ढगाची सावली

ऋतुगंध हेमंत - वर्ष १२ अंक ५


डोईवर ऊन रखरखीत
पायाखाली वाट खरखरीत


दुर्गम्य सुळके गगनचुंबी
बाजूला निसरडी दरी


शीतल पाण्याच्या सईने
कंठ शुष्क पडला


रान फुलाच्या विरहाने
उष्ण वाराही थबकला


वळणावर सुकलेले झाड
निष्पर्ण त्याची सळसळ


एकटीच वाट खुरडतो मी
पाहते उंच उडणारी घार


कसा अडकलो पोचलो कुठे
मनास कळूनही नकळे


सांडून गेले सारे मित्र
वादळात हरपले छत्र


कसला आधार कसली सुरक्षा
झिजून गेल्या सर्व अपेक्षा


कुठूनसा आला श्यामल घन
थांबवण्या असीम रणरण


जग आता राहिले ना वैराण
अमृत ओलावा शिंपतो घन


हुरूपाची सुटता वावटळ
विरघळली सारी मरगळ


वाट ओली टवटवीत
मृदगंध पसरला मनात


रान पक्ष्याची शीळ धुंद
जणू सानिका घुमते मंद


पंख पसरून वाराही आला
उडवून लावत निराश पाचोळा


वाळक्या खोडाला लागले डोहाळे
अनपेक्षित हिरवे गार धुमारे


होते सुळके जे दुर्दम्य
भासती आता नयनरम्य


भेसूर खोल दरीतून
निर्मल झऱ्याची खळखळ


काळिमा छु मंतर झाला
जादू का भटकत्या मेघाची


शोधाअंती गमले मला कि
करवट ती निरपेक्ष मनाची 


- विवेक वैद्य

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा