प्रेम जुन्या काळचं

ऋतुगंध वसंत वर्ष १३ अंक १

८०, वर्षापुर्वी प्रेम या विषयावर बोलत नसत. शाळेमधे प्रेमस्वरुप आई, वात्सल्यसिंधू आई, या कवितेत आईच्या प्रेमाचेच गुणगान असायचे. जगात फक्त आईचेच प्रेम मोठे होते, ती कविता म्हणतांना सर्व वर्ग ढसाढसा रडायचा. त्यामुळे हेच खरं प्रेम असे वाटायचे. 

निजामाच्या राज्यात तालुक्याच्या गावात चौथीपर्यंतच शाळा होती. त्यामुळे शिक्षण यथातथाच होते, पण वडील मुंबई येथुन डॉ. होऊन आले होते, त्यांना शिक्षणाचे महत्व माहीत होते. घरी टाइम्स ऑफ इंडिया येत होता. मुलांना मात्र मॅट्रिक पर्यंत शाळा होती, आमचे सर्व नातेवाईक इंग्रजी राज्यात होते. त्यांच्याकडे पाठवण्याचे ठरले.

पण मुलगी मोठी झाल्यावरच पाठवायचे. तो पर्यंत ती चौदापंधरा वर्षाची होत असे. त्याप्रमाणे आम्ही पाचवीत म्हणजे इंग्रजी पाहिलीत साड्या नेसूनच जात असू. मुला-मुलींची शाळा पण मुला-मुलींनी बोलायचे मात्र नाही. 

मराठी विषयात गद्यपद्यात व्याकरणात अनेक प्रकार असत, त्यात काव्याचे श्रृंगार, वीर, करुण, रौद्र वगैरे प्रकार होते पण प्रेम हा प्रकार शेवटी होता. त्या काळात प्रेम म्हणजे मातापित्याचे, बहिण भावंडाचे, आजी-आजोबांचे एवढेच माहित होते.

पारतंत्र्यात असल्याने देशावरचं प्रेम सर्वश्रेष्ठ ठरले होते. देशप्रेमाने सर्व झपाटले होते. तेव्हा देशप्रेमाचीच गाणी म्हणायची, पांचट गाणी म्हणायची नाहीत. सिनेमा सुद्धा देशप्रेमाचाच पहायचा, जसे संतसखु, रामराज्य, सीतास्वयंवर वगैरे असेच पहायचे. पांचट सिनेमा पहाणे चांगलं लक्षण नाही असे मत होते, पांचट हा शब्द इतक्या वेळा यायचा तो उरला सुरला तरी अगदी बेचवच व्हायचा.

पुस्तकं वाचायची ती सुद्धा उपदेशपर ,कांही चांगलं घेतां येईल अशी. त्या काळात साने गुरुजींनी गोड गोष्टीचे दहा भाग लिहीले होते, ते वाचायचे. ‘श्यामची आई’ या त्यांच्या पुस्तकाने लोकांना वेड लावले होते, ते वाचून सर्व वर्ग किती रडला हे कळत असे.

वर्गात मुल मुली बोलत नसत पण, अगदी भावाचा मित्र जरी घरी आला तरी बोलत नसत. जर कुणी मुलगा मुलगी कांही निमित्ताने जरी बोलतांना दिसले तरी त्यांची काहीतरी भानगड आहे अशी शंका यायची. त्या काळी मीनाक्षी, वनमाला, दुर्गा खोटे वगैरे नट्या होत्या. मीनाक्षीने अगदी तोकड्या कपड्यात यमुनाजळी ’खेळू खेळ कन्हैया’ हे गाणे म्हटले होते. ‘ब्रम्ह्मचारी’ या सिनेमातील ते गाणे, त्यावर बरीच चर्चा झाली होती. शाळेच्या गॅदरिंगमधे मुलामुलींच्या वेगळ्या नाटिका असत. 

कॉलेज मधेही तीच तऱ्हा होती, पण तोपर्यंत देशाच्या स्वातंत्र्याची चळवळ सुरु होती, त्या निमित्ताने मुलं-मुली एकत्र येत होते. इंग्रजांच्या विरुध्द लढ्याच्या तयारीने एकत्र येत, प्रभात फेऱ्या, मोर्चे, सत्याग्रह वगैरे... मोठमोठ्या पुढाऱ्यांच्या सभा होत असत, अगदी तुरुंगात जाण्याचीही तयारी असे! हा भाग सुध्दा कौतुकाचा होता, स्वातंत्र्यानंतर मात्र वेगळं वळण लागलं. 

या आधी व नंतरही साहित्यिकांनी आपले विचार मांडले, त्यात त्यांचाही वाटा मोठा आहे. त्यांची नावे सांगण्यात वेळ घालवत नाही. या साहित्यिकांनी लोकांना वेड लावलं होतं, आजही आहे. आमच्या घरी सर्वांना वाचनाचं प्रचंड वेड, त्यामुळे पुस्तक खरेदी, तीही आवडत्या लेखकांची. हा पण त्यांच्या वरच्या प्रेमाचाच भाग आहे. प्रेम हे कुठल्याही प्रकारचे असूं शकते. त्या प्रेमाला कशाचीही उपमा देता येत नाही.

हे सारं तुमच्या प्रेमापोटी लिहिलं, तुम्ही माझ्या प्रेमापोटीच आवडलं नाही तरी, "खूप छान" म्हणून मला आणखीन हरबऱ्याच्या झाडावर चढवणार ! त्यामुळे मला मूठभर मांस चढणार!!! ( जे चढायला नको आहे ... )

आता समाप्ती करते. 

-शांता टिळक 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा