संपादकीय

ऋतुगंध वसंत वर्ष १३ अंक १
नमस्कार साहित्यप्रेमी जनहो,

ऋतुगंध चा पहिला अंक "वसंत" आपल्यापुढे सादर करीत आहोत.२०१० पासून कोणत्या ना कोणत्या रूपाने महाराष्ट्र मंडळ सिंगापूर ऋतुगंध साठी काम करण्याची संधी मिळाली.महाराष्ट्र मंडळ सिंगापूरचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष. या वर्षी मला संपादक पदाची धुरा सांभाळण्याची संधी दिल्या बद्दल मी मंडळाची ऋणी आहे. ऋतुगंध समिती मध्ये माझ्या बरोबर काम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांचेही आभार.

मानवी मन हे अत्यंत गूढ. त्याचा थांगपत्ता आजही भल्या भल्यांना लागलेला नाही. तर ह्याच मनाच्या भाव भावना ह्या संकल्पनेवर आधारित ह्या वेळचे ऋतुगंधचे अंक असणार आहेत.

सर्व जगाला व्यापून राहिलेली "प्रेम" ही भावना आपल्या पहिल्या ऋतुगंध "वसंत" चा केंद्रबिंदू आहे. प्रेम ह्या भावनेचा स्पर्श झाला नाही असा माणूस विरळाच.

वसंत ह्या पहिल्याच अंकाला आपल्या लेखकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. "प्रेम" ह्या विषयावरील कविता, कथा, ललितलेखन इ. सर्व प्रकारचे साहित्य आपल्यासाठी सादर करीत आहोत. निरंजन नगरकर यांची कथा "कृतकृत्य", प्रेमाची “शक्ती” हा नितीन मोरेंचा लेख आणि इतर सर्व लेख वाचून एकाच विषयाचा मानवी मन किती वेगवेगळ्या प्रकारे विचार करते ते लक्षात येतं

ह्या अंकापासून "ट्रेकिंग पाहावे करून" (विवेक वैद्य), "स्वगत" (वृंदा टिळक), "आजोबांचा कट्टा" (अरुण मनोहर), "ऋतुराग मालिका" (ओंकार गोखले), "मनातली गाणी" (शैलेश दामले), "मना सज्जना" (श्रीकांत जोशी) अश्या सहा लेखमाला नियमित आपल्या भेटीस येणार आहेत

चैत्रात महिनाभर काढण्यात येणारी रांगोळी "चैत्रांगण"चे मुखपृष्ठ तुम्हाला नक्की आवडेल. तसेंच आपल्या बालमित्रांनी काढलेली सुंदर चित्रंही या अंकात पाहायला मिळतील.

या अंकात ममंसिं वार्ता, अध्यक्षांचे मनोगत आणि आगामी कार्यक्रमां बद्दल माहिती मिळणार आहेच पण सध्या तरुण वर्गात अतिशय लोकप्रिय असलेल्या audio books च्या धर्तीवर एका नव्या प्रयोगाची सुरुवातही करत आहोत. "अध्यक्षांचे मनोगत" आणि खास आपल्या बालमित्रांसाठी असणारा "आजोबांचा कट्टा" ह्या दोन्हींच्या ध्वनिफिती आपणांला ऐकायला मिळणार आहेत.

याखेरीज, नुकत्याच झालेल्या गुढीपाडव्याच्या कार्यक्रमाची एक व्हिडिओ क्लिपही आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि हो, संगीत क्षेत्रातील महान हस्ती श्री विजय कोपरकर यांची मुलाखत अगदी आवर्जून वाचावी अशीच.

आमच्या ऋतुगंध समितीचा हा पहिलाच अंक कसा वाटला ते आम्हांला नक्की कळवा. आपल्या प्रतिक्रियांची आम्ही नेहमीच वाट पाहू.

राजश्री लेले



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा