महाराष्ट्र मंडळ वार्तापत्र


दिवाळी कार्यक्रम

या वर्षीच्या दिवाळीच्या कार्यक्रमाची सुरवात ZEE5 ने आयोजित केलेल्या मराठी गाण्यांची अंताक्षरी ने झाली. प्रेक्षकांचा सहभाग असलेला हा अंताक्षरीचा कार्यक्रम खूपच रंगला.

उत्तरार्धात अरुण तरुण चमूने “सूर निरागस हो” हा मराठी गीतांचा बहरदार कार्यक्रम सादर केला. मंडळाच्या अरुण-तरुण समूहाने अत्यंत उत्साहाने सुरांची मंगलमय उधळण करत मराठी गीतांचा कार्यक्रम प्रेक्षकांपुढे ठेवला. संगीत, वादन, गायन, नेपथ्य व सादरीकरण हे सर्वच अरुण-तरुणांनी केले होते आणि एक उत्कृष्ट कार्यक्रम रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला. भावगीते तसेच पोवाड्याने श्रोते मंत्रमुग्ध झाले आणि सिंहपुरीतील दिवाळी अधिकच सजून गेली. अरुण-तरूणांनी स्वरांची लयलूट करत एकावर एक बहारदार गाणी गायली आणि त्यांना उत्तम साथ दिली ती समवयस्क वादकांनी. पारंपारिक आणि आधुनिक वाद्यांनी गाण्यांची रंगत खुलत गेली आणि दिवाळी खऱ्या अर्थाने संस्मरणीय झाली. आपल्या अरुण-तरुणांचे जितके कौतुक करावे तितके थोडेच आहे.

दिवाळी म्हंटली की फराळ आलाच! या वर्षी कार्यकारिणीने सर्वांसाठी चिवडा लाडूचा फराळ ठेवला होता आणि कार्यक्रमाची सांगता सुग्रास मिष्टान्न भोजनाने झाली. 


विशेष सर्वसाधारण सभा

दिनांक १६ नोव्हेंबर २०१९ रोजी मंडळाची विशेष सर्वसाधारण सभा संपन्न झाली. उपस्थित सभासदांच्या संमतीने खालील निर्णय घेण्यात आले. 

१. ५ ते १७ ह्या वयोगटातील बऱ्याच मुलांनी (घटनेप्रमाणे) आपल्या पालकांच्या संमतीने सभासदत्व घेतले आहे. अर्थात त्यांना मंडळाच्या सभांमधे सहभागी होण्यास आणि निर्णयांसाठी मत देता येत नाही आणि पुढेही देता येणार नाही. पण अशा मुलांची मंडळाच्या ’database’ मधे केवळ नोंदणी करण्यासाठी आता त्यांना ’Associate member’ म्हणता येईल. 

२. मंडळाच्या घटने प्रमाणे आपले आर्थिक आणि सभासदत्वाचे वर्ष १ जानेवारी पासून ३१ डिसेंबर पर्यंत असते. प्रत्येक वर्षी, १ जानेवारी पासून सभासदत्वाचे नूतनीकरण सर्व सभासदांनी करावे ही अपेक्षा आहे. घटनेप्रमाणे वार्षिक सभासदत्वाचे नूतनीकरण ३१ मार्च पर्यंत केले नाही तर सभासदत्व रद्द होते, तसेच विद्यमान वर्षाचे सभासद-शुल्क भरलेल्या व्यक्तींनाच सभासद म्हंटले जाते.

३. १ जानेवारी २०२० पासून, वार्षिक सभासदत्वाचे शुल्क वाढून आता $३०/= झाले आहे. 

इतर कम्युनिटी कार्यक्रम


महाराष्ट्र मंडळाला सिंगापूर मधील स्थानिक संस्थांकडून कार्यक्रम करण्याबद्दल नेहमीच आमंत्रण येत असते.

३० नोव्हेंबर रोजी One community fiesta by West Coast च्या तर्फे आयोजित कार्यक्रमात मंडळाने भाग घेऊन साडी नेसण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. स्थानिक महिलांनी फार उत्साहाने ह्या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला. बाकरवडी आणि नारळाची बर्फी हे मराठमोळे खाद्यपदार्थ लोकांसाठी ठेवले होते तसेच वारली पेंटिंग चे प्रात्यक्षिक सुद्धा या वेळी दाखवण्यात आले. 

- शब्दांकन – तेजश्री दाते


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा