ट्रेकिंग पहावे करून - टूर द माऊंट ब्लांक


वेळ, पैसे आणि तंदुरुस्ती या तीन गोष्टी जेंव्हा एकत्र मिळतात तेंव्हा आयुष्यात खरी मजा यायला लागते. आपण काय करू शकतो आणि काय करू शकत नाही हे कळायला लागतं. विशीत तंदुरुस्ती असते, वेळ असतो; पण पैसे नसतात. तिशीत तंदुरुस्ती असते पण वेळ आणि पैसे दोन्ही म्हणावं तेवढं नसतं. साठी आली कि वेळ आणि पैसे तर असतात पण तंदुरुस्ती साथ देईलच असे नाही. त्यामुळे चाळीशीत आणि पन्नाशीत जे काही करायचे ते करून घ्यावे असा विचार करून मी २०१६ मध्ये ट्रेकिंग नव्या जोमाने परत सुरु केले. 

भारतात लडाखमध्ये ट्रेक केला. मलेशियात कोटा किनाबालू शिखर सर केले. इंडोनेशियात रिंजानी नावाच्या ज्वालामुखी पर्वतात वर गेलो. जपान मधला फुजी पर्वत पहिला. इतकंच काय नेपाळमध्ये एवरेस्ट बेस कॅम्पचा ट्रेकसुद्धा करून झाला. आता मी संधी शोधत होतो, ती आशिया खंडाच्या बाहेर कुठे जायला मिळते का याची. मनापासून शोधलं कि सगळं सापडतं असं म्हणतात. तसं मला एक ट्रेक सापडला जो माझ्या वेळापत्रकात, बजेट मध्ये आणि काठिण्यपातळीत व्यवस्थित बसत होता. टूर द माऊंट ब्लांक. 

फ्रांस, स्वित्झरलँड आणि इटली च्या सीमारेषा जिथे मिळतात तिथे उभा असलेला हा एक सुंदर पर्वत आहे. माऊंट ब्लांक चा शब्दश: अर्थ पांढरा पर्वत. हे आल्प्स पर्वतमाळेतले सर्वात उंच शिखर आहे. त्याची उंची ४,८०८ मीटर एवढी आहे. आता हिमालयातल्या शिखरांच्या मानाने हे उंची जरी कमी वाटत असली, तरी सृष्टीसौन्दर्य यत्किंचितही कमी नाही. या पर्वताला भारताच्या इतिहासातसुद्धा फार महत्व आहे. १९६६ मध्ये एअर इंडियाचं होमी भाभा यांना घेऊन जाणारं विमान जिनिव्हा विमानतळावर उतरायच्या प्रयत्नात ह्याच पर्वतावर कोसळलं होतं. 

या पर्वताला प्रदक्षिणा घालायची, जाताना वाटेत लागणारी सुंदर गावे बघायची, तिथली निसर्गशोभा बघायची, असा सोपा कार्यक्रम होता. पर्वत शिखर सर करणे हा एक पर्याय होता; पण त्यासाठी लागणारी पूर्वतयारी आणि पर्वतारोहणाचे तांत्रिक शिक्षण नसल्यामुळे तो बेत रद्द करून, मी प्रदक्षिणेचा मार्ग पत्करला होता. 

माझ्या इतर सगळ्या ट्रेक्समध्ये मी जसा एकटाच अनोळखी गिर्यारोहकांबरोबर गेलो होतो, तसेच याही वेळेला केले. जिनिव्हा एअरपोर्टवर उतरून वॅन मध्ये बसून शामोनीक्स नावाच्या फ्रान्स देशातील गावाकडे जाताना माझ्याबरोबरचे सहप्रवासी कोण असतील, कसे असतील असेच विचार माझ्या मनात येत होते. आमची वॅन भरधाव वेगाने एका रुंद चौपदरी रस्त्यावरून चालली होती. वॅनचा ड्राइवर सांगत होता की त्या वर्षी हिवाळा फार तीव्र होता त्यामुळे आजूबाजूच्या पर्वत शिखरांवरचे बर्फ अजून वितळले नव्हते. ते पांढरे डोंगरमाथे, त्याच्या खाली हिरवळीचे चार पट्टे आणि मग खाली तपकिरी रंगाचे वाळलेले गवत त्यांना मधोमध चिरत जाणारा आमचा ग्रे रंगाचा रस्ता…अशा अतिशय विलोभनीय दृश्याने आमचे स्वागत केले. 

आमचे विमान उतरले स्वित्झर्लंडमध्ये; पण आम्ही चाललो होतो फ्रांसमध्ये. देश ओलांडताना किती त्रास होऊ शकतो याच्या तुआस सेकण्ड लिंकच्या आठवणी मनात ताज्या होत्या; पण तसं काही घडलं नाही. जेंव्हा रहदारीचे नियम सांगणाऱ्या निळ्या पाट्या हिरव्या रंगाच्या झाल्या तेंव्हा वॅन चालकाने आपण आता फ्रांस मध्ये आलो आहोत असे घोषित केले. दिवेलागणीच्या वेळी मी शामोनीक्स मध्ये आमच्या मुक्कामाच्या जागी येऊन पोचलो. रिसेप्शन मध्ये पोचता पोचता पियानोचे मंजुळ स्वर कानावर पडले आणि चक्क चाल ओळखीची होती. पियानोवर कोणीतरी “मैं शायर तो नहीं” हे गाणे वाजवत होते. काय हा चमत्कार… किंवा हे गाणे फ्रेंच भाषेतही आहे काय किंवा तिकडूनच इकडे आले काय असा विचार करत मी आवाजाच्या दिशेने गेलो, तर तिथे एक भारतीय दिसणारा माणूस लॉबीतील पियानोवर हे गाणे अगदी तल्लीन होऊन वाजवताना दिसला. मी जवळ जाऊन ते गाणे गुणुगुणु लागलो. गाणे संपवून त्याने हात पुढे केला आणि म्हणाला “मी जितू . तुझ्याबरोबर माऊंट ब्लांक ट्रेकला येणार आहे. तू विवेक ना?” परत एकदा काय हा चमत्कार असे भाव माझ्या चेहऱ्यावर उमटलेले बघून तो हसत म्हणाला, “अरे बाकी सगळेजण येऊन पोचले आहेत. सगळ्यांची रात्रीची जेवणं झाली आहेत. तुझीच सगळे वाट बघत होते. वेलकम.” असे उत्साहाने केलेल्या स्वागताने मला एकदम आपलेसे वाटायला लागले. 

दुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्या वेळेला चेक आऊट करून आम्ही हॉटेलच्या बाहेर जमलो. आमचा वाटाड्या आम्हाला भेटला. ल्यूक उंचापुरा पण तरी किडकिडीत, उत्साही, कायम स्मितहास्य तोंडावर ठेवून बोलणारा इंग्रज होते तो. जेंव्हा सह्याद्री मध्ये गडांवर ट्रेकिंग ला जायचो तेंव्हा मिळणारा वाटाड्या आणि ल्युक यांच्यामध्ये वेताळ टेकडी आणि माऊंट ब्लांक एवढे अंतर होते. 

फार पूर्वी जीवधन गडावर पोचण्याचे तीन प्रयत्न असफल झाले तेंव्हा आम्ही जीवधन वाडीतल्या गावकऱ्यांना शरण गेलो आणि वाटाड्या द्या असं सांगितलं. तेंव्हा त्यांनी घासाघीस करून १० रुपये पडतील असे सांगितले. आणि “हणम्या” अशी जोरात हाक मारली. मोठ्या भावाचा कोण्या एकेकाळी पांढरा असलेला शर्ट आणि त्याचीच घसरणारी चड्डी घातलेलं एक गुडघ्याएवढं पोर समोर आलं. 

“यांना गडावर पोचिव. आणि यांच्या बरुबरच माघारी ये. वर माकडांशी खेळत बसू नको. घोर लागतो जीवाला.” अशी तंबी भरत बापानी हणम्याला आमच्याबरोबर पाठवले. हणम्या निघाल्यामुळे मित्र मंडळींचा विट्टीदांडूचा खेळ अर्धवट राहिला. मग हणम्या, त्याच्या बरोबर खेळणारे ४-५ त्याच्याच साईझचे मित्र, विट्टीदांडू बघत बसलेल्या त्यांच्या २-३ बहिणी आणि त्यांच्याशी नेहमी खेळणारी गावातली २ कुत्री अशी पूर्ण वरात आम्हाला जीवधन वर पोचवायला निघाली होती . 

त्या हणम्याला वाटाड्या म्हणणं ठीक होतं; पण ल्युकलाही वाटाड्या म्हणायचं? ल्यूक वन-मॅन आर्मी होता. त्याला आमच्या ट्रेकच्या वाटेची, आजूबाजूला दिसणाऱ्या पर्वत शिखरांची, खेडेगावांची खडानखडा माहिती होती. त्याच्या पाठीवरच्या सॅक मध्ये प्रथमोपचार पेटी होती, रोप क्लाइंबिंग चे सामान होते, पावसाचे जाकीट होते, स्नो चे जाकीट होते, थोडे खायचे पदार्थ होते, पिकनिक मॅट होती, सुरी, कॅन ओपनर, चमचे, फोर्क असे अनंत पदार्थ होते. अशा ल्यूकला वाटाड्या म्हणायचं? माझ्या सदसद्विवेक बुद्धीला ते पटेना. तेंव्हापासून मनात सुद्धा मी त्याला मार्गदर्शक किंवा गाईड म्हणायला सुरुवात केली. 

त्याने आम्हाला सेफ्टी ब्रिफींग दिले. काय त्रास होऊ शकतात, ते होत आहेत ते कसे ओळखायचे, झाल्यास काय करायचे वगैरे वगैरे. माझे कान ल्युककडे; पण नजर इतर सहप्रवाश्यांकडे होती. जितूभाईला आधीच “गुड मॉर्निंग” म्हणून झाले होते. त्यांच्या बरोबर एक १९-२० वर्षाचा एक मुलगा होता, त्यांच्या शेजारी एक मुलगा, एक मुलगी आणि त्यांचे आई वडील असे चौकोनी कुटुंब होते. त्यांच्या शेजारी साधारण साठीला पोचलेल्या; पण फॅशनेबल कपडे घातलेल्या आणि केसांचा बॉय कट केलेल्या एक बाई होत्या. अजून ४-५ माध्यमवयीन पुरुष होते. एकंदरीत उत्साही टीम होती. ल्युकचे भाषण संपल्यावर आम्ही ट्रेक सुरु केला. 

आमच्या ट्रेकची सुरुवात एका केबलकारने झाली. शामोनीक्स हे अतिशय सुंदर गाव होतेच; पण केबल कार हळू हळू वर जाताना निसर्गाची बदलत जाणारी जी रूपं पहिली, ती प्रत्यक्ष अनुभवायला पूर्वपुण्याईच पाहिजे. सुरुवातीला सूचिपर्णी झाडांचे शेंडे दिसत होते ते मागे पडत गेले. मग दूरवरची हिरवळ आणि त्यात फुललेले रान फुलांचे ताटवे. प्रत्येक फुलाचा रंग वेगळा रूप वेगळे. प्रत्येक मेडोचा थाट वेगळा. मेडोमधली ही फुलं अल्पायुषी असतात. झुळझुळणाऱ्या वाऱ्यावर बेफिकीर डोलत होती. मग केबलकार अजून वर गेली, मग आजूबाजूचा डोंगरांचे पायथे दिसायला लागले… काही करडे, काही तपकिरी, काही हिरवे.. आणि जसं जसं वर गेलो तसे तसे डोंगर माथे दिसायला लागले. पांढरे शुभ्र. ढगांच्या आणि काड्या कपारींच्या सावल्या पडल्या होत्या तेवढाच काय तो करडा आणि काळा रंग. आणि त्याच्यावर निरभ्र आकाश. युरोप मध्ये प्रदूषण कमी असल्याने म्हणा किंवा अक्षांश-रेखांश वेगळे असल्याने म्हणा आकाशाचा रंग वेगळाच दिसतो. भारतात किंवा सिंगापूर मध्ये दिसणाऱ्या निळ्या आकाशाला निळेभोर म्हणावेसे वाटते, युरोप मधल्या आकाशाला निळेशार म्हणावेसे वाटते. केबलकारचा प्रवास संपला आणि आम्ही चढायला सुरुवात केली.

सुरुवातील सगळ्यांनी जाकीट, कानटोपी, हातमोजे असा जामानिमा घालून चढायला सुरुवात केली. आजूबाजूला बर्फ दिसतंय म्हणजे थंडी असणारच अशी खात्री होती सर्वांची. पण हळू हळू जसजशी चढण लागली आणि दम लागायला लागला तसंतस सगळ्यांना उकडायला लागलं. आधी हातमोजे सॅक मध्ये गेले, मग कानटोपी आणि मग जाकीट. थोड्यावेळाने सगळे जण चक्क अर्धा बाह्यांचा टी शर्ट आणि पॅन्ट अशा वेषात चढण चढू लागले. प्रत्येकाचा वेग वेगळा, आवेश वेगळा. काहीजण सारखे पाणी प्यायला थांबत होते, तर काही फोटो काढायला, तर काही हेडफोन लावून आपल्याच दुनियेत दंग होऊन चालत होते. 

मी जेंव्हा ट्रेकला जातो तेंव्हा मला निसर्गसौन्दर्यात जेवढा इंटरेस्ट असतो तेवढाच आजूबाजूच्या लोकांमध्ये. त्यामुळे मी कधीही हेडफोन लावत नाही. मला तर ती डू नॉट डिस्टर्बची खूण वाटते. मला सहप्रवाशांशी गप्पा मारायला फार आवडतं. एकमेकांच्या बरोबर चालण्यात काहीतरी विशेष आहे खरे. ट्रेकिंगमध्ये बरोबर चालताना तुम्हाला पायाखालच्या वाटेकडे बघत चालावे लागते. एकमेकांच्या चेहऱ्याकडे, हावभावाकडे पाहता येत नाही. आपण जे काय बोललो त्याच्यावर शेजाऱ्याची नक्की काय प्रतिक्रिया होती हे लगेच कळत नाही. त्यामुळे आपण स्वगत बोलल्यासारखे बोलत राहतो आणि ऐकणारा ऐकत राहतो. आणि एक प्रकारची जवळीक निर्माण होते. अगदी अनोळखी माणसांना देखील आपल्या मनात खोल दबलेल्या भावना सांगायला जराही आडकाठी वाटत नाही. पावलापावलागणिक गुपित बाहेर पडतात. बंध बांधले जातात. 

जितू आणि त्याच्या बरोबरचा किशोरवयीन मुलगा कुठेतरी मागे राहिले होते. तो तरुण मुलगा खूप फोटो काढत होता आणि जितू त्याची काळजी घेण्यासाठी त्याच्याबरोबर चालत होता. त्यामुळे मी बाकीच्या सहप्रवाशांशी गप्पा मारायला सुरुवात केली. 

साधारण माझ्याएवढीच उंची आणि शरीरयष्टी असलेला पन्नाशीच्या पुढचा उल्हास माझ्याशेजारी चालत होता. औपचारिक गप्पा सुरु झाल्या. तुम्ही कुठले? आम्ही कुठले? घरी कोण असते? तुम्ही अमक्याना ओळखता का? आणि तमके तुमच्या ऑफिस मध्ये होते का? अर्ध्यातासात सगळे वरवरचे विषय संपले. अजून ५-६ तास वाट तुडवायची होती. किती वेळ गप्प राहणार? आणि का? आपसूक खोल दडलेले विषय बाहेर आलेच. 

उल्हास एका मेडिकल ट्रान्सक्रिप्ट करणाऱ्या कंपनीचा संस्थापक होता. नंतर त्याच्या कंपनीला मोठी गुंतवणूक मिळाली. मग त्याने अजून काही वर्षं काम करून कंपनीची अजून भरभराट केली; पण BPO क्षेत्रातली कंपनी असल्याने सगळे काम अमेरिकेत चालायचे. अक्षरश: दिवसरात्र काम करायचा तो. प्रकृतीवर परिणाम व्हायला लागला. कौटुंबिक स्वास्थ्यावर परिणाम व्हायला लागला. मन:स्वास्थ्य बिघडायला लागलं. आणि आपण हे सगळं काय करतोय आणि कोणासाठी करतोय असा प्रश्न वारंवार पडायला लागला. एक दिवस त्याने गाठीशी किती पैसे आहेत ते मोजले. थोडी आकडेमोड केली आणि ठरवलं की स्वेच्छानिवृत्ती घ्यायची. पन्नास-बावन्न च्या वयात त्याने रोज ऑफिस मध्ये जायचे सोडून घर सांभाळायचा निर्णय घेतला. MBA करताना मी चाळीशीत निवृत्ती असा वाक्प्रचार ऐकलं होता पण तस काहीही करायची हिम्मत झाली नव्हती. आणि आज या आल्प्स पर्वताच्या एका पायवाटेवर मी पन्नाशीत अशी उडी मारणाऱ्या उल्हासच्या शेजारून चालत होतो. त्याची गोष्ट त्याने मन लावून सांगितली. मी सर्व बारकावे टिपून ती ऐकली. 

तो बोलायचं थांबला. आम्ही दोघांनी एका झाड खाली थांबून पाण्याचे चार घोट घेतले. आजूबाजूचे दृश्य पहिले. आता आम्ही बऱ्याच उंचीवर आलो होतो. आता मागच्या २-३ पर्वतरांगा दिसू लागल्या होत्या. त्यांच्या करड्या रंगाच्या वेगवेगळ्या छटांनी त्या किती लांब असाव्यात याचा अंदाज येत होता. अगदी समोरची पर्वतरांग मात्र शुभ्र पांढरी दिसत होती. अगदी निष्कलंक. आणि मागचा तो निळाशार आकाशाचा रंग. सूर्य आमच्या पाठीमागे होता आणि त्याच्या समोर ढग होते त्यामुळे ऊन नव्हते. नुसताच डिफ्युज्ड प्रकाश होता. अशा प्रकाशात फोटो खूप छान येतात. मी लगेच आजूबाजूचे ३-४ फोटो काढले. आणि आम्ही चालायला सुरुवात केली. 

“भीती नाही वाटली स्वेच्छानिवृत्ती घेताना?” मी उल्हास ला विचारलं. 

हाच प्रश्न जर मी एखाद्या पार्टीत विचारला असता तर उल्हास मला भोचक म्हणाला असता; पण जेंव्हा तुम्ही एकटे १० दिवसाच्या ट्रेकला अनोळखी लोकांबरोबर जायला तयार होता तेंव्हा तुम्ही मोकळे पणाने बोलण्याच्या आणि ऐकण्याच्या अलिखित करारावर सही केलेली असते. 

“वाटली ना! खूप वाटली. आपल्या शरीराचा एखादा भाग गळून पडावा असं वाटलं. पण निर्धार पक्का होता. आणि मी घरी राहतोय म्हटल्यावर माझ्या बायकोला तिच्या करियरवर लक्ष केंद्रित करता आलं.”

“आजूबाजूच्या लोकांच्या काय रिअॅक्शन्स?”

उल्हास हसला आणि म्हणाला, “काही विचारू नकोस. व्यक्ती तितक्या प्रकृती. काही जण आले आणि काळजीच्या सुरात म्हणाले - काही लागलं तर सांग. संकोच करू नकोस. काही जण म्हणाले - चार दिवसात बोअर होऊन कामाला लागतो की नाही बघा. काहीजणांनी अपेक्षित वयोमान आणि वाढत जाणारे खर्च याची आकडेमोड करून माझा निर्णय कसा चुकीचा आहे हे मला पटवण्याचा प्रयत्न केला. मी कशालाही बधलो नाही. माझ्या निर्णयावर ठाम राहिलो.”

“व्वा छान. मग लोकांचा सूर बदलला की नाही?”

उल्हास अजूनच जोरात हसत म्हणाला, “हे काय विचारणं झालं? हळूहळू सगळ्यांनी हळूच कानात येऊन सांगितलं की खरंतर त्यांनापण तसच करायचंय; पण हिम्मत होत नाही. आणि उल्हास असं करू शकला म्हणून सगळ्यांचा जळफळाट होत होता. “

आम्ही दोघेही खळखळून हसलो. 

उल्हास पुढे म्हणाला, “आता मला जर कोणी विचारलं की तुम्ही काय करता? तर मी म्हणतो की मी माझी पुढची सुट्टी प्लॅन करतो. मग ते परत विचारतात - तसं नाही हो. तुमचा व्यवसाय काय, तुम्ही नक्की करता काय? मग मी परत सांगतो - अहो माझा फुल टाइम व्यवसाय म्हणा उद्योग म्हणा किंवा अजून काहीही म्हणा - मुख्य काम आहे पुढच्या सुट्टीच प्लँनिंग.” 

आता मला सुद्धा उल्हास चा हेवा वाटायला लागला होता; पण एकत्र चालणारे मित्र एकमेकांचा हेवा करत नाहीत. फक्त एकमेकांना सपोर्ट करतात. तसाच मी आजही उल्हासला करतो. आजही आम्ही एकमेकांना आपापल्या सुट्टीचे फोटो पाठवतो. इकडे जा तिकडे जा किंवा अमक्या वर्षी परत एकत्र जाऊ या असे प्लॅन्स करतो. तास दोन तासांच्या त्या एकत्र चालण्यातून आमची आयुष्य एकमेकांना जोडली गेली आहेत . दोघांच्या मित्रपरिवारात एक मौलिक भर पडली होती. चालता चालता मुक्कामाची जागा येऊ घातली होती. आता एकमेकांच्या अबोल सहवासाचा आनंद घेत झपाझप पावले टाकत आम्ही चाललो होतो. 
दुसऱ्या दिवशी दिसणारी निसर्गदृश्ये पाहायला आणि इतर सहप्रवाशांच्या जीवनगोष्टी ऐकायला मी आतुर होतो.

(क्रमश:) 


विवेक वैद्य

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा