बा मना ! आज जरा निराश झाल्यासारखा दिसतोस ! का बरे ?
अरे या ऋतुगंध चा विषयच ‘नैराश्य’ आहे हे कळले. त्यामुळे पूर्वीच्या दु:खद स्मृती जागा झाल्या. काळ हे त्यावर औषध आहे पण त्या स्मृतीसुद्धा मनाला निराश करतात. आतापर्यंतच्या आनंदावर विराजण पडले. यावर काही उपाय आहे का?
बरे झाले तूच हा विषय काढलास म्हणून. तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा आधीच पाण्याची व्यवस्था करायला हवी नव्हे का? बघ असा विचार तुला सुचला यातच माणूस म्हणून तुझे वैशिष्ट्य दिसते. या सर्व गोष्टींवर आधीच विचार करून ठेव म्हणजे पुढे विसरला नाहीस तर कामाला येईल.
आहार, निद्रा, भय, सुखाची इच्छा सर्व प्राणिमात्रांना असते. ह्या नैसर्गिक प्रवृत्ती आहेत. त्या केवळ भोगयोनी आहेत. मनुष्याला मन-बुद्धी हे विशेष अधिक मिळाले आहेत, नाही तर मनुष्य आणि पशू यात काय फरक?
हे नैराश्य कशामुळे येते? दु:खद प्रसंग आला आणि ते दूर तत्काळ होण्याचा उपाय नसेल तर मनुष्य निराश होतो. परिश्रम करूनही आपल्याला हवे ते मिळाले नाही, मग ते यश असो, धन असो, प्रेम असो, तरी नैराश्य येते. आपल्याला दु:ख नसावे आणि सुख असावे या मनाच्या मूळ संकल्पाला ‘इच्छा’ म्हणतात. सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी आपण (शरीराने) जिवंत असावे आणि सर्व अनुकूल असावे या नैसर्गिक प्रवृत्ती आहेत. पण पोटभर अन्न मिळाले की पशू खाणे थांबवतात. भूक नसेल तर सिंह शिकार करत नाही. नैसर्गिक प्रजाननाची वृत्ती निवृत्त झाली की प्राण्यांची कामवासना निवृत्त होते. मनुष्याचे तसे नाही. त्याला ते सुख सतत असावे असे वाटते. त्यामुळे तो अविचार करतो आणि प्राण्यांपेक्षाही भयंकर वागतो हे रोजच्या घटनांमधून सिद्ध होते.
शास्त्र सांगते जीवात्मा अनेक योनीत सुख दु:खादी भोग भोगत (जेव्हा पाप पुण्य काहीसे समान होते तेव्हा) मनुष्य जन्मात येतो. चांगले वाईट, सुख-दु:ख यांचा तो विचार करु शकतो. सुख निश्चित कसे मिळेल याकरिता प्रयत्न करतो. सुख आणि सुखाची साधने यावर प्रेम जडते आणि दु:खाची कारणे यांच्याबाबत अप्रीती उत्पन्न होते. या दोन वृत्तीना ‘राग’ आणि ‘द्वेष’ असे म्हणतात. असे द्वंद्व जरी प्रतीत झाले तरी दोन्ही एकाच काम (हे हवे – हे नको) या वृत्तीचे आविष्कार आहेत. यांना शास्त्राने ‘क्लेश’ म्हटले आहे. (अविद्याऽस्मिता रागद्वेषभिनिवेशा: पंच क्लेशा: |, पा. यो. २.३). हे क्लेश दूर व्हावेत म्हणून शेषावतार पतंजली यांनी योगसूत्रे लिहिली. त्याला भारतीय मानसशास्त्र असेही म्हणतात. आपण नाही का या क्लेशपासून मुक्त होण्याच्या आशेने अंबेची प्रार्थना करतो. “क्लेशापासुन सोडवी तोडी भवपाशा | अंबे तुजवाचुन कोण पुरवील ‘आशा’| “. आरत्या नुसत्या म्हणतोस पण त्यावर कधी विचार केला आहेस?
शास्त्राने आणि संतांनी यांचा खूप विचार केला आहे. आधी आपण या आशा-निराशेचा विचार करु. सर्व सामान्य मूळ इच्छा त्याला शास्त्रीय शब्द आहे ‘काम’-इदं मे स्यात् इदं मे स्यात् (मला हे हवे, ते हवे इ.). जेव्हा माझ्याकडे जे नाही ते हवे वाटते त्याला म्हणतात ‘इच्छा.’ ही इच्छा आता नाही तर भविष्यात पूर्ण होईल असे वाटत राहते ती ‘आशा’ (आस, मनात आशा नसणे – ‘निर् आस – निरास’, प्रयत्नपूर्वक आशा काढून टाकणे ‘उत् आस- उदास’ ). माणूस आशेवर जगतो. जीवन आशे-निराशेचा खेळ आहे , ‘.... आखिर टूट जाता है’ हे ऐकले आहेस ना? एक सुभाषितकार म्हणतो ‘आशा नाम मनुष्याणां किमाश्चर्यक शृंखला | यया बद्धा प्राधावन्ति मुक्ता: तिष्ठंति पङ्गुवत् ||’ आशा नावाचे बंधन आश्चर्यकाराक आहे. त्यांने बांधलेला जोरात पळत असतो आणि जो मुक्त असतो तो पळण्या ऐवजी पंगु मनुष्यासारखा स्वस्थ असतो.
आशेचे पुढे काय होते पाहायचे आहे? मिळाले त्यात समाधान, तृप्ती नाही. आणखी मिळावे असे वाटत राहते तेव्हा तिला ‘तृष्णा, हाव’ असे म्हणतात. विषय आवश्यकच आहेत असे जे वाटणे – स्पृहा (आवश्यक वाटत नाही – निस्पृह) माउली म्हणतात ‘स्पृहा मना पुढा | आशेचा घे दवडा | विश्व धापे चाडा | पायातळी || (ज्ञा.१४.२३७ ) विषयांची इच्छा चंचल मनाच्याही पुढे आशेची धाव घेते. अशा अफाट इच्छेमुळे सर्व विश्व तो आपल्या पायाखाली घालतो.
तेव्हा अशा आशा, इच्छा जेव्हा पूर्ण होण्याची शक्यता नसते तेव्हा नैराश्य येते. या वेळी योग्य मार्गदर्शन मिळाले नाही तर त्याचे पर्यवसान म्हणजे मनुष्याची आणखी घसरण होते. आपल्या प्रयत्नाने स्वबळावर ह्या त्या गोष्टी मिळत नाहीत असे वाटले की त्या दुसऱ्याने त्या पुरवाव्यात अशी ‘अपेक्षा’ तो करु लागतो. कोणी आपणहून त्या पूर्ण केल्या नाहीत तर तो हीन दीन होऊन ‘याचना’ करु लागतो. पण त्या जेव्हा पूर्ण होत नाहीत तेव्हा कंटाळून हतबल होतो. ‘द्राक्षे आंबट’ असे मनाचे तात्पुरते समाधान करून घेतो पण त्या इच्छा संस्काररूपाने सूक्ष्मपणे टिकून राहतात. तेव्हा त्यांना वासना म्हणतात. एखाद्या भांड्याचा वास कसा जाता जात नाही अगदी तसे. त्या वासना अंत:करणात इतक्या दृढपणे कोरल्या जातात की मृत्यूने देखील पुसल्या जात नाहीत. कारण स्थूल देह पडला तरी सूक्ष्म देह त्या वासनांचा पुंज घेऊन दुसरा देह धारण करतो. या वासना जीवाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला लावतात. (जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे | - एकनाथी हरिपाठ).
या गोष्टीवर विश्वास ठेव असे माझे म्हणणे नाही, पण विश्वास ठेवण्यात तुझाच फायदा आहे. बा मना ! तुझ्याबद्दल ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात ते ऐकायचय? तुझी उत्पत्ती रजोगुणापासून झाली आहे. तुझा चंचलपणा जो आहे तो वायुतत्वाचा आहे. स्वैर वर्तन आणि भ्रम हे तुझे विशेष आहेत. सतत कल्पना करीत राहणे हा तुझा स्वभाव आहे. खरे तर या कल्पना करण्याच्या प्रवृत्तीमुळे तू मूळ आनंदरूप परमात्म्यापासून जीवाला वेगळा केलास. त्याला कर्ता भोक्ता, सुखी, दु:खी, अज्ञानी, बद्ध केलेस. आशा-इच्छांना तुझ्यामुळे बळ प्राप्त होते. ‘वाया मन हे नाव | येरवी कल्पानाचि सावेव | जयासंगे जीवदशा वस्तु || जे इच्छेते वाढवी | आशेते चढवी | जे पाठी पुरवी | भयासि गा || द्वैत जेथे उठी | अविद्या जेणे लाठी | जे इंद्रियांते लोटी | विषयामाजी || संकल्पे सृष्टी घडी | सवेचि विकल्पूनि मोडी | मनोरथांच्या उतरंडी | उतरी रची || (ज्ञा. १३.११०-११५). हे झाले तुझ्या खोड्यांचे वर्णन. पण ‘इंद्रियाणाम् मनश्चास्मि’ – मन ही माझी विभूति आहे असेही भगवंत सांगतात. कारण सदिच्छा उत्पन्न झाली तरी त्याप्रमाणे कार्य करायला तूच इंद्रियांना सांगतोस ना. जीवाच्या रथाचा लगाम तू आहेस. उधळून जाण्याची प्रवृत्ती असलेले इंद्रियांचे घोडे ताब्यात ठेवून योग्य मार्गावर वळवणे हे तुझ्यामुळेच तर शक्य आहे. म्हणून श्रुती म्हणते ‘मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः । बन्धाय विषयासक्तं मुक्त्यै निर्विषयं स्मृतम् ॥‘ (अमृतबिंदु उपनिषद्)
खर तर अत्यंत कृपाळू असा परमेश्वर आपल्या अंतरी राहून आपल्याला कायम साद घालत आहे. पण खेळात रमला असता लहान मुलाला तहान भूक लागत नाही मात्र पडला-झडला किंवा कोणी मारले की आई आठवते, तो रडत तिच्या कुशीत शिरतो, तसेच आपले आहे. आपण कायम विषय भोगातच खेळात रमू नये व कधीतरी त्याच्याकडे यावे म्हणून आपल्या उपभोगात त्याने खोडा घातला आहे. दु:ख शोक निराशा कोणाला चुकले नाही. कर्म स्वातंत्र्य असले तरी भोगांच्या बाबतीत ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हे प्रत्यक्ष भगवंतांनी राम अवतारात मनुष्य रूप घेऊन दाखवून दिले आहे ना !. आपल्याच मुलाबाळांना तो दु:खी कसा बरे पाहू शकेल. संतांच्या रूपाने तोच आपल्या जीवनात मार्गदर्शक म्हणून येतो. ‘संत जे माझी रूपडी | तेथ दृष्टि पडो आवडी |’ (ज्ञा. १८.१३५६) असे म्हणून आठवण देतो.
तुला या दु:खावर रामबाण औषध पाहिजे ना?. पण त्याकारिता पथ्येही पुष्कळ पाळावी लागतील. मागे श्रद्धेचा विचार केला. प्रथम शास्त्र आणि संत यांच्यावर विश्वास ठेव. ‘जरि विश्वाससी माझीया बोला | तरी मी नेईन रे तुजला | जेथीचा तेथे ||’ जेथीचा तेथे म्हणजे मूळ सुखरूप अवस्थेमध्ये. समर्थांचे असे आश्वासन आहे. प्रत्यक्ष युद्धभूमीवर शोकाने अस्वस्थ, व्याकूळ, हतबल, निराश झालेल्या महान धनुर्धर अर्जुनाचे निमित्त करून प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी सर्व प्रकारचा उपदेश केला. अगदी प्रत्येकाच्या अधिकाराचा, आवडीचा विचार करून कर्मयोग, ध्यान योग, भक्तियोग, ज्ञानयोग सांगितला. गीतेची सुरुवात अर्जुनाच्या ‘विषाद योगाने’ झाली आहे. युद्ध कर्तव्य तर पार पडेलच शिवाय आत्यंतिक सुखाचा योग ज्यामुळे होईल याचा उपदेश करण्यात आला. ज्या अर्थी तुला निराशा निवारण करण्याची इच्छा आहे, विषाद योग झाला आहे त्या अर्थी तू पुढचे सुयोग समजण्याला पात्र झाला आहेस.
‘कारणासहित दु:खनिवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती’ हे आपल्या श्रुति-स्मृतिचे ब्रीद आहे. किती अमूल्य उपदेश आहे हा. जगात श्रीमद् भगवदगीता या ग्रंथाइतकी दुसऱ्या कोणत्याही ग्रंथाची जगात इतकी दखल घेतली गेली नाही. माऊलींचा जन्म तीच गीता तुझ्या माझ्यापर्यंत पोहोचवावी यासाठीच तर झाला. समर्थांनीही दासबोधाला गीतेचा संदर्भ आहे असे सुरवातीलाच म्हटले आहे. गीता outdated आहे, ‘त्या श्रीकृष्णाने, त्या वेळी, त्या अर्जुनाला, तो उपदेश केला’ त्याच्याशी माझा काय संबंध असे जर अजून तुला वाटत असेल तर तुझ्या सारखा दुर्दैवी तूच ! Seculatity च्या नावाखाली गीते पासून आपल्याला पद्धतशीर वंचित केले आहे, पण गीतेइतके secular तत्त्वज्ञान दुसरे नसेल. इथे अनेक संस्था गेली वीस पंचवीस वर्षे हा विचार या सिंगापूर सारख्या संपन्न भोगभूमीमध्ये ती गीता तुझ्यापर्यंत पोहोचविण्याचा विविध प्रकारे उद्योग करत आहेत.
बरे मला खरे सांग ! इथे येऊन खूप पैसे मिळवून तू सुखी आहेस का? निराशेचा विचार तुझ्या डोक्यात आला याचा अर्थच तू पूर्ण सुखी नाहीस असा आहे. ‘घरे सुंदरे सौख्य नाना परीचे | परी कोण जाणेल ते अंतरीचे |‘ हे समर्थांनी पाहिले आहे. म्हणूनच ‘जगी सर्वसुखी असा कोण आहे’ असे समर्थांनी विचारले ना? ज्या अर्थी तू पूर्ण सुखी नाहीस त्या अर्थी पूर्ण सुखी संतांचे पाय धरावेस हेच खरे. मागे तुकाराम महाराजांचे म्हणणे आपण ऐकले ना? सुखी कोण असतो माहीत आहे? समर्थांच्या शब्दातच सांगतो. “नसे मानसी नष्ट आशा दुराशा । वसे अंतरी प्रेमपाशा पिपाशा ॥ ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा । जगी ‘धन्य’ तो दास सर्वोत्तमाचा ॥“ (म. श्लो.५५ ) तेव्हा काय कर ? “मना राघवेवीण आशा नको रे ।“ (म. श्लो. १८). जे भगवंतांनी अर्जुनाला सांगितले तेच तर समर्थ सांगत आहेत ‘अनित्यं असुखं लोकं इमां प्राप्य भजस्व माम् ||’ (गी. ९.३३) जगी होईजे धन्य या रामनामें । क्रिया भक्ती ऊपासना नित्य नेमें ।। ‘उदासीनता’ तत्वतां सार आहे । (म. श्लो. ५७) अवास्तव आशा नसणे म्हणजे ‘उत् आस’ किंवा उदास. व्यवहारात समजतो तसा उदास याचा अर्थ निराश असा नव्हे. गीतेमध्ये सांगितलेले कर्म-भक्ति-ज्ञान या पैकी एका योगाचे प्रयत्नपूर्वक आचरण करावे हेच समर्थ देखील सांगतात. मनाचे श्लोक म्हणजे सोप्या भाषेत तुझ्या करिता सांगितलेली संक्षिप्त गीताच आहे.
तेव्हा बघ तुला कुठला मार्ग योग्य वाटतो, आवडतो ते ! सर्व मार्ग एकाच सुखरूपते कडे नेतात. हे औषध अर्थात एका दिवसात कामाला येणारे नाही पण “हळूह्ळू ढाळे ढाळे | केतुलेनि एके वेळे | मार्गाचे नि बळे | निश्चित ठाकी ||” (ज्ञा. ३.३.४२) असे माऊलींचे आश्वासन आहे. तेव्हा वाट चुकशील अशी भीती नको. मात्र वाटचालीला सुरवात तूच करायला हवीस.
त्याच श्रीकृष्णाच्या प्रेरणेने.
श्रीकांत जोशी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा