आजोबांची ओसरी (गप्पागोष्टी भाग २)

ऋतुगंध ग्रीष्म वर्ष १३ अंक २


आजोबांची ओसरी मधील गोष्ट येथे एक ऑडिओ स्वरूपात:



छोट्या मित्रांनो आज पुन्हा अरुण आजोबा तुमच्याशी गप्पागोष्टी करायला आले आहेत. दोन महिने किती भरकन गेले नाही! यावेळेचा ऋतुगंध अंक “भीती” या विषयावर आहे. तुमच्यापैकी कोणाकोणाला भीती वाटते? असे विचारले की कोणी म्हणते ‘मला वाटते’, कोणी म्हणते, ‘मला नाही, याला वाटते’, तर कोणी म्हणते ‘मी कधीच घाबरत नाही!’ मित्रांनो, थोड्याफार प्रमाणात सगळ्यांनाच कसली ना कसली भीती वाटत असतेच. कोणी बाहेर बोलून दाखवतात. कोणी मनातच ठेवतात. भीती म्हणजे असे काय असते? राग, लोभ, दु:ख या जशा भावना आहेत ना, तशीच भीती सुद्धा एक भावनाच आहे. आपल्याला खूप राग आला की आपण ठरवले तर तो दाबून ठेवू शकतो. खूप आनंद झाला तरी आपण मोठमोठ्याने हसत सुटत नाही. जर या भावना आपण आपल्या ताब्यात ठेवल्या नाही तर आपले नुकसान होते हे आपल्याला चांगलेच माहीत असते. म्हणून आपण त्या दाबून ठेवायला शिकतो. तसेच भीतीला देखील प्रयत्नांनी ताब्यात ठेवता येते.

कां बरे वाटते आपल्याला भीती? एखादा भुतांचा सिनेमा बघताना आपण थरथर कापतो. डोळे गच्च मिटून घेतो. आपण काही चूक केली असेल तेव्हा आई, बाबा, टीचर यांची भीती वाटते, की ते आपल्याला शिक्षा करतील. जेव्हा जेव्हा आपल्याला काही त्रास होईल, काही अपाय होईल अशी शंका मनात येते, तेव्हा हा भीती नावाचा बागुलबुवा मनात ठाण मारुन बसलेला असतो. आपल्याला काहीतरी त्रास होणार हे कळते, पण नक्की किती, कसा होणार हे माहीत नसते. तेव्हा भीती वाटते.

मित्रांनो, भीती वाटणे ही वाईटच गोष्ट आहे असे मुळीच नाही. अगदी लहानपणी तान्ह्या बाळाला पणतीच्या ज्योतीवर बोट धरले तर भाजेल हे मुळीच माहीत नसते. अशा वेळीस आईच त्याला “हाय आहे” अशी भीती दाखवते. लाल दिवा असतांना पुढे गेला तर पोलिस पकडेल अशी भीती मोठ्या माणसांना देखील वाटते. अशा भीतीचा सगळ्यांना फायदाच होत असतो. पण कुठलीही गोष्ट खूप जास्त करू नये हे माहीत आहे नां तुम्हाला? बासुंदी आवडली म्हणून खूप जास्त खाल्ली तर दुसऱ्या दिवशी हाल होतात नां? तसेच भीतीचे आहे. भीती सुद्धा खूप जास्त वाटू दिली तर आपण घाबरून काहीच करणार नाही! साध्या साध्या हालचाली पण करता येणार नाहीत! तुम्ही पोहणे किंवा सायकल शिकला असाल ना ? पहिल्यांदा पाण्यात उडी मारतांना भीती वाटते. तरी उडी मारावीच लागते! नाही मारली तर पोहणे येईल का ? सायकल चालवतांना तुम्ही घाबरता म्हणून बाबांनी कॅरियर सोडलेच नाही, तर सायकल शिकाल का ? आपण भीती विसरून सायकल कशी शिकतो? कारण आपल्याला पक्के माहीत असते की जरा हँडल डगमगले तर धरायला बाबा मागे आहेत. बुडायला लागलो तर मित्र आपल्याला वाचवेल.

भीती असावी. पण त्यावर उपाय मनात पक्के धरून तसे वागावे. भीती कुठल्या कुठे पळून जाते. पाण्यात उडी मारायला घाबरणारा मुलगा पाहता पाहता इतरांना देखील शिकवू लागतो! ज्या गोष्टीची भीती वाटते, ती नाहीशी होण्यासाठी आधी ती गोष्ट समजावून घ्यावी. उंचावरून उडी मारली तर काय काय अपाय होऊ शकेल हे आपल्यापेक्षा मोठ्या लोकांना विचारून घ्यावे. ते अपाय होऊ नयेत म्हणून कोणती काळजी घ्यावी ते विचारावे.

भुताची भीती तर लहान मुलेच काय मोठ्या माणसांना सुद्धा वाटते! गंमत म्हणजे तरी सुद्धा भुतांचे सिनेमे सगळेच आवडीने बघतात! कां बरे? कारण सगळ्यांना ठाऊक असते की भूत वगैरे नुसत्या कल्पनाच आहेत! अजून कोणीही भूत पाहिलेच नाही! जे नाहीच त्याला काय घाबरायचे?

छोट्या मित्रांनो भीतीला नीट समजून घेण्यासाठी मी तुम्हाला दोन गोष्टी सांगतो.

एका जंगलात ढुशा नावाचा एक मस्तवाल सांड रहात होता. तो खूप शक्तिशाली होता. त्याला वाघ सिंह देखील घाबरायचे. ढुशाला एक गोड पिल्लू होते. डुबऱ्या त्याचे नांव. डुबऱ्याला सिंहाची खूप भिती वाटायची. आपले बाबा सिंहाला घाबरत नाहीत हे डुबऱ्याला माहीत होते.

ढुशा डुबऱ्याला म्हणाला- “तू सिंहाला मुळीच घाबरु नकोस.”

“मग तुम्ही पाय रोवून जसे सिंहासमोर उभे रहाता, तसा मी उभा राहू कां?” डुबऱ्याने विचारले

“आणि सिंह जर अंगावर आला तर?”

“मी लगेच मागे वळून धूम ठोकीन!” डुबऱ्या म्हणाला.

“तसे मुळीच करू नकोस. एकतर तू आकाराने अजून लहान आहेस. तेव्हा माझ्यायेवढा वाढल्याशिवाय सिंहासमोर उभा राहूच नकोस. दुसरे म्हणजे, मोठा झाल्यावर देखील, मागे वळून कधीही पळू नकोस. तसे केलेस तर सिंह तुझ्या पाठीमागून उडी मारून तुझी मान पकडणार. तू घट्टपणे पाय रोवून आणि शिंगे रोखून सिंहासमोर उभा राहिलास तर सिंहच तुझ्या अणकुचीदार शिंगांना घाबरून पळ काढेल.” ढुशाने डुबऱ्याला शिकवले.

“खरंय बाबा! मला आता नीट समजले. मी काळजी घेईन. आता मला सिंहाची भीती वाटत नाही.” डुबऱ्या बाबांसारखे मोठ्याने ओरडायचा प्रयत्न करीत म्हणाला!

गोष्टीचा बोध- भीतीला समजून घ्या. काय काय होऊ शकेल हे विचारा. तसे होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यायची? तसे झालेच तर उपाय काय करता येतील? आई बाबांशी, मित्रांशी बोलून ठरवा. काळजीपूर्वक आणि तयारी करून कुठलेही काम करा. भीतीच्या जागी आता एक मस्तपैकी प्लॅन तयार झालेला असेल!

दुसरी गोष्ट मजेदार आहे! एका जंगलात एक सिंह रहात होता. त्याला सगळे प्राणी घाबरायचे. सिंह मात्र कोणालाच घाबरत नसे. म्हणजे सगळ्यांना असे वाटायचे! खरंतर सिंहाला उंदराची खूप भीती वाटायची. आपण झोपलो असतांना उंदीर आपली आयाळ कुरतडेल असे सिंहाला वाटायचे!

इतर प्राण्यांमध्ये फक्त हत्तीला सिंहाची भिती वाटायची नाही. त्यामुळे सिंहाला वाटले आपण हत्तीला विचारू ‘तुला कोणाचीच अगदी माझी सुद्धा भीती वाटत नाही याचे काय रहस्य आहे?’

सिंहाने हत्तीला विचारले “मला सगळेच घाबरतात. मला मात्र छोट्याशा उंदराची भीती वाटते! तुला कशी काय कोणाचीच भीती वाटत नाही?

“कोण म्हणे मला भीती वाटत नाही?” हत्ती म्हणाला “उंदीर तर बराच मोठा आहे. मला तर इवल्याशा डांसाची भिती वाटते, की डांस माझ्या कानातून माझ्या मेंदूत जाईल आणि मी मरेन! म्हणून मी एकसारखा कान हलवीत डांसाला हाकलीत उभा असतो.”

गोष्टीचा बोध- भीती वाटणारे फक्त तुम्ही एकटेच घाबरट नाहीत! या जगात अगदी ताकदवान सामर्थ्यशाली लोकांना देखील कधीकधी क्षुल्लक गोष्टींची भीती वाटत असते.

तर मित्रांनो, भीती म्हणजे काय हे समजले असेल तर पुढच्या वेळी “मला अशी अशी भीती वाटते” हे सांगायला लाजू नका. मात्र त्याचवेळीस हे देखील सांगा की तुम्ही ती भीती कशी पळवून लावणार आहात!” चला तर. बाय बाय. पुन्हा भेटू!

अरुण मनोहर



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा