दु:ख - मानावे तसे


दुःख, नैराश्य, वेदना हे शब्द आपण कीत्येकदा एकामागून एक, एकाच वाक्यात, एकाच संदर्भात वापरतो. दुःखामुळे नैराश्य येते का नैराश्यामुळे दुःख होते? वेदनेमुळे दुःख होते का दुःखामुळे वेदना होतात? बर वेदना ही फक्त शारीरिक, मानसिक की दोन्हीही? शारीरिक वेदना झाल्या तर मनालाही वेदना होतातच की आणि मनातील वेदनांचा शरीरावर परिणाम होतोच होतो. तीच गत नैराश्याची, मनातील नैराश्यामुळे शरीरावर शिथिलत्व पसरतेच आणि शारीरिक निरीच्छेमुळे मनावर मळभ जमते.

दुःख, नैराश्य, वेदना हे प्रकाशासारखे आहे का, की जिथे प्रकाश नाही तिथे अंधार. म्हणजे अंधार असा वेगळा अस्तित्वात नसतोच. प्रकाश नाही म्हणून त्याला अंधार म्हणायचा. मग जिथे सुख नाही तिथे दुःख असे असते का? का सुखाच्या अभावालाच दुःख म्हणायचे? पण ते तितके साधे, सोपे नाही. बरेचदा सुख असले म्हणजे दुःख नसतेच असे नाही. सुख असले तरीही कुठेतरी दुःख सुद्धा असतेच. संपूर्ण सुख असे अस्तित्वात असल्याचे मलातरी वाटत नाही की सर्वसामान्य माणसांपैकी कुणी अनुभवले असेल. अर्थात दुःख आहे म्हणून अजिबात सुख नाही असेही फारसे आढळत नाही. थोडक्यात काय तर सुख आणि दुःख बहुतेक वेळा जोडीने बरोबरीने नांदत असल्याचे दिसते. प्रत्येकाच्या आयुष्यात काही काही गोष्टी सुखाने चाललेल्या असतात तर काही काही बाबतीत दुःखच भरलेले असते. दुर्दैव असे की त्या सुखांनी आपल्याला जेव्हढे सुख मिळते त्याच्या कीत्येक पटींनी त्या दुःखांमुळे दुःख होते.

मृत्यू ही दुःखाची परमावधी असू शकते का? का मृत्यू हा दुःखाचा अंत असु शकतो? का जो जातो त्याच्या दुःखांचा अंत आणि जो मागे रहातो त्याच्या दुःखाची परमावधी? अर्थात व्यक्तीनुसार – जाणाऱ्या आणि मागे राहणाऱ्या , परिस्थिती आणि प्रसंगानुसार एखाद्याचा मृत्यू, हे सुख आहे का दुःख आहे, हे वास्तव अवलंबून रहाते. अर्थात वास्तव म्हणायचे की कल्पना? कारण सुख आणि दुःख हे मानण्यावर असते असे म्हणतात ना!

सुख हे मानण्यावर असते असं म्हणतात, मग तसंच दुःख हे सुद्धा मानण्यावरच असते का? काही कारणाने एखाद्याने एक पाय गमावला तर दुसरा पाय तरी शाबूत आहे ह्याला सुख मानणे म्हणतात का? तसे असेल तर मग दुसरा पाय शाबूत असताना, एक पाय गमावला म्हणून दुःख झाले तर ते मानल्यामुळे झाले असे होईल का?

माझी आजी नेहमी म्हणायची की ‘सुख हे मानण्यावर असते’. मला आजीचे हे म्हणणे काही केल्या पटायचे नाही. मी म्हणायची की आजी एखाद्याच्या हाताला थोडेसे खरचटले किंवा थोडेसे लागले, थोडे रक्त आले आणि जर का तो माणूस त्या गोष्टींचा खूपच मोठा बाऊ करायला लागला तर तुझे हे म्हणणे ठीक आहे की जी दुखापत झाली आहे त्यावरून दुःख करायची काही गरज नाही, उलट जास्ती लागले नाही म्हणून सुखच मानले पाहिजे. म्हणजेच ‍‌‍‌‍‍‍‍‌‌‌‌पर्यायाने ‘सुख हे मानण्यावर’ असते. पण मग मी आजीला विचारायची, आजी पण हेच जर एखाद्याचा अक्सिडेट मधे एक पायच गमावला गेला तर त्याला सुद्धा तू ‘सुख हे मानण्यावर असते’ असे सांगणार का? तुझा एक पाय जरी तू गमावला असशील तरी तू त्यात ‘सुख मान’ ह्या म्हणण्याला काय अर्थ राहील आजी. आपण कोणत्या तोंडाने त्या व्यक्तीला असे म्हणू शकू? तेंव्हा आजीने मला त्याचा खरा अर्थ सांगितला.

आजी म्हणाली ‘सुख काय किंवा दुःख काय , हे मानण्यावर असते’ ह्याचा खरा अर्थ तुम्हाला आहे त्या परिस्थितीत आयुष्य जगण्याचे बळ देणे असा आहे. एक पाय गमवला म्हणून दुःख मानलेत तर आयुष्यभर दुःखी रहाल , गेलेल्या पायाचाच फक्त विचार करत बसाल , त्यातून कधीच बाहेर पडू शकणार नाही, जिवंत असाल पण जगणे सोडाल, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मग आहे त्या एका पायाचाही विसर पडेल , त्याचा वापर करता येईल हेही उमगणार नाही. त्या उलट एक पाय गमावला तरी दुसरा पाय शाबूत आहे, सक्षम आहे ह्याचे जूर ‘सुख मानले’ तर त्या एका पायावर का होईना पण हिमतीने उभे राहायला, चालायला, स्वावलंबी व्हायला शिकाल. पर्यायाने जगायला शिकाल, असा त्याचा अर्थ आहे. म्हणूनच ‘दुःख मानायचं नाही’ तर ‘आहे त्यात सुखच मानायचं’ असं शिकवलं जाते कारण मगच आयुष्य चालू राहील, आयुष्य जगायची इच्छा होईल, त्यासाठी लागणारी ताकद गोळा करता येईल. देवाची इच्छा, विधिलिखित वगैरे वगैरे कल्पना सुद्धा आहे त्या दुःखद परिस्थितीची काही कारणमीमांसा देता यावी म्हणून, किंवा कुठेतरी हे दुःख थांबेल असा आधार, विश्वास मिळावा म्हणून देत असतील.

जेंव्हा सुख माना असे म्हणतात, तेंव्हा दुःख मानूच नका असे कोण म्हणतो. झाल्या गोष्टीचे दुःख होणे स्वाभाविकच आहे, ते होतेच आणि जरूर करावे. त्याने दुःखाचा भार हलका व्हायला ,मदतच होते. फक्त हे दुःख कीती काळ करायचे, त्याचा काय, कशावर, कोणावर काय काय परीणाम होतोय याचे भान राहिले पाहिजे. दुःखाचा निचरा झाला की आयुष्याची पुढची वाटचाल करण्यासाठी उभारी धरता येते आणि मग मात्र ‘आहे त्यात सुख मानायचे’ ह्या गुरुमंत्राच्या जोरावरच येईल त्या प्रसंगाला ‘सुखाने’ सामोरे जाता येते. आणि मग एक वेळ अशी येते कि खरचच सुख हे ‘मानायला नाही लागत’ तर खरंच सुखी ‘व्ह्यायला’ होत.

अर्थात हे म्हणणे जितके सोपे आहे त्याच्या कीत्येक पटींनी करणे अवघड आहे अगदी अशक्य वाटण्या इतके अवघड. पण मग म्हणूनच स्वतःची स्वतःला ह्या गुरुमंत्राची सतत आठवण करून द्यायची की ‘सुख काय आणि दुःख काय, हे सगळे मानण्यावर असते’!

योगिनी लेले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा