त्रिभया



भयवृक्ष-1

माझ्या आत-आतून पूर्ण बहराने फुललेले हे भयाचे झाड...
...आता निर्दयीपणे पूर्ण उखडून फेकले पाहिजे मुळांसकट
माझ्यातील खोलखोल अंधारात झपझप वाढणाऱ्या या झाडांची मुळे
मला जखडून टाकताहेत... भीतीचा कर्करोग गिळंकृत करतोय
माझ्यातील उरल्यासुरल्या प्रकाशाचा एकेक अंश...
या झाडाची फळे परिपक्व होताहेत माझाच जीवनरस शोषून...
नपेक्षांची अरंगी फुले विषारी वेगाने वाढताहेत आणि
ढवळून काढताहेत मनगुंफेतील काळोख...
आतील काही सूक्ष्म काजवे गिळंकृत करण्यासाठी
भयवृक्ष राक्षसी वेगाने फोफावतो मनाच्या तळापासून
नाही लागत त्याला जराही माती अन् पाणी
तो जगतो फक्त मनातील काळोखरसाच्या तवंगावरच...
क्षणिक आशेच्या अळ्या वळवळतात त्याच्या पानांफुलांवर इतकेच
वरवरचा तेलतवंग हलला की खालचे पाणी दिसावे
तसे ढवळावे लागते भयाला निगुतीने
हे भयभीताला कसे कळावे...?
या भयाण वृक्षाच्या ढोलीत दडून बसलेले
काही प्रश्नार्थक आकाराचे भुंगे मात्र गप्प गप्प आहेत वाचा गेल्याप्रमाणे
पक्षाघाताने जीभ जणू लुळी पडल्याने त्यांच्या भ्रमरध्वनीचा मागमूसही नाहिये
(भुंग्यांचा आवाज किती डोक्यात जातो ना एरव्ही...?)
माझ्या तीक्ष्ण विचाराच्या कुऱ्हाडीने या भयवृक्षाच्या फांद्या छाटण्याचा प्रयत्न
करायला गेलो तर जखडून ठेवले माझे हात करकचून त्या वृक्षमुळांनीच...
पण या भयवृक्षाला माहीतच नाहिये की, त्याच्या मुळांच्याही खाली
आत्म्याच्या गाभाऱ्यात पेरुन ठेवलेय मी बोधीवृक्षाचे एक अनवट बीज
त्यातून स्त्रवणारा ज्ञानप्रकाश पोखरत जाणार आहे
भयवृक्षाचे सर्वखोल पसरलेले साम्राज्य अन्...
अन् यथावकाश बोधीवृक्षाच्या एकट्या फांदीवरच्या एकट्या संगमफुलावर
बसणार आहे प्रेमाचा एकमेव रंगीत पक्षी...
त्याच्या रेशीमस्वराने सुगंधित होत जाणार आहे आत्मगाभारा...
भयाचा पालापाचोळा कुठच्याकुठे भिरभिरत जाणार आहे तेव्हा
...भयवृक्षाला आपली मुळे उचलून परागंदा व्हावे लागेल माझ्यातून
एक नवे ‘झाड’ शोधायला...

-------------------------------------------------------

महाभय-2

काळोखाचे भय वाटत होते तिथपर्यंत ठीक होते या महानगरात
आताशा माणसांना उजेडाचे भय वाटू लागलेय अतोनात इथल्या
आतल्या उजेडात जे जे काही दिसते त्याने भयभीत झालेली चिडीचूप माणसे
भयग्रस्त शहरात उसवलेल्या गाठोड्यांप्रमाणे फिरणाऱ्या माणसांच्या झुंडी
कसले अनामिक भय दाटून आलेय या झुंडीतील माणसांमध्ये...?
(की भयापोटीच झुंड तयार झालीये त्यांची?)
हवेलाही चावून गिळंकृत करत उडत निघालेल्या या पिरान्हा माशांच्या झुंडी...
भयसूत्रांच्या कानामात्रांनाही मोकळे सोडले नाही त्यांनी..
भय इथले असो वा तिथले... ते संपण्यासाठी नसतेच
संपेलच कसे ते भय?
भयाशयातून अथक गाज ऐकू येतेय वादळापूर्वीच्या शांततेची.
प्रत्येक शिखरासमोर दरी असावी इतक्या सहजलोलुपतेने
प्रत्येक सर्वोच्च सुखासमोर दुःखाची खाई बुभुक्षितपणे जिव्हा चाटत उभीये...
ही सुध्दा भयास्पद अवस्थाच की प्रत्येक सुखासीनाची.
उमलत्या अंधाराच्या अंगावर पडलेले साधे पिठुर चांदणे जेव्हा
अंगभर कोडाप्रमाणे भासू लागते तेव्हा मनातून भयास्पद खूणगाठ बांधलीच जाते की
‘आता सारे संपत आलेय’ (पण पुन्हा नव्या वेदना नव्याने सुरु होण्याचे
भय तर आहेच ना मानवा?)
लाख आपण सुरूप असू... सावली मात्र ठाम कुरूप आणि
तितकीच भीषण आकाराची असते ही तशी भिववणारी गोष्टच की...
अंधारात तर सावल्या आपल्या पाठीवरच बसलेल्या असतात
जख्ख म्हातारीप्रमाणे...
सर्वदूर समोर पसरलेल्या निर्मनुष्य डांबरी रस्त्यावरुन मधोमध
भर रात्री हातात कंदिल घेऊन निघालेला एकटाच माणूस सर्वस्व गमावून
त्याच्या मागे एक अँब्युलन्स हात धुवून लागलीये
सायरनच्या असह्य आवाजाने अख्खे महानगर जागे झालेय
पण तो मात्र अजूनही गुंगीतच चालतोय, रस्ता मधोमध अडवून कारण
रिकाम्या अँब्युलन्सचाही सायरन मुद्दाम सुरुच ठेवण्याची
या शहराची बेरकी पध्दत त्याला नीटच माहितीय
कुठे वीतभर धुराची वलये दिसली तरी
वणवा पेटल्याची दवंडी पेटणारी मंडळी मात्र
या सायरनच्या अखंड कीर्तनाने आनंदित होतात
काहीतरी ‘घडणार’ या आशेने त्यांच्या डोळ्यांत शिकारी चमक येऊन
रात्रीच्या पथदिव्यांप्रमाणे ते लुकलुकू लागतात
मात्र तरीही तो रस्त्यातून बाजूला नाहीच होत
अँब्युलन्सला ‘साईड’ने जाणे माहीतच नाही
तिला राजरस्त्याची सवय झालीय
मग शेवटी नाईलाजाने तो जणू अँब्युलन्सचाच
एक भाग झाल्याप्रमाणे अँब्युलन्स त्याला गिळंकृत करुन
आपल्यात सामावून पुढे जाऊ लागते
फुगलेल्या सुस्त सापाप्रमाणे सायरन आता मात्र बंद झालेला असतो
सायरनच्या तोंडात कुणी बोळा कोंबला हे
त्या भयाण गांवाला कळायचेच राहते मात्र
गंधाला त्याचा स्वत:चा स्वर असतो हे कळूनही
स्वराला चिकटलेला मृत्युगंध तिथे भणभणत राहतो
रस्त्याने येताजाता गर्दीबाज
अँब्युलन्सचा सायरन घुमू लागला कुठल्याशा की
उन्हातून छायांचे घोळके विस्कटताना दिसतात
वाटते... की काहीतरी भयंकर
घडणार आहे इथे आसपास... मीच जणू केंद्रबिंदू असल्याप्रमाणे
दिसू लागतात सावल्या शुभ्र यमदूतांच्या
वाटू लागते मनाच्या कुठल्याशा कोपऱयात
की कधीतरी सायरनचा हा आवाज आपल्यासाठी सुध्दा वाजेल


-----------------------------------------------------
भयमुक्ता-3

मी लपून बसलोय घट्ट माझ्यामध्ये... भयभीत अवस्थेत
कुणाला दिसणार नाही अशा बेताने...
आणि तरीही ‘ती’ येतेच आणि माझे बोट घट्ट पकडते असोशीने...
माझ्यात खोल दडून बसलेल्या भयावर खेकसते
माझी सर्वस्वी भयमुक्ता...
‘हिंमत असेल तर बाहेर ये,
तुला संपवायला मीच पुरेशी आहे’
तिच्या मधस्पर्शाच्या जादुईने मला घेरुन टाकणाऱ्या भयछाया क्षणात
अंतर्धान पावतात आणि समग्र आसमंतात तिच्या-माझ्याखेरीज उरतच नाही कोणी...
‘सावल्या मेल्याचे दुःख नाही, ऊन सोकावता कामा नये’ असे अस्फुट पुटपुटणाऱ्या
एका चंद्रिकेला खोचून मी तिच्या केशसंभारात माळतो गजरा माझ्या प्राक्तन फुलांचा...
तेव्हा त्याक्षणी मात्र भयकंपाची तिरीप झेपावते नेमकी तिच्या निळ्या पुंकवावर...
माझ्यात साचून राहिलेले प्राचीन भय आता मात्र साळसूदपणे
मनपाताळाच्या पायऱ्या खोलखोल उतरून अज्ञानात कायमचे परागंदा होऊन जाते.
कुठे जाते कुणास ठाऊक...?

- महेश आफळे

1 टिप्पणी: