ऋतुगंध ग्रीष्म वर्ष १३ अंक ३
रिकामे खिसे पण ,
माणुसकीने भरलेले मन
होतं असं कोणे एके काळी ..
फाटक्या खिशाची लाज नव्हती,
मदतीची किंमत मोजली जात नव्हती
होतं असं कोणे एके काळी ..
शिक्षण कष्टाने मिळवावे लागे,
रस्त्यावरच्या दिव्याखाली बसावं लागे
होतं असं कोणे एके काळी ..
विद्येला विनयाची झालर होती ,
शिक्षणाने समाजसेवा घडत होती
होतं असं कोणे एके काळी ..
लेखणीला तलवारीची धार होती,
शब्दांनी साम्राज्ये उधळली होती
होतं असं कोणे एके काळी ..
घरातल्या थोरांना मान होता,
देव्हाऱ्यातल्या देवाचा धाक होता
होतं असं कोणे एके काळी ..
कधी कशी कुठून आधुनिकता आली
सगळंच चित्र बदलून गेली ….
रिकाम्या खिशाची लाज आली,
माणुसकीची मनं रिकामी झाली,
खिसे भरायला हपापले सारे,
दमडीचा दाम होऊन गेले खरे !!
दामाने कामे पटापट केली,
डिग्र्यांनी मुलांची दप्तरे भरली,
दिव्याखाली बसायची गरज संपली,
पबात बसून डिग्रीची ऑर्डर दिली,
मौल्यवान विद्येचा आदर गेला ,
कष्ट नव्हतेच, विनय मग कसला ?
शिक्षणाने समाजसेवा करायची असते?
स्वतःपुरतं बघ वेड्या, असं कुठे नसते !!
लेखणीची धार बोथट झाली,
भल्या-भल्यांची तर विकलीच गेली,
दामाजीने घरात नाच सुरु केला,
थरथरत्या हातांना जाच सुरु झाला,
थकलेल्या डोळ्यांना वृद्धाश्रम दिसला,
तेव्हा मात्र, घरातला देव्हारा रिकामा झाला ..
घरातला देव्हारा रिकामा झाला ..
- युगंधरा परब
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा