च्युक छप छप चॅक


असं म्हणतात की प्रत्येक पर्वताची एक देवता असते आणि ती कोणाला पर्वत शिखरावर येऊ द्यायचं किंवा नाही ते ठरवते. किंबहुना जेव्हा त्या पर्वतावर जायची वेळ येते तेव्हा ही देवता घरी येऊन बोलावते आणि शिखरावर घेऊन जाते. “बुलावा आया है माता ने बुलाया है” म्हणत भक्तगण वैष्णो देवी ला जात असतात. या वदंतेवर माझा एवढा विश्वास नाही पण माझ्या फुजी पर्वत मोहिमेच्या मागे कोणती तरी शक्ती होती हे नक्की.

फुजी पर्वत लाजरा बुजरा आहे. तोक्यो कडून नागोया कडे शिकानसेनने जाताना अवचित दर्शन देतो, तर कधी कधी नरिता विमानतळावर उतरताना क्षितिजावर झळकून जातो. पण एखादा छान फोटो काढावा म्हणाल तर एखाद्या लाजऱ्या बालकाप्रमाणे डोक्यावर ढगांचे पांघरूण घेऊन बसतो. कितीही आर्जवं करा. नाही म्हणजे नाही बाहेर येत. गिर्यारोहकांना शिखरावर जाऊन त्याच्याशी हितगुज करायचे असते. तिथे ही फुजी पर्वताचे नखरे आड येतात. उंचच्या उंच पर्वत, जगातले ३५ वे उंच शिखर, ज्वालामुखी पर्वत असल्याने उतार इतका जास्त आहे की बर्फाच्छादित असतांना जाणे धोक्याचे असते. म्हणून गिर्यारोहकांसाठी वर्षातले केवळ ४० दिवस फुजी आरोहण शक्य असते. त्यातून हाच मौसम असतो चक्रीवादळाचा. तुम्ही फुजी वर चढण्याची मनीषा घेऊन येता आणि चक्रीवादळ आडवे येते. असे जनसंपर्काचे चाळीस दिवस झाले की थंडीचे आणि बर्फाचे बहाणे करून फुजी पर्वत परत आपल्या एकांतात निघून जातो, सप्टेंबर महिन्यापासून.

अशा या लाजऱ्या जपानी पर्वतावर सिंगापूर मधून मोहीम आखायची असेल आणि ती यशस्वी करायची असेल तर दैवी शक्ती पाहिजेच पाठीशी.

च्युक छप छप चॅक

पाचव्या स्टेशन पासून निघालो तेव्हा गिर्यारोहकांचे लोंढे च्या लोंढे निघाले होते. यशस्वी मोहिमेची स्वप्न बघत. फुजी नेहमी प्रमाणे ढगांच्या पडद्यामागे बसला होता. रिमझिम पाऊस पडत होता. पण निर्धार पक्का होता. अनुभवी गिर्यारोहक आपल्या आधीच्या मोहिमेच्या गोष्टी सांगत होते.

“हे ढग, हा पाऊस सगळे फुजीनी दिलेली कसोटी आहे. लेच्या पेच्या गिर्यारोहकांना परत पाठवून द्यायची. वर पोचायचं असेल तर सामर्थ्य असून उपयोग नाही. पाहिजे तो पक्का निर्धार. तो असेल तर सामर्थ्य नसलेले लोक सुद्धा वर पोचलेले मी पहिले आहेत.”

“इथून काळे पांढरे ढग दिसत आहेत. त्याला भेदून आपण पलीकडे जाणार आहोत. आणि एकदा पलीकडे गेलो कि तिकडे आहे निळेभोर आकाश ज्यात ढगांचा एक पुंजकाही औषधाला शोधून सापडणार नाही. आणि रात्रीचे आकाश चांदण्यांनी इतके भरलेले असेल की तुम्हाला चंद्राचीही गरज भासणार नाही.”

“झाडं झुडपं नाहीत. दगड धोंडे पण नाहीत. बोर्निओ मध्ये दिसतात तशा वेली पल्लवी पण नाहीत. तरी फुजी सुंदर आहे.”

कोण्या दूर देशीचे, वेगळ्या आकार-प्रकारचे लोक, वेगळ्या भाषा, वेगळे संस्कार, वेगळी संस्कृती. पण फुजी पर्वत चढायचे स्वप्न बघत खांद्याला खांदा लावून चालत होते. माणसा-माणसातले सर्व भेद नाहीसे झाले होते. कोणी घसरला तर आपोआप आधाराचा हात पुढे येत होता, पाणी, च्याऊ म्याऊ, पाऊस-वाऱ्यापासूनचा आडोसा सगळे वाटून घेण्यासाठीच होते.

कोणी उंच नव्हते कोणी बुटके नव्हते, कोणी वृद्ध नव्हते, कोणी तरुण नव्हते, कोणी काळे नव्हते, कोणी गोरे नव्हते, कोणी तपकिरी नव्हते, कोणी पुरुष नव्हते, कोणी स्त्री नव्हते, सर्वजण फक्त फुजी पर्वतभक्त होते.

च्युक छप छप चॅक

एक उत्साही जपानी कुटुंब भेटले. वडील, आई आणि एक जुळं.
तो मुलगा आणि मुलगी अवघे सहा वर्षाचे होते. तरी त्याच्या आई-वडिलांनी त्यांच्या पाठीवर छोट्या छोट्या सॅक मध्ये त्यांचे सामान त्यांच्या बरोबर दिले होते. पाण्याची एक छोटी बाटली, खाऊ, पॉन्चो. मी विचारलं की आधीच पायाखालचा रस्ता इतका अवघड, त्या लहानग्यांना चालू द्यायचं. आई वडील म्हणाले, “फुजी पर्वतारोहण ही केवळ शारीरिक कसरत नाही. मानसिक पण आहे. आम्हाला त्यांना असा संदेश द्यायचा आहे कि जेव्हा आपण निसर्ग सान्निध्यात जायला निघतो तेंव्हा आपण तयार असलो पाहिजे. आपले सामान आपण नेले पाहिजे. आज ते छोटे आहेत आणि त्यांची सॅक हलकी आहे पण जसे जसे ते मोठे होतील तसतशी सॅक जड होईल. पण सॅक घेतल्याशिवाय ट्रेकिंग ला जाऊ शकत नाही हा विचार त्यांच्या मनात पक्का रुजेल.”

एक तरुण युरोपिअन मुलगी झपझप चढत होती. सातव्या स्टेशनपाशी फोटो काढून घेण्यासाठी म्हणून थांबली आणि तिने मला फोटो काढण्याची विनंती केली. ओळख झाली. चालताचालता गप्पा सुरु झाल्या. दूर देशाची ती मुलगी रोज योगाभ्यास करायची. अत्यंत अवघड आसने सहज करायची. जपान मध्ये मुक्काम होता थोडे दिवस तिथे चार पैसे कमावण्यासाठी योग शिक्षक म्हणून एका जिम मध्ये काम करत होती. मी अचंबित झालो. ज्या माझ्या मातृभूमीत योग जन्माला आले आणि ज्याचा अभ्यास जगभरातले लोक करतात त्याचा मला गंधही नव्हता. मी विचारलं मिळतात का पुरेसे पैसे योग शिकवून. ती म्हणाली नाही मिळत मग मी रात्री बिअरबाला म्हणून काम करते. बिअर देते, ग्राहकांशी गप्पा मारते, त्यांच्या बरोबर फोटो काढते, मौज मस्ती मध्ये सहभागी होते आणि सकाळी प्राणायाम योग शिकवते. व्यक्ती तितक्या प्रकृती असं जेव्हा मी मनाशी म्हणत होतो तेव्हा ती झप झप पुढे निघून गेली. परत भेटू म्हणली. योग शिकण्यासाठी किंवा बिअर पिण्यासाठी. आयुष्यात काही चॉईस फार मजेदार असतात.

पायथ्याशी भेटलेले गिर्यारोहक जे म्हणाले ते खरे होते. ढगांचे कवच भेदून आम्ही जेव्हा वर पोचलो तेव्हा गर्द निळे आकाश होते. नक्षत्रांच्या चांदण्याची चाहूल होती.

च्युक छप छप चॅक

दिवेलागणीच्या वेळेला आठव्या स्टेशन पर्यंत पोचलो. हीच आमच्या मुक्कामाची जागा. एका जपानी तरुणाने ओला हातरुमाल देऊन आमचे स्वागत केले.
बूट इथे ठेवा, सॅक इथे ठेवा अशा सूचना खुणांनी दिल्या. एक छोटेसे उपहारगृह होते. लाकडी बाकडी, लाकडी भिंती. थकून भागून आलेले गिर्यारोहक दम घालवत, खात-पीत, गप्पा मारत बसले होते. त्या तरुणाने विचारले शाकाहारी जेवण हवे की मासांहारी. मी म्हणालो मांसाहारी. तो घेऊन आला. बीफ करी आणि भात. मी म्हणालो मी बीफ खात नाही. तो म्हणाला दोनच जेवणाचे प्रकार आहेत. बीफ करी किंवा व्हेज करी. काय हवे? परत जाणवलं की आयुष्यातले काही चॉइस फार मजेदार असतात. मी म्हणालो व्हेज करी चालेल. त्यांनी बेन्टो मधली एक प्लास्टिकची पिशवी काढून घेतली आणि म्हणाला आता हे जेवण शाकाहारी आहे. किती सोप्पं होतं सगळं. निमूटपणे जेवलो.

मग तो झोपायची जागा दाखवण्यासाठी मला जिन्याने वर घेऊन गेला. वर मोठ्या डॉर्मेटरी होत्या. ओळीने थकलेले गिर्यारोहक झोपलेले होते. त्याने एक रिकामी जागा दाखवली आणि खुणेनी घूस इथं असा म्हणाला. मी तिथे झोपायला जाणार तितक्यात मला जाणवलं की शेजारी एक मुलगी झोपली आहे. मी चमकलो. त्याला विचारलं की पुरुषांचा विभाग वेगळा आहे का? त्याला मी काय विचारतोय कळलंच नाही. शेवटी दुसऱ्या एक प्रवाशाने सांगितले इथे सगळे एकत्र आहे, झोपणे, जेवणे खाणे इतकेच काय स्वच्छता गृह पण वेगळे नाही.

परत माझाच विचार मला परत आठवला … इथे कोणी स्त्री नाही पुरुष नाही आहेत ती सर्व फुजीभक्त.

च्युक छप छप चॅक

कधी कधी थरारक दिवस ढळून गेला की शरीर दमलेलं असलं तरी मन ताजतवानं असतं. आपण झोपायचा प्रयत्न करत असतो आणि मनाच्या भराऱ्या चालूच असतात. आपल्याला हात धरून ते वेगळ्याच दुनियेत नेते. जिथे भास असतात आभास असतात पण ती स्वप्नं नसतात. स्वप्न पडायला झोप लागावी लागते ती तर लागलेली नसते. अजुन बाजूचे आवाज ऐकू येत असतात, अनोळखी अंथरुणात वळवळ सुरु असते. अशा जागेपणा आणि झोप यांच्या सीमारेषेवरच्या त्या अवस्थेत किती वेळ गेला माहित नाही पण अचानक बरेच गजर वाजायला लागले. मृतवत पडलेले गिर्यारोहक ताडकन उठून बसले. जोरात हालचाली सुरु झाल्या. पुढच्या प्रवासाला निघायची तयारी सुरु झाली.

डॉर्मेटरीतून बाहेर पडायचे होते पण दारात गर्दी होती. काय झालं असेल बरं? तो तरुण दार बंद करून झोपून गेला असेल आणि उठता ऊठत नसेल का?
अशक्य. जपानी लोक कामाचे इतके चोख की मृत्युशय्येवर असले तरी यमराजाला म्हणतील थोडा थांब मी दार उघडून येतो. काय झाले असेल बरं? पाच दहा मिनिटे चुळबूळण्यात गेली. मग लक्षात आलं फुजीच्या शिखरावर सूर्योदय पाहण्यासाठी साधारण १ ते २ किलोमीटर लांबीची एक रांग लागली आहे. आणि त्या रांगेत सामील होण्यासाठी आमच्या डॉर्मेटरीतून जे लोक जाऊ इच्छित होते त्यांची वेळ येईपर्यंत रांगेत राहणे आवश्यक होते. फुजी वर जाण्यासाठीचा तो ट्रॅफिक जॅम होता.

जसजसं पुढे जाऊ लागलो तसतसे चित्र प्रकट होऊ लागले. फुजीच्या शिखराला नागमोडी वळसे घालत जाणारी ती वाट होती आणि त्या वाटेवर सर्व गिर्यारोहक डोक्याला टॉर्च लावून वर अत्यंत शिस्तीत आणि तालबद्ध पद्धतींनी वर चढत होते. नक्षत्रांचे चांदणे पडले असावे पण आता मोहक दिसत होती ती डोक्याला लावलेल्या टॉर्चची नागमोडी वळणे घेत पसरलेली आणि मारुतीच्या शेपटासारखी वाढत जाणारी ती दिव्यांची रांग. आणि कोणी कोणी कोणाशी बोलत नव्हते. आवाज येत होता हातात असलेल्या काठ्यांचा आणि तालबद्ध पावलांचा. गिर्यारोहणाच्या काठ्या दगडावर ठेवल्या गेल्या कि च्यूक असा आवाज येत होता. मग दोन पावले छप छप आणि मग काठी उचलली गेली कि चॅक.

च्युक छप छप चॅक

तसं म्हणलं तर सूर्योदय आणि सूर्यास्त रोज होतो. त्यात काय पाहण्यासारखं? असं पण मला बऱ्याच लोकांनी थट्टेनी विचारलं आहे. पण खरं सांगा रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण लक्ष तरी देतो का? ऑफिस मध्ये बसललेलो असताना बाहेर ऊन का पाऊस ते पाहायला पण गूगल मेल उघडतो आपण. मग सूर्योदय पाहण्यासाठी ३७०० मीटर वर चढण्याचा खटाटोप कशासाठी? याच सोपं उत्तर आहे, करून बघा मग कळेल.

मला पाहायला मिळालेला सूर्योदय अतिशय नाट्यमय होता.

मी फुजी शिखरावर पोचलो तेव्हा खूप थंडी होती. गार वारं सुटलं होतं. जॅकेट टोपीला ना जुमानता थंडी फट मिळेल तिथून आत शिरून झोंबत होती. डोळ्यातून पाणी येत होते. हातमोजे काढून टच फोनने फोटो काढणं या सारखी शिक्षा नव्हती. पण सगळ्यांच्या नजरा पुर्वेकडे खिळलेल्या होत्या. पुर्वेकडे तुरळक ढग होते आणि तिथे जमलेले हजारो लोक आपल्या लाखो दैवतांकडे प्रार्थना करत होते की कष्टाचं चीज होवो आणि सूर्योदय या चुकार ढगांच्या मागे न होवो.
सूर्योदय होण्याच्या बऱ्याच आधी आपल्याला नक्की कोणत्या ठिकाणी सुर्यबाप्पा येणार ते कळतं. तो बिंदू तेजोमय असतो आणि हळू हळू सगळी कडे प्रकाश पसरायला लागतो. खरं सांगायचं तर तुरळक ढग या वेळेला सूर्योदयाची मजा वाढवतात. ढगांचे रंग मिनिटा मिनिटाला बदलतात. सूर्योदयाच्या बिंदुच्या उजवीकडे एक मोठा ढग होता. आधी तो आकाशच वाटत होता पण जसजसा सूर्य वरती येऊ लागला तसतसा त्या ढगांचा आकार स्पष्ट होऊ लागला. आधी तो काळाकुट्ट दिसत होता पण त्याला एक सोनेरी किनार होती. मग हळू हळू सूर्याच्या जवळचा ढगांचा भाग गुलाबी झाला त्या गुलाबी रंगाची छटा हळू हळू बदलत नारंगी झाली. क्षितिजापाशी जोरात वारा असावा कारण मध्ये ढगांचा आकार बदलला. क्षितिजावरच्या डोंगराच्या मागे सूर्य होता पण ढगांशी चाललेली त्याची रंगपंचमी पाहून त्याचे अस्तित्व जाणवत होते. २D दिसणारा देखावा हळूहळू ३D होत होता. डोंगरांचे आकार स्पष्ट होत होते. मग उजळलेल्या आकाशाचे प्रतिबिंब पडून दूरवरचं एक तळं चमकायला लागलं. पूर्व दिशा प्रत्येक क्षणाला जास्त उजळ होत होती इतकी की आता तिच्या कडे एकटक बघता येत नव्हतं.

ढग, वारा, डोंगर , तळे यांनी गायलेल्या नांदी नंतर प्रवेश केला सूर्य बाप्पाने. सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या आणि एकमेकांना दिल्याही. हसरे चेहरे. काही आलिंगन. सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं. गेल्या १०-१२ तासात केलेल्या परिश्रमाचं चीज झालं होतं. अनेक बकेट लिस्ट वर एक खूण पडली होती.

जायची वेळ झाली होती. ज्यांच्याबरोबर चार पावलं चालताचालता मनात खोलवर लपलेल्या गोष्टी ऐकल्या सांगितल्या त्यांना अलविदा म्हणायची वेळ आली होती. जन्मजन्मांतरीची नाती असल्यासारख्या तारा जुळल्या होत्या ते कदाचित परत कधी भेटणार नव्हते. ज्यांच्या बरोबर आत्ता सेल्फी घेत होतो ते फेसबुक मधला एक लाइक होणार होते.

पण मला खात्री आहे की आजही त्यांनी डोळे मिटून फुजीची आठवण काढली तर त्यांना एकच नाद ऐकू येईल.

च्युक छप छप चॅक
च्युक छप छप चॅक
च्युक छप छप चॅक

विवेक वैद्य

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा