स्वगत - नित्यकल्याणी

                                                 
घरातली बाग कितीही लहान असू दे, त्यातील झाडांची कामे कधी न संपणारी. गंमतीचा भाग असा कि झाडे आवडणाऱ्या माणसांसाठी, ह्या कधी न संपणाऱ्या कामांचा भार न होता, दगदग न वाटता, ती कामे म्हणजे सुखनिधान होऊन जातात. जिवाचा विसावा होऊन जातात.

रोज वाढणाऱ्या झाडांकडे पाहत राहणे, कळ्या कधी धरतात ,फुले कशी फुलतात ह्याकडे 

लक्ष ठेवणे हे दिवसातला महत्वाचा भाग बनून जाते. सकाळी डोळे उघडताच मनात विचार येतो तो, आज कोणते फुल फुलणार आहे ह्याचा ! कधी कधी असे दिवस असतात कि अनेक झाडे फुलांनी बहरत असतात, पण कधी असेही दिवस येतात कि एकाही झाडाला फुल येणार नसते. आयुष्यातही नाही का कितीतरी वेळा अशा येऊन गेलेल्या असतात? अशावेळी देखील झाडांतला, त्या दिवसातला आणि एकूणच जगण्यातला उत्साह टिकवून ठेवणे ह्यालाच आयुष्य जगणे म्हणत असावेत बहुतेक! 

माझ्या छोट्याश्या बागेतले सदैव बहरणारे झाड म्हणजे सदाफुली. वर्षभर, कोणत्याही परिस्थितीत फुलत राहणारी सदाफुली. इतर भाषांतून ती सदाबहार, नयनतारा, नित्यकल्याणी ह्या नावांनी देखील ओळखली जाते. 

सदाफुलीचे रोप मी आणले होते माहेरच्या अंगणातल्या बागेतून, खास आईच्या सांगण्यावरून. म्हणूनही ते माझे फार लाडके. मी त्या रोपाचे गाव बदलले, त्याला प्रवासातले धक्के सहन करायला लागले. त्याला मातीत वाढायची सवय होती, त्याचे अमर्याद अवकाश मी कुंडीत बंदिस्त करून टाकले. नंतर इथे आणल्यावर देखील गावातल्या गावात घर बदलणे, कुंडी बदलणे असे सगळे बदल अगदी लीलया झेलत, ते झाड आजपर्यंत छान वाढत राहिले आहे. फुलत राहिले आहे. 

काही महिन्यांपूर्वी झाड वाढत वाढत फांद्या वेलासारख्या कुंडीच्या बाहेर झेपावयाला लागल्या. झाडांचे ते बाहेर विस्तारणे, पानाफुलांचे नैसर्गिक सुशोभन होणेदेखील फार लोभस होते. पण नंतर फांद्या जमिनीला टेकायला लागल्या. अगदी लोळायलाच लागल्या. मी विचार केला कि जेव्हा फांद्यांना फुले आणि कळ्या नसतील तेव्हा खाली टेकणाऱ्या त्या फांद्या कापून टाकेन. म्हणजे मूळ झाड चांगले सशक्त होईल. 

कित्येक महिने असेच गेले, झाडाने मला त्याला कापायची संधी दिलीच नाही. कळ्या नाहीत, फुले नाहीत असा एकाही फांदीचा , एकही दिवस गेला नाही. अखेर मन कठोर करून एक दिवस जमिनीला टेकणाऱ्या फांद्या कापून टाकल्या. कळ्या, फुले असलेल्या फांद्या कापताना आणि नंतरदेखील फार अस्वस्थता आली होती. 

त्या कापलेल्या फांद्या दुसऱ्या एका कुंडीत खोचून ठेवल्या. आज जवळजवळ महिना होत आला तरी, अजूनदेखील त्या कुंडीत खोचलेल्या फांद्या फुलत आहेत. आपल्यातला जीवनरस कणाकणाने वापरत आहेत. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आपला फुलण्याचा धर्म प्राणपणाने जपत आहेत, निभावत आहेत.

कुंडीतले मूळ झाड आपल्या फांद्या कापल्या गेल्या म्हणून मनात कष्टी झाले असेल का? त्याला दुःख झाले असेल का? झालेही असेल..कोणास ठाऊक? पण बाहेर मात्र त्या झाडाने तसे काहीच दिसू दिले नाही. त्या फांद्या नसण्याची कसर झाडाने अधिकच फुलून भरून काढली. फुलांचा आकार अधिक मोठा आणि झाडाची पाने अधिक तजेलदार दिसत होती.

एवढेच नाही, तर कुंडीत अजून बारकी बारकी रोपे देखील आली होती. फांद्या कापल्या गेल्याचे संकट झाडावर कोसळले, पण झाडाने, त्या संकटाने खचून न जाता, अतिशय सकारात्मकतेने संकटाकडे पाहिले. संकटाचा उपयोग स्वतःला अधिक मजबूत करण्यासाठी, रुजण्यासाठी करून घेतला. नित्य कल्याणाचाच विचार करणारी म्हणून ती नित्य कल्याणी असेल का?!! 

सदाफुली जमिनीवर लावताना, ती आक्रमकतेने वाढते, चिवट आहे हा धोका लक्षात घ्या, असे सांगितले जाते. कारण ती सर्वत्र पसरते. अगदी मानवजातीसारखेच वर्णन. आक्रमकतेने वाढणारी, इतर जीवसृष्टीवर आक्रमण करणारी, इतर जीवसृष्टीचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करुन घेणारी अशी मानवजात! हे वर्णन तर मानवजातीचे आणि सदाफुलीचे बरोबर जुळते, पण सकारात्मकतेने विचार करण्यात तेवढा माणूस सदाफुलीपेक्षा कमी पडतो. छोट्या/ मोठ्या संकटांनी निराश, हताश होऊन जातो. खचून जातो. नैराश्याने ग्रासलेली अनेक माणसे आपल्या आसपास आढळतात. ते नैराश्य संपूर्ण अस्तित्वावर बांडगुळासारखे वाढत जाते. त्याचा वचपा आपल्या परिघा तील माणसांशी वाईट वागून काढावासा वाटतो. कोणी आपल्या भल्यासाठी काही सांगितले तरी ते ऐकावेसे वाटत नाही.. एकूणच संपूर्ण आयुष्य गढूळ होत जाते. असा एक माणूसही आसपासची अनेक आयुष्ये झाकोळून टाकायला पुरेसा असतो

आपल्याही आयुष्यात अशा नैराश्याच्या वेळा तर येऊन गेलेल्याच असतात. त्या त्या वेळी, माझे कोणी नाही, माझ्यासाठी कोणी नाही, आता जगण्याजोगे काहीच उरले नाही असे वाटून गेलेले असते. आपण खोल खोल बुडत आहोत आणि वर येता येत नाही, कोणीतरी खालीच दाबून ठेवते आहे असेही वाटलेले असते. अशा वेळी दुप्पट उत्साहाने उसळी मारून पाण्याच्या पृष्ठभागावर यायचे आहे ..आपले आपल्यालाच हे एकदा जाणवले आणि अंगी बाणवता आले कि नैराश्य हरलेच समजा. हुरहुरत्या तिन्हीसांजेपासून शाश्वत पुनवेपर्यंतचा प्रवास आत्मबळावरच करावा लागतो. प्राणांवर नभ पांघरणारे प्रत्येकाच्या वाट्याला कसे कोणी येणार? 

घनदाट निबिड वन किर्र गातसे गाणी
कलतात सावल्या कुणी डहूळले पाणी
भयनादआवर्त गरगरे तमाच्या पैंजणी
स्मरणातील काहुर मनी कोरती लेणी ।।१।।

मौनात निमाले लागट बोचरे कोंब 
निवविते साधना जनीमनीचे डोंब 
स्वतःच सुज्ञशा स्वतःने पूर्ण होताना 
सरे हुरहूरी सांज, प्रकाशले चंद्रबिंब ।।२।।

किरणांसवे गुंफिली असली लाघव माया
कि पाण्यावर थरथरली गर्द धुकेरी छाया
होता चंद्र्स्पर्श सावल्यांना, उजळले पात्र 
विकसली मनी पुनवेची तृप्त शाश्वत रात्र ।।३।।

कल्याणाचा उत्साहपूर्ण, सकारात्मक. आशादायक विचार आणि कृती करणे, त्याच्या साहाय्याने नैराश्यावर मात करणे माणसालाही शक्य आहे. कोणालाही हानी न पोचवणारे कल्याण. कोणाचेही हक्क ओरबाडून न घेणारे कल्याण. मग माझ्या कल्याणापासून ते विश्वाच्या कल्याणापर्यंत पोचता येईलच.असे झाले कि केवळ सदाफुलीचेच नव्हे तर मानवजातीचेही नाव नित्य कल्याणी ठेवता येईल!!


वृंदा टिळक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा