विकतचे दुखणे

दुःखापासून दूर पळताना आपण नकळत दुःखाचाच पाठपुरावा करतो असे दिसते. जगताना नेहमीच मोठमोठी दुःखं येतात असे नाही तर काही लहान गोष्टींनाही लोक मोठ्या दुःखाचे लेबल लावून मोकळे होतात. ईशा नावाच्या एका सुस्वभावी मध्यम वयीन गृहिणीचे उदाहरण घ्या. लौकिक अर्थाने ईशाकडे आज सगळी सुख हात जोडून उभी आहेत. शिक्षण,पैसे,बॅंकबॅलन्स,सुस्वभावी नवरा आणि एक गोड हुशार मुलगी-अमिषा. ईशाला आणि तिच्या कुटुंबाला कसलीही ददात नाही. परंतु दुर्देवाची बाब अशी की ईशाला दुःखी व्हायला कोणतेही कारण पुरते. 

कालचाच प्रसंग बघा. तिच्या दूरच्या आत्येसासूबाई त्यांच्याकडे राहायला आल्या होत्या. ईशाने आणि अमन ने त्यांचे यथोचित स्वागत केले. चांगला आदरसत्कार केला. आत्येसासूबाई खुश होत्या. पण जाता जाता ईशाला एक ‘मुलगीच’असल्याचे दुःख व्यक्त करून गेल्या. झाले. आत्येसासूबाई स्वतः दुःखी झाल्याच पण ईशालाही दुःखी करून गेल्या. अमिषा सारखी एक सुंदर,सुदृढ गुणी मुलगी असल्याचा अभिमान बाळगण्याऐवजी तिला मुलगा नाही म्हणून ती आज दुखी आहे. एकच मुलगी हवी हा त्या दोघांचा निर्णय होता हे आज ती विसरली आहे. 

अमिषा अतिशय हुशार आणि समजूतदार आहे. ती अठरा वर्षाची आहे. या तरुण वयात आईचे दुःख तिला कळले तर तिला किती धक्का बसेल याचा ईशाने कधी विचार केला नाही. ज्यांना मुलंच होऊ शकत नाहीत त्यांचा विचार ईशाने केला नाही. ज्यांना मुले आहेत पण दिव्यांग आहेत त्यांचा विचार ईशाने केला नाही. ज्यांना मुलगा असूनही अपघातात मरण पावला अशा पालकांचा ईशाने विचार केला नाही. तिच्या सख्ख्या भावाचाच मुलगा हुशार सुदृढ असूनही आईबाबांशी संबंध ठेवत नाही. ईशाने हवे तिथे डोळस दृष्टीने बघण्याऐवजी डोळ्यांवर झापडं ओढली. ह्यालाच विकतचे दुखणे असे म्हणता येईल.

दुसरे उदाहरण शारदाताईंचे. शारदाताई आजी होऊन चांगली दहा बारा वर्ष झाली. शारदाताईंना मान देणारी प्रेमळ सून आणि मुलगा त्यांच्या बरोबर राहतात. नातवंडेही आजी आजी करून अवतीभवती फिरतात. परंतु शारदाताई अजूनही त्यांच्याच काळात जगत आहेत. किंबहुना आता त्यांचा हट्टीपणा इतका पराकोटीला गेला आहे की मुलांनीही चाळीस पन्नास वर्षांपूर्वी त्या जशा काटकसरीने (?) राहिल्या तसेच राहावे असे त्यांना वाटते. नवीन कपडे घेणे,नवीन सामान घेणे,वस्तू घेणे,बाहेर जेवायला जाणे हा त्यांना वायफळ खर्च वाटतो. त्यावरून त्या सतत सर्वांना फैलावर घेतात. मधून मधून हे सर्व करण्याची आजच्या पिढीची गरज बनली आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही किंवा त्यांना हे समजून घ्यायचे नसते. त्यामुळे घरातील शांती बिघडून जाते. मुलांच्या मनाचा विचार न करता शारदाताई सतत हेकेखोरपणा करून मुलांना दुःखी करतातच शिवाय स्वतःही दुःखी होतात.

तर अशा या विकतच्या दुखण्याच्या अनेक तऱ्हा.लिहाव्या तेव्हढ्या थोड्याच. पण काय आहे, सध्या आपण या गोष्टीत जास्त वेळ न रेंगाळता आपल्यालाही विकतच्या दुखण्याचे गिऱ्हाईक न केलेले बरे ! कसं? 


मोहना कारखानीस


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा