ऋतुगंध वसंत वर्ष १३ अंक १
मानवी मन हे अत्यंत गूढ, अजब रसायनांनी भरलेली एक पोतडी आहे असे म्हणतात. त्याच्या आत काय आहे ह्याचा थांगपत्ता आजही आधुनिक मानसशास्त्रज्ञांना लागलेला नाही. त्या मनाची प्रेम ही भावना हा या ऋतुगंध अंकाचा विषय आहे. कोणत्यातरी आंतरिक हेतूमुळे वस्तू वा व्यक्ती एकमेकांकडे आकृष्ट होतात. कुठल्याही बाह्य गुणांवर हे प्रेम अवलंबून राहात नाही. ‘व्यतिषजति पदार्थानांतर: कोऽपि हेतु: | न खलु बहिरुपाधीन् प्रीतय: संश्रयन्ते ||’ असे महाकवी कालिदास ‘मालविकाग्निमित्रम्’ या नाटकात म्हणतो. हेच ‘हृदयी प्रीत जागते, जाणता अजाणता’ या शब्दात मराठी कवी म्हणतात. एखाद्या व्यक्तीवर, वस्तूवर, कलेवर, पाळलेल्या प्राण्यावर, तत्त्वप्रणालीवर आपण प्रेम करतो. कधी ते हेतूपूर्ण असते तर कधी निर्हेतुक असते असे वाटते. प्रेम ही संकल्पना खरे तर अशीच गूढ राहिली तर त्यात मजा आहे. त्याचे विश्लेषण केले तर प्रेमिकांचा आणि रसिकांचा नक्कीच रसभंग होईल. पण भारतीय तत्वज्ञांनी त्यावर गंभीर पणे विचार केला आणि त्यातून प्रेम ही वृत्ती आणि तिचा अनुभव जेथे येतो त्या मनाचे जास्तीतजास्त विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. याबाबत काही मते मांडण्यास मी असमर्थ असल्याने संत किंवा इतर विचारवंत काय म्हणतात आणि त्यातून काही बोध होतो का ते पाहण्याचा प्रयत्न करतो.
या मनामुळेच आपल्याला मानव ही संज्ञा प्राप्त झाली. जोपर्यंत जगणे आणि मरणे याच दोन बिंदुंमध्ये आणि आहार निद्रा भय मैथुन या नैसर्गिक प्रेरणांपुरते मानवी जीवन सीमित होते तोंपर्यंत मनुष्य आणि इतर प्राणिमात्र यात फरक नव्हता. उत्तरोत्तर शरीराबरोबर मनाचाही विकास होत होत वात्सल्य, प्रेम, करुणा, भक्ती, त्याग इत्यादी भावनांच्या विविध छटांनीं त्याच्या जीवनाला नवीन अर्थ निर्माण झाले. मातेचे वात्सल्य, प्रेयसीचे प्रेम, दु:खी जीवांबद्दल वाटणारी करुणा, अनंतकोटी ब्रह्मांडाचे चक्र अविरत प्रवर्तित करणाऱ्या त्या परात्पर शक्तीबद्दल भक्ति, इतरांसाठी त्याग इत्यादीनी जगण्यातला एक वेगळा आनंद प्रत्ययाला येऊ लागला. शारीरिक मीलनातून मनोमीलन आणि त्यातून अनघ प्रीतीचा मंगल साक्षात्कार होऊ लागला. त्यावेळी मानवी जीवन खऱ्या अर्थाने सुरभित झाले. निरपेक्ष त्याग, सर्वांशाने निरभिलषित सर्वस्वाचे समर्पण म्हणजे कधीही नष्ट न होणारी प्रीती ! भारतीयांचे प्रीतीचे अमर तत्त्वज्ञान असे आहे. (गायत्री विज्ञान आणि साधना – श्रीपादशास्त्री किंजवडेकर)
पण त्याच वेळी हेही लक्षात येते की विनाश हा देखील या सृष्टीचा अविभाज्य गुण आहे. ‘कामस्तदग्रे समवर्तताधि’ असे सृष्टी उत्पत्तीचे कारण नासदीय सूक्ताचे ऋषी सांगतात. प्रेमातून विश्वाची उत्पत्ती आणि प्रेमाने सांभाळ हे तत्त्व जितके खरे तितकाच विनाश हा देखील सत्य आहे. जोपर्यंत सर्व सुरळीत आहे, सुखद आहे तोपर्यंत ठीक. पण तीच प्रेमास्पद व्यक्ती, वस्तू वियोगाने, काही कारणाने क्लेशदायक ठरली तर किंवा आपल्या मनाविरुद्ध घटनेमुळे तीच अत्यंत द्वेषाची वस्तू किंवा व्यक्ती बनते. मग आपण दुसरी प्रेमास्पद वस्तू वा व्यक्ती शोधू लागतो. आईच्या कडेवर असलेले थोडे मोठे झालेले मूल कोणी त्याला ‘भुर्र जाऊ’ म्हटले की लगेच त्याच्याकडे झेप घेते. पुढे खेळापुढे आई आवडेनाशी होते. पुढे प्रेमास्पद गोष्टी आणखी बदलत जातात. प्रेमविवाहात बद्ध झालेलेही पुढे सहजगत्या वेगळे होतात असे दिसते. हे वास्तव नाकारता येत नाही. दृश्य जगातील सर्वच गोष्टी नाशिवंत आणि द्वंद्वात्मक असल्याने सुखाबरोबर दु:ख वाढून ठेवले आहे. त्यामुळेच सुखाला चव आहे असे आपण म्हणू फार तर.
पण ‘एक धागा सुखाचा शंभर धागे दु:खाचे’ अशी पळवाट न काढता अध्यात्मशास्त्र कायमच्या सुखाचा विचार करते. नैसर्गिक असलेले हे प्रेम जरी दृश्य जगातील गोष्टीमधून अनुभवायला येत असले तरी त्याचा उगम सद्रूप-चिद्रूप-आनंदरूप आत्मस्वरुपाच्या ठिकाणी आहे असे अध्यात्म शास्त्रातील तर्काने आणि आपल्या अनुभवाने सिद्ध होते. ते आत्मतत्त्व नाम-रूपात्मक सृष्टीच्या रूपाने आकाराला येते आणि अस्ति-भाति-प्रिय अशा प्रकारे आपल्या अनुभवाचा विषय होते. त्याच्या अनुभवासाठी पंच ज्ञानेंद्रिये, त्याच्या प्राप्तीसाठी पंचकर्मेंद्रिये आणि अनुभवासाठी मन-बुद्धी युक्त अंत:करण निर्मात्याने आपल्याला दिले आहे. खरे तर अस्ति-भाति-प्रियत्व हे आपले मूळ स्वरुप आहे. आपल्याला सतत असावे असे वाटते, एखाद्या गोष्टीबद्दलचे अज्ञान स्वस्थ बसू देत नाही आणि आपण आपल्याला कधीच अप्रिय होत नाही. सर्व मनुष्यजात आनंदरूप अशा माझे स्वभावत: भजन करीत असतात असे भगवंत ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. नास्ति-अज्ञान-आणि अप्रिय गोष्टी स्वभावत: आवडत नाहीत. पण तरी या द्वंद्वात्मक जगतात अस्ति चे नास्ति, ज्ञानाचे अज्ञानात आणि प्रियत्वाचे द्वेषात रूपांतर होणे हे वास्तव आहे
लौकिक प्रेमाचे विषय व्यक्ती आणि वस्तू असतात. खोलवर विचार केल्यावर त्यांच्यावरील आपले प्रेम आणि त्यांचे आपल्यावरील प्रेम स्वभावत: स्वार्थी असल्याचे लक्षात येते. त्या प्रेमाला कितीही गोंडस नावे दिली तरी त्यातील स्वार्थ समजायला वेळ लागत नाही. याज्ञवल्क्य ऋषींनी याविषयी स्पष्ट निर्णय दिला आहे. बृहदारण्यक उपनिषदातील हा संवाद पती-पत्नीमधला आहे. याज्ञवल्क्याला दोन पत्नी आहेत. संन्यास घेण्यापूर्वी आपली संपत्ती त्याने दोघीत वाटली, तेव्हा त्याची एक पत्नी मैत्रेयी विचारते, ही संपत्ती घेऊन मला अमृतत्वाची प्राप्ती होईल का? ज्या अर्थी सर्व संपत्तीच्या त्याग करून तुम्ही संन्यास घेता आहात त्या अर्थी काही तरी अधिक मौल्यवान गोष्टीकरिता आपण संन्यास घेत आहात. तेव्हा याज्ञवल्क्य म्हणाले ‘तुझ्या या विचारांमुळेच तू मला प्रिय आहेस’. असे म्हणून याज्ञवल्क्य तिला फर मोठे तत्त्वज्ञान सांगतात, आपल्या आत्म्याकरिता सर्व आपल्याला प्रिय असतात. ‘आत्मानास्तु कामाय सर्वं प्रियं भवति |’ (बृह. २.४.५). आपल्यावरील प्रेमामुळेच सर्व प्रिय असतात. याचा सरळ अर्थ असा की माणसाचे स्वत:वर प्रेम असते व बाह्य विषय वा व्यक्ती स्वत:ला अनुकूल असल्या तरच त्यांच्याविषयी प्रेम वाटते. काही गोष्टी असल्याने तर काही त्यांच्या नसण्याने प्रिय असतात. याज्ञवल्क्याने अशा सर्व व्यक्तींची यादीच दिली आहे. माता, पिता, पती, पत्नी, पुत्र, कन्या इत्यादी सर्व परस्परांना प्रिय असतात ते स्वत:वरील प्रेमामुळेच. आपल्या अहंकाराला धक्का लागला की प्रिय व्यक्ती वैरी होतात. अमृतत्त्वाची प्राप्ती त्या आत्म्याला जाणल्याने होईल. पुढे त्याचे उपाय ते मैत्रेयीला सांगतात.
वरील सर्व नात्यात मातेचे अपत्यावरील प्रेम सर्वश्रेष्ठ आहे याबद्दल प्रश्नच नाही. पण कुंतीच्या उदाहरणात याज्ञवल्क्यांचा सिद्धांत लागू पडतो. कैकेयीने तिचा पती असलेल्या दशरथाला अपरंपार दु:खात लोटले कारण दशरथापेक्षा भरत तिला स्वत:साठी प्रिय होता. बहुतेक सर्व नाती एकमेकांना सांभाळून राहातात कारण सर्व संबंधितांचे आधी स्वत:वर प्रेम असते. कोणा एकाच्या हितसंबंधांना धक्का लागला की नाती तुटायला अल्प वेळ पुरतो. परोपकार करणारी व्यक्तीसुद्धा स्वत:ला समाधान मिळते म्हणून परोपकार करते. संतांमध्येदेखील अत्यंत उन्नतावस्थेमध्ये हीच प्रेरणा काम करते. ‘बुडती हे जन देखवेना डोळा | येतो कळवळा म्हणोनिया ||’
म्हणून अध्यात्मशास्त्राने आपल्या अंतरंगात खोल शिरून आपल्या अनुभवाचा साक्षी असलेले ते तत्त्व समजावून देण्याचा प्रयत्न केला. आपली नैसर्गिक प्रेमाची प्रेरणा बाह्य वस्तूंकडून अंतरंगाकडे वळवली आणि भक्तिशास्त्राचा उदय झाला. जगन्नियंत्या ईश्वराच्या रामकृष्णादी सगुण साकार अवतार तसेच अंतरीच्या आनंदघन रामाच्या प्रेमाचे एक परिपूर्ण शास्त्र निर्माण झाले. भक्तीची व्याख्या करताना देवर्षी नारद म्हणतात ‘सा तु अस्मिन् परमप्रेमरूपा ||’ (ना.भ.सू. २). भगवद्प्रेमाने भरून गेलेले अंत:करण हे भक्तीचे मुख्य साधन आहे. भक्ती व प्रेम हे दोन समानार्थी शब्द आहेत. प्रेम ईश्वराकडे वळले की भक्ती होते. जोपर्यंत अंत:करणात लौकिक विषय घर करून बसलेले असतात तोपर्यंत या अलौकिक प्रेमाला अवसर मिळत नाही. ईश्वर निर्दय, पक्षपाती किंवा लहरी नाही. पूर्वकर्माप्रमाणे प्रारब्ध ही त्याची व्यवस्था आहे तो पूर्ण न्यायी, कृपाळू, भक्तप्रतिपाळक असल्याने त्याच्यावरच प्रेम करावे. ‘त्याचा महिमा कळेल कोणाला | माता वाटून कृपाळू झाला |’ असे त्याविषयी समर्थ म्हणतात. ‘समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रिय: | ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम् ||’ सर्वांच्यासाठी मी समत्वाने असलो तरी माझे भक्त मला अधिक प्रिय असतात असे गीतेमध्ये भगवंतांनी वारंवार सांगितले आहे. त्याच्या फार मोठ्या अपेक्षा नाहीत. केवळ स्मरण पुरे आहे. प्रेमाने अर्पण केलेले पत्र, पुष्प, फळे, पाणी सुद्धा तो आनंदाने स्वीकारतो. काही अर्पण केले नाही तरी प्रत्येकाचे जीवन व्यवहार तो अंतरात राहून चालवतो. ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ असा तुकाराम महाराजांचा अनुभव आपणही घेऊ शकतो. संत तर त्याच्याशी अत्यंत प्रेमाने भांडले देखील आहेत.
असुरपुत्र प्रल्हादाच्या तोंडून त्याने आपल्याकरिता नवविधा भक्ती सांगितली. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, निर्माण होते व पुढे आत्मनिवेदन भक्तीचे भाग्य उदयाला येते. शबरीचे निमित्त करून स्वत: श्रीरामांनी ही नवविधा भक्ती सांगितली. ‘देवाच्या सख्यत्वासाठी | पडाव्या जिवलगांच्या तुटी |’ आणि प्रसंग आलाच तर ‘प्राण तोही वेचावा |’ असे संतांनीसांगितले आणि स्वत: आचरुन दाखविले. समर्थांनी दासबोधात नवविधा भक्तीवर विस्तृत निरुपण केले आहे ते याच साठी.
भक्ती प्राप्त झाली असता तृप्ती, आनंद व उत्साह अनुभवाला येतो. सर्व कर्मे भगवदर्पण बुद्धीने करणे व त्याचे विस्मरण होताच व्याकूळ होणे याला भक्ती म्हणावे. ज्ञानेश्वर महाराजांच्या विरहिण्या, किंवा ‘कावो रामा माये दुरी धरीयेले’ ही समर्थांची आळवणी बोलकी आहे. असे अर्पण, स्मरण आणि विस्मरणातील व्याकुळता कोठे प्रकर्षाने पाहावयास मिळेल तर व्रजगोपींमध्ये असे नारदमुनी पुढे आपल्या सूत्रात म्हणतात. गोपी भक्तीचा हा सर्वात वरचा मानदंड समजला जातो. तुमच्या या प्रेमाचे ऋण मी अनेक जन्म घेतले तरी फेडू शकणार नाही अशी श्रीकृष्णाने त्यांना कबुली दिली. आपले प्रेम गोपींच्या एकनिष्ठ भावाच्या कसोटीवर तपासून पाहावे. गोपींच्या प्रेमामुळे मधुराभक्तीचा संप्रदाय उदयाला आला. संत तुकाराम महाराजांनी देखील यावर अनेक अभंग रचले आहेत.
भक्तिशास्त्र आपल्या प्रेमाचा ओघ विष्णूकडे किंवा आपल्या आराध्य दैवताकडे वळवावा. समर्थ म्हणतात, ‘सदा सर्वदा प्रीति रामी धरावी | सुखाची स्वये सांडी जीवी करावी ||’ सर्व संबंधितांतही विष्णूरूप पाहून आपली कर्तव्ये प्रसन्न चित्ताने पार पाडावीत. त्यात कोरडेपणा अथवा तुटकपणा येऊ देऊ नये. सर्वांचे अधिष्ठान विष्णू असले तरी सर्वजण त्रिगुणात्मक असल्याने त्या गुणांनुसार त्यांचे आपल्याशी वागणे असणार आहे. हे लक्षात घेऊन त्याकडे दुर्लक्ष करावे म्हणजे आपली मन:शांती बिघडणार नाही. संतांचे आणि भगवद्गीतेतील विचार अल्प बुद्धीने मांडण्याचा प्रयत्न केला. पुढील अंकापासून नवविधा भक्तीचा अधिक विचार क्रमाने करुया.
-श्रीकांत जोशी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा