महाराष्ट्र मंडळ सिंगापूर वार्ता

महाराष्ट्र मंडळातील घडामोडी

  • वार्षिक सर्वसाधारण सभा 
रविवार दिनांक २३ फेब्रुवारी रोजी मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा, S.P. Jain school of Management, इथल्या सभागृहात पार पडली. दुपारी १ वाजता सहभोजनाने सुरवात झालेल्या ह्या सभेचे कामकाज ४.३० वाजेपर्यंत चालले. मावळत्या कमिटीच्या अध्यक्षा नलिनी थिटे यांनी मागील वर्षी झालेल्या कार्यक्रमांचा आढावा घेतला.

त्याच प्रमाणे २०१८ चा वार्षिक ताळेबंद पण सभागृहासमोर मांडला. त्यानंतर झालेला महत्वाचा कार्यक्रम म्हणजे नवीन कार्यकारिणीची निवड. संतोष अंबिके ह्यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कार्यकारिणीची स्थापना झाली. नूतन अध्यक्षांनी उपस्थितांचे आभार मानले आणि सहकार्याची अपेक्षा व्यक्त करुन नवीन वर्षात अनेक उत्तम उपक्रम राबवण्याचे आश्वासन दिले.
  • होळी 
कातोंग कम्युनिटी सेंटर, महाराष्ट्र मंडळ, गुजराती सोसायटी, सिंधी सोसायटी, मारवाडी मित्र मंडळ दरवर्षी होलीकोत्सव एकत्र साजरा करतात. या वर्षी हा कार्यक्रम दि.२३ मार्च रोजी सकाळी ९:०० ते दुपारी २:०० या वेळेत साजरा झाला.
कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून Member of Parliament Mr. Lim Biow Chuan आणि सिंगापूरमधील भारताचे उच्चायुक्त श्री.जावेद अश्रफ यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य होता. ह्या रंगारंग कार्यक्रमात मंडळाच्या वतीने एका नृत्याचेही आयोजन केले होते. 

  • गुढीपाडवा 
ह्या वर्षी मंडळाचा गुढी पाडवा NUS Shaw Foundation Alumni इथल्या सभागृहात साजरा झाला. पु.ल.देशपांडेंच्या जन्मशताब्दी-निमित्त आयोजित “ग्लोबल पुलोत्सव” या उपक्रमा-अंतर्गत, पु.ल. व्यंगचित्र-प्रदर्शन व गुण गाईन आवडी हा शब्द-संगीताचा अविस्मरणीय ठरेल असा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची संकल्पना, संकलन, अभिवाचन – सौ.सुप्रिया चित्राव यांनी केले.गायक कलाकार होते पं.विजय कोपरकर आणि डॉ.रेवा नातू. तबला वर साथसंगत केली श्री.नवाज मिरजकर यांनी आणि संवादिनी वर साथ दिली श्री.राजीव परांजपे यांनी. सिंथेसाईजर वर कु.सुरभी आठल्ये हिची साथसंगत होती शिवाय सह-अभिवाचन श्री.रोहित परांजपे यांनी केले. काहीसा उशिरा सुरु झालेला हा कार्यक्रम नंतर मात्र चागलाच रंगला. कार्यक्रमाची सांगता श्रीखंड पुरी च्या सुग्रास सह्भोजानाने झाली.

गुढी पाडवा कार्यक्रमाचा व्हिडीओ आपण येथे पाहू शकता:



  • LISHA कार्यक्रम 
लिटल इंडिया शॉप कीपर्स एन्ड हेरीटेज असोसिएशन ("लिशा") तर्फे दरवर्षी सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले जातात. भारतातील निरनिराळ्या प्रांतातील विविध संस्कृतींचे दर्शन सिंगापुरी जनतेला व्हावे ह्या उद्देशाने केल्या जाणाऱ्या ह्या कार्यक्रमात महाराष्ट्र मंडळ, सिंगापूर चा नेहमीच सहभाग असतो. ७ एप्रिल ला यावर्षी भारतातील वेगवेगळ्या राज्यांतील पारंपारिक घरांच्या फोटोंचे देखावे आयोजित केले होते. मंडळातर्फे आपण लोकमान्य टिळक ह्यांच्या घराचे चित्र पाठवले आहे. हे प्रदर्शन इंडियन हेरीटेज सेंटर जवळ Clive street इथे आयोजित करण्यात आले आहे. 

ह्याच उपक्रमाचा दुसरा भाग म्हणून २७ एप्रिल ला भारतातील राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वाजवण्यात येणाऱ्या ढोल ह्या वाद्याची झलक सादर केली जाणार आहे. मंडळातर्फे ढोल- ताशा पथक आपले कौशल्य दाखवणार आहेत.

आगामी कार्यक्रम
  • नाट्य आणि स्वरगंध निवड चाचणी – संगीत आणि नाट्य क्षेत्रातील कलाकार निवडण्यासाठी निवड चाचणी घेण्यात येणार आहे.संगीत आणि नाटक ह्या दोन्ही क्षेत्रातील उत्तम कलाकार निवडणे हा या चाचणीचा उद्देश आहे.

  • महाराष्ट्र दिवस – १ मे रोजी मंडळातर्फे महाराष्ट्र दिवस साजरा करण्यात येणार आहे. खाद्य जत्रा हे आकर्षण असलेल्या या कार्यक्रमात पाककला स्पर्धा पण घेतली जाणार आहे. कार्यक्रमाची अधिक माहिती लवकरच आपल्या पर्यंत येईल

-श्यामल भाटे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा