शुभ दीपावली

ऋतुगंध शरद - वर्ष १२ अंक ४


"उठा उठा,दिेवाळी आली,मोती स्नानाची वेळ झाली", असा पुकारा करीत एक तरुण आणि छोटा मुलगा घरोघरी जातात आणि दिवाळीच्या पहाटे लोकांना उठवतात.

जुनीच पण अलिकडे परत दिसायला लागलेली एक जाहिरात पाहिली आणि मन पाखरू एकदम बालपणाकडे झेपावले. माझे बालपण पुण्यनगरीत गेले. पुणे, जिला सांस्कॄतिक वारसा आहे, परंपरेचे वळण आहे अन शालीनतेबरोबरच पुरोगमित्वाचे वलयही आहे.

"बालपणीचा काळ सुखाचा" असे आत्ताच्या पिढीच्या बाबतीत माहीत नाही; पण काही वर्षांपूर्वी तरी खरे होते. तेव्हा पु.ल.वाचले नव्हते; पण त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली प्रत्यक्षात भेटत होत्या. करमणुकीची आधुनिक साधने नव्हती; पण सण-उत्सवांची रेलचेल होती आणि मुख्य म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद घेण्याची क्षमता नक्कीच होती.

दीर्घ, तप्त ग्रीष्म संपून जेव्हां वर्षाकडे वाटचाल सुरु व्हायची ना, तेव्हा सर्वप्रथम सामोर्‍या यायच्या मनाला उल्ह्सित करणार्‍या श्रावणसरी! चिंब भिजण्याचा आणि इंद्रधनुष्याचा मनोहर खेळ व्हायचा. मग नवपरिणितांच्या मंगळागौरींनी माजघरे आणि नंतर नंतर कार्यालये दुमदुमायला लागायची. काचेच्या काकणांची किणकिण अन नवथर हसण्याने वातावरण मंगलमय होऊन जायचे. ऊन पावसाचा मजेदार खेळ संपतोय तोवर गणरायाच्या स्वागताची सिद्धता व्हायची. स्वत: खपून तयार केलेले मखर, देखावे अभिमानास्पद वाटायचे. आरती मन्त्रोच्चारांचा जयघोष खूप पवित्र वाटायचा आणि जोडीला सुबक मोदक मिटक्या मारीत खायचे. पाणावलेल्या डोळ्यांनी गणपतीबाप्पांची पाठवणी करून झाली की पितरांचे ऋण उतरण्याचे दिवस यायचे.

आता वेध लागायचे ते नवरात्रीचे! लहान,मोठ्या मुलींसाठी भोंडला किंवा हादगा (गुजरातमध्ये गरबा समस्त स्त्रीवर्गासाठी) हा एक सोहळाच असायचा. रोज रात्री कोणाच्या ना कोणाच्या घरी पाटावर हत्ती रेखून त्याभोवती फेर धरून हादग्याची गाणी म्हटली जायची अन मग तो घोळकाच्या घोळका दुसर्‍या घराकडे वळायचा. दर दिवशी वाढत जाणारी खिरापतींची संख्या हे मोठेच आकर्षण! ओळखायला अवघड आणि नवनवीन पदार्थ बनविण्यासाठी आईकडे लावलेला धोशा....सगळीच गंमत होती!! मग विजयादशमी अर्थात "दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा" म्हणत आपट्याची पाने सोने समजून लुटायची मजा. नव्या बाळगोपाळांची पाटी सरस्वतीने सजवून शाळेचा प्रारंभ व्हायचा.

आता बिच्चारे कित्ती लवकर नर्सरी नावाच्या पाळणाघरात जातात.....कोजागिरीचा काय तो डौल! शरदाची शिरशिरी अनुभवत शुभ्र चांदण्यात बसून घेतलेला घट्ट आटीव केशरी दुधाचा आस्वाद खूप दिवस रेंगाळायचा..

येणार येणार असे पडघम वाजवत दिवाळी येऊन हजर होते. गृहिणींच्या पाककलेला उधाण यायचे, सुट्टीला आलेले पाहुणे अन मुलाबाळांना चवीपरीने खाऊ घालण्यात धन्यता वाटायची, चकल्या, चिवडा, लाडू, अनरसे असे वेगवेगळे वास दरवळू लागायचे. बालिका सुबक रांगोळ्या सजवण्यात गर्क असायच्या, तुटपुंज्या पगारातून केलेल्या बचतीच्या पैशातून फटाके, नवे कपडे यायचे अन अप्रूपाने वापरणे व्हायचे. घराबाहेर आकाशकंदिल टांगलेले दिसायचे. भल्या पहाटे उठून उटणे आणि खास उत्सवाचा म्हणून आणलेल्या मोती साबणाने स्नान करण्याची पर्वणी साधायची. पहिल्या प्रहरी पहिला फटाका कोण लावणार याचे गुप्त बेत व्हायचे. तुळशीबागेत प्रभु रामचंद्र भक्तांची वाट बघत असायचे अन तेव्हा (ग्लोबल वार्मिंग पूर्वी) कार्तिक महिना थंडीचा असायचा; त्यामुळे अक्षरश: कुडकुडत आरती गाठायची. आपले सण आणि निसर्ग यांचे नाते जवळचे. वसुबारसेला गाय-गोर्‍ह्याची पूजा, धनत्रयोदशीला धान्याने पूजा, नर्कचतुर्दशीला करटुल्याचे फळ नरकासुर समजून पायी चिरडायचे, लक्ष्मीपूजनाचे घरी आणि व्यापा-यांना 

जास्तच असायचे. पाडव्याला पति-पत्नी आणि भाऊबीजेला भावा-बहिणीच्या नात्याला सुखची झालर लागायची. दिवाळीत एक एक करून लावलेल्या पणत्यांनी सजवलेले, उजळलेले घर किती शांत आणि सुंदर दिसायचे. हं फटाके कधीतरी जीवघेणी गंमतही करायचे. एकदा एक चमनचिडी एका ९-१० वर्षाच्या मुलाच्या शर्टात शिरली की! आई गंऽऽऽ!!!काय टरकलो होतो आम्ही सगळे! भित्र्या सशासारखे "मी नाही, मी नाही" म्हणत जीव मुठीत धरून होतो; पण तो पठ्या बहाद्दर, त्याने ती चमनचिडी काढून फेकली आणि परत लवंगी लावायला तयारच! हीरोच वाटला तो तेव्हा.

दिवाळी संपली तरीही गंमत संपायचे नाव नाही ते पार त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत. तुळशीचे लग्नही नटून थटून खर्‍या लग्नासारखेच गाजायचे. त्या दिवशीची कोकणातली गावोगावी मुख्य देवळाच्या आवारातली सजलेली, लखलखणारी उंच दीपमाळ अजूनही डोळ्यासमोर दिसते. दिवाळीच्या सुट्टीत किल्ले करायची, रांगोळ्यांची, भाज्यांपासून बनविलेल्या दागिन्यांची अशा कित्येक स्पर्धांचे पेव फुटायचे. अगदी अल्प खर्चात होणारे पण कलागुणांना वाव देणारे बरेच उपक्रम होत असत. सुट्टीत बाहेरून आलेल्यांकडून ऐकलेल्या गोष्टींमधे रात्री सरायच्या. दिवाळीत एक दिवस तरी "कोळाचे पोहे" हा चिंचेचा कोळ आणि हलकी मिरची लावलेले नारळाचे दूध घालून केलेला स्वादिष्ट प्रकार होणारच. आजकाल ते बहुधा कोणाला माहीतच नसतात.

काळानुसार आपण स्थलांतरित होतो. "आहे" हे "होते" मधे बदलते, आपले अग्रक्रम बदलतात, स्थळकाळाप्रमाणे पद्धती आटोपशीर केल्या जातात. सणवार अजूनही साजरे होतात. खूप पैसा आहे, म्हणू ती हौस पुरवण्याची क्षमता असते पण सगळ्याचे अप्रूप मात्र हरवत चालले आहे. भाऊबीज किती मिळाली ह्यापेक्षा मी किती जास्त भावांना ओवाळले ह्याचे कौतुक क्वचितच दिसते. आता दिखाऊपणाला जरा जास्तच महत्त्व! परंपरांवर जुनाटपणाचा शिक्का बसतो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची मजा नवीन लहान मुलांना फक्त ऐकूनच माहीत असतात. पण आपल्यासारख्यांनी काळानुसार नव्या अन्वयार्थाने समजावले तर कच्ची मडकी नावीन्य म्हणून तिकडे वळून बघतात. जुने तेच सोने असा अट्टाहास अजिबात नाही, नव्या विस्तारलेल्या कक्षांमधून खूप काही आत्मसात करता येते. तरीही आपल्या संस्कॄतीचा वारसा पुढे सरकवायला हवा. भारताबाहेर राहणारी आपली मंडळी ह्या परंपरा जपण्याचा स्तुत्य प्रयत्न करतातच. एकच वाटते, आपल्या सगळ्या सण-उत्सवांची निसर्गाशी असलेली नाळ तुटत जाते आहे ते थांबवायला हवे. त्या त्या ॠतूनुसार बनणार्‍या पदार्थांचे महत्व, त्यामागची आरोग्याची गुरुकिल्ली, भावना कमी होतेय. दुकानात सगळेच मिळते की पण मानसिक समाधान देणा-या छोट्या रिवाजातून मिळणारा मोठा आनंद उणावत चालला आहे, तो पैशाने नाही विकत घेता येत घेत! आणि हे सगळे ज्यांनी अनुभवलेले आहे त्यांना नक्की जाणवेल. पण आपण भरलेल्या अर्ध्या पेल्याकडे पाहून जमेल तितके तरी संभाळून पुढेही पाठवायचे ठरवले की झाले काम !!

चला तर मग,तयार व्हा खुसखुशीत अंक वाचत वाचत खुमासदार पदार्थांचा आस्वाद घ्यायला!दिवाळी येऊच घातली आहे, बंधूनो सौंना खूष कसे करावे याचा झटपट विचार करा.......

"शुभ दीपावली!!"

- जयश्री  भावे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा