आकारलेली दिवाळी - एक शब्दचित्र

ऋतुगंध ग्रीष्म - वर्ष १२ अंक २


दिवाळी जणू पंचेन्द्रियांतून मनात झिरपते. वर्षभर तिथे ओलावा टिकवते.

दिवाळी म्हटलं की जसे अनेक गंध मनात दरवळतात, सुगंधी तेलाचा, उटण्याचा, मोती साबणात मिसळलेला सुवास. आज कोणाकडे कोणता फराळाचा पदार्थ बनतोय याचा सांगावा आणणारा, फटाक्यांच्या धुराचा, झेंडूंच्या तोरणांचा असे अनेक. आणि अभ्यंगस्नानातून होणारा मायेचा मोलाचा स्पर्श! तो कसा विसरता येईल?

त्याचबरोबर काही दृक्चित्र आणि ध्वनिस्मृतीही. त्या जरा अधिक विस्ताराने....व्हिज्युअल आर्टिस्टच्या चष्म्यातून काही ऑडिओ व्हिज्युअल्स रंग, रेषा आणि आकार यातून साकारलेली गेरुनं सारवलेल्या चौकोनात ठिपक्यांची आखीव रेखीव रांगोळी.
सुबक. सुरेख. साधलेली उत्तम रंगसंगती. मधोमध मंद तेवणारी मातीची पणती. तिच्या प्रकाशात चमचमणार्‍या वर्खाच्या चांदण्या.
फटाक्यांचं पार्श्वसंगीत. कंदिलाच्या झिरमिळ्यांनी वार्‍यासवे धरलेला ताल. प्रसन्न मनानं रंग-रांगोळीचा डबा घेऊन दारातून आत शिरता शिरता तोरण एका बाजूनी जरा विषमतोल झालेलं ते सारखं करणं.

"दिन दिन दिवाळी" म्हणत फुलबाजीनी हवेत धुराची वर्तुळं काढल्याशिवाय का दिवाळी साजरी होते? एखादी तुडतुडी शांत तेवणार्‍या ज्योतीशी उगाच तंटा करते. थुईथुई फुलणारे अनाराचे त्रिकोण.
भुईचक्राच्या घुमघुम चकरा. वेगात सूर मारुन कधी सरळ, कधी नागमोडी रेषा काढणारे, स्वतःच ती उडी, "काय पण तीर मारलाय!" अशा अविर्भावात साजरे करणारे बाण. लडींचा दाये-बाये करत झडलेला मार्च.
कोपर्‍यातल्या किल्ल्यातल्या महाराजांना तोफांची सलामी देणारे सुतळी बाॅम्ब.

चांदीच्या ताटात, यंदा आयतेच आणलेले आयताकार शंकरपाळे, चकल्यांची काटेकोर वर्तुळं, ज्यांशिवाय दिवाळी अपूर्ण असे ते पूर्णमिदं गोल लाडके लाडवोबा. पातळ पोह्यांचा पिवळा चिवडाही चिवडायला लागतोच.
शेवेच्या लोकरीचे गुंडे, आय मीन, चवंगे हलक्या हाताने चुरडून सुटी केलेल शेव दवाळीची सुट्टी चटकदार करते. अर्धवर्तुळाकार टम्म खोबर्‍याचा तोबरा भरलेल करंजी. कडेला चार-दोन कडबोळी. खसखस पेरलेले ओठांवर खसखस पिकवणारे अनारसे. पाकातले चिरोटे हेही जोडीला. अथात फीस्ट फाॅर आईज असले तरी मूळ काम हे रसना तृप्तीचं असतं.

अशी रोमरोमातुन साजरी होणारी ही दिवाळी! उगीच नाही म्हणत - दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा!

- अर्चना रानडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा