झाडाला आज काही सांगायचंय...

ऋतुगंध शिशिर   - वर्ष १२ अंक ६


मी एक वृक्ष बोलतोय. तुम्हा माणसांच्या दृष्टीने मी अतिशय जुना असा जख्ख म्हाताराच म्हणा ना. मी केव्हा कधी काळी एक इवलंसं रोपटं होतो हे मला आता आठवतसुद्धा नाही. तुम्ही जसे साजरे करता तसे आमचे वाढदिवस वगैरे नसतात. तुमच्या अनेक पिढ्या मी पहात आलो आहे. ऊन-पावसाळे किती पहिले, हे मोजायची तुमची सवय पण आम्हाला नाही. तुमच्यासारखं फिरून जग पाहण्याचं भाग्य आम्हाला नाही. आमचे आपले उभ्या ठिकाणाहून पाहण्याचे ठरलेले देखावे. जसे आकाश आणि पृथ्वी रोज सतत एकमेकांना दुरूनच बघतात तसेच मी आणि माझी सावली. रणरणतं ऊन वरून झेलण्याला दुसरा पर्याय नसल्याने, मी सावलीकडे पहातच मन रमवतो. ती निवांत, शांत मऊ गवतावर पहुडलेली असते. आजवर किती किती पिले, पाखरे, लेकरे इथे विसावली, खेळली अन बागडली. तुम्हाला जसं सणावाराला, कार्यसमयी घर भरलेलं आवडतं, तसंच आम्हालाही. 

माझ्या बुंध्यापाशी माणसं जमली, मुलं खेळली, माझ्या अंगाखांद्यावर पाने,फळे नांदली कि कसं, धन्य-धन्य वाटतं. पानगळीत जेंव्हा माझीच पाने जीर्ण पाचोळा झाली, तेव्हा सावलीनेच ती झेलली. सतत अभिमानाने मी तिच्याकडे बघत बसायचो. ती माझीच कृती आहे आणि जोवर ती दिसते आहे तोवर मी आहे याची मला जाणीव होत असते. माझ्या सावलीला कोणी खोडू अथवा पुसून टाकू शकत नाही याचा मला केव्हढा तरी अभिमान ! 

पण... अरे रे... रे... आज मात्र सकाळ पासून मन थोडे विचलित झाले आहे. आज काही माणसांचा घोळका इथे जमला आहे आणि त्यांच्या हातात विजेवर, इंजिनावर चालणाऱ्या करवती दिसत आहेत. छे... छे... मी घाबरलो आहे असे किंचितही समजू नका. प्राणवायु तुम्हांस देण्यात मी खारीचा वाटा आजवर उचलला आहे. पण तुम्ही प्राणवायुही घेता आणि कधी आमचे प्राणही घेता हे ठाऊक आहे. आमची काही शेजारी झाडं कुऱ्हाडींचे घाव घेऊन गेली, हे मी पाहिलेलं आहे. 

आता एव्हाना करवतींनी आपले कार्य सुरु केलेले आहे. पण हे काय ? मला वेदना अजिबात होत नाहीयेत. हो, शरीरापेक्षा मनाला वेदना जास्त होतात असं ऐकलं होतं, ते आज अनुभवतोय. ही माणसे नंतर माझ्या खोडाचे परीक्षण, निरीक्षण करून, वयाची वर्तुळे मोजतील. माझी खरी उपयुक्तता त्यांना तेंव्हाच जास्त आहे, हे ही मला माहित आहे. 

मी इथून जाण्याची खंत वा दुःख मला तसूभरही नसणार, 

इतक्या वर्षांपासून जिने गच्च कवटाळून मला धरले, आज त्या पृथ्वी माऊलीस वाईट वाटणार, 

माझी अन सावलीची प्रथम आणि अंतिम ताटातूट होणार, 

एकच दुःख जिव्हारी लागणार,

माझी सावली माझ्या डोळ्यांदेखत कायमची गायब होणार...

- नंदकुमार देशपांडे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा