गुलाबी ढग, गुलाबी स्वप्न

गुलाबी ढग, गुलाबी स्वप्न ?
स्वप्न की सत्य ? 
सत्य, चिरंतन सत्य. 

सत्य, असतं का पारदर्शक ? 
पारदर्शक, म्हणावं का आत्मदर्शक ? 
आत्मदर्शक, असतं का पाणी ? 
पाणी : भूगर्भात, भूवर, आसमंतात. 

आसमंतात एक ऊर्जा. 
ऊर्जा, माझ्यात तुझ्यात. 
तुझ्यात, माझं प्रतिबिंब. 
प्रतिबिंब, कुठे दिसतं ? 

दिसतं पाण्यात, शांत-पाण्यात !
पाण्यात सगळंच सामावतं. 
सामावतं सारं आसमंत. 
आसमंत. अनंत, अमर्याद. 

अमर्याद आकाश, अमर्याद माती. 
माती, पाणी, आकाश, पोकळी. 
पोकळी ? खरंच ? की आभास ? 
आभास, ज्याचा रंगच गुलाबी. 
गुलाबी, गुलाबी ढगांच्या उरी सामावलाय मावळता रवी. 

रवि, चिरंतन. 
चिरंतन रवी, चिरंतन जल, चिरंतन वृक्ष. 
वृक्ष : दूत, अपत्य मातीचं, धरेचं. 
धरेचं स्वप्न, गुलाबी ! 
गुलाबी ढगांचं ! 
गुलाबी ढग, गुलाबी स्वप्न ? 
स्वप्न की सत्य ?
सत्य....

तृप्ती मेहता-देशपांडे







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा