कवी शब्दांचे ईश्वर (भाग ३) - आनंद यात्री मी

ऋतुगंध हेमंत वर्ष १२ अंक ५

सावंतवाडी ,कुडाळ आणि बेळगावच्या दौऱ्यानंतर आम्ही मुंबईचा दौरा आखला.आता मालिकेच्या तिसऱ्या भागाच्या चित्रीकरणाची तयारी सुरू करायची होती.हा भाग होता महाराष्ट्राचे लोकप्रिय कवी मंगेश पाडगावकरांवकर यांच्यावर. या तिसऱ्याभागाचे शूटिंग करण्यासाठी व मालिकेच्या पहिल्या भागासाठी म्हणजे आरती प्रभूंच्या एपिसोडसाठी ‘सत्यकथा ‘,मौजे’ च्या श्री.श्री.पु.भागवत यांचीही मुलाखत घ्यायची होती. आणि काही फाईल शॉट्सही मला हवे होते. श्री.पु.भागवत आणि पाडगांवकर यांचेकडूनही आरती प्रभूंवर त्यांनी काही सांगितले तर ते मला हवे होते.श्री.पुंनी खानोलाकरांवर काही बोलणे माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचे होते. त्यामुळे एपिसोडमधे मौलिक भर पडली असती. जगण्यासाठी जेव्हा खानोलकर मुंबईला आले तेव्हा पाडगांवकर आणि श्री.पुं.यांनी त्यांना फार मदत केली होती. या दोघांनी त्यांना पदाराआडच्या दिव्याप्रमाणे जपले होते. कोकणात श्री. सी.श्री.उपाध्ये आणि विद्याधर भागवत आणि मुंबईच्या वास्तव्यात श्री.पु. आणि मंगेश पाडगांवकर यांनी त्यांना आधार दिला नसता तर त्यांचे काय झाले असते त्याची कल्पनाच करवत नाही.

मंगेश पाडगांवकरांवर ‘ अनन्वय’ने एक कार्यक्रम केला होता,’ आनंद यात्री मी !’ त्यामुळे पाडगांवकरांची चांगली ओळख झालीहोती.त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री.व सौ.पाडगांवकर माझ्या घरी राहायलाच आले होते.त्यामुळे त्यांच्याशी स्नेहही जुळला होता. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने संगीतकार श्रीनिवास खळे देखील माझ्या घरी राहायला आले होते. त्यामुळेच मी मराठी कवितेसाठी काही तरी चांगले योगदान माझ्याकडून देत आहे याची दोघांनाही चांगली कल्पना होती.अशी आमची काहीना काहीतरी ओळख आत्तापर्यंत बहुतेक कवींना होती.त्यामुळेच मालिकेचे काम सुकर होत होते.

पाडगांवकरांच्या चित्रीकरणासाठी आम्ही मुंबईला निघालो. कामाला निघताना मी मुहूर्त वगैरे बघण्याच्या भानगडीत कधीच पडले नाही. ‘अनन्वय’ने आत्तापर्यंतकधीच नारळ वगैरे फोडून कामाचा शुभारंभ वगैरे केल्याचे आठवत नाही. याला अपवाद फक्त एकाच चित्रीकरणाचा ,’ग्रेस’ यांच्या एपिसोड’च्या वेळचा.त्याची हकीकत पुढे येईलच. असो. कामासाठीची सर्व सिद्धता होणे हाच खरा मुहूर्त ठरवण्यामागील हेतू असतो,असे मला वाटते. आणि हाच ‘मुहूर्त ‘या शब्दाचा अर्थ प्रत्येकाच्या मनात असायला हवा. कोणतेही काम चांगले करायचे असेल,तर त्यासाठी भरपूर पूर्व तयारी आवश्यक असते.

त्यासाठी भविष्य बघणे,ज्योतिषाला हात दाखवणे,पंचांग बघणे,इ.कर्मकांडात आपल्याला मानसिक दृष्ट्या न अडकवणे अधिक श्रेयस्कर असते अशी आमची ठाम भूमिका असते. त्यामुळेच प्रत्येक कवीच्या एपिसोडचे शूटिंगचे काम सुरू होण्याआधी त्या कवीच्या सर्व साहित्याचा भरपूरअभ्यास,वाचन,मनन,चिंतन झाले आहे की नाही,हा कवी मला २३मिनिटात मांडायचा असल्याने त्या बाबतचा विचार कसून झाला आहे की नाही ,त्याची कविता मला दृक श्राव्य माध्यमातून लोकांसमोर मांडताना त्या बाबतचा काही वेगळा विचार झाला आहे की नाही , यासाऱ्या गोष्टींचा विचार मी कसून करीत असे. त्यामुळेच प्रत्येक कवीवरील एपिसोड मी चांगल्या प्रकारे सादर करू शकले, असे मला वाटते. साधारणपणे त्या त्या कवीच्या गेय कवितेचे रेकॉर्डिंग आम्ही त्या कवीच्या चित्रीकरणाच्या आधी पूर्ण करीत असू. म्हणजे मग त्या त्या एपिसोडमधे ते गाणे वापरण्याच्या जागा आणि
त्यासाठी द्यावा लागणारा वेळ या दोन्ही गोष्टींची निश्चितता होत असे.या गीतांशिवाय कोणकोणत्या कवितांचे वाचन त्या कवीकडून करून घ्यायचे आहे,हे देखील आधीच ठरवून ठेवले जाई.श्री.राहुल घोरपडे यांनी यावेळी एक निराळाच पण वेगळा विचार माझ्यासमोर मांडला. तो त्यांच्या सांगीतिक कारकीर्दीच्या दृष्टीने आणि एकंदरीतच मालिकेला प्रायोजकत्व मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा वाटला. त्या विचारात वावगे काहीच नव्हते फक्त प्रश्न होता तो आमच्या ‘खिशाचा’.आपले गाणे एखाद्या अव्वल दर्जाच्या गायक,गायिकेने गावे असे एखाद्या उभरत्या संगीतकाराला वाटणे हे अगदी सहज आणि स्वाभाविकही होते. तसे झाले तर मलाही आनंदच होता. पण खर्चाचा विचार करता ही त्यांच्या मनातली गोष्ट सत्यात कशी उतरेल,या बाबत मात्र मन साशंक होते. कारण यासाठी ज्या व्यक्तीचे नाव ते घेत होते, ती व्यक्ती इतकी महान होती की तिथपर्यंत आपले हात कसे पोहोचतील या संदर्भात मनात आशंका होती. परत ती व्यक्ती आपल्या वेळाच्या चौकटीत आपल्याला कशी उललब्ध होईल हा सुद्धा एक मोठा यक्ष प्रश्नच होता. सर्व बाजूंनी विचार करता त्या महान व्यक्तीला गाठणे म्हणजे एखाद्या मृगजळाच्यामागे धावण्यासारखे किंवा धुक्याला मुठीत बद्ध करण्याइतके कठीण आहे,अशी आपली माझी समजूत होती. पण कोणत्याही बाबतीत ‘नाही ‘हा शब्द उच्चारायचाच नाही असाच ‘पण’ केला असल्याने काय होईल ते घडू देणे ,असाच विचारांचा ढाचा ठरून गेला होता. ही महान व्यक्ती कोण ? अशी उत्सुकता असेल ना ? तुमच्या मनात ? त्या महान व्यक्तीचे नाव तुम्ही कदाचित ओळखले असेलही कदाचित. त्या व्यक्तीचे नाव मराठी माणसानी आपल्या मनात आदरपूर्वक जपलेले,त्या व्यक्तीचा स्वर आपल्या सगळ्यांच्या कानांत,मनांत गुंजत राहिलेला आहे. ती व्यक्ती पार्श्वसंगीताच्या क्षेत्रात अनेक वर्षे अधिराज्य गाजवते आहे.गायनाचे सर्व प्रकार तिने आत्तापर्यंत लीलया हाताळले आहेत....त्या व्यक्तीचे नाव ‘आशा भोसले’. ते नाव कळल्यावर मी जे म्हणते आहे त्याचा मतितार्थ तुमच्या लक्षात यायला वेळ लागणार नाही. त्या वेळी आशाताईंना आमच्या मालिकेसाठी गायला बोलावणे हा आमच्यासाठी लहान तोंडी मोठा घास होता. त्यांना विचारण्यात आपण जरा धाडसच करतो आहोत अशी भावनाही मनात दाटली होती. पण जो सच्चा कलाकार असतो ना ! त्याला आपल्या कलेबद्दल आत्मविश्वास असतो. घोरपडेम्हणूनच म्हणत होते ‘” मला ठाम विश्वास वाटतो की आशाताईंनी माझी चाल ऐकली तर त्याही हे गाणे गायला नकार देणार नाहीत.आणि त्यांनी जर ही गझल रचना गायली तर माझ्या या गीताला दिलेल्या स्वरसाजाचेत्या सोने करतील. मला असेही
निश्चितपणे वाटते आहे की त्याच या गीताला न्याय देऊ शकतील.या गीताची चाल बांधताना माझ्या डोळ्यांसमोर जे नाव होते ते एकाच गायिकेचे .ते म्हणजे ‘आशा भोसले.

“मी म्हटले ठीक आहे,आपण त्यांना फोन तर लावूयात. या कामी आम्हाला मदत झाली ती श्री,ढवळे यांची. त्यांचा आणि मंगेशकर कुटुंबियांचा चांगलाच घरोबा आहे. त्यांनी आशाबाईंचा नंबर आम्हाला दिला,’ या नंबरावर तुम्हीच फोन करा ‘असेही सांगितले. मला आठवते आहे की रवींद्रनाट्य मंदीरच्या बाहेरच असलेल्या टेलिफोन बूथवरून आम्ही त्यांना फोन लावला होता. एकंदर सहा वेळेला आम्ही फोन लावायचा प्रयत्न केला होता ,पण यश लाभले नाही.तरीही आम्ही चिकाटी सोडली नाही.अक्षरश: देवाचे नाव घेतले आणि परत एकदा फोन लावला. आणि या वेळी मात्र आमच्या प्रयत्नाला यश मिळाले.पलीकडून चक्क आशाबाईच बोलत होत्या. आत्ता पर्यंत ज्या कानांना त्यांचा गातानाचा आवाजच ऐकायची सवय होती,ते कान आज त्यांचे बोलणेही ऐकत होते. त्यांचा बोलण्याचा आवाजही मधुर वाटला.आपण प्रत्यक्ष आशाबाईंशी बोलत आहोत यावर विश्वासच बसेना आमचा ! क्षणभर काय बोलावे हे देखील सुचेना.जरा गोंधळलेल्या अवस्थेत मी असताना श्री.घोरपडे मला त्यांच्याशी काय बोलायचे त्याचे प्राँम्पटिंग करत होते. आशाबाईंनी माझे सर्व म्हणणे ऐकून घेतले आणि गाण्यासाठी होकार दिला. त्यांचा होकार मिळाल्यावर आमचा आनंद गगनात मावेना. भारताची एक दिग्गज गायिका पाडगांवकरांची एक गझल आपल्या एपिसोडमध्ये गाणार आहे ही घटनाच अपूर्व ,अभूतपूर्व होती. आभाळाला हात लागल्यागत झालं.

कोणाचीही स्थिती माझ्या सारखीच झाली असती. रेकोर्डिंग अर्थातच आशाताई देतील त्या तारखेला करण्याचे निश्चित झाले. त्यांनी एक तारीख आम्हाला दिली. त्या दिवशी मुंबईला या म्हणाल्या. आम्ही रेकॉर्डींगसाठी एक चांगला स्टुडिओ बुक केला.आशाताईंचे गाणे रेकॉर्ड करायचे म्हणजे काय ! आम्हाला अग्रक्रमाने रेकॉर्डिंगसाठी स्टूडिओचे बुकिंग दिले गेले. परंतु त्यांनी दिलेल्या त्या तारखेला काही रेकॉर्डिंग होऊ शकले नाही. असे आणखी एकदा झाले. तिसऱ्यांदा मात्र त्यांनी दिलेल्या तारखेला रेकॉर्डिंग झाले,आणि त्या अद्वितीय क्षणांचे आम्ही साक्षीदार होण्याचे भाग्य आम्हाला मिळाले.आशाताई खरे तर एवढ्या मोठ्या गायिका.त्यांच्या पुढे आम्ही म्हणजे सूर्यापुढे काजवा, अशी खरे तर एकूण स्थिती.त्यांच्या पुढे आमचे काम अगदीच लहान. पण त्यांच्या मनाच्या मोठेपणाची साक्ष आम्हाला क्षणाक्षणाला पटत होती. रेकॉर्डिंगची वेळ ठरली होती,सकाळी आठ वाजता.आशाताईंची गाडी त्या दिवशी नादुरुस्त होती. तरीही केवळ दिलेली वेळ पाळण्यासाठी म्हणून त्या बरोब्बर सात वाजून पंचावन्न मिनिटांनी स्टुडिओच्या दारात उभ्या होत्या. दिलेली वेळ त्यांनी आपल्याकडून कसोशीने पाळली होती.अगदी चक्क टॅक्सी करून त्याआल्या होत्या. नवीन गायक गायिकांनी त्यांचा हा वक्तशीरपणा ध्यानात घेण्यासारखा आहे. प्राप्त झालेल्या यशामागे अनेक कारणे असतात त्यापैकी हे देखीलएक कारण आहे की आपण कोणाला तरी वेळ दिलेला असतो. तो पाळणे आपले कर्तव्य असते. हे जो ध्यानात ठेवतो, तो पुढे जातो. या आधी दोन वेळेला त्यांचे रेकॉर्डिंग आम्ही करू शकलो नाही,त्याची कारणेही त्यांची आपल्या कामाप्रती असणारी आस्थाच आहे. त्यापैकी एकदा आमचे रेकॉर्डिंग करायचे म्हणून त्या सकाळीच घरी रियाजाला बसल्या होत्या आणि साधारण सकाळी साडे सात,पावणेआठ वाजता त्यांचा फोन आला की “आपण आज रेकोर्डिंग ठरवले आहे खरे पण आज सकाळी रियाजाला बसले आणि लक्षात आले की आवाजात थोडी खर जाणवते आहे,काय करूयात ? “ आम्ही त्यांना लगेच सांगितले की ठीक आहे आशाताई !
आम्ही परत येऊ रेकॉर्डिंगसाठी. या प्रसंगातून आम्हाला एक गोष्ट ठळकपणे जाणवली ती त्यांची आपल्या कामावरील निष्ठा ! इतकी मोठी गायिका कोणतेही आणि कोणाचेही रेकॉर्डिंग असो,सकाळी लवकर उठून रियाजाला बसते, रियाज करते. आज माझ्या आवाजात जरा खर जाणवते आहे,हे प्रामाणिकपणे संगीतकाराला सांगते,हे देखील नवोदित गायक गायिकांनी लक्षात घेणे नितांत गरजेचे आहे. एखाद्या कलाकाराचे यश आपल्या नजरेत भरते, मात्र त्या यशामागील त्या कलाकाराने घेतलेली मेहेनत आपण लक्षात घेत नाही. ती देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. त्या शिवाय आपल्याला त्यांच्या यशाची किंमत कळणार नाही. दुसऱ्या वेळी त्यांची पाठ खूप दुखत असतानाही पेन किलर्स घेऊन त्या आल्या होत्या, पाठदुखीच्या गोळ्या घेत घेत रेकोर्डिंग करण्याची त्यांची तयारीही त्यांनी दर्शवली होती. पण त्यांनी इतका त्रास घेऊन रेकॉर्डिंग करावे , हे आमच्या मनाला पटेना. आम्हीच त्यांना विनंती केली की ,”आशाताई ! इतके परिश्रम नका घेऊ.आम्ही परत येऊ रेकॉर्डिंगसाठी.” दुसऱ्यांदा आम्हाला काम न करता परत जावे लागत आहे,आम्ही पुण्याहून या कामासाठी येत आहोत ,काम व्हायला पाहिजे होते. असा विचार त्यांच्या मनात येत होता. तसे त्यांनी आम्हाला बोलूनही दाखवले. पण आम्ही त्यांच्या प्रकृतीचा विचार आधी केला आणि तेच बरोबरही होते. आणि आम्ही पुण्याला परतलो. पण त्यांचे वाईट वाटणे आमच्या पर्यंत नक्कीच पोहोचले. आम्ही परत एकदा त्यांच्या मनाच्या मोठेपणाच्या दर्शनाने भरवून गेलो. आशाताई अगदी वेळेत स्टुडिओत आल्या त्यांना बघूनही अक्षरश: आम्हाला धन्य वाटले. पांढरी कलकत्ता साडी त्यांनी नेसली होती. अगदी नेहमीचाच वेष.आल्यावर जरा ओळखपाळख झाली .मग त्यांनी श्री.घोरपडे यांच्याकडून गीताची चाल ऐकली. ती पाडगांवकरांची एक सुंदर गझल होती. एकदा येईन सजणा परत मग जाणार नाही मैफिलीतून या जगाच्या , मी पुन्हा गाणार नाही आशाताईंनी रचना नीट वाचली. मग ती स्वत:च्या हस्ताक्षरात एका कागदावर लिहून घेतली. त्या म्हणाल्या” ही माझी माझ्यापुरती पद्धत आहे. मला जे गीत म्हणायचे,ते मी माझ्या हाताने पहिल्यांदा लिहून काढते.” मग त्यांनी गीताची चाल परत एकदा श्री. घोरपडे यांच्याकडून जाणून घेतली. आणि त्या म्हणाल्या “ हं....आता ट्रॅक लावा.” गाण्याचा ट्रॅक लावला गेला.त्यांनी एकदा त्या ट्रॅकबरोबर गाणे म्हणून बघितले. गाण्याचे स्क्रिप्ट पुढे असलेल्या स्टँडवर लावले.हातातल्या हिऱ्याच्या लखलखत्या बांगड्या स्टँडलाअडकवून ठेवल्या .चक्क स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना बायका जशा पदराची दोन्ही टोके कमरेलाखोचून घेतात,तसा पदर कमरेला खोचून घेतला.आणि म्हणाल्या ,” चला,लावा ट्रॅक ....मी रेडी आहे टेक द्यायला.”आणि त्यांनी ते गीत गायला सुरुवात केली.तो आवाज,स्वर्गीय आवाज ऐकून आमच्या अंगावर अक्षरश: काटा उभा राहिला. त्यांचा आवाज कानात साठवताना भान हरपल्यागत होत होते.गान तपस्येतून तावून सुलाखून निघालेला विशुद्ध स्वर आम्ही कानात साठवून घेत होतो. एक एक सच्चा स्वर आणि मोत्यांच्या सरी बरसाव्यात तशी तान सुरांची बरसात आम्हाला अनुभवायला मिळत होती. समोर जे घडत आहे ते केवळ दैवी चमत्कार आहे असे वाटत होते. टेक संपला,ओके झाला असल्यास नवल ते काय ? आशाताई बाहेर आल्या.म्हणाल्या,” चांगली बांधली आहे चाल. आम्ही सगळ्या प्रकारची गाणी गातोच,पण काही चाली गायल्याने आंतरिक समाधान मिळत असते. त्यातलीच ही एक चाल आहे,असे म्हणावेसे वाटते.बरं ..परत एकदा ऐकवता ? “आशाताईंनी असे काही म्हणणे हे आमच्या लेखी खूप होते. त्यांनी परत एकदा गाणे ऐकण्याची इच्छा व्यक्त केल्यावर त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून त्यांना लगेचच ते गीत परत ऐकवले गेले. आपण काय गायलेले आहे हे त्यांनी मन:पूर्वक डोळे मिटून ऐकले. जणू त्यांची श्रवण समाधीच लागली होती. इतक्या एकाग्रतेने आपण गायलेले गाणे ऐकल्यावर त्यांनी आम्हाला विचारले,अगदी सहजपणे,” कसं वाटलं ? “ असे त्यांनी काही विचारावे, हेच आम्हाला एक मोठे आश्चर्य वाटून गेले. आम्ही यावर काय बोलणार ? म्हणजे एखाद्या गंधर्वाने विचारावं ,की काय कसं वाटलं माझं गाणं ? तर काय बोलणार तुम्ही ? त्याला उत्तर देताना जी तुमच्या मनाची होईल,तीच अवस्था आमच्याही मनाची झाली. मग श्री. घोरपडे म्हणाले,” आशाताई ! अहो,उत्तमच झालं ! “ पण त्यांना काय वाटले कोण जाणे, त्या
म्हणाल्या ”नाही,नाही .परत एकदा लावा एकदा ट्रॅक. मी परत एकदा एक टेक देते .“ त्यांनी परत एकदा ते गीत गायले. आम्ही अवाक ! स्वत:च स्वत:ची कलाकृती त्रयस्थ होऊन बघितली पाहिजे,नव्हे प्रत्येक श्रेष्ठ कलाकार हे करत असतो वगैरे वगैरे आत्तापर्यंत वाचले होते,त्याचे प्रत्यंतर आम्ही साक्षात घेत होतो. परत एकदा वाटले कलाकार थोर होत असतो.

तो त्याच्या प्रामाणिकपणे केलेल्या तपश्चर्येतून ! या साऱ्यातून एक गोष्ट मात्र ध्वनित होत होती की त्यांना संगीतकाराची चाल खूप भावून गेली आहे. याच गीताबाबतीत त्यांनी काही दिवसांनंतर घोरपड्यांच्या घरी आपण होऊन फोनही केला होता,की’ गीताची चाल चांगली बांधलेली आहे.त्यांना खूप आवडली.’ हे घोरपडे यांच्यासाठी एका महान गायिकेने दिलेले मोठे प्रशास्तीपत्रकच होते. जे मिळणे खूप कमी लोकांच्या भाग्यात असते. याच साठी प्रत्येक सच्चा कलावंत आसुसलेला असतो,थांबलेला असतो. घोरपडे या बाबतीत भाग्यवान ठरले. याच वेळी आणखी एक संकट उभे राहिले होते.हे संकट एकंदरच मालिका निर्मितीच्या फार मुळावरच आले होते. ते संकट म्हणजे माझा बँक बॅलन्स खाली झाला होता. पण मालिकेचे काम थांबून राहणे शक्यच नव्हते.माझा काका श्री. प्रकाश करंदीकर आणि काकू उर्मिला करंदीकर माझ्या बालमैत्रिणीचे वडील श्री.पंडित आणि माझ्या पुणे विद्यापीठातील मैत्रिणी डॉ.प्रभा नातू,डॉ.विनया डोंगरे आणि डॉ.कल्याणी दिवेकर या सर्वांनी मदतीचा हात पुढे करून माझी पैशाची नड भागवली आणि मला मोठ्या संकटातून वाचवले. त्यांनी त्या वेळी केलेल्या मदतीवरच आम्ही मालिकेचे काम पुढे सुरु ठेवू शकलो. एरवी कठीण झाले असते. त्यांचे किती आणि कोणत्या शब्दात आभार मानायचे? आभार मानणे हे देखील तसे खूपच औपचारिक होईल. त्यापेक्षा त्यांच्या ऋणातच राहाणे मी पसंत करीन. मालिकेच्या या भागात मला पाडगांवकरांकडून कोणत्या कवितांचे
वाचन अभिप्रेत आहे, हे मी या मालिकेच्या भागाची आखणी करतानाच ठरवून ठेवले होते. पाडगांवकरांनी अनेक काव्य प्रकार अगदी सहजपणे हाताळले आहेत.त्या प्रत्येक काव्य प्रकारातील एक एक कविता त्यांनी वाचावी व अशा प्रकारची विविधता त्यांच्या कवितेत त्यांना का आणावीशी वाटली, याचा उहापोह त्यांनी करावा. ते प्रेक्षकांना आवडेल असे मला वाटले. या साऱ्यामुळे खुद्द कवीच्याच तोंडून काही ऐकता आले तर रसिकांनाही ते अधिक भावेल असा माझा कयास होता आणि तो बरोबर ठरला.मालिकेच्या भागाची आखणी अशा प्रकारे केलेली आहे याची कल्पना पाडगांवकरांना अगोदरच देऊन ठेवली होती. आपल्या काव्यामागची आपली भूमिका प्रत्यक्ष त्या कवींनी सांगणे हे प्रेक्षकांना अपेक्षित होते,ती त्यांची अपेक्षा आपण पूर्ण केली पाहिजे हे देखील आम्ही आधीच ताडले होते. हा आमचा हेतूही साध्य झाला,असेच आता म्हणायला पाहिजे. काव्य वाचन करायचे म्हटल्यावर अर्थातच पाडगांवकर अगदी खुलून आले होते हे वेगळे सांगायला नकोच. पाडगांवकर हे सौंदर्यजीवी व भावजीवी कवी.आपल्या कवितेची वाटचाल सांगताना ते म्हणाले,” मी माझी पहिली कविता लिहिली तेव्हा मी चौदा वर्षांचा होतो.आता माझ्या वयाची पासष्ट वर्ष संपलेली आहेत आणि मी सहासष्टाव्या वर्षात पदार्पण
केलेले आहे. ( या मालिकेच्या वेळचे त्यांचे वय पासष्ट वर्षांचे होते. ) चौदा वर्षापासून आज पर्यंत मी सतत कविता लेखन केले आहे. कविता लिहिणे या पासून मला विलक्षण आनंद होतो. माझ्या मनातलं सर्जनशीलतेचं केंद्र आहे ,म्हणजे ज्याला मी ईश्वरच मानतो,त्याला स्पर्श मला या कविता लेखनाच्या प्रक्रियेतूनच होत असतो. तेव्हा मी काही कोणावर उपकार करण्यासाठी किंवा जगाचा उद्धार करण्यासाठी अशी माझी भूमिका कविता लिहिण्यामागची नाही. मला आनंद होतो,मला माझ्यामधल्या ईश्वरतेचा,निर्माणशीलतेचा प्रत्यय मला माझ्या कविता लेखनातून होतो,म्हणून मी कविता लिहितो आणि लिहीत राहीन. बालकवींप्रमाणेच पाडगांवकरांची कविता निसर्गाशी संवाद साधते. निसर्ग त्यांच्याबरोबर रुसतो,हसतो,रडतो,उडतो,बागडतोही. म्हणूनच एका कवितेत ते अगदी सहज म्हणून जातात....एक शब्द पक्षी झाला,आकाशात उडाला एक पक्षी शब्द झाला शाईमध्ये बुडाला. पाडगांवकरांनी विशुद्ध प्रेम कविता मराठीला दिली. सकाळी उठताच अंगणात प्राजक्त सडा दिसावा,सर्व रात्र चांदण्यात निथळून निघावी,एखादी डहाळी वाऱ्यावर झुलत राहावी अस त्यांच्या प्रेमकवितेचं स्वरूप. हे स्वरूप मला आता दृश्य स्वरूपात दाखवायचे होते. ते आव्हान मी स्वीकारले.फुले,पाने,पक्षी, झरे ,पाऊस, वादळ,वारे, उडणारे पक्षी,थुईथुई नाचणारे मोर,ही सारी निसर्ग चित्रे मला हाका घालू लागली आणि मी या साऱ्यांना माझ्या कॅमेऱ्यात बद्ध करण्याचा सपाटाच लावला. हानाद माझ्या मनाला लागल्यावर मला आता पाडगांवकरांची कविता ‘ दिसू ‘ लागली,त्यात गुंतत जाऊन मी त्यांच्या कवितेला दृश्य स्वरूपात आणू शकले.ते कसे हे कळून घ्यायचे असेल तर तुम्हाला एपिसोडच बघायला लागेल.यासाठी मी त्यांची एक मनोहारी प्रेमरूप प्रतिबिंबित झालेली कविता निवडली.एका प्रेमिकेला प्रेमाची चाहूल लागते आहे आणि ती आपल्याच मनाशी संवाद साधते आहे.अशा स्वरूपाची ती कविता आहे.......

फांदी फांदी झुलत्ये का ? ताल कोणी धरतंय का ?
काकणं किणकिण किणकिणतायत,
कळशीत पाणी भरताय का ?
सुवास असा घमघमतोय ,झाड फुलांत गढलंय का ?
वारा गाणं का म्हणतोय ? प्रेमात कोणी पडलंय का ?

ही कविता मुग्धा गोडबोलेनी इतकी हळूवार वाचली की त्या शब्दांची नजाकत खुलून आली. आणि त्यावर अतिशय सुंदर निसर्ग दृश्ये ! म्हणजे ती कविता दृश्य स्वरूपात अधिकच देखणी झाली. ही कविता संपते ना संपते तोच आशाताईनी गायलेली ती भाव विभोर कविता ! शब्द होते....

पूर ही येवोत आता ,कोसळो पाणी कितीही
टाकिले पाऊल मागे हे पुन्हा फिरणार नाही
एकदा येईन साजणा परत मग जाणार नाही
मैफिलीतून या जगाच्या मी पुन्हा गाणार नाही

प्रेमिकेनी व्यक्त केलेला निर्धार अधिक गडद होण्यासाठी मग पुन्हा सुयोग्य फाईल शॉट्सची योजना मी केली.वारा,वादळ,कोसळणारा पाऊस आणि त्यानंतर शांत झालेलं वादळ, प्रसन्न निसर्ग आणि पिसारा फुलवून नाचणारा मोर ! खूप परिणाम साधत सादर केलेली ही दृश्यात्मकता प्रेक्षकांना फार भावून गेली,हे वेगळे सांगायला नकोच. पाडगावकरांच्या कवितेनी दिलेले दृश्यात्मक आव्हान मी पेलले. विशेष म्हणजे पाडगांवकर एपिसोड बघून खूप खूष झाले.मला इतके श्रम केल्याचे सार्थक वाटले. पाडगांवकरांची कविता वाचताना असे जाणवत राहाते की त्यांच्या मनात एक’ जिप्सी ‘ कुठेतरी खोल दडून बसला आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे तो कधी कधी त्यांना अस्वस्थ करत असतो. मग कविवर्यांना आम्ही जिप्सी कविता वाचायचा आग्रह केला आणि त्यांनी तो अर्थातच मान्य केला. आपल्या खास शैलीत त्यांनी आपली कविता वाचली आणि आम्ही त्यात पुरते रंगून गेलो. पाडगांवकर वाचत होते.......

कधी कधी पहाटते उरी आगळी प्रतीती
जाळीमधून धुक्याच्या तेज झिरपते चित्ती
जाचू लागते जिप्सीला ज्ञात विश्वाची चौकट
आणि जाणवते काही गूढ अंधूक पुसट
खेळ मांडिलेला सारा पुन्हा उधळाया धजे
आपणच निर्मिलेले आपणच मोडू धजे
गूढ अज्ञात धुक्यात आणि जातसे बुडून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून
घर असूनही आता घर उरलेले नाही
चार भिंतींची जिप्सीला ओढ राहिलेली नाही
कुणी सांगावे असेल पूर्वजन्मीचा तो शाप
घडी सुस्थिरपणाची विसकटे आपोआप
कुणीतरी साद घाली दूर अनंतामधून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून......

पाडगांवकरनुसते निसर्ग कवीही नाहीत आणि फक्त भावकवीही नाहीत.जीवनातल्या ज्वलंत प्रश्नांनी जळणारे आणि सामाजिक बांधिलकीने भारलेले मन त्यांच्याजवळ आहे. त्यांची “सलाम” ही कविता त्याचेच निदर्शक आहे.ही कविता वाचताना पाडगांवकर फार जोरकस,ओजपूर्ण वाचतात.याचा प्रत्यय आम्ही घेतला आणि तो अनेकांनी घेतला असेल. आम्ही त्यांचा हा आविष्कार ‘ याचिदेही, याची डोळा ‘ बघितला आणि चित्रबद्ध देखील केला .या कवितेतील प्रत्येक शब्द इतका जोरकस उच्चारला जात होता की एखादा कसलेला अभिनेताच तशी कविता सादर करू शकेल.आणि त्यांचे वाट फक्त ६५ होते हे ही महत्त्वाचे. पाडगांवकर वाचत होते.........

वटारलेल्या प्रत्येक डोळ्याला सलाम
शेंदूर थापलेल्या दगडाला सलाम
लाखो खर्चून बांधलेल्या देवळांना सलाम
देवळातल्या देवांच्या धाकांना सलाम

देवळांचे आणि धर्मांचे कंत्राट घेणाऱ्यांना सलाम
रिकाम्या हातातून उदी काढणाऱ्यांना सलाम
हवेतून अंगठी काढणाऱ्या बडे बुवाला सलाम
शनीला सलाम , मंगळाला सलाम

भीतीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम
आईवर आयुष्यभर गुरगुरणाऱ्या बापाला सलाम
बापावर गुरगुरणाऱ्या त्याच्या साहेबाला सलाम
सलाम प्यारे भाईयों और बेहेनो ,सबको सलाम !


मनात आले कुठे हळुवार प्रेम कविता वाचणारे ‘ ते ‘ पाडगांवकर आणि कुठे सामाजिक आणि राजकीय प्रश्न तळमळीने वाचणारे ‘ हे ‘ पाडगांवकर !एकाच व्यक्तिमत्त्वाची ही दोन रूपं......आपला भंवताल बघून ,सर्व व्यवहाराला आलेलं बाजारू , बेगडी रूप बघून हां कवी आंतून किती अस्वस्थ होत असेल ! याचंही प्रतिबिंब त्यांच्या एका कवितेत पडलेलं आहे. या कवितेत ते म्हणतात ........

आलो इथे कशाला , माझे मला कळेना
या बेगडी जगाशी , हां सुरही जुळेना
नाकारिले फुलांचा बाजार मांडणे मी
म्हणुनीच संकटांची माध्यान्ह ही टळेना

संगीतकार घोरपडे यांनी या गाण्याला चाल लावायची ठरवले. त्यांना ते सोपे काम वाटत असले तरी त्या गाण्यावर काय व्हिजुअल्स टाकायची हा प्रश्न माझ्या समोर सदैवच असायचा. आणि त्यातून मार्गही दिसायचा तसेच आताही झाले. पाडगांवकर सायनला राहतात तिथेच म्हणजे त्यांच्या घरीच आम्ही शूटिंग घेत होतो. त्यांच्या त्या घराच्या जवळच एक झोपडपट्टी होती. त्या दिवशी तिथे कोणता तरी उत्सव होता. अर्थातच त्या झोपडपट्टीत खूप जोरातला उडस्पीकरवर गाणी लागलेली होती. या साऱ्या कोलाहलामुळे आमच्या शूटिंगमध्ये व्यत्यय यायला लागला.पाडगांवकरांसकट आम्ही सगळे या प्रकारामुळे जम वैतागलो आणि त्रासून गेलो. मग पाडगांवकरांनी शेवटी सगळ्या प्रकाराला कंटाळून पोलिसांना फोन लावला,” अहो ! मी मंगेश पाडगांवकर बोलतो आहे. तुम्ही माझी गाणी रेडीओवरून नेहेमी ऐकता ना ! हं.. तोच मंगेश पाडगांवकर ! माझ्या घरी काही मंडळी शूटिंगसाठी आली आहेत. पुण्याहून. आणि माझ्या शेजारच्या झोपडपट्टीत कसला तरी आनंदोत्सव साजरा होत आहे. मला कबूल आहे, की ते आनंद साजरा करत आहेत. पण त्यामुळे त्यांच्या म्हणजे माझ्या शूटिंगमध्ये व्यत्यय येत आहे. कृपा करून आपण त्यांना सांगा ,जरा आवाज लहान करा म्हणावं “आता खुद्द कविराजांनीच फोन केला त्यामुळे थोडे तरी ऐकले गेले. पोलिसांना थोडा वेळ तरी आवाज कमी करण्यात यश मिळाले, नाही असे नाही.पण परत परत हा त्रास उदभवतच होता.शेवटी पाडगांवकर फार वैतागले,त्रासले,रागावले. कोणत्याही व्यक्तीचे हेच झाले असते ना ! अखेर आम्ही सगळ्यांनीच आता आपण चहाची सुट्टी घ्यायचे ठरवले.आणि नाईलाजाने त्यांच्या गच्चीवर गेलो .कविराज प्रचंड अस्वस्थ होऊन गच्चीत येरझारा घालायला लागले. त्यांचा राग अनावर होत होता. त्यांना या प्रकाराची चीड आली होती. त्यांचा राग त्यांच्या हावभावातून प्रकटत होता.

त्यांची ही मनाची झालेली अस्वस्थ स्थिती मी कॅमेऱ्यात बध्द करून घ्यायला माझ्या कॅमेरामनना,बाबू सोनावणे यांना सांगितले. त्यांनी ती अस्वस्थता बरोबर चित्रबद्ध केली. ठरवूनही असे शॉट्स मिळाले नसते. आणि पाडगांवकरांचा हा असा मूड ! शक्यच नाही. कॅमेरा सुरूच होता आणि आपले काम करीत होता. कविराज अस्वस्थ होऊन येरझारा घालीत होते.संतापाने काही बोलत होते. मला एक आख्खे गाणे त्याच्या आशयासकट या संपूर्ण चित्रीकरणातून एडिट करता आले.खरंच सांगते ,एक एक वेळ असते,म्हणतात ना !

त्या प्रमाणे ...ठरवून प्लॅन करूनही जे जमले नसते, असे शूटिंग आणि एडिटिंग जमून गेले या गाण्यासाठी.कलावंताच्या मनातील त्रागा,अस्वस्थता,धुमसता राग हे सारे मूड्स पाडगांवकरांच्या नकळत टिपले गेले,जणू ते असाअभिनयच करीत आहेत. आणि हे सारे इतके यशस्वी झाले की एपिसोड बघितल्यावर मला अनेकांचे फोन्स आले ,” काय हो माधवी ताई ! पाडगांवकरांचा हा मूड कसा काय बुवा मिळाला तुम्हाला ? “मी मनातल्या मनात हसत होते. वाटले काही गोष्टी या ठरवून होत नसतात.त्या व्हायच्याच असतील तर आपोआप होतात ,हेच यावरचे उत्तर. नाही का? जीवनावर प्रेम करणारे ,निसर्गाचे भरभरून गुणगान गाणारे पाडगांवकर सामाजिक व्यंग्यांवरही आपल्या कवितेतून प्रहार करतात.हे त्यांच्या कवितेचे एक दुसरे रूप..उदा.त्यांच्या “सलाम”,”उदासबोध” अशा कवितासंग्रहातून ही अभिव्यक्ती ठळकपणे दिसून येते “ या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे “, श्रावणात घन निळा बरसला” यांसारखी बहारदार गीते लिहिणारे पाडगांवकर जेव्हा रांगेचा नेता तो रांग मोडणारा तोच जबरदस्त तुझी टांग तोडणारा अशांसारखे शब्द लिहितात तेव्हा त्यांचे एक वेगळेच रूप रसिकांसमोर येते. किंवा त्यांची “सलाम “,“ख्रिस्त”अशा काही कविता घ्या. अशा कावितांमधून त्यांचे सामाजिक भान अतिशय प्रखरपणे पुढे येते. अशांसारख्या सामाजिक आशयाच्या कवितांमधून आम्ही दोन कवितांची चाली लावण्यासाठी निवड केली. एक म्हणजे ,”रात्र आहे वादळी वारा पिसा सैराट आहे” ही कविता आणि दुसरी ,”आलो इथे कशाला माझे मला कळेना,या बेगडी जगाशी हा सूरही जुळेना “ ही गझल. या स्वरबध्द करून त्या ज्येष्ठ पार्श्व गायक श्री. रवींद्र साठे यांच्याकडून गाऊन घेतल्या. “अनन्वय”च्या सर्व गायक गायिकांनी या गाण्यांना कोरसची साथ दिली. पाडगांवकरांनी अनेक काव्य प्रकार लीलया हाताळले.गझल,न गझल, बोलगझल, बोलगाणी,बालकविता,वात्रटिका,प्रेम आणि निसर्ग कविता,भावगीत अनुवादित काव्य,इत्यादी अनेक काव्यप्रकार हाताळण्यामागची आपली भूमिकाही त्यांनी विषद केली.त्यांनी सांगितले,” मी अनेक काव्य प्रकार लिहीत आलो. मी प्रयोग वगैरे करतो अशी या मागची माझी भूमिका नव्हती,नाही आणि असणार नाही. आणखी एक म्हणजे जीवनाचं कुतूहल. प्रत्येक माणसाचा जो अनुभव आहे,प्रेमाचा अनुभव,दु:खाचा अनुभव, अनुभव,संतापाचा अनुभव,हा प्रत्येक अनुभव , तो कलावंत म्हणून माझ्याजवळ येतो आणि मला म्हणतो,मला माझा आवाज दे,मला माझं रूप दे,मलां माझं व्यक्तिमत्व दे आणि त्या त्या अनुभवाप्रमाणे त्याची भाषा,त्याचा आवाज,त्याचं रूप शोधणं हे माझ्या एकूणच जीवनविषयक कुतूहलाचं एक अपरिहार्य अंग आहे, असं मी मानतो. १९६२ साली वात्रट आणि टीका हे दोन शब्द एकत्र करून ,टीका या शब्दातला ’टी ‘ हे अक्षर दीर्घ असते,पण हा लहान प्रकार असल्याने मी तो ते लघु लिहून ‘वात्रटिका ‘ असा शब्द निर्माण केला.” असे सांगत पाडगांवकरांनी दोन वात्रटिका सादर केल्या त्यापैकी एक वात्रटिका वानगीदाखल...एक होती करवली ती लग्नात हरवली तिच्या आईने केले तांडव पालथा घातला सगळा मांडव इतक्या गोंधळात नवऱ्याने हौस आपली पुरवली. आणि आमच्या आग्रहावरून दुसरी वात्रटिका सादर केली......एका माणसाला स्वप्न पडले, त्याने उठून लग्न केले आणि लग्न करून झोपी गेला ,पुन्हा नाही जागा झाला त्यानंतर ‘ बोल गझल ‘ च्या विषयी पाडगांवकर सांगते झाले,”’ बोलगाणी ‘ हा प्रकार मी लिहिला, त्याच अंगाने पण गझलच्या घाटात असणारा असा हा प्रकार.बोल भाषेचा त्याच्यात उपयोग केला आहे. जसा मी बोलगाण्यात केला होता तसा....आता एक झलक ‘बोल गझले’ ची ऐकवतो....

 झरा कधी आपण होऊन तुमच्या दारात येतो काय 
पाऊस तुमचा हात धरून नाचायला नेतो काय ? 
अनावर सळसळ करीत हिरवा उत्सव उधळताना 
पिंपळ कधी साद घालत तुमचं नाव घेतो काय

पाऊस तुमचा हात धरून नाचायला नेतो काय ?
आकांक्षाची गाडी तुम्ही कधी मुद्दाम चुकवता ?
जगण्याच्या बासरीत शिरून श्वास सूर होतो काय ?
झरा कधी आपणहून तुमच्या दारात येतोकाय ?

आपणच गाणं होऊन आपणच ऐकता कधी ?
तुमची हिरवी फांदी करून पक्षी बसून गातो काय ?
पाऊस तुमचा हात धरून नाचायला नेतो काय ?
झरा कधी आपण होऊन तुमच्या दारात येतो काय ?
काळोखाच्या काठाने एकटे एकटे चालता कधी ?

गाण्यासारखं चालणं ऐकून मृत्यू दाद देतो काय ?
पाउस तुमचा हात धरून नाचायला नेतो काय ?

जीवनामधले जे कठोर वास्तव आहे ते हा प्रकार काहीसे वर्ज्य मानायला लागला आहे. त्यामुळे माझ्या मनात असा विचार आला की हे जे कठोर वास्तव आहे ते जर व्यक्त करायचे असेल तर त्याची भाषा, त्या भाषेचे वजन, त्यामुळे शब्दकळेला येणारे एक प्रकारचे ठोस स्पष्ट असे रूप, त्या रोमँटिक मूडमधे बसणारे नाही आणि म्हणून जीवनातले हे सगळे अनुभव व्यक्त करीत असणाऱ्या या प्रकाराला मी ‘ गझल’ असे न म्हणता ‘ न गझल ‘ से म्हटलेले आहे.......एक झलक ऐकवतो. “ असे म्हणत पाडगांवकरांनी त्यांचा  गझल ऐकवला.......


रांगेचा नेता तो रांग मोडणारा
तोच जबरदस्त तुझी टांग तोडणारा
ध्येय रकाने खरडी भाड्याचा बोरू
राजकीय रबर थोर शब्द खोडणारा

रांगेचा नेता तो रांग मोडणारा ......
घारींनी घेरियली घूस पळू लागे
शोधाया मोक्षाशी पूल जोडणारा
बकऱ्यांची भजने ही फुकटच की गेली

देव हसे बिर्याणी मस्त झोडणारा
रांगेचा नेता तो......
एक तरी दगड उचल एकदा तरी तू
या खोट्या जगण्याची काच फोडणारा
रांगेचा नेता तो रांग मोडणारा ..........

जीवनाची असोशी,जीवनावरचे अनन्य साधारण प्रेम ही या कविमनाची वैशिष्ट्ये आहेत. आपले जीवनविषयक तत्त्वज्ञानही ते अगदी साध्या सोप्या भाषेत सांगून जातात. ते म्हणतात, “ माणसाच्या आयुष्यात सुख असतात तशी दु:ख असतात. फुलंअसतात तसे काटे असतात. पण मी असं मानतो की जो जो माणूस जिवंत आहे, त्याला आनंदानं जगण्याचा हक्क आहे. म्हणूनच सारखं काटे सलतात म्हणून दु:खांकडे बघून ...ते जरी आयुष्यातलं वास्तव असलं तरी रडत बसायचं कारण नाही. कारण ते एकमेव वास्तव आहे असं मानायचं कारण
नाही.अशीच भावना काहीशी या कवितेतली आहे....ऐका .....

पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं
आणि फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं ?
काट्यासारखं सलायचं का फुलायचं फुलायचं
तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं ?
कण्हत कण्हत का गाणं म्हणत तुम्हीच ठरवा
पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं
आणि पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणतां येतं
सरला आहे म्हणायचं का भरला आहे म्हणायचं
तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं
कण्हत कण्हत का गाणं म्हणत तुम्हीच ठरावा......

बाल कवितांचे वाचन करताना तर पाडगांवकर बेहद्द खूष झाले होते. कारण त्या कवितांचे वाचन करताना त्यांच्या आसपास त्यांचीच नातवंडे बसली होती. मग काय विचारता ? आजोबा कविता वाचताना इतके खुलले होते की ते तुम्ही त्या एपिसोडमधेच प्रत्यक्ष पाहायला हवे. हे आनंद क्षण आम्ही टिपले. तो त्यांचा आनंद शब्दातून सांगणे केवळ अशक्य! कारण हे आजोबा कोणी साधे सुधे नव्हते,ज्यांनी हजारोंच्यावर काव्य मैफली करून सारा महाराष्ट्र हलवून सोडला होता ते होते ! कविवर्य मंगेश पाडगांवकर ! त्यांनी आपल्या नातवंडांना कविता ऐकवली ........अगडंबजी बगडंबजी शंभर लाडू रगडंबजी भागाकार गुणाकार सरळ व्याज नफा तोटा लाडू खाणाऱ्यालाच भितो गणितासारखा वीर मोठा आपल्या गुटगुटीत अंगकाठी असलेल्या नातावाआकडे बघून ते म्हणाले, “ म्हणूनच तनूला गणित घाबरतं...”लाडू पोटात नसतील तर गणितात आपण दगडंबजी........ पाडगांवकरचे शूटिंग म्हणजे आमच्यासाठी एक आनंद यात्राच होती.पाडगांवकर आपल्या खास शैलीत निर्मिती रहस्य उलगडीत होते. लयदार, विशिष्ट आघातांनी युक्त असे त्यांचे बोलणेही ऐकतच राहावे असे वाटत होते. कविता वाचनाइतकेच त्यांचे ते बोलणे देखील रंगतदार,पण मार्मिक असे होते. कविता वाचताना ते अशा प्रकारे वाचत होते की त्याची अनुभूती आमच्या पर्यंत येऊन भिडत होती. पाडगांवकर एके ठिकाणी म्हणतात.....

दंव बिंदूतिल हळवे स्पंदन
जाणिवेत कधि टिपून घेतो
गडद निराकाराची किमया
कधि शब्दांतुन खुलवित बसतो.......

तरल फुलपाखरासारखे शब्द आणि तरल भावना यांचा मनोज्ञ संगम म्हणजे पाडगांवकरांची कविता ! ते शब्द ऐकतानाच त्यांच्या शब्दातील दृश्यात्मकता जाणवायला लागते. पाडगांवकरांच्या कवितेतला निसर्ग बहरलेला आहे. तो निसर्ग मलूल,सुकलेला,वठलेला नाही. त्यांच्या कवितेत मानाला सुखावणारी,आल्हाद देणारी पावसाची संतत धार आहे. त्यामुळे त्यांच्या कवितेत हिरवीगार झालेली लसलसती हिरवीगार शेते,वनश्री आहे,रंगीबेरंगी फुलांचे फुललेले गेंद आहेत. भरभरून वर्षणारे मेघ आहेत,झुळूझुळू वाहणारे निर्झर आहेत,गाणारे पक्षी आहेत,नाचणारे मोर आहेत. हे जीवन म्हणजे एक आनंदाचे” गाणे” आहे. ते “कण्हणे” नाही.हा कवीचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन त्यांच्या कवितेतून सतत व्यक्त होतो. म्हणूनच ते म्हणतात,” माझे जीवन गाणे” पाडगांवकर जीवनाकडे सौंदर्यपूर्ण नजरेने पहातात. त्यांच्या कवितेतला हा आनंदोत्सव कॅमेऱ्यात पकडणे हे माझ्या समोर एक मोठे आव्हान होते.

एक शब्द पक्षी झाला ,आभाळात उडाला
एक पक्षी शब्द झाला, शाईमध्ये बुडाला

या कवितेतली दृश्यात्मकता मला सारखी खुणावत होती. त्यासाठी मी निळ्या फुलांनी बहरून आलेल्या वेलीची निवड केली. आणि आकाशात उडणारा निळा पक्षी त्या वेलीच्या निळ्याशार फुलांच्या गेंदावर अलगद येऊन उतरतो ,विसावतो,असे चित्रीकरण करून ते दृश्य त्या ओळींवर टाकले.ते फार परिणामकारक झाले. पाडगांवकरांची जी गझल आशाताईंनी गायली होता त्यावर चित्रीकरण काय आणि कशा प्रकारे दाखवायचे, हा माझ्या समोरचा एक यक्ष प्रश्न होता. त्यासाठी त्या गझलेतल्या शब्दांना न्याय देणारे दृश्य येणे आवश्यक होते. बजेट थोडे असल्याने “फाईल शॉट्स” घेणेच शक्य होते. आम्ही आरती प्रभूंच्या शूटिंगसाठी कुडाळ,सावंतवाडीला जाऊन शूटिंग करून आलो हे समजल्यावर पाडगांवकर आपल्या थट्टेखोर स्वभावानुसार मला पाडगांवकर म्हणाले देखील होते की,” तुम्ही कोकणचा सुंदर निसर्ग आरतीसाठी कॅमेऱ्यात पकडलेला
असणार !मग आता आमचा मालिकेचा भाग कोणकशाला बघणार? आमच्या काय या मुंबईच्या लहानशा घरातल्या चार भिंतीच ! “ या शब्दाशब्दातून पाडगांवकरांचे कोकणावरील नितांत प्रेमच अशा प्रकारे व्यक्त होत होते. ते आम्हाला समजत होते कारण ते तसे पक्के कोकणी. मुंबईत वास्तव्य असले तरी “वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा” अशा ओळी सहजच उत्स्फूर्तपणे लिहिणारे ! सुंदर निसर्गचित्र आपल्या कावितेतून रेखाटणारे! त्यांना देखील मी अतुल कुलकर्णीला जे उत्तर दिले तेच उत्तर दिले.म्हणाले,” पाडगांवकर मालिकेचा हा भाग जेव्हा दूरदर्शनवर लागेल ,तेव्हा तुम्ही बघालच.तुमच्या कवितेतला निसर्ग मी कसा दाखवते ते ! “

पाडगांवकर हे उत्तम परफॉर्मर असल्याने त्यांचे सारे शूटिंग एकही रीटेक न होता खूपच लवकर पार पडले हे वेगळे सांगायला नकोच ! त्यांचे सर्व कुटुंबीय अगदी त्यांच्या जावायासकट शूटींगच्या दिवशी उपस्थित होते. त्यामुळे सगळ्या कुटुंबाचे अनेक शॉट्स सहजच घेता आले. सौ.पाडगांवकरांच्या आदरतिथ्याने आम्ही भारावून गेलो. त्यांनी चहा सोबत आणलेल्या गरम गरम बटाटे वड्यांबरोबरच पाडगांवकरांचे खमंग संवाद सगळ्यांना सुखावून जात होते. एकंदरीत कविराजांनी खूपच नेटके आणि आखीव रेखीव शूटिंग दिले. त्यांचा एक स्वभाव विशेषही विशेषत्वाने जाणवून गेला. तो म्हणजे आम्ही किती मिनिटांचा एपिसोड दूरदर्शनसाठी देणार आहोत आणि आपण किती वेळाचे शूटिंग यांना देत आहोत याचे पूर्ण भान त्यांना होते. हा मला आढळलेला त्यांचा व्यावसायिकतेचा चांगला भाग मनात साठवत मी” पॅक अप ” म्हटले. एपिसोड संपवताना पाडगांवकरांच्या कवितेच्या ओळी आम्ही आमच्या प्रेक्षकांना ऐकवल्या.......

हलके काढून कंटक पायींचे
स्वरांत विणिले सर मी स्वप्नांचे
हासत दु:खाचा केला मी स्वीकार
वर्षिले चांदणे पिऊन अंधार
प्रकाशाचे गाणे अवसेच्या रात्री
आनंद यात्री मी ! आनंद यात्री !


- माधवी वैद्य



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा