मनातली गाणी - भाग पहिला

ऋतुगंध वसंत वर्ष १३ अंक १

प्रियकर प्रेयसी प्रेमगीत
नवीन आज चंद्रमा नवीन आज यामिनी
मनी नवीन भावना नवेच स्वप्न लोचनी ।।धृ।।
दूर बाल्य राहिले दूर राहिल्या सखी
बोलण्या कुणासवें सूर दाटले मुखी
अननभुत माधुरी आज गीत गायनी

अनादी चंद्र अंबरी अनादी धुंद यामिनी
यौवनात तू नवी मदीय प्रीत स्वामिनी 
घर न प्रीतकुंज हा बैस ये सुहासिनी
कोण बाई बोलले? वाणि ही प्रियंवदा
या मनात नांदते तुझीच प्रीतिसंपदा
कशास वेगळेपणा? जवळ ये विलासिनी



गदिमांच्या काव्याला सुधीर फडके यांनी हे प्रेमगीत समर्पक चालीत बांधले आणि उषा अत्रे आणि सुधीर फडके यांनी गाऊन सादर केले. चित्रपट होता “उमज पडेल तर” गाण्यात प्रेमरस तर ओथंबून होताच पण तिसऱ्या कडव्यात जो प्रश्नार्थक भाव तो इतक्या सौंदर्यपूर्ण पद्धतीने मांडला आहे त्याला तोड नाही. गीतातील अशी स्थाने गीताचा प्राण असतात.
मातृप्रेम

आई तुझी आठवण येते
सुखद स्मृतीच्या कल्लोळांनी काळीज का जळते
वात्सल्याचा कुठे उमाळा तव हातांचा नसे जिव्हाळा
हृदयाचे मम होऊन पाणी नयनी दाटू येते
आई तुझ्याविण जगी एकटा पोरकाच मज म्हणती करंटा
व्यथा मनीची कुणास सांगू काळीज तिळतिळ तुटते 
हाक मारितो आई आई मुके लेकरू सुन्या दिशाही
तव बाळाची हांक माउली का नच कानी येते
सुकल्या नयनी नुरले पाणी सुकल्या कंठी उमटे वाणी
मुके पाखरू पहा मनाचे जागी तडफड करते
नको जीव हा नकोच जगणे आईवाचून जीवन मरणें
एकदाच मज घेई जवळी पुसूनी लोचने माते 


नाटककार बाळ कोल्हटकर याच्या काव्याला भालचंद्र पेंढारकर यांनी चाल देऊन दुरितांचे तिमिर जावो या नाटकात सादर केले आहे. काही गीते अशी असतात त्यांचे विश्लेषण न करता फक्त गीतार्थाचा आनंद घ्यावा माझ्यामते हे गीत त्यांपैकी आहे.
मातृभूमी प्रेम
आपल्या मातृभूमीची आरती गावी तसे हे गीत आहे.


मधुकर गोळवलकर यांनी स्वातंत्र्यवीरांच्या काव्याला अतिशय अर्थपूर्ण चाल दिली असून लतादीदी यांनी गायले आहे. ज्यांचे मन संवेदशील आहे त्यांच्या मनात राष्ट्रभक्ती जागवेल असे हे गीत आहे. हे गीत लतादीदींच्या आवडत्या रांगात बांधलंय रागाचे नाव हंसध्वनी..

निसर्गप्रेम
ये रे घना 
ये रे घना 
न्हाऊ घाल 
माझ्या मना 

फुले माझी अळुमाळू 
वारा बघे चुरगळू
नको नको म्हणताना 
गंध गेला रानावना 
टाकुनिया घरदार नाचणार नाचणार 
नको नको म्हणताना मनमोर भर राना 

आरती प्रभूंच्या या निसर्गकाव्याला पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी चाल दिली आहे. गायले आहे आशाताई यांनी. हे गीत म्हणजे काव्य, चाल आणि गायकी यांचा त्रिवेणी संगम आहे. 


- शैलेश दामले


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा