आजोबांची ओसरी - भाग ३

ऋतुगंध वर्षा वर्ष १३ अंक ३


आजोबांची ओसरी मधील गोष्ट येथे ऐका ऑडिओ स्वरूपात:

कसे आहात मुलांनो? मागच्या अंकातल्या “भीती” विषयीच्या गोष्टी वाचल्यात ना? काही आठवते आहे का? आज पुन्हा आपण भेटलो! मजेत आहात ना सगळे? असेच खूष रहात जा! घरात लहान मुले हसती खेळती असली ना, की सगळे घर आनंदी असते! हो ना? बाबा ऑफिसमधून घरी आले की धावत जाऊन तुम्ही त्यांच्या कडेवर बसायला बघता. त्यांनी उचलून घेतले की माझ्यासाठी काय आणले विचारता. त्यावेळीस बाबांकडे बघत असाल! त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो ना! ते बघून आई सुद्धा हसते. तरीही रागाने तुम्हाला म्हणते “अरे जरा थांब! आधी बसू तर दे बाबांना!” तुम्हाला हे देखील कळते की आईचा राग केवळ खोटाखोटा आहे! म्हणून तुम्ही आणखीनच बिलगून बाबांना चिकटता! “आधी माझ्यासाठी काय आणले ते दाखव” असा हट्ट करता! सगळे घर आनंदाने भरून जाते!

मित्रांनो, घरात तुमच्यामुळे अशी कित्येकदा आनंदाची उधळण होत असते! कधी तुम्ही धावत घरात येता. आई स्वयंपाक करण्यात गुंतली असते. तरीही तिचा हात धरून तिला बाहेर आणता. तुम्हाला मित्राने दिलेली एखादी छोटीशी गोष्ट दाखवता!.. रंगीत पेन्सिल असेल, तुमच्याबरोबर शेअर केलेली आंब्याची अर्धी बर्फी असेल! तुम्हाला कधी एकदा ती आईला दाखवतो असे झाले असते. आई हसून ती वस्तू खूप आवडली असे म्हणते. तुमचा आनंद डबल होतो! म्हणजे मित्राने अर्धी बर्फी दिली तेव्हा एकदा आनंद झाला. आईला सांगण्यासाठी आनंदाने धावत आलात, तेव्हा पुन्हा आनंद! मग आईने कौतुक केले तेव्हा त्याच अर्ध्या वडीचा तिसऱ्यांदा पुन्हा पूर्ण आनंद. बाबा ऑफिसमधून घरी आले की हे सगळे पुन्हा त्यांना सांगताना तुम्ही आई बाबांबरोबर आणखीन एकदा आनंदात बुडून जाता! एकच अगदी छोटीशी गोष्ट पुन्हापुन्हा सगळ्यांना आनंद देते!

हे आनंदाचे क्षण आपल्या अवतीभवती विखुरलेले असतात. आपणच ते घट्ट पकडून पुन्हा आपल्या सभोवती उधळून द्यायचे असतात. रंगपंचमीच्या दिवशी आपण पिचकारीने रंग उधळतो ना? तसेच. आपल्याला झालेला आनंद आईबाबांसोबत वाटला की तो डबल होतो. तोच पुन्हा मित्रांबरोबर शेअर केला की आणखी एकदा डबल होतो! जादूच म्हणाना ही आनंदाची! कधी शाळेत सर रागावतात. किंवा धावतांना पडून खरचटते. अशावेळी दु:ख होते ना? असे वाटते, कोणाशी बोलूच नको या! एका कोपऱ्यात एकटेच बसून राहावे. एखादा जिवाभावाचा मित्र येतो. काय झाले विचारतो. तुम्हाला काहीच सांगायचे नसते. तुम्ही गाल फुगवून गप्प बसता. तो मित्र तुम्हाला पुन्हा विचारतो. इतर गोष्टी बोलून तुम्हाला गुंतवतो. मघाचा रुसवा जाऊन तुम्ही पुन्हा आनंदाने त्याला सांगू लागता... “अरे मी धावता धावता एकदम खांबालाच धडकलो आणि पडलो!” तुम्ही दोघेही “असा कसा खांब दिसला नाही” म्हणत हसता! पायावरचे खरचटलेले आता मुळीच बोचत नसते. दु:ख शेअर करून तुम्ही आधी ते अर्धे केले असते. आणि थोड्याच वेळात मित्राने आपले दु:ख समजून घेतले म्हणून त्या दु:खातूनच आनंद तयार झाला होता!

मित्रांनो, आनंद होण्यासाठी नेहमी काहीतरी मोठ्ठेच घडायला हवे असे नसते! नेहमी नेहमीच पहिला नंबर येईल असे नाही ना! रोजच कसे बाबा तुमच्यासाठी नवीन कपडे, नवीन खेळणी आणतील? या गोष्टी वेळेप्रमाणे मिळतातच. तेव्हा आनंद होतोच. पण रोज थोडीच असे होते? तरीही रोज आपण हसतखेळत असतो. याचे कारण म्हणजे आजूबाजूला होणाऱ्या लहानसहान गोष्टींमध्ये आपण आनंद घेतो. आई काही कारणाने रागावली, तरी नंतर जवळ घेऊन लाड करते तेव्हा, बाहेर पाउस थांबून आकाशात इंद्रधनुष्य फुलते तेव्हा, आईने लावलेल्या जास्वन्दीच्या झाडावर पहिले फूल उमललेले तुम्हालाच दिसते तेव्हा! अशा कितीतरी बारीकसारीक घटना तुमच्या चेहऱ्यावर हसू फुलवून जातात. त्यावेळेस तुमच्या लक्षात देखील येत नसेल. पण हे आनंदाचे कणकण तुम्हाला आणि तुमच्या भोवतीच्या सगळ्यांनाच खूष ठेवत असतात.

एका शाळेमध्ये एक टीचर होती. तिने क्लासमधल्या मुलांना एकदा शिकवले की आनंद शेअर करून कसा डबल तिबल किंवा अनेकपटींनी मोठा करता येतो. झाले असे की क्लासमध्ये टीचर नेहमीच कोणते ना कोणते असाइनमेंट द्यायची. शहाण्या मुलांना ते काम करायला आवडायचे. पण काही आळशी मुले कंटाळा करायची. कोणते नां कोणते कारण देऊन ते काम टाळायची. काही लबाड मुले आई वडिलांकडूनच ते असाइनमेंट करून घेऊन शाळेत स्वत:चे म्हणून दाखवायची. टीचरला सगळे समजायचे. पण ती कधी मुलांना रागवायची नाही. कारण ती खूप दयाळू होती. तिने एकदा विचार केला, असे कोणते काम आपण मुलांना दिले की सगळीच मुले अगदी आनंदाने ते काम स्वत:च करतील? तिला एक कल्पना सुचली.

दुसऱ्या दिवशी शाळेत तिने मुलांना म्हटले.. “आज मी एक नवीन असाइनमेंट तुम्हाला देणार आहे.”

“ओके टीचर, सांगा तुम्ही.” शहाणी मुले म्हणाली.

“काहीच प्रोब्लेम नाही. आईला जे करता येईल असे काही द्या” लबाड मुले एकमेकांना म्हणाली.

“ओह नो!” आळशी मुले म्हणाली.

“हे बघा, सोप्पे असाइनमेंट आहे. दर आठवड्यात एकदा प्रत्येकाने क्लासमध्ये असे काहीतरी करायचे की ज्यामुळे समोरचा खुष होईल, आनंदी होईल, हसेल. मी सगळे बघणार आहे.”

“अरे वाह! हे तर खूपच सोपे आहे. कागद कापायला नको, चित्र काढायला नको, फक्त समोरच्याला हसवायचे, आनंदी करायचे.” शहाणी, लबाड, आळशी सगळीच मुले म्हणाली.

क्लास सुरु झाला. शहाण्या जॉयने आपल्या खाऊच्या डब्ब्यातले चॉकलेट केविनला दिले. केविन जॉयला हसून thank you म्हणाला. दोघेही हातात हात घालून क्लासमध्ये नाचले. त्यांच्याभोवती फेर धरून बाकी मुले नाचली. सगळे टाळ्या वाजवून हसले. आळशी चिंटूने थकलो बुवा असे म्हणत डेस्कवर डोके टेकून झोपल्याचे सोंग केले. आणि तो मोठ्याने घोरू देखील लागला. ते बघून सारेच, अगदी टीचर सुद्धा खूप हसली. लबाड साहिलने अमरला एक छोटा बॉक्स भेट म्हणून दिला. तो उघडताच त्यातून एक बेडूक डरांव डरांव करीत टून्नकन बाहेर आले. अमर घाबरून उडालाच! बेडकाला पकडण्यासाठी क्लासमध्ये एकाच धमाल झाली. सगळे हसत होते. मजा करत होते. क्लास संपल्याची घंटा झाल्याचे कोणाला ऐकूही आले नाही.

“टीचर, उद्या पण हेच असाइनमेंट करू या.” सगळे एका सुरात ओरडले.

“नाही हं! रोज रोज नाही. आता पुढच्या आठवड्यात!” टीचर खोटे रागावून म्हणाली.

पुढच्या आठवड्यात मुले उत्सुकतेने वाट पहात होती. आज काय काय धमाल करायची हे ठरवूनच आली होती. टीचर क्लासमध्ये आली तेव्हा तिच्या हातात मोठी पिशवी होती. ती भरलेली दिसत होती.

“मुलांनो, मागच्या आठवड्यात तुम्ही जी मज्जा केली, तोच आनंद आज मी तुम्हाला देणार आहे.” असे म्हणत तिने पिशवीतून एक फोटो बाहेर काढला. जॉय केविनला चॉकलेट देत असताना केविन हसत होता तो फोटो. नंतर एकेक करून तिने पिशवीतून मागच्या सगळ्या आनंदी क्षणांचे फोटो बाहेर काढले. नाचणारी, बागडणारी मुले, उड्या मारणारा बेडूक, फेर धरून टाळ्या वाजवणारी मुले. वाकडे तोंड करीत खोटे घोरणारा आळशी चिंटू. हे सगळे मजेदार फोटो एकत्र बघून सगळी मुले पुन्हा एकदा खूप हसली. नवीन काहीही न करता मागचाच आनंद त्यांनी पुन्हा एकदा मिळवला होता. अगदी लहानलहान गोष्टींमधून मोठा आनंद कसा मिळवायचा हे देखील ती शिकली होती. समोरच्यासाठी काहीतरी करून आपल्याला आनंद मिळवता येतो, निरुपद्रवी खोड्यांमधून समोरच्याला न दुखावता धमाल करणे ती शिकली होती. सगळ्यात महत्वाचे म्हणजे, आनंद शेअर करून अनेक पटींनी वाढवायचा कसा हे त्यांना समजले होते.

लक्षात राहील ना मित्रांनो? “आनंद अगदी लहानसहान गोष्टींतून सुद्धा मिळू शकतो, आनंद शेअर करून वाढतो, आणि दु:ख शेअर करून कमी होते.”

पुढच्या वेळी भेटू तेव्हा मला नक्की सांगा हं, तुमच्या छोट्याछोट्या आनंदाच्या गोष्टी! 



अरुण मनोहर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा