“तुम्ही साजूला पैसे देताय ?” शशांकसर काहीश्या रागातचं विचारत होते…
“हो, का? काही हरकत?”...
“त्याची शैक्षणिक जबाबदारी नक्कीच आपली आहे पण त्याच्या हौसेमौजेचे पैसे तुम्ही द्यायचे हे मला पटलेलेही आणि आवडलेले दोन्हीही नाही !” शशांकसरांनी आपले मत मांडले.
“सर, त्याची परिस्थिती माहित आहे आपल्याला. कुठून आणेल तो ४००० रुपये? तो म्हणाला की पुढयाच्या वर्षी हप्त्याने परत करेल ”
“ कळले पाहिजे त्याला कि तो ट्रिपला जाण्याची हौसमौज करू शकत नाही...ह्याची त्याला सवय लागेल कि गरज असेल कि उधारी मागावी आणि कुठूनतरी ती मिळते, आणि नेमके तेच नको आहे मला. त्याच्यात ती जिद्द निर्माण व्हावी कि मी ते सर्व करीन जे मी गमावले आहे...” आता मात्र सर खरंच चिडले.
“ मला नाही वाटत कि एका उधारीने तो मुलगा बिघडेल, आणि बघू द्या ना त्याला जग... जिद्द यायला डोळ्यांना काही दिसायला तर हवे? मी देणार आहे त्याचे पैसे…” मी हि माझ्या मतावर एकदम ठाम!!! पण सरही बरोबर होते…
शशांकसरांचे आणि माझे कधीच वाद झाले नाहीत पण आज मात्र साजूवर एक मोठा मतभेद झाला!
साजू... .हसरा,काळा-सावळा, काहीसा कृश, ऊंच, नेहमी थोडी दाढी व केस वाढलेला, चौकटीचा भडक शर्ट व विटकी जीन्स आणि पायात साध्या रबरी स्लीपर्स. हुशार, मेहनती आणि सरळ स्वभावाचा. वडील कुठेतरी दोह्यात मजूर, दोन लहान बहिणी, एक अशिक्षित आई आणि विरारच्या चाळीत एक खोलीचं घर इतकंच त्याचं जग, मात्र रोज सकाळी वेळेच्या आधीच १५ मिनिटे वर्गात येऊन बसायचा.हसरा खेळकर, कोणाच्याही मदतीला धावून जाणारा.. दरवर्षी ओणमला आग्रहाने घरी बोलवायचा मित्र मैत्रिणींना, कसलीही लाज न बाळगता. मीठ भाकरी पण वाटून खाऊया इतके सुरेख विचार.
हात धरून घेऊन आला होता स्वतःच्या आईला पहिल्या वर्षाचे निकालपत्र घ्यायला, म्हणाला तिला फक्त मल्याळी येतं. त्यामुळे २० मिनिटे समोरासमोर बसूनही आमचा संवाद झालाच नाही! त्याचा निकालही त्या मातेला कळला नाही आणि माझे कौतुकाचे शब्दही नाहीत!!निघताना मात्र त्या बाईंनी काही क्षण माझ्या हातावर स्वतःचा हात ठेवला व नजरेने सर्वकाही बोलून गेल्या आणि मी सुन्नं झाले.
विश्वासावर जग चालते हे किती खरं आहे. त्याला शब्दांची गरज नसते…
साजूचा आत्मविश्वास भक्कम होता. आईवडीलांचे खूप कौतुक होते त्याला, त्यांच्या गरिबीचे त्याला कधीच वाईट वाटलेले मला दिसले नाही. आई वडिलांचा त्याच्यावरचा विश्वास त्याला भरभरून प्रोत्साहन देत होता. मी जर पैसे दिले नसते तरीही तो घरच्यांवर नक्कीच नाराज झाला नसता, कारण जे बळ त्याला घरून मिळत होतं ते त्या पैशांपेक्षा खूप लाखमोलाचे होतं. माझी इच्छा त्याने बाहेरचे जग पाहावी अशी होती आणि ती तो फक्त पैशाच्या बळावर पूर्ण करू शकत होता. त्याला काय करायचे आहे, काय हवे आहे हे त्याला न बघता कसे कळेल? त्याचे अनुभव त्याने जमवायचे आहेत, त्यावरच तर तो पुढची वाटचाल करेल. ४००० हि फार मोठी रक्कम न्हवती पण त्याने अनुभव गमावणे हे मला मान्य न्हवते. त्याचा त्या ट्रिप मधील आनंद ओसांडून वाहत होता. फॅक्टरी, कंपनी तो मनापासून आणि बारकाईने पाहत होता जसे कि तो त्याचा भविष्यकाळ बघतो आहे.
त्याच्या आईचा विश्वास होता कि तिचा मुलगा खूप प्रगती करेल. साजूचा शिक्षकांवर प्रचंड विश्वास होता कि त्याला योग्य शिक्षण आणि मार्गदर्शन मिळेल. माझा विश्वास होता कि त्याला जग पाहण्याची गरज आहे आणि शशांकसरांचा विश्वास होता कि त्याला पैशांची नाही पण जिद्दीची गरज आहे. “आम्ही सगळे फेर धरून तर एकाच गोलात होतो….विश्वासाच्या”
दोन वर्ष उलटली, आणि एका सकाळीच साजू माझ्या कार्यालयात आला. शुभ्र पांढरा शर्ट, राखाडी पॅन्ट, पायात चामडी बूट, स्वच्छ दाढी आणि व्यवस्थित केस…
“ अरे, ओळखलेच नाही मी तूला. किती छान दिसतो आहेस या ऑफिसच्या कपड्यांमध्ये?” तसा तो लाजला व एका छोट्या पुडीतील पेढे पुढे करून म्हणाला कि “आज माझ्या नोकरीचा पहिला दिवस, आशिर्वाद घ्यायला आलो आहे. हे कपडे आणि बूट शशांकसरांनी घेतले आहेत मला, म्हणाले कि आता ऑफिसला असे जात जा.”...
मी शशांकसरांकडे एक नजर टाकली आणि मतभेद तिथेच संपला….
तेजश्री दाते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा