काय हेच प्रेम असते?

ऋतुगंध वसंत वर्ष १३ अंक १

उठल्या उठल्या आठवण काढणं
मग खूप छान गुड मॉर्निंग चा मेसेज करणं
त्या मेसेज ला उत्तर नाही दिले तर 
ताबडतोब फोन करणं
आणि फोनवर चार गोष्टी सुनावणं
वर हळूच विचारणे, काय गं भवाने
कुठे फिरते आहेस?
काय हेच प्रेम असते?
पुढे हळूच विचारणे 
काय मग आज फ्री आहेस का?
भेटायचे का एमआरटी ला? 
छत्री आणायला विसरू नकोस हं..
मस्त शॉपिंग करू, फोटो काढू आणि उशीर व्हायच्या आत घरी जाऊ !
काय हेच प्रेम असते?? 

मग परत फोन वाजणं,
मला थोडे काम आहे 
आज नको उद्या जाऊ 
छान चायनीज गार्डन फिरू 
लोरिसला जाऊ , मॅकडी ला खाऊ 
मज्जा करू चालेल का?
अन् हसत फोन ठेवणं,
काय हेच प्रेम असते?

दुसऱ्या दिवशी आठवणीने फोन येणं
चल, आवर लवकर एमआरटी ला भेटू 
उशीर झालाच तर टेन्शन नको!
उपाशी घराबाहेर पडू नकोस 
खाऊनच नीघ सांगत भेटू पटकन म्हणणं!!
भेटीसाठी खास ढिंगचॅक कपडे घालणं
भरपूर नट्टापट्टा करणं
काय हेच प्रेम असते?

मग काय, एमआरटी ला येणं
तासभर वाट पाहणं
फोन मधल्या मेसेजकडे डोळे लावून बसणं, 
येणाऱ्या प्रत्येक ट्रेनकडे भिरभिर नजरेने पाहणं
पण हवी ती व्यक्ती न दिसल्याने पुन्हा 
मोबाइलचे मेसेजेस पाहणं,
तास दोन तासाने हवी ती व्यक्ती दिसल्यावर 
जीव भांड्यात पडणं
मग तिरकसपणे विचारणे, इतक्या लवकर कसे काय?
त्यावर “ तुझ्या नानाची टांग “ असे खट्याळ उत्तर मिळणं
काय हेच प्रेम असते???

मग पायाला भिंगरी लागल्यासारखे 
गरगर फिरणं, भरपूर हसणे खिदळणं
बाहेरच खाणं, विंडो शॉपिंग करणं
अन हळूच घड्याळात वेळ पाहणं
अन नाईलाजाने घराच्या वाटेकडे लागणं
आणि घरी काहीच झाले नाही असे दाखवत 
रोजचंच रुटिन जगणं 
काय हेच प्रेम असते???

प्रेम म्हणजे प्रेम असते 
सगळ्यांचे सेम नसते 
कधी हे प्रेम आईबाबांवर असते 
कधी हे प्रेम भावाबहिणींवर असते 
कधी झाड पानांवर 
तर कधी मुक्या प्राण्यांवर 
कधी आकाशात धावणाऱ्या ढगांवर 
तर कधी लुकलुकणाऱ्या ताऱ्यांवर 
पण माझे हे अवखळ प्रेम आहे 
माझ्या मैत्रिणीवर!!

रोज फोनवर बोलताना 
“तुझ्या नानाची टांग!”,
“अवघड आहे सगळे” असे म्हणणं
आणि तीन तीन तास पोटभर गप्पा मारणं,
गप्पा मारून झाल्यावर हळूच 
“मला खूप काम आहे म्हणणे” !
खरंच सांगा हे प्रेम नाहीतर काय??
प्रेम म्हणजे एक गुड मॉर्निंगचा मेसेज,
......दुसरा गुड मॉर्निंग मेसेज... 
....तिसरा गुड मॉर्निंग मेसेज... 
नाहीच आला रिप्लाय 
तर सरळ कॉल करणं

प्रेम म्हणजे हक्काने “भवाने कुठे फिरतेस?” म्हणणं..
प्रेम म्हणजे तिच्या फोनची वाट पाहणं
प्रेम म्हणजे तिला हक्काने ओरडणं
तितक्याच हक्काने तिला समजावणं
प्रेम म्हणजे तिचा ओरडा सहज ऐकून घेणं

खरंच प्रेम म्हणजे प्रेम असते 
सगळ्यांचे सेम नसते!! हो ना!!

- अश्विनी कुलकर्णी
 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा