अहो झाली का व्यवस्था? कधी ऍडमिट करायचं आईंना? तिथे चांगली देखभाल होईल त्यांची....इति: सुनबाई. हो गं, या वयात ठणठणीत असलेलं बरं. मलाही घाई झालीय तिला पाठवायची अशी लेकानेही री ओढली. गुडघ्यासाठी बामची नवी बाटली आण हे सांगायला म्हणून गेलेली ती हे संभाषण ऐकून मागे फिरली.
नवऱ्यापुढे जाऊन काकुळतीने तिने विचारलं...एव्हढी का जड झालीय मी की मला आता आश्रमात टाकणार? मी सांगितलं होतं ना की मरू दे मला असचं...असं म्हणत तिने डोळ्याला पदर लावला.
अप्पा पेपर दूर सारत बोलले ....गप्प बस गं. काहीतरी बोलू नको. आणि तुला काही कायमची पाठवत नाही आहोत. फक्त पायाच्या ऑपरेशननंतर विश्रांती मिळावी म्हणून महिनाभर ठेवणार आहेत.
पण मी म्हणते घरी का नको? सुनबाईला तर मी नकोच आहे. शाळेचं कारण सांगून बरी सुटका करून घेतेय. पण मी म्हणते लेक तर आपला आहे ना? त्यानेही असं टाकून दिल्यासारखं करावं? माझ्या नशिबी सुखं नाही हेच खरं....असं म्हणत ती ओक्साबोक्शी रडू लागली.
अप्पांचा आवाज चढला...काय अपेक्षा आहे तुझी तिने नोकरी सोडावी आणि त्याने पायाशी बसावं? अगं, त्या सेन्टरमध्ये रग्गड पैसे भरलेत त्या दोघांनी. का तर तुला आराम मिळावा, तू लवकर बरी व्हावीस. सगळचं कसं गं निगेटिव्हली घेतेस. जरा डोकं चालवं. कायमचं तुझा आपला हेकेखोरपणा.
आवाज ऐकून ऑफीसच्या गडबडीत असलेले सून आणि लेक धावतच आले. तिने अपेक्षेने लेकाकडे बघितलं तर काय गं आई समजून घे ना एव्हढचं तो बोलला आणि घराबाहेर पडला. अहो नाश्ता तरी....हे सुनबाईचे शब्द हवेतच विरले. अप्पा-आई तुमचा नाश्ता आणि जेवण झाकून ठेवलयं. पिलूचा खाऊ वेगळा डब्यात ठेवलाय आल्यावर त्याला द्या. अस म्हणून सुनही जास्त काही न बोलता आवराआवर करून शाळेत गेली.
अप्पा करदावले ....बघ गेली ना ती दोघं खंतावून. किती करतात ते मायेने, जरा गोडीने घे. मान्य आहे मला, माझ्या घरात तुला तुझ्या मनासारखं वागायला नाही मिळालं म्हणून तु त्यांचपण सुखं हिरावून घेणार का? अगं एव्हढी कडू झालीस तर वेगळी होतील दोघं मग बस रडत. अशी दोघांची चांगलीच जुंपली.
सरतेशेवटी हो मीच, मीच वाईट आहे ना. जातेच कशी निघून असं म्हणत ती बाहेर पडली. पावलं आपोआपच नवीनच रहायला आलेल्या बालमैत्रिणीकडे वळली. मनात स्वतःची आणि मैत्रीणीची तुलना चालूच होती. मैत्रिणीकडे सगळं कसं बैजवार होतं. मुंबईत राहणारा मुलगा-सून आठवड्याला भेटून जातात. घरात कामाला गडी, बाहेरून तयार डबा. महिन्याचा महिन्याला डॉक्टर घरी येऊन बघून जातो. कसलीच काळजी नाही.
सून, नातवंडपण बरी आहेत. भेटली होती एकदा दोनदा. सून कुठे कुठे फिरायला जाते तिथून आवर्जून सासूसाठी काहीबाही आणते. भेटायला येतानाच हॉटेलचे काय काय चमचमीत पदार्थ घेऊन येते. मजा असते तिची. नातवंड लहान आहेत पण धांगडधिंगा कसा तो नाही. कस अगदी सुंदर चित्रातल्यासारखं.
आणि दिवाणखाण्यात लावलेल राजहंसाच चित्र कुठूनसं लांबच्या देशातून आणलय म्हणे तिनं. किती बाई जिवंत ते. अशी हौस मौज हवी. नाहीतर आपलं...ह्याही वयात रांधा, वाढा आणि उष्टी काढा.
हे स्वगत चालू असतानाच ती मैत्रिणीच्या घराजवळ पोहचली तर कानावर नानांचा चिडलेला आवाज आला. अरे काय पैसा दिला म्हणजे झालं का? इथे आल्यावरही हॉटेलमध्ये उतरल्यासारखे वावरतात. त्या पोरांना तर बिलकुल आपला लळा लागू दिला नाही आहे.....
अगं बाई, एकादशीच्या घरी महाशिवरात्र झालं की असा विचार करत ती फाटकाजवळच घुटमळत राहिली. तेंव्हाच नानासाहेब तणतणत तिच्याकडे दुर्लक्ष करत निघून गेले. मग ती हळूच घरात शिरली. उगीचच तिचं लक्ष त्या तसबिरीकडे गेलं. आज राजहंस काही रुबाबदार वाटत नाहीये बाई, अस तिला उगाचच वाटून गेलं.
ये बाई, ऐकलस...काय करू सांग आता...असं म्हणत मैत्रीण स्फुंदू लागली. काही नाही गं, सब घोडे बाराटक्के असा तिनही गळा काढला.
काही सांगू नकोस. एव्हढे दिवस बोलले नाही तुला पण आज सांगते. तु नेहमीच सून आणि लेकाच रडं गातेस. तु शांत व्हावीस म्हणून नेहमीच तुझं ऐकून घेत होते. पण आमची परिस्थिती त्याहून बिकट हो. हसून साजरं करतोय झालं.
मुलांच्या पंखात बळ दिलं मग आता उडाली म्हणून रडायचं कशाला गं? आमचं आयुष्य कसं त्या हंसाच्या जोडीसारखं छान सुरेखच वाटतंय सगळ्यांना पण ते हंस माना वर करून अश्रू ढाळतायत हे कुणालाच दिसत नाही.
पैसा, वैभव, सुबत्ता सगळं विपुल आहे पण प्रेमाला महाग झालो आहोत. मुलगा, सून, नातवंड येतात पण पाहुण्यांसारखी. वाटतं गं, मुला नातवंडाना दोन घास बनवून घालावे पण डाएट आणि हायजिनच्या नावाखाली टाळतात. पण येताना हॉटेलातून ढीगभर आणतात ते गोड मानून घ्यावं लागत. काही काम नाही बघ. दोन वेळचा डबा येतो. नको नको म्हणत असताना सुद्धा लोकं काय म्हणतील आम्हाला म्हणून सुनेनं गळ्यात मारला आहे. पचत नाही ग आताशा सगळं पण गुपचूप दिवस ढकलतोय. नातवंडतर जवळ सुद्धा येत नाहीत लांबूनच हाय बाय करतात. खूप वाटत त्यांनी घरात हैदोस घालावा, आरडाओरड करावी, पदराखाली लपाछपी खेळावी. मटामटा त्यांचे मुके घ्यावेत पण यातलं काहीच घडत नाही.
खूप दिवस झालेत कुलदैवताला जाऊन यावं म्हणते. देवाचा कधी निरोप येईल सांगता येत नाही म्हणून आधीच भेटून घ्यावं वाटत. ह्यांना देश विदेश फिरायला वेळ आहे पण आम्हाला देवाला घेऊन जायला नाही. धडधाकट आहेत तोवर आम्ही आमचं जातो म्हणालं तर ते हि नाही. सगळ्यातच मोडता घालतात. का तर लोक काय म्हणतील. पिंजऱ्यात ठेवल्या सारखं वाटत बघ.
आता कितीही उगाळला तरी कोळसा काळाच आणि त्यात आपलेच ओठ अन आपलेच दात काय सांगावं.
पण भरल्याघरात तू का वागतेस ग अशी? आज आला होता तुझा लेक. तसा नेहमीच येतो आमची चौकशी करायला. तूझी सून हि अधेमधे काही ना काही खायला पाठवत असते तुझ्या नकळत. का तर तुला मी एकच मैत्रीण म्हणून मलाही सांभाळतात दोघ. अगं परक्याची इतकी काळजी घेतात मग तुझं किती करत असतील.
मग का चिडचिड करतेस आणि पाण्यात बघतेस दोघांना. आपल्या नशिबाने त्यावेळी नाही मिळालं. पण आता आहे न सगळं मग त्यात आनंद घ्यायचा सोडून सगळ्यात वाईटच का शोधतेस गं ...मैत्रिणीने विचारलं.
स्वतःबद्दल सांगता सांगता आपल्यावरच घसरली हि हे जाणवताच तिला राग आला. घरीही हे असेच बोलले आणि आता इथेही तेच. मग ती उसळून बोललीच माझं काय जळतंय मलाच माहित.
हो, हो तेच माहित करून घ्यायला तुझा लेक आला होता. अगं तुझ्या तब्येतीसाठीच धावपळ करतायत ना दोघ. विचार कर ...नोकरी, घर, तुझी आणि अप्पांची सेवा कशी ग झेपेल एकटीला. त्यात त्याचा धंद्यात अजून जम नाही, तिच्या नोकरीवरच घरदार अवलंबून आहे. तू बाळाकडे बघतेस म्हणून सगळं मनात ठेवून बिचारी ओढाताण करते. खरतर मुलगा होऊन ती घर सांभाळतेय. मग तिची आई व्हायचं सोडून छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ का करतेस.
अगं वयाने आणि अनुभवाने मोठे आपण. समजुतीने वागावं, चुकलं तर सावरावं हिच अपेक्षा असते ग त्यांची. प्रत्येक गोष्टीत खुसपट काढत आणि आमच्या वेळी नव्हतं बाई असा निराशावादी राग का आळवावा? आणि मग त्याच सावट पूर्ण घरावर. बघ विचार कर एकटं पडायचं की कुटुंबात रमायचं ते? आज हे चिडले ते त्यामुळेच. विषयाने विषय वाढत गेला बघ. पण मला माहित आहे हे आमचं कपातलच वादळ असेल ते आणि कुटुंबात असच असलेल बर हो.
आपल्या ह्या रडगाण्यात किती वेळ झाला बघ. जेवणाची वेळ तर टळून गेली. आता चहा तरी पिवूया अस मैत्रिणीने म्हणाल्यावर तिला वेळेचं भान आलं.
ती मान हलवत उठली. तर राग आला का गं, हक्काची मैत्रिण म्हणून बोलले हो. वाईट वाटलं तर बोलू नकोस माझ्याशी पण लेकाला जरूर समजून घे असं मैत्रिण काकुळतीला येऊन बोलली.
नाही गं, निघते आता. सुनबाई यायची वेळ झालीये. शिणली असेल ती सकाळपासून, तिच्याबरोबरच घेईन घोटभर अस म्हणत लंगडत बाहेर पडली सुद्धा. मैत्रिणीने लांबूनच अलाबला घेत कडाकडा बोट मोडली आणि दोघी समजुतीच हसल्या.
घरी पोहचल्यावर तिने लगबगीने सगळ्यांसाठी चहाचं आधण ठेवलं. सुनबाई येताच तिच्याकडे झेपावणाऱ्या बाळाला घेत तिच्या हातात गरमगरम चहाचा कप ठेवला. आणि आज रात्रीच्या जेवणाचा काय बेत करूया ग असं तिला विचारू लागली.
सुनबाईने अप्पांकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने बघितलं तर त्यांनी खांदे उडवले. शेवटी आज कुठला देव पावला अस भीतभीतच अंदाज घेत तिन सासूला विचारलं.
सुनेच्या डोक्यावर हात ठेवत ती म्हणाली, देव नाही ग पण नीरक्षीर विवेक असलेला राजहंस भेटला. आणि वरतून सुनेला ठसक्यात म्हणाली आता महिनाभर लादलेल्या माहेरी सक्तीच्या विश्रांतीला जाणारच आहे तर चार दिवस सासुरवास सहन करते झालं. त्यावर सुंभ जळला तरी पीळ जळत नाही अशी अप्पांनी कोटी केल्यावर सगळेच खळाळून हसले. आणि तिला सोबत पूर्ण घरच हसल्याचा भास झाला.
अंजली कुबल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा