ऋणानुबंध

                    
मी माझ्या हातातले envelope उघडले, त्यावर नाव लिहिले होते. Agnes Demeyere. मला त्या नावाचा धड उच्चार पण करता येत नव्हता. ही गोष्ट आहे १९८० मधली, स्थळ Alliance Francaise de Pune चे ऑफिस , झालं काय कि, माझी वाहिनी सौ. अंजली परांजपे ही तेव्हा फ्रेंचची प्रोफेसर होती, तिनी मला फ्रेंच शिकायला व Alliance Francaise ची मेम्बरशिप घ्यायला एनकरेज केले. त्या वर्षी पुण्यामधे १५, २० फ्रेंच पाहुणे आपले भारतीय कल्चर शिकायला येणार होते व ते hosts च्या घरी १ महिना राहणार, असा प्रोग्राम होता. मी होस्ट म्हणून नाव दिले होते. मग त्या पाहुण्यांशी कसे वागायचे, त्यांचे खाणे, पिणे त्यांना कल्चर समजावणे ह्या बद्दल आम्हाला थोडे ट्रेनिंग पण दिले गेले.

तेव्हाचे माझे माहेरचे घर प्रभात रोड वर, जुना ऐसपैस कौलारू मोठा बंगला, भोवताली सुंदर फळा, फुलांची बाग, दारात ३ मोठ्ठी आंब्याची झाडे आणि त्याच्या जोडीला डौलदार पेरूचे झाड. आणि त्यात नांदणारे आमचे एकत्र कुटुंब. काका, काकू, आई, बाबा, आम्ही बहिणी, घरातले नोकर, चाकर, येणारे पाहुणे, रावळे. असे सगळे येणाऱ्या फ्रेंच पाहुण्याचे स्वागत करायला जय्यत तयार होतो. आणि त्या दिवशी अनियेस आमच्या घरी आली. गोरीपान, उंच, हसतमुख चेहरा, माझ्या पेक्षा ५,६ वर्षांनी मोठी. मुख्य म्हणजे ती फ्रांस मध्ये इंग्लिश टीचर असल्यानी आम्हा दोघींना भाषेची अडचण आली नाही. व आम्हा दोघींची पटकन मैत्री झाली. कारण आलेल्या पाहुण्यान पैकी काहीना एक शब्दही इंग्लिशचा येत नसल्यानी त्यांच्या होस्टची खूप पंचाईत झाली होती. अनियेसला आधी घरातल्या सगळ्यांशी ओळख करून दिली. इतके सगळे लोकं कायम इथेच राहतात का? व त्याचा तुला स्ट्रेस होत नाही का? ह्या तिच्या प्रश्नाचे तेव्हा मला खूप आश्चर्य वाटले होते. कारण तेव्हा इंटरनेट, गुगल, मोबईल हे काहीच दिमतीला नसल्याने exposure खूप बेताचे होते व त्या आधी मी कधी परदेशी न गेल्यामुळे त्यांची जीवनपद्धती मला फारशी ठाऊक नव्हती. माझे मोठ्ठे मित्रमंडळ, भरपूर नातेवाईक, माझी family ह्या सर्वांना हाताशी घेऊन मी अनियेस करता १ महिन्याचा भरगच्च कार्यक्रम आधीच आखला होता. तिच्याकरता प्रत्येकच गोष्ट नवीन होती, आपली संस्कृती, रहाणी, खाणे पिणे. हळूहळू ती आमच्या कुटुंबात छान रुळली. रोजचे महाराष्ट्रीयन शाकाहारी जेवण ती आवडीनी जेवत असे. तिच्या अनेक शंकांना आम्ही जमेल तितकी उत्तरे देत असू. त्या अवधीत आलेले सणवार, काही छोटे outings, पुणे शहर सगळे तिने मनापासून एन्जॉय केले. हे सगळे होत असताना १ महिना कधी संपला कळलेच नाही. आणि तिच्या परत जाण्याचा दिवस येऊन ठेपला. आम्हाला दोघीनाही खूप वाईट वाटले. आणि आम्हा सर्वांचा निरोप घेऊन अनियेस तिच्या मायदेशी परतली. 

नंतर काही वर्षे आम्ही एकमेकीना पत्र लिहित असू. पण पुढे माझे लग्न झाले, मी संसार, मुले, बाळे, करीयर ह्यामधे बिझी झाले. तसेच तीही लग्न होऊन तिच्या आयुष्यात, करियर मधे बिझी झाली. दिवस, वर्षे उलटून गेली. मग इंटरनेटनी जग जवळ येऊ लागले.आणि अचानक २००६ मध्ये मला तिचा इमेल आला. प्रिय मिनू, माझा मुलगा अलेक्स हा PhD करतो आहे व काही कामानी भारतात येणार आहे, तर तू आहेस का? तेव्हा माझे यजमान राजीव व मी ह्यांच्या नोकरीच्या निमित्तानी दुबईला होतो, पण अलेक्स येणार होता, तेव्हा नेमके सुट्टीला आम्ही इंदोरला (माझ्या सासरी) येणार होतो, म्हणून मी तिला लगेच कळवले, कि अलेक्सला जरूर येऊ दे, आणि आमच्या मैत्रीचा नवा अध्याय सुरु झाला. अलेक्स पण त्याच्या आईप्रमाणेच आमच्या कुटुंबात खूप रुळला. माझे सासू, सासरे, नवरा, मुले ह्यांच्याशी त्याची छान दोस्ती झाली. एकत्र कुटुंब, आपली संस्कृती, खाणे पिणे ह्या सगळ्या आठवणी घेऊन अलेक्स पण फ्रांसला परतला. आता मोबाईल, Whats app, Email, Facebook ह्या सगळ्यानी जग खूपच जवळ आले आहे. अनियेसनी अनेकदा आम्हाला तिच्या घरी बोलावले. मी आणि राजीव कधी ह्यांच्या कामाच्या निमित्तानी तर कधी प्रवासाची आवड म्हणून अनेक देश फिरलो. पण अनियेसच्या घरी जाण्याचा योग आला नव्हता. आणि म्हणतात ना, योग आल्याशिवाय गोष्टी घडत नाहीत. पण तो योग आत्ता ऑगस्ट २०१९ मधे आला. आम्ही फ्रांस, बेल्जियम, Netherlands अशी ट्रीप केली. आणि ह्या वेळेस अनियेस कडे जायचे ठरवले. मी तिला तसे कळवल्यावर तिला अतिशय आनंद झाला. व तुम्हाला कुठे कुठे फिरायला आवडेल, काय खायला आवडेल असे तिचे रोजचे प्रश्न सुरु झाले. आम्ही सगळे देश फिरून शेवटी पुन्हा फ्रांस मध्ये येऊन मग तिच्या गावी Piriac इथे गेलो. आम्ही दोघींनी भेटल्यावर एकमेकींना कडकडून मिठी मारली. व दोघींना खूप वेळ काय बोलावे हेच सुचेना, कारण आम्ही ३९ वर्षांनी भेटलो. तिची ३ मुले लग्न होउन आपापल्या घरी आहेत. अनियेस व तिचा नवरा समुद्रकाठी असलेल्या ह्या सुंदर गावात, निसर्गाच्या सान्निध्यात राहतात. खूप मोट्ठे सुंदर घर, घरापुढे बाग, मागे किचन गार्डन. आम्ही ३ दिवस त्यांच्या कडे होतो. त्यांनी आम्हाला फ्रांसची country side मनसोक्त फिरवली. राजीवची व तिच्या नवऱ्याची पण छान गट्टी झाली. आम्ही फ्रेंच जेवण खूप एन्जॉय केले. गप्पांना तर नुसता उत आला होता, कारण फोन वर बोललो, मेल लिहिले तरी समोर बसून बोलायची मजाच वेगळी असते. ३९ वर्षांच्या आठवणी जणू दाटून आल्या होत्या. आम्ही एकमेकींच्या कुटुंबाची अतिशय आस्थेने चौकशी केली. ३ दिवस कुठे भुरकन उडून गेले कळले नाही. आणि आमचा परत निघण्याचा दिवस उजाडला. आमची Paris – Singapore अशी परतीची flight होती. तिच्या गावी airport, रेल्वे स्टेशन नसल्यानी ते जवळच्या गावी आम्हाला सोडायला आले होते. तिथून Paris करता बुलेट ट्रेन आहे. 

निघताना आम्ही दोघींनी एकमेकींना कडकडून मिठी मारली आणि दोघींच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. तिला व तिच्या नवऱ्याला सिंगापूरला नक्की या, असा आग्रहाचे आमंत्रण करुन आम्ही त्यांचा निरोप घेतला. तर असे हे ऋणानुबंध, आयुष्याला किती सुंदर आणि समृद्ध बनवतात ना. 

मेघना असेरकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा