दुःख पर्वताएव्हढे

माणसाच्या आयुष्यत त्याला यश अपयशला सामोरी जावा लागतं. यश सुख, आनंद देऊन जातं तर अपयशामुळे निराशा, दुःखाला सामोरी जावं लागतं. वेगवेगळ्या गोतावळ्यात गुंतलेल्या मानवाचा जन्म दुःख सुखाच्या पाळण्यावर झुलत असतो. लहानपणीची सुख छोटी पण निरागस आणि तसेच काहीसे दुःखाच्या बाबतीत असतं.

यश अपयश पेक्षा फार मोठे दुःख म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तीला गमावण्याचे...गेलेली व्यक्ती परत कधी दिसणार नसते. मनाला कितीही समजूत घातली तरी हे दुःख हृदय पोखरत जातं. आजूबाजूचे, सखे सोयरे समजूत घालतात, थोड्या वेळ बरोबर थांबतात पण भा.रा. तांब्यांच्या कवितेतील " जन पळ भर म्हणतील हाय हाय" या ओळींचा प्रत्यय यायला लागतो. त्यांना तरी का दोष द्यावा? क्षणाक्षणाला वेगाने पळणार आयुष्य कोणासाठी थांबत नाही आणि थांबू देत नाही.......

"शो मस्ट गो ऑन" ही उक्ती माणसाच्या आयुष्यासाठी पण लागू आहे. माझी आई कणखर होती, ती नेहेमी सांगायची जेंव्हा कधी आपल्या वाईट वाटत, दुःख वाटत तेंव्हा आपल्या पेक्षा भयंकर परिस्थितीतून जाणाऱ्या लोकांकडे बघावं. त्याच्या कडे बघितलं की आपण खूप सुखी आहोत किंवा पुष्कळ बऱ्या परिस्थितीत आहोत याची आपल्याला जाणीव होते.

संत कबीर आपल्या दोह्यात सांगतात, मी ब्रह्माण्डात फिरून आलो, प्रत्येकाला कुठलं न कुठलं दुःख होतं. ज्याने देह धारण केला त्याच्या वाटेला दुःख येणारच. मग त्याला सामोरी जाण्यासाठी आपली सहनशक्ती आपण वाढवायला हवी.

रामदास स्वामी सांगतात," जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूचि शोधून पाहे". सगळे संत, तत्वज्ञानी सांगतात दुःखाचा त्रास करून घेऊ नका..... हे सगळं रुचत पण पचत नाही. आयुष्यात येणारे प्रसंग असे असतात की "मन वढाय वढाय....."अशी मनाची स्थिती होते. मानवाचा जन्म आपल्याला मिळाल्यामुळे कलेची देणगी आपल्याला लाभली आहे. अशा प्रसंगांना तोंड देतांना स्वतःला अवगत असणाऱ्या कलेत मन गुंतवावे किंवा एखादा खेळ, आपले छंद परत जोपासावे. जगात कुठलीच गोष्ट शाश्वत नाही. काहीं न काही बदल हा होतच असतो. दुःख जरी पर्वत एव्हडे असले तरी जवा एव्हड्या सुखाच्या आठवणी नेहेमी स्मरणात ठेवाव्या. ज्यांना आध्यात्माची आवड आहे त्यांनी त्याचा सहारा घ्यावा. हल्ली सर्व सोशल मिडियावर अध्यात्मावर वेगवेगळे व्हिडिओ आपण बघता असतो. स्वतःला रुचेल ती साधना करून स्वतःची सहनशीलता वाढवली की कधी ही येऊ शकणाऱ्या कुठल्या ही प्रसंगाला तोंड द्यायला मन तयार होईल.

राजा दुःखी संन्यासी दुःखी,
अमिर दुःखी रंक(गरीब) दुःखी।
कहे कबीर ये सब दुःखी,
सुखी संत मन जीत।

कबीर आपल्या एका दुःखावरच्या दोह्यात म्हणतात राजा, संन्यासी, आमिर, गरीब... या दुनियेत सगळेच दुःखी.ज्याने आपल्या मनावर विजय मिळवला तोच खरा सुखी.

थोडं कठीण आहे पण मुश्किल नाही....

- हेमांगी वेलणकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा