रुपानं क्षणभर बाल्कनीतून बाहेर डोकावून बघितलं. "छ्या, काय नुसती पावसाची पिरपिर! त्यात भरीला नाचणार्या मुलांचा धिंगाणा." तिने फ्रेंच विंडोचं दार सरकवलं आणि ए.सी. ऑन केला. फतकल् मारून ती सोफ्यात बसली. मऊ लुसलुशीत सोफा तिच्या वजनानं दबला. रिमोट हातात घेऊन ती चॅनल सर्फ करत राहिली. खवय्येगिरीचा कार्यक्रम बघून भूक उगा चाळवली. क्लिपनी तोंड आवळून ठेवलेल्या चिप्सच्या पाकीटानं मोकळा श्वास घेतला नि ते आ वासून तिच्याकडे पाहू लागलं. खारट तेलकट चव तिच्या जिभेचा ताबा मिळवण्यात यशस्वी झाली.
अरूपानी खिडकीचं दार लोटून दिलं, पडद्याची बट डोळ्यांवरून बाजूला सारली. पावसाचे तुषार तिच्या संवेदनांना चिंब भिजवून जाऊ लागले. बाहेर पोरं डुंबताना बघून तीही मनानं त्यांच्यातलीच एक बनून गेली. काॅफीचे घुटके घेत घेत, काॅफीतल्या साखरेगत ती त्या पावसात विरघळून गेली.
स्वरूप उद्याच्या लेसनची तयारी करत होती. रंगचक्राचा पाठ घ्यायचा होता. तिच्या मनात आलं "कलरव्हीलवर एकमेकांच्या समोरासमोर असणार्या रंगांना पूरक (complementary) रंग म्हणतात. आणि विरुद्ध (contrasting) रंग असंपण म्हणतात. विरोधी आणि पूरक हे समानार्थी कसे असू शकतात? का यांच्या आमन्यासामन्यातच एक समतोल साधतो आणि वर्तुळ पूर्ण होतं, चक्र सुरू राहातं?" जसा श्रावणातला हा पाऊस ऊन-पावसाची आंधळी कोशिंबीर खेळत राहातो. सगळी चक्र अव्याहत फिरत असतात. पृथ्वीचं फिरणं जितकं नकळत असतं तितकंच नकळत आपण सगळे याच चक्राचा भाग असतो... रूपारूपास्वरूप.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा