करूण रसातील गाणी

काही अविस्मरणीय करूण रसातील मराठी गाणी:
मराठी भाषिक समाजाला करूण रसातील गाणी का आवडतात याचे मला एक कोडं आहे. येथे मी पाच मराठी प्रसिद्ध गाणी उदाहरण म्हणून देत आहे.

तोच चंद्रमा नभात



कवयित्री - शांताबाई शेळके, गायक आणि संगीतकार सुधीर फडके (बाबूजी)
शीला भट्टारिका यांच्या संस्कृत श्लोकावरून शांताबाईंना असफल प्रेमाच्या आशयाचे गीत सुचले आणि त्यांनी या विषयावर चार कडवी लिहिली त्यातील तीन कडवी ध्वनिमुद्रित झाली. शांताबाईंनी १० मिनिटात काव्यलेखन पुरे केले आणि पुढील दहा मिनिटात बाबूजींनी हे काव्य चालीत बांधले. सर्जनशीलतेचा उत्तम अविष्कार म्हणजे हे गीत आहे

आज राणी पूर्वीची ती प्रीत 



कवी वा. रा. कांत, गायक बाबूजी आणि संगीतकार - यशवंत देव
असफल प्रेमाची कहाणी या गीतात व्यक्त केली आहे. यशवंय देव काही वर्ष नागपूर रेडिओ केंद्रात कार्यरत होते तेव्हा त्याकाळात विदर्भातील काही प्रतिभावंत कवींचा परिचय झाला आणि त्यांची काही गाणी पुढे त्यांनी चालीत बांधली त्याचेच हे उदाहरण

बगळ्यांची माळ फुले 



कवी वा. रा. कांत, गायक पंडित वसंतराव देशपांडे आणि संगीतकार श्रीनिवास खळे.
असेच पूर्वीच्या प्रेमाची आठवण येणारे हे काव्य आहे. पंडित वसंतराव देशपांडे यांच्या अफाट गायकीने हे गाणे अजरामर झाले आहे

भातुकलीच्या खेळामध्ये



कवी मंगेश पाडगावकर, गायक अरुण दाते संगीतकार यशवंत देव
या काव्याची सुरुवात गोड भावाने होऊन पुढे त्यात विरह आहे. हे गाणे यशवंत देवांनी चालीत बांधले आणि अरुण दाते आणि मंगेश पाडगावकर यांना ऐकवले तेव्हा दोघांनाही ही चाल आवडली नाही. पण देव याच चालीचा आग्रह धरून होते. शेवटी अरुण दात्यांनी अनिच्छेने गाणे ध्वनिमुद्रित केले. या गाण्याला अमाप प्रसिद्धी मिळाली. अरुण दाते यानी एका भेटीत सांगितले, हे गाणे म्हटल्याखेरीज प्रेक्षक सोडत नाहीत. गाणे लोकप्रिय झाल्यावर दाते आणि पाडगावकर यांनी आपली चूक मेनी केली.

विकलं मन आज



कवयित्री शांत शेळके, गायक बकुल पंडित संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी
भारताच्या फाळणीची पार्श्वभूमी असलेलं, एक हिंदू आणि एक मुस्लिम गायक मित्र यांची कथा असलेले एक हृदयस्पर्शी नाटक. कथा रणजित देसाई यांची आणि त्यातील सर्व गाणी लिहिली शांताबाईंनी. या काव्यात अस्वथ मनाचे उत्तम वर्णन केले आहे आणि अभिषेकीबुवानी अतिशय सुंदर चाल बांधली आहे.

ही चाल राग सरस्वतीवर आधारित आहे. जर राग सरस्वती व्यवस्थितपणे गायला गेला तर हा राग एक गंभीर वातावरण तयार करतो. याच रागावर सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गाणं 'रिमझिम झरती श्रवणधार' हे पण एक प्रसिद्ध गाणे असेच करूण रसातील आहे.

कदाचित भारत देशावर शेकडो वर्ष परकियांनी केलेले राज्य, शिवाजी महाराज आणि पेशवे यांचा काळ वगळता देश आणि महाराष्ट्र गुलामगिरीतच होता. १९४७ साली आपला देश जरी स्वतंत्र झाला तरी गेल्या ७० वर्षात योग्य रीतीने देशाची उन्नती झाली नाही, त्यामुळे आलेले नैराश्य हेच कदाचित करूण रसातील गीतांच्या आवडीला प्राधान्य देत असावे.

- शैलेश दामले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा