ऋतुगंध वर्षा वर्ष १३ अंक ३
किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला. हे नुसते गाणे गुणगुणले तरी किती छान वाटते ना. पहा, 'ऋतुगंध'च्या ह्या वेळच्या विषयातच कशी जादू आहे ते. अहो, आनंदी राहणे हा माणसाचा नैसर्गिक स्वभाव आहे. लहान मुलाला खेळतांना पहा. एखाद्या लहानशा खेळण्याशी खेळण्यात ते तासनतास रंगून जाते. एखादा आवडीचा खाऊ मिळाला, की मनापासून त्याचा आस्वाद घेते. लहान मुलांना आनंदी व्हायला फार मोठे कारण लागत नाही. छोट्या छोट्या गोष्टीत ते आनंद मिळवतात. म्हणूनच त्यांच्याशी खेळायला, त्यांच्या बाललीला पाहायला आपल्याला इतकी गंमत येते. व आपणही त्यांच्यामध्ये रमून जातो व काही तास तरी आपण आपले मोठ्यांचे जग विसरतो. जे अर्थातच तितके निरागस, निर्मळ नाहीये हे आपल्यालाही जाणवते.
रोज सकाळी उठून जर आपण ठरवले, की आजचा दिवस मस्त घालवायचा. तर ते शक्य आहे. कारण खरंच आयुष्य किती क्षणभंगूर आहे, त्यात आपल्याला आपली दैनंदिन कामे, स्वयंपाक, बाकी जबाबदाऱ्या हे सगळे उरकून जो फावला वेळ मिळतो, तो कसा घालवायचा हे सर्वस्वी आपल्या हातात असते. तो वेळ आपण निगेटिव्ह विचार, दुसऱ्याला नावे ठेवणे, मत्सर, द्वेष, ह्यामधे पण घालवू शकतो. पण विचार करा, ह्यातून मिळत काहीच नाही. कारण ही अशी वागली, म्हणून मी दुखावली गेले, अमका असे म्हणाला म्हणून मला वाईट वाटले. ह्याला काही अर्थ नसतो. त्यापेक्षा आपण आपल्या आवडीचे काम केले, काही नवीन शिकलो, तर किती तरी आनंद मिळू शकतो.आपला आनंद हा आपल्या स्वतःच्या हातात असतो. अर्थातच हे म्हणणे सोपे आहे तितके करणे नाही. पण आपण प्रयत्न तर करूच शकतो.
असे म्हणतात, “Only a Happy person can make others Happy”. घरात जर आई खूष असेल, तर मुले पण चांगला, सकारात्मक विचार करायला शिकतात. आपल्याला स्वत:ला मनापासून मजा येते, अशा गोष्टी जरूर कराव्यात. गाणे, लिखाण, वाचन, वाद्य वाजवणे, चित्रकला, पेंटिंग, भरतकाम, अनेक प्रकारचे खेळ, पोहणे अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्यामधे मन खूप छान रमू शकते. सतत नवीन काहीतरी शिकण्याने मन ताजे तवाने, प्रसन्न रहाते. मला तर पाऊस पडत असताना किंवा थंडीच्या दिवसात, मस्त आल्याचा चहा, बरोबर कुरकुरीत भजी बरोबर घरची मंडळी, किंवा मित्र, मैत्रिणी ह्यांच्याशी तासनतास गप्पा मारायलाही खूप आवडते. मी लिखाण करतांना, कविता लिहितांना ते सगळे दुसऱ्याला आवडेल का ह्याचा विचार करत नाही. आपल्याला आवडेल, पटेल ते मनापासून लिहावे असे मला वाटते. दुसर्यांना आवडले, त्याचे कौतुक झाले तर तो माझ्याकरता बोनस असतो.
आयुष्यात मोठे आनंद खूप कमी वेळा येतात. म्हणून रोज छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूष व्हायला शिकले पाहिजे. सगळे काम वेळेत झाले, 'ऋतुगंध'करता वेळेत लेख लिहिता आला, एखादा नवीन पदार्थ केला तो छानसा जमला व घरी सगळ्यांना खूप आवडला. ह्या गोष्टी पण मनाला खूष ठेवतात. जितके आपण आशावादी राहू तितकी आपली तब्येत पण छान राहते. आपण स्वतः खूष राहावे, पण सतत सगळ्यांना खूष करायचा प्रयत्न करू नये असे माझे प्रांजळ मत आहे. कारण 'व्यक्ती तितक्या प्रकृती' त्यामुळे सगळ्यांना खुश करणे ही एक तारेवरची कसरत आहे, त्यामुळे त्या भानगडीत पडू नये असे मला वाटते. प्रत्येक माणूस आपल्या स्वभावाप्रमाणे वागत आणि बोलत असतो. कुणालाही बदलायचा प्रयत्न करू नये. त्या पेक्षा जे लोक आपल्याला आनंद देत नाहीत किंवा ज्यांच्या सहवासात आपल्याला मजा येत नाही, त्यांच्या पासून ४ हात दूर राहावे, हे बरे.
शेवटी “जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधोनी पाहे” ह्या प्रमाणे जीवनात चढ, उतार असणारच. आत्ता नुकत्याच एका मैत्रिणीशी खूप छान गप्पा रंगल्या होत्या, तिच्या ज्येष्ठ लेखिका आईने सांगितलेले वाक्य मला फार आवडले. जीवनाच्या चादरी वर जर बसलो आहे, तर त्याला वळ्या तर येणारच आहेत. त्यामुळे उतार, चढाव, आनंद, दु:ख आयुष्यात असणारच, त्यातून आनंदी कसे राहायचे, हे मात्र प्रत्येकानी आपापले ठरवायचे.
- मेघना असेरकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा