ऋतुगंध ग्रीष्म वर्ष १३ अंक २
"ना तलवार की धार से, ना गोलियों की बौछार से.. बंदा डरता है तो सिर्फ परवर दिगार से.." इति - दातो राजकुमार उर्फ ब्रिगेडियर सूर्यदेव सिंह. स्थळ गेंडास्वामीचा अड्डा, युग साधारणतः द्वापार युगानंतरचा काळ म्हणजे कदाचित कलियुग असावं.
मला माझ्याबद्दलही असंच वाटत होतं. आपणही कोणाच्या तिर्थरूपांना घाबरत नाही; पण ज्या दिवशी मी तांबड्या भोपळ्याची भाजी खाल्ली, माझा भ्रम दूर झाला. (तांबडा भोपळा म्हणजे शुध्द मराठीत pumpkin). त्या दिवसापासून आजपर्यंत माझं गणित बदललंय "बंदा डरता है तो सिर्फ कसबा गणपतीसे और तांबड्या भोपळ्याकी भाजीसे."
लहानपणी भीती असते आणि मोठं झालं की जाते वगैरे या सगळ्या पोकळ गप्पा आहेत. ज्याला प्रामाणिकपणे घाबरलो, ज्याची मनापासून भिती बाळगली त्याला मोठं झाल्यावर सोडायचं? असं थोडी असतं?
मी काय राज आहे? आधी सध्याचे पंतप्रधान धन्य वाटले म्हणून तीर्थ प्यायलो आणि नंतर त्यांची कामाची पध्दत आवडली नाही, तर लगेच नावं ठेवायला लागलो?
आपण आपल्या भितीशी प्रामाणिक रहाणारी व्यक्ती आहे. मुद्दा नीट समजावण्यासाठी अॅडव्होकेट चढ्ढाचा कर्दनकाळ, भारत पाकिस्तान युध्द एकहाती संभाळण्याच्या क्षमतेचा आणि भाजपचा धडाडीचा उमेदवार अजय सिंग म्हणजे सनी देओल यांचं वाक्य उधार घेतो. “हिंदुस्थान जिंदाबाद था, हिंदुस्थान जिंदाबाद है और हिंदुस्थान रहेगा”. अगदी तस्संच तांबड्या भोपळ्याची भीती लहानपणी थी, मोठं झाल्यावरही थी, आजही है आणि ठोसर पागेपर्यंत रहेगी.
इथे वाक्याचा उत्तरार्ध अर्ध्या हळकुंडानी पिवळ्या झालेल्या लोकांना म्हणजे लहानपणी पुण्याला आणि पुणेकरांना नावं ठेवणा-यांना आणि नविन नोकरी मिळताच पहिला पुण्यात फ्लॅट बुक करणा-यांना नाही कळणार. ठोसर पागा कळायला जुने खोडच हवे. गुगल करा, नाही तर दुर्लक्ष.
सांगायच तात्पर्य असं की भोपळा आजही आवडत नाही.
घरी भोपळा दिसला की पोटात अजूनही भितीने गोळा येतो. रात्री झोप लागत नाही. उद्या डब्यात भोपळ्याची भाजी तर नाही ना देणार. कधी कधी झोपेतून "नहीsssss" ओरडत खडबडून जागपण येते. घाम फुटतो.
पण काही लोक ती आवडीने खातात. दाखला द्यायचा झाला तर आमच्या मातोश्री. ती काय खायची गोष्ट आहे. भोपळा ही न आवडीचीच गोष्ट आहे आणि त्याचे पदार्थ भितीदायकच आहेत.
कवी कुसुमाग्रजांची एक प्रसिध्द कविता आहे. सर्वांच्या परिचयाची असेलच. "प्रेम कोणावरही करावं."
प्रेम कोणावर करावं
रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं,
वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं,
गाईच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं,
मोराच्या पिसा-यातील अद्भुत लावण्यावर करावं,
प्रेम काळजाच्या नात्यावर करावं,
प्रेम खड्गाच्या पात्यावरही करावं,
प्रेम कुणावरही करावं
वगैरे वगैरे....
फार सुंदर कविता आहे. पण जर चुकून यात अस लिहिलं असत की "प्रेम कशावरही करावं
प्रेम उकडीच्या गरम गरम मोदकावर करावं, आणि प्रेम तांबड्या भोपळ्यावरही करावं" तर कुसुमाग्रजांना आयुष्यभर एका टिकाकाराला सामोर जावं लागलं असतं.
लहान असताना भोपळ्याचा उपयोग फक्त वाघापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी असतो. तो पोखरून हेलमेट सारख घालून चल रे भोपळ्या टुणूक टुणूक म्हणायच असतं. बस एवढच. जेव्हा त्याचे इतरही काही उपयोग असतात हे कळले तेव्हापासून ही गोष्टसुध्दा वाचणं सोडून दिलं होतं. माझ्या मुलांनाही कधी ही गोष्ट सांगितली नाहीये. नकोच.
गोष्ट खाजगी आहे तरी सांगतो भोपळ्याची इतकी भिती तो बांधून पोहायला लागेल, म्हणून मी पोहायलासुद्धा खूप उशिरा शिकलो. काय सांगू अजून?
अहो मी halloween पार्टीला कधीच जात नाही. लोक भोपळे घेऊन येतात म्हणे.
सर्वात आणीबाणीचा काळ म्हणजे 1987. या वर्षी माझी मुंज झाली आणि लोक मला ब्राह्मण म्हणून श्रावण महिन्यात जेवायला बोलावू लागले. मला वाटत त्या वर्षी पाऊस चांगला झाला होता की काय, शेतक-यांनी तांबड्या भोपळ्याचं पीक जास्त लावलं असावं. कारण असं, ज्या घरी जेवायला जायचो तिथे तांबडा भोपळा. त्यावर्षी तांबड्या भोपळ्याची पुण्यात चांगलीच दहशत होती. बरं, ब्राह्मण म्हणून लोकांकडे जात आहेस, नीट जेव. पानात काही टाकायचं नाही ही त्यावर आजीची धमकी. 7-8 वर्षाचं पोर ते! किती अत्याचार करावेत त्या लहान जीवावर? जेवताना शेवटी तोंडाची चव बिघडू नाही म्हणून लवकर संपवलं, तर नको म्हणत असतानाही पानात संपलं म्हणून परत वाढणारे महाभाग ही काही कमी नव्हते. कदाचित पातेल्यातलं उरलेलं त्यांचं टेंशन ते कमी करत असणार. अरे मग करता कशाला?
नंतर नंतर इतकी धास्ती वाटायची की कोणी जेवायला बोलावलं तर आधीच कबूल करून घ्यायचो येईन, पण जेवणात तांबडा भोपळा नको. अस जेवायला बोलावून पुण्य कमवू पहाणा-यांविषयी अजून काय बोलावं.
थोडक्यात तांबडा भोपळा, त्याचे होणारे पदार्थ, त्याचे पदार्थ करणारे लोकं, ते आवडीने खाणारे लोकं, ते इतरांना खाऊ घालणारे लोक आयुष्यात कितीही पुढे गेले तरी या सर्वांच्या प्रगती पुस्तकावर माझ्या दृष्टीनी मोठ्ठा भोपळा आहे.
-विरंगुळा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा