सबंधन सप्रेम

ऋतुगंध शरद - वर्ष १२ अंक ४


आकाशात गडद काळे ढग दाटून आलेले असताना, काळ्या मातीत, वाळलेल्या पिवळ्या गवतात काळ्या-पिवळ्या मादी आणि नर किंगकोब्रांची गाठ पडते. काळी-पिवळी वीज शेतजमिनीत आळोखेपिळोखे घेत जावी तसे ते एकमेकांभोवती आवेगाने विळखे घालून झटपटायला लागतात. काळ्या ढगांतून चंदेरी तेज सरसरत जावे तशी त्यांच्या शरीरातून सुखाची चमक सरसरत जाते. घटकाभर सोसाटल्यासारखं होऊन मग पाऊस पडून जमिनीचा वाफारा निघावा तसे ते थोड्यावेळाने क्लांत होतात. मादीने आपला वंश पुढे चालवायला जोडीदार निवडलेला असतो; आणि नराची मेहनत सुफळ झालेली असते. मग ते दोघे संगतीने राहू लागतात. काही दिवस असेच जातात आणि मग अचानक, निकड न भागलेला दुसरा नर तिथे येऊन ठाकतो. 

दोन तडफदार नर किंग-कोब्रा एकमेकांना आव्हान द्यायला जमिनीवरून फूटफूटभर उंच फणा काढून समोरासमोर ठाकलेले. असं वाटतं की आता त्वेषाने एकमेकांवर फुत्कारतील, विषारी दंश करतील एकमेकांना; पण घडतं भलतंच. यत्किंचितही तोंड न उघडता अतिशय डौलदार नृत्य केल्याप्रमाणे ते डोलायला लागतात. एकमेकांच्या डोक्यावर अलगद स्पर्श करायला चढाओढ करतात. बराच वेळ असा खेळ चालतो. कोणी कितीवेळा दुसर्‍याच्या डोक्याला स्पर्श केला ह्याची गणती कशी ठेवतात कोण जाणे; पण नव्या नराची निकड पहिल्या नराच्या बचावाला भारी पडते. पहिला नर निमूट हार मानून निघून जातो. नवा नर त्याला दातही लावत नाही. किती हा उमदेपणा!

नवा नर मग मादीशी जवळीक करु लागतो. तिला ते मान्य असतं का ते कळायला मार्ग नाही; पण दोन्ही नरांनी आपसांत निकाल लावलेला असतो. नवा नर थोडंसं मादीच्या मागे-पुढे करतो, सलगी करायला बघतो आणि कसं कोण जाणे; पण तिला स्पर्श करताना त्याला कळतं की तिच्या उदरात पहिल्या नराचा अंश आहे. दुधात मिठाचा खडा पडावा तसा तो इतकावेळ राजस, उमदा वाटणारा नर क्षणार्धात हिंस्त्र होतो आणि मादीच्या नरडीचा घोट घेतो. ती तडफडते, झटपटते, जीव आणि वंश वाचवायला आकांताने प्रयत्न करते; पण नराच्या पकडीसमोर तिचं काहीही चालत नाही. तिचा जीव पूर्णपणे गेला आहे ह्याची खात्री होईपर्यंत नर तिला सोडत नाही; आणि जीव गेल्याची खात्री झाल्यावर निर्विकारपणे तिचं मृत शरीर ओलांडून सरसरत निघून जातो.

डॉक्युमेंटरी संपली तरी सिद्धार्थ तसाच बसून राहिला त्या प्रसंगाचा विचार करत. त्यातलं क्रौर्य त्याला प्रचंड अस्वस्थ करून गेलं. "पण त्या नागाला क्रूर तरी कसं म्हणणार?", सिद्धार्थचं विचारचक्र गरागरा फिरत होतं, "एका करवंदाएवढा त्याचा मेंदू. त्याला काय विचारशक्ती असणार? त्याच्या जनुकीय प्रेरणेनुसार तो वागला. किंबहुना असं वागणारे कोब्रा टिकले उत्क्रांतीमध्ये म्हणून आज ते तसं आहे, नाही का? त्या नागाला दुसरी काही भावनाच नाही, निव्वळ एका जैविक यंत्रासारखं तो वागणार. त्यात चूक-बरोबर-क्रौर्य-क्षमा-दया-माया हे काहीही नाही. पण समजा त्याला विचारशक्ती असती माणसासारखी तर त्याने सोडलं असतं जिवंत त्याच्या असलेल्या मादीला? समजा त्याला माहित असतं माणसासारखं की, नको असेल तर तो अंश नष्ट करता येईल; तर त्याने त्या मादीला तिच्यातला आधीचा अंश नष्ट करून स्विकारलं असतं त्याच्या वंशाची वाहक म्हणून? त्याला काय, वंश वाढल्याशी कारण ना? की अशी विचारशक्ती असूनही तिला त्याने अपवित्र झाली म्हणून मारलंच असतं?". बेडरूममधून शिल्पाची हाक आल्यावर, अनुत्तरित विचार मनाच्या कोपर्‍यात ढकलून, टीव्ही बंद करून सिद्धार्थ उठला आणि बेडरुममध्ये गेला. शिल्पा शॉवर घेऊन आली होती.

"झोपायचं नाही का?", त्याला पाहून ती म्हणाली.

"हं", तो म्हणाला आणि बेडच्या कडेवर बसून तिच्याकडे पाहू लागला. तिचे केस, तिच्या डोक्याचा आकार, तिचा चेहरा, तिची शरीरयष्टी. एक स्वतंत्र, त्रयस्थ व्यक्ती म्हणून तिचा तो विचार करायला लागला. तिचा सावळा गोड गोल चेहरा पाहून त्याला नेहमीच हृदयात मऊ मऊ वाटायचं; पण कधी तिच्यावर मालकीहक्क असल्यासारखं त्याला वाटलं नाही. "एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून ती आपल्याला आवडते", त्याला वाटलं,"पण आपल्यातही जनुकीय प्रेरणा आहेतच ना? समजा तिला दुसरं कोणी आवडलं तर?" त्या विचाराने तो चमकला. मनात एकदम गोंधळ झाला त्याच्या. त्या विचाराने एकदम प्रतिक्रिया येण्यापेक्षा आपली प्रतिक्रिया काय असायला हवी ह्याच विचाराने तो गोंधळला. "माणूस कसा प्राणी आहे? किंगकोब्रासारखा?", त्याला प्रश्न पडला.

दिवे मालवल्यानंतरही बराच वेळ त्याला झोप येईना. शेवटी तो स्टडीत येऊन बसला आणि नुकतंच वाचून संपवलेलं "सेपियन्स" रँडमली उघडून वाचायला लागला.

*************************

दहा वाजता बॅडमिंटन खेळून झाल्यावर नेहमीप्रमाणे तो आणि अभिजित चहा घेत बसले होते; तेव्हा विषय निघालाच. डॉक्युमेंटरीबद्दल आणि त्या प्रसंगातल्या क्रौर्याबद्दल त्याने अभिजितला सांगितले.

"हं...", ऐकून बराच वेळ शांत बसून अभिजित शेवटी म्हणाला,"चारित्र्याच्या संशयावरून बायकोला ठार मारणारी माणसंही असतात की. माणूसही शेवटी प्राणीच. तू रिचर्ड डॉकिन्सचं 'द सेल्फिश जीन' वाच. त्यात प्राण्यांच्या वागण्यामागची गेम थिअरी उलगडून दाखवलीय."

"अरे, पण माणूस विचार करणाराही प्राणी आहे. आपलं सगळं वागणं निव्वळ जनुकीय प्रेरणेतून नसतं. तसं असतं तर कायदे-कानून आणि सामाजिक संकेत आलेच नसते ना अस्तित्वात."

"माणूस विचार करणारा प्राणी असला तरी शेवटी विचारांचं मूळ जनुकीय प्रेरणेतच आहे. आपला वंश पुढं चालवण्यासाठी आणि आपली संपत्ती आपल्याच संततीला मिळावी ह्या विचारातूनच स्त्रियांवर बंधनं आली; म्हणजे चुकून दुसर्‍याची संतती आपली समजून त्यांना वाढवण्याचे श्रम घेतले जाऊ नये म्हणून."

"पण हे सगळं शेती करून माणूस स्थिरस्थावर होऊन नागर वसाहती वसल्यानंतर बर्‍याच काळाने झालं. तू 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' वाचलंय का? त्यात माणसांचं वागणं कुठल्या काळात कसं होतं ते लिहिलंय आणि ते वाचल्यावर कळतं की ही निव्वळ जनुकीय प्रेरणा नसून त्या-त्या काळातल्या सामाजिक नीतिकल्पनांवरून माणसांचं वागणं ठरत होतं. एकेकाळी तर स्त्रियांना गाईगुरांसारखीच किंमत होती. अनेक स्त्रियांची मालकी असणे व आलेल्या पाव्हण्याला त्यातली स्त्री देणे वावगे समजत नसत. त्या स्त्रीच्या भाव-भावनांना किंमत शून्य. जसजशी संपत्ती वाढत गेली तसतशी आपल्याच रक्ताच्या वारसाला ती मिळावी म्हणून ह्या कल्पना बदलत गेल्या. सुरक्षेची साधनं व डीएनए टेस्ट्स वगैरे नसल्यामुळे एकमेव उपाय म्हणजे स्त्रीवर बंधनं आणणे. आणि मग पतिव्रता वगैरे संकल्पना आणि त्याचे अफाट उदात्तीकरण."

"हं, खरंय, पण तेव्हा दुसरा उपायच नव्हता ना. आपण कष्ट करुन संपत्ती कमवायची आणि ती दुसर्‍याच्या संततीला मिळाली म्हणजे?"

"बरोबर. तेव्हा उपाय नव्हताच, तेव्हा आजची आधुनिक साधने नव्हती ना."

"आज साधनं आहेत म्हणून फरक पडलाय असं तुला वाटतं? मध्यंतरी तो दीपिका पदुकोणचा 'इट्स माय चॉईस' व्हिडिओ आला होता त्यावर किती टीका झाली होती."

"हो ना... अमोल पालेकरचा 'अनाहत' पाहिलायस का? तो पाहायला गेलो होतो तेव्हा गंमतच झाली. पिक्चर संपल्यावर सगळे बाहेर पडत असताना, आमच्या पुढच्या रांगेत उभ्या असलेल्या काकू त्यांच्याबरोबरच्या दुसर्‍या काकूंना म्हणाल्या "अगं, हा पालेकरांचा पिक्चर आहे ना, मग असं काय?". अमोल पालेकरच्याच पहेलीवरही बर्‍याच लोकांनी नाकं मुरडली होती. स्त्रीच्या कामनांना काहीही किंमत दिली की लोकांना आवडत नाही."

"र.धो.कर्व्यांना किती हाल काढावे लागले माहिताय ना? ते पाहून त्यानंतर सगळे चिडीचूप ह्या विषयावर इतकी वर्षे झाली तरी! बाय द वे, तू ध्यासपर्व पाहिला असशीलच. तोही अमोल पालेकरचाच आहे."

"हो... एकदम डिप्रेसिंग. एकशेतीस कोटी माणसं पैदा करणारा देश आपला आणि".

**************************

शुक्रवारी संध्याकाळी ऑफिसमधून निघाल्यावर सिद्धार्थला निखिलचा फोन आला. तो आणि मोना नदीकाठच्या रेस्टॉरंटमधे बसले होते. मग शिल्पाला तिकडे यायला सांगून सिद्धार्थ तिकडेच गेला. जाऊन बसला नाही तोच निखिलचा प्रश्न,

"वाचलंस का?"

"काय?", सिद्धार्थ गोंधळून म्हणाला.

"स्क्रिप्ट."

"स्क्रिप्ट?"

"मित्रा, महिन्याभरापूर्वी मी तुला नाटकाचं स्क्रिप्ट दिलं होतं वाचायला. वाचलंस का?"

"ओह, ते होय? वाचलं, वाचलं."

"कोणतं स्क्रिप्ट रे?", मोनाने उत्सुकतेनं विचारलं.

"अगं ते 'अलिबाबा आणि चाळीशीतले चोर'. मी ह्याला दिलं होतं वाचायला; पण ह्याचं काही म्हणणंच नाहीय त्यावर.", निखिल म्हणाला.

"कोण म्हणतं म्हणणं नाहीय? नंतर आपलं बोलणंच झालं नाही ना!"

"बरं मग आता सांग काय म्हणणं आहे."

"तसं चांगलं आहे. थोडं शब्दबंबाळ आहे; पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटी जी काही तात्त्विक कसरत करुन कोलांटीउडी मारलीय ना नाटककाराने, त्याला तोड नाहीय. कातडीबचाऊ!"

"कोलांटी उडी काय मारलीय?"

"इतकी बडबड करून झाल्यावर काय शोध लावला की, आपल्याला काही करायचं नसतं; फक्त एक्साईटमेंट हवी असते. म्हणजे काही करण्याच्या कल्पनेत एक्साईटमेंट आहे; पण प्रत्यक्ष करण्यात नाही?"

"अरे ए, तसं म्हटलं नसतं शेवटी तर कोणी त्या नाटकाला हात तरी लावला असता का? तसं म्हणूनसुद्धा त्या नाटकाला विरोध होतोच ना?."

"म्हणूनच म्हटलं ना. सगळं शेवटी व्यवहाराच्या गणितापाशी येतं. साहिर लुधियानवी ज्याला ‘दौलत के भूखे रिवाज’ म्हणतो ना ते हेच. नाटक चाललं पाहिजे म्हणून शेवट कसा कोणाच्याही कशालाही धक्का देणारा नको; नाटकभर हूल देत राहिलं तरी. आपल्याला काही करायचंच नसतं कारण व्यवहाराला धक्का बसण्याची भीती असते. काळ बदलला तरी ते पूर्वापार चालत आलेले संपत्तीच्या रक्षणाचे रिवाज तोडायला नकोत; पण तोंडाने आयुष्य भरभरुन जगण्याची, नव्या अनुभवांना भिडण्याची भाषा."

"तू जरा अतिरेकी बुद्धीवादीपणा करतोय असं नाही वाटत का तुला? मलातरी ते नाटक आवडलं. दुर्दैव की ते करता येणार नाही; पण त्यात वावगं काही दिसत नाही मला."

"वावगं नाहीच आहे काही. फक्त जे वास्तवात वाटतंय त्याचं डिनायल करण्याचा, त्या डिनायलला तात्त्विक मुलामा देण्याचा प्रकार आहे नेहमीचा."


********************************

रात्री घरी आल्यावर सिद्धार्थ आणि शिल्पा लिव्हिंग रुममध्ये सोफ्यावर जरा टेकले आणि चाळा म्हणून सिद्धार्थने टीव्ही लावला. टीव्हीवर "जस्ट फॉर लाफ्स" नावाचा कॉमेडी शो चालू होता. रस्त्यांवर, मॉलमध्ये येणार्‍या-जाणार्‍या लोकांवर काहीतरी प्रँक करुन छुप्या कॅमेर्‍याने त्यांच्या प्रतिक्रिया टिपून त्या दाखवत होते. बघता बघता शोमध्ये नवी गंमत सुरु झाली. रस्त्याने जाणार्‍या जोडप्यांपैकी स्त्रीला तिच्या जोडीदाराच्या नकळत विश्वासात घेऊन भलत्याच पुरुषाबरोबर नाचायला आणि तो नाच एन्जॉय करण्याचा अभिनय करायला सांगत होते. जोडप्यातली स्त्री त्या परक्या पुरुषाबरोबर अगदी घसट करून आनंदाने नाचायला लागली की तिच्या जोडीदाराच्या प्रतिक्रिया छुपा कॅमेरा टिपू लागत होता आणि त्या शोचा सूत्रसंचालक मुद्दाम तिच्या जोडीदाराला भडकावून तो काय करतो ते बघत होता.

ते बघता बघता शिल्पाने एकदम वळून विचारलं, "समजा तुझ्यासमोर मी असं कोणाबरोबर नाचत असले, तर तू काय करशील?"

सिद्धार्थने तिच्याकडे पाहिले. तिच्या सावळ्या गोड चेहऱ्याकडे पाहताना त्याच्या हृदयात काहीतरी उचंबळून आलं. हसऱ्या चेहर्‍याने तो धीरोदात्तपणे म्हणाला,"तुला मजा येत असेल तर मला काही वाईट वाटणार नाही."

एकाएकी तिचा हसरा चेहरा बदलला आणि हसण्याची जागा रागाने घेतली,"काही वाटणार नाही? म्हणजे तुझं माझ्यावर प्रेमच नाहीय?”

सिद्धार्थ एकदम गडबडला. "प्रेम नसण्याचा कुठे प्रश्न येतो इथे? मी फक्त पझेसिव्ह नाही इतकंच. नुसतं नाचलं कोणाबरोबर तर त्यात काय वाटण्यासारखं आहे जोपर्यंत तुला आवडतंय तोपर्यंत?"

"ते काही नाही.. तू विचित्रच आहेस. कुठल्याही नॉर्मल पुरुषाला राग येईल असं पाहून. पण तुला नाही येणार कारण तुला माझ्याबद्दल काही वाटतच नाही.", इतकं म्हणून ती तणतणत बेडरूम्मध्ये निघून गेली.

सिद्धार्थ अवाक् होऊन तसाच ती गेली त्या दिशेने बघत बसून राहिला. टीव्हीवरचे लोक आता कॅमेर्‍याकडे बोट दाखवून खदाखदा हसत होते.

- निरंजन नगरकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा