अध्यक्षांचे मनोगत

ऋतुगंध वसंत वर्ष १३ अंक १

सप्रेम नमस्कार ! प्रथम, ऋतुगंधच्या सर्व वाचकांचे आणि मंडळाचा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम अनेक वर्ष यशस्वीपणे राबवणाऱ्या कार्यकर्त्यांचे अनेक आभार. सर्वांना हिंदू नवर्षाच्या शुभेच्छा !

यंदा मंडळाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. मंडळ २५ वर्षांचे झाले..! पहिल्या कार्यकारिणीत रूजू झाल्यापासून,मधे अनेक व आजच्या पंचविसाव्या कार्यकारिणीत येईपर्यंत - एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून - माझाही प्रवास तितकाच दीर्घ आहे हे सत्य, मनाला विलक्षण वाटले..! मंडळाने आपल्या कारकिर्दीच्या वसंत ऋतूत प्रवेश केला असे म्हणावे तर ते योग्य नाही. कारण अशा संस्थांना मानवी आयुष्यासारखे सहा ऋतूंच्या चक्रातून जावे लागू नये. आपल्या महाराष्ट्र मंडळात सदैव वसंत ऋतूच रहावा ही माझी इच्छा आणि प्रार्थना आहे.

वसंत हा या वर्षातला पहिला अंक. बसंत बहार या खूप जुन्या हिंदी चित्रपटातील गाणे आठवले.

केतकी गुलाब जूही चंपक बन फूले । ऋतुबसंत अपने कंठ गोरी गरवा लगाएं ।

झूलना में बैठ आज पीके संग झूले । ........... पं.भीमसेन जोशींचा शास्त्रीय संगीतातील त्याच रागाशी एकनिष्ठ, खडा आणि निर्मळ स्वर आणि त्याच शब्दांचे मधूर स्वरूप, चित्रपटाच्या नायकाने दाखवून बादशाहच्या दरबारात स्पर्धा जिंकली, असा प्रसंग उभा करायला मन्नादांचा स्वर. ह्या गाण्याच्या वर्णनातील त्या प्रेयसी प्रमाणेच मंडळाने २०१९ ह्या वर्षाचा आनंदोत्सव साजरा करावा असा मानस आहे. अर्थात मंडळाचे सूत्र “संपर्क, संवाद, सहवास” याच्याशी, आपल्या भाषा/संस्कृतीशी व सर्व कलाप्रकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्दिष्टांशी एकनिष्ठ राहूनच....! त्या अजरामर झालेल्या गाण्यात अभिव्यक्त झालेला विषय, या अंकाप्रमाणेच प्रेम हाच आहे! फक्त मंडळाचे/सभासदांचे मराठी संस्कृतीवरचे प्रेम आणि ते प्रेम “same” नाही...!

आपल्याला माहीतच आहे की मंडळाचा कारभार हा मुख्य तीन पाठबळांवर चालतो. एक म्हणजे सभासदांचा व हितचिंतक/प्रेषकांचा सक्रिय पाठिंबा आणि सहभाग, दुसरे मंडळाच्या कार्यकारिणीतील सदस्य ---- केवळ मराठी संस्कृतीच्या आत्मीयतेपोटी आणि त्यातून मिळणाऱ्या सामाजिक समाधानासाठी स्वत:चा अमूल्य वेळ देणारे का.का. सभासद आणि तिसरे, याच प्रेरणेने मंडळाच्या विविध कायमस्वरूपी उपक्रमांसाठी सातत्याने वेळ देणारे स्वयंसेवक.. हे सर्व कार्य बरेचसे रंगमंचा-मागचेच असते; त्याची फलश्रुती आपण पाहता ती मंडळाच्या विविध माहिती आणि प्रसिध्दी माध्यमांद्वारे व सादर होणाऱ्या कार्यक्रमांद्वारे. या तिन्ही घटकांना व खास करून ही जबाबदारी पेलणाऱ्या का.का. सद्स्यांना तुमचे सहकार्य, प्रोत्साहन व कौतुक आणखी प्रेरणा देते हे महत्वाचे.

मंडळाच्या आगामी कार्यक्रमांमधे विशेष उल्लेख करण्यासारखे म्हणजे दिनांक २/३/४ ऑगस्ट रोजी योजिलेला रौप्यमहोत्सवी सोहळा. शुक्रवारी सायंकाळी सुरू होणाऱ्या या महोत्सवात, नाटक, संगीत, साहित्य, नृत्य या सर्वांचा समावेश असेल व भारत, हाँगकाँग, थायलंड, मलेशिया येथून आमंत्रीत आणि सहभागी होणारे पाहूणे असतील ही अपेक्षा आहे.

मंडळाच्या २५ वर्षांत एक अत्यंत मह्त्वाच्या प्रश्नाने माझ्या मनात घर केले होते. मी प्रथम जेव्हा मंडळाच्या पहिल्या कार्यकारिणीत आलो तेव्हां माझे वय विशीच्या आसपास होते. आज आयुष्याच्या वसंतात प्रवेश केलेल्या बऱ्याच मुलांचा मी “काका” झालो आहे. पण पहिल्या ‘कमिटीत’ एक तरूण कार्यकर्ता (कार्यकारिणी कार्यकर्ता उर्फ “का.का”) आणि आज एक पिढी उलटल्यावर, कार्यकारिणीत खरंच अध्यक्ष “का.का”...! चौथ्यांदा मंडळाचा अध्यक्ष होताना ही बाब अगदी मनात चमकली..! माझ्या मनात घर केलेला प्रश्न आहे की सिंगापूर मधे वाढलेल्या आमच्या नंतरच्या पिढीला मंडळाच्या उद्दिष्टपुर्तीत व कार्यात कसे सामावून घ्यायचे, त्यांना मंडळाच्या पुढच्या २५ वर्षांच्या वाटचालीकरिता कसे प्रेरित करायचे, तयार करायचे!?

बऱ्याच विचारांती एक मार्ग सुचला आणि मी तो लगेच चोखाळला. संपर्क/संवाद झाला. १५ ते २५ वर्षे या वयोगटातील मुलांचा एक समूह तयार झाला. हे मंडळाचे “अरुण-तरुण” ! ह्यात आपली जबाबदारी आणि मंडळाच्या उद्दिष्टांची जाणीव असलेले व त्याकरिता उत्साहाने स्वयंसेवक म्हणून पुढे आलेले जवळ जवळ ३० अरुण व तरुण आहेत........म्हणून “अरुण-तरुण” ! मंडळाच्या सर्व उपक्रमांना, कार्यक्रमांना यांचा हातभार तर महत्वाचा असणार आहेच परंतू मंडळाच्या भविष्याला ह्याच समूहाने आकार द्यायचा आहे, मंडळाला मराठी भाषा व संस्कृतीच्या संवर्धनार्थ सांभाळायचे आहे. अरूण तरूणांचा उत्साह दांडगा आहे, निर्धार पक्का आहे उद: त्यांनी मला promise केले की ते सर्व एकमेकांशी मराठीतच बोलणार....मी तथास्तू-सुखिनःसंतू म्हट्ले आहे...!

मंडळी, तर असे हे “म.मं.सिं” रौप्यमहोत्सवी वर्ष सुरू झाले आहे. मंडळाच्या रूपरेषेत, कार्यकारिणीने अनेक कार्यक्रम योजले आहेत. आपले हितचिंतक व प्रेषक, GIIS शाळा व आपल्या वाचनालयाच्या बाबतीत अजून काही बदल अपेक्षित आहेत. आपणा सर्वांच्या सहभागाने, सहकार्याने या वर्षीचे सर्व कार्यक्रम, उपक्रम अत्यंत यशस्वी होतील याची खात्री व्यक्त करतो.

अध्यक्ष्यांच्या मनोगताची ऑडिओ क्लिप  ऐकण्यासाठी येथे क्लिक करा:



आपला सस्नेह,
संतोष अंबिके

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा