सर्वांना सप्रेम नमस्कार!
महाराष्ट्र मंडळ सिंगापूर, लवकरच आपले रौप्यमहोत्सवी वर्ष ओलांडून काळाच्या पुढच्या खंडात प्रवेश करीत आहे.
या अत्यंत महत्वाच्या टप्प्याचे आनंदोल्लंघन करताना, सर्व सभासदांचे, कार्यकर्त्यांचे, स्वयंसेवकांचे, प्रेषकांचे व हितचिंतकांचे मन:पूर्वक अभिनंदन ! या निमित्ताने साजऱ्या होणाऱ्या सोहळ्यात सर्वांचे स्नेहपूर्वक स्वागत.
अशा प्रसंगी अध्यक्ष म्हणून मनोगत लिहित आहे. म्हणजे वर्षा ऋतुच्याच या विशेषांकाच्या पार्श्वभूमीवर विचारांचा धबधबा वेगाने कोसळत असताना, त्यातले काही, आपल्या दुबळ्या शब्दपात्रात जमा करून, संगणकाच्या अक्षर-फळ्यात कैद करून, इथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे! गेल्या पंचवीस वर्षांच्या माझ्या आठवणी इतक्या खोल, व्यापक आणि वैविध्यपूर्ण आहेत की संपादकीय शब्दमर्यादेत त्यांना गवसणी घालणे केवळ अशक्य गोष्ट आहे! त्यामुळे हा इवलासा अपुरा प्रयत्न आहे!
२५ वर्षांपुर्वी महाराष्ट्र मंडळाची नोंदणी झाली तेव्हांचे सिंगापूर आणि आताचे, यात एका पिढीचे अंतर आहे (साधारण २५-३० वर्षांत एक पिढी होते असे म्हणतात). सामाजिक मानसशास्त्रात ’अब्राहाम मास्लोव’ यांचा मानवी गरजांचा पदानुक्रम (hierarchy of human needs) नमूद केलेला आहे. त्याला सिंगापूरला आलेल्या मराठी माणसे ही अपवाद नाहीत. सुरूवातीला अगदी प्राथमिक गरजांसाठी - संपर्क, संवाद आणि सहवास – यासाठी आपल्या मराठी किंवा मराठी बोलणाऱ्या इतर भारतीय स्थलांतरितांचा शोध घेणारे त्यावेळी आलेले सभासद, आज आपल्या आयुष्यातील चाकोरी व त्याही बाहेरचे जीवन, हे मानसिक-आत्मिक-वैचारिक पूर्णत्वाच्या निकषांची कितपत तृप्ती करते याचा शोध घेत आहेत. याला झपाट्याने प्रगती करणारे तंत्रज्ञान व आर्थिक परिस्थितीत असणारा फरक यांची छान साथ मिळत आहे. त्यामुळे आजचा सिंगापूरकर मराठी माणूस, तसेच सिंगापूरला येणारा नवीन मराठी माणूस, २५ वर्षांपुर्वीहून वेगळा आहे. ह्याचा छोटासा दृष्टांत द्यायचा झाला तर असे पहा की पूर्वी सिंगापूरला स्थलांतर केल्यावर शाळा/घर शोधणे, आजूबाजूला कोण राहते ह्याची माहिती काढणे, ’आपला’ किराणा माल कुठे मिळतो वगैरे, ही प्राथमिकता असायची, आता हे सगळे काही अल्प वेळांत मोबाईलवर “गुगल मावशी”, “फेसबुक काका” व “वॉट्सॲप दादा” यांच्या मदतीने होऊ शकते. अर्थात हे सर्व अजूनही तितक्याच गरजेचे आहे. पण आता, बदललेल्या परिस्थितीमुळॆ ही प्राथमिकता चट्कन ओलांडून, ’मला’ ’माझ्या’ विचारसरणीशी/ जीवनशैलीशी/छंदोपासनेशी संलग्न कोण व कुठे भेटेल यासाठी संपर्क, संवाद व सहवास यांचा थेट शोध सुरू होतो. मंडळी, यातला समान घटक कोणता – संपर्क संवाद आणि सहवास – तेच मंडळाचे सूत्र आहे..! तीन विविध देशांत अनेक कार्यकारिणीं मधे काम केल्यावर माझ्या मनात ही गोष्ट पक्की बसली व याचाच पाठपुरावा मी अनेक वर्ष करत आहे.
पण आता बदलत्या परिस्थितीत, बदललेल्या पिढीसाठी, बदललेल्या पिढीनेच हे काम अविरत सुरू कसे ठेवायचे? हा प्रश्न सारखा माझ्या मनात असतो व त्यासाठी अरूण-तरूण सभासदांवर केंद्रित असलेल्या उपक्रमाबद्द्ल मी वसंत-२०१९ च्या अंकात लिहिले होतेच. या बाबतीत नवीन पिढीने व त्यांचे पालक/मार्गदर्शक यांनी आवर्जून नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या प्रवासात आपल्याला उपलब्ध असलेले काही घटक अचल आहेत, तर काही परिवर्तनीय आहेत (सोप्या मराठीत constant and variable! ). महाराष्ट्र मंडळाची मूळ उद्दिष्ट्ये (भाषा, संस्कृती, सामाजिक उत्तरदायित्व यांची जपणूक आणि संवर्धन), अभिजात गोष्टींविषयी आत्मियता/आदर, मंडळाच्या घटनेशी एकनिष्ठता, ही सर्व माझ्या दृष्टीने अचल रहायला हवीत. ती नसतील किंवा त्यांचे पातळीकरण झाले, तर महाराष्ट्र मंडळाची ओळखच पालटेल किंवा “ते” महाराष्ट्र मंडळ राहणारच नाही..! आधुनिकता व आधुनिक जीवनपध्दतीचा अवलंब, जे अभिजात आहे त्याच्याबरोबर, जे समकालीन आहे, त्याच्याशी संलग्नता व समतोल साधत, उत्तम कला/संगीत/ नाट्य/साहित्य यांचा प्रवाह सुरू ठेवणे हे माझ्या दृष्टीने परिवर्तनीय घटक आहेत. उद: मंडळाचा संपर्क हा मराठीत होणे आवश्यक आहे तर समकालीन समतोल साधण्यासाठी, काही बाबतीत नविन पिढीच्या सोयीसाठी व मराठी न समजणाऱ्या लोकांचा विचार करून महत्वाचा संपर्क ईंग्रजीत असणे मोलाचे आहे. महत्वाचे म्हणजे हे कधी विसरू नये की आपण जर मराठी भाषेचा आग्रह धरला नाही, तिचा वापर केला नाही, तर आपल्या पुढच्या पिढीने मराठी “इतिहासजमा” केली तर ते अपेक्षितच आहे! मराठी भाषेचा वापर व “परदेशात मराठीचा, मराठी लोकांसाठी जागर” यावर मी खूप लिहिले आहे आणि सिंगापूर व चिपळूण येथे झालेल्या साहित्य संमेलनांमधे भाषण/निबंधाद्वारे माझे विचारही मांडले आहेत, ज्याचे खूप कृतज्ञतापूर्वक कौतूक झाले. असो.
मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षसोहळ्याच्या निमित्ताने, दोन गोष्टींचा विशेष उल्लेख करावासा वाटतो:-
1. अरूण तरूणांचा मंडळाच्या कार्यक्रमांच्या नियोजनात आणि भविष्यातील कारभारात समावेश– आत्तापर्यंत या उपक्रमांत सामील झालेल्या सर्व अरूण तरूणांचे अभिनंदन, न झालेल्यांना आवाहन!
2. आपल्या शेजारी राष्ट्रांतील महाराष्ट्र मंडळांबरोबर सहकार्य – या उपक्रमाला गतिमान करायला अमूल्य सहकार्य दिल्याबद्द्ल म.मं.हाँगकाँग, बँकॉक व मलेशिया आणि श्री.मनोज कुलकर्णी, श्री.मंदार पारसनीस व श्री.अशुतोष देशपांडे यांचे खास आभार!
मंडळाच्या २५ वर्षांच्या यशस्वी प्रवासाला अनेकांचा हातभार लागला. अर्थात हे संघकार्यामुळेच शक्य होते, पण संघकार्याचे प्रतिनिधी म्हणून, ४ ऑगस्ट २०१८ रोजी आपण पहिल्या कार्यकारिणीचा व २४ वर्षांतील अध्यक्षांचा गौरव केला. शिवाय मंडळासाठी बऱ्याच ज्येष्ठ/प्रतिष्ठित व्यक्तींनी खूप काही केले, त्यांचे आपण सर्वच अत्यंत ऋणी आहोत..! तसेच, सांगतेचा कार्यक्रम यशस्वी करणारे; स्वयंसेवक-सभासद, कलाकार, पाहुणे, कार्यकारिणी, प्रेषक, सल्लागार, देणगीदार - या सर्वांचे अनेक आभार!
महाराष्ट्र मंडळ सिंगापूर – जिवेत् शरद: शतम्!
आपला स्नेहाभिलाषी,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा