ऋतु राग मालिका – भाग तिसरा

ऋतुगंध वर्षा  वर्ष १३ अंक ३

नमस्कार मंडळी, ऋतु राग लेखमालिकेच्या तिसऱ्या भागाकडे आज आपण वळू या. ज्येष्ठ पौर्णिमा सरते न सरते तर लगेच ग्रीष्म वर्षाबरोबर हातमिळवणी करायला उत्सुकच असतो.. त्याची चाहूल लागली की, ते कालपर्यंत भिरभिर भिरभिरणारे पांढुरके भुरे ढग जांभुळके होऊ लागतात, आणि वाऱ्याच्या मंद झुळका स्वैर होऊ लागतात. उंच माडाची झाडं फांद्यांनी उसळ्या देत त्या गर्द मेघांना झोंबू लागतात.. लहान लहान वावटळीसोबत झाडांची सुकलेली पाने गळून एक एक करत फेर धरु पाहतात आणि त्या न बोलत्या पानांमधून एक आश्वासक संदेश लोकांपर्यंत पोचायला लागतो.. मी येणार! .. तयारी करा... त्या गडद होऊ पाहणाऱ्या ढगांमधून ते अमर चैतन्य पाझरणार...

कसं आहे पहा, मागल्या ऋतूमध्ये आषाढ लागतो काय, आणि पहिल्या येणाऱ्या त्या वावटळीच्या पावसांत भिजलेल्या झाडांचा कायापालट होतो काय.. पानं ओली, फुलं ओली, त्या झाडांच्या बुंध्यात घरटी ओली, आणि त्यात कुडकुडणारे पक्षी ओले, इतकंच काय आपली मनं सुद्धा चिंब भिजून ओली.. त्या ओलेत्या मनाला मग एखादी सुरावट याद यावी ती कुठली तर “मल्हार” रागाची... का बरं मल्हारच? अजून कुठला राग का नाही? सुरांचा तो साज, ते लेणं, तो थाट अजून कुठल्या रागाने उमटून येणं निव्वळ अशक्य.. म्हणूनही कदाचित इतकी वर्षं मल्हारच ऐकल्याने असं काहीसं घडू शकत असेल.. पण एखादा बिहाग किंवा मालकंस ऐकून पाहावा ह्या ऋतुत... नाही भुरळ पडत..! तरीपण भूपाली, बिभास, मेघ, देस आणि जयजयवंती हे असे काही राग ह्या वर्षा ऋतुत गायले जातात. ह्या रागांची प्रकृती म्हणजे स्वर गुंफण एकमेकांशी मिळती जुळती आहे, आणि वर्षाकालीन बंदिशी ह्या रागांमध्ये प्रसिद्ध आहेत. पण छ्या:! ती सर त्या मल्हाराच्या स्वरांना नाही, ते कोंदण त्या स्वरानुभुतीला येऊच शकत नाही अशी वर्षानुवर्षं आपली दृढ समजूत आहे... त्यामुळे वरील रागांपैकी आज मी जो विचार मांडणार आहे... तो फक्त मल्हार ह्या रागाचाच...

रात्रभर पावसाळी वारे पन्नास-साठ मैल वेगाने सोसाटून वाहत येणारं आणि तुमच्या मनाला रुंजण घालणारे ते हे स्वर... काळ्या ढगांनी भरलेलं आभाळ, त्यानं अंधारून येऊन कुंद झालेली हवा, अचानक कडाडणारी वीज या पार्श्वभूमीवर, प्रियकराच्या विरहानं व्याकुळ झालेली आणि त्याची वाट पाहणारी नायिका... आणि ह्या वातावरणाशी एकरूप होणारा राग म्हणजे मल्हार. अर्थात नुसतं मल्हार म्हणून चालणार नाही. त्याचे अनेक प्रकार आहेत; काही प्रचलित आणि काही अनवट, दुर्मिळ, जास्ती न गायले जाणारे. मल्हाराची इतकी रूपे आहेत की त्यांचं विभाजन प्राचीन, मध्यकालीन, आणि अर्वाचीन मल्हारांमध्ये होतं. मल्हाराचे नाव, वर्षा ऋतुत “मल-हरण” करणारा “मल-हार”, ह्यावरून पडलेलं आहे. प्राचीन मल्हारांमध्ये शुद्ध-मल्हार, गौड-मल्हार, आणि मेघ-मल्हार ह्या रागांचा समावेश आहे. हे राग साधारण पंधराव्या शतकात बांधले गेले असावेत. मल्हारचे प्रकार कितीही असले तरी वर्षा ऋतूमध्ये सर्वप्रकारच्या मल्हार रागांमध्ये गायले जाऊ शकतात ह्यावर ग्रंथकारांचे एकमत आहे.

ह्या लेखमालिकेच्या अनुषंगाने मी वाचलेल्या काही संदर्भ ग्रंथांमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे, अत्यंत सर्जनशील असणाऱ्या या मोजक्या स्वरांच्या रागा‌तील ‘मल्हार अंग’ आणि इतर समप्रकृती रागांच्या जोडाने मल्हार रागाचे २५-२७ वेगवेगळे प्रकार होतात.. सूरमल्हार, मेघमल्हार, गौडमल्हार, नटमल्हार, खमाजी मल्हार, बसंत मल्हार, बहार-मल्हार, कानडा मल्हार, देस मल्हार, छाया मल्हार, गांधी मल्हार, चंचलसस मल्हार, जयंती मल्हार, रामदासी मल्हार, सोरट मल्हार, मीराबाई की मल्हार, पटमल्हार, त्रिभुवन मल्हार, चरजू की मल्हार आदि मल्हाराचे अनेक प्रकार आहेत. यापैकी काही प्रचलीत असून प्रत्यक्ष मैफलीत सादर केले जाणारे तर काही प्रकार अप्र‌चलित असून ते केवळ शास्त्राभ्यासापुरते मर्यादित आहेत.

त्यापैकी आता काही प्रचलित प्रकार आणि त्याबद्दल थोडी माहिती सांगतो.

शुद्ध-मल्हार हा राग, राग दुर्गा आणि राग जलधर-केदार ह्यांच्या अगदी जवळचा आहे किंवा ह्या दोन रागांवरच आधारलेला आहे. ह्या तिन्ही रागांच्या सुरावटी आणि स्वर बघता लक्षात येईल की सगळे स्वर सारखेच आहेत, फक्त स्वर लगाव आणि अलंकार वेगवेगळे आहेत. तरी पण राग दुर्गा आणि जलधर केदार हे बिलावल थाटातले राग आहेत तर शुद्ध-मल्हार रागाला काही दिग्गजांनी काफी थाटात घातले आहे तर काहींनी खमाज थाटात! अर्थात हा राग आता कोणी विशेष गातही नाही पण खरंतर हा राग बिलावल थाटातच पाहिजे असं गुणीजनांचं मत आहे.

पंडित कुमार गंधर्वांनी ह्या रागात एक सुंदर बंदिश बांधली आहे जी तुम्ही पुढील लिंकवर ऐकू शकता.

रितू बरखा आयी, बरसन लागी... शुद्ध मल्हार - कुमार गंधर्व


मेघ-मल्हार त्यातला त्यात मेघ- मल्हार हा सर्वजनपरिचित आहे. “सा रे म प नि सां | सां नि प म रे सा|” खूप प्राचीन असलेल्या ह्या रागाचं स्वरुप मांडताना काही गायक ह्यात दोन्ही निषाद घेतात, काही कोमल गंधार घेतात तर काहीजण कोमल गंधार आणि धैवत घेतात. संगीत पारिजातमध्ये पं. अहोबाल मेघ-मल्हारचे वर्णन करताना म्हणतात..

मल्हारो वर्षासु सुखदायकम् |
यतों वर्षासु गेयोsयं मेघ इत्यापि कीर्तीत: |
अकालराग गानेनं जातदोष हरत्यम् ||

मेघ-मल्हार रागात रिषभ व निषाद स्वरावर आंदोलन आहे जे मेघ रागाचे स्वरूप दाखवते आणि त्यात रिषभ-पंचम स्वर संगती आणि मध्यम-रिषभाची मींडयुक्त स्वर संगती आहे जी मल्हार रागाची पूरक आहे. ह्याचा अर्थ असा होतो की भारतीय अभिजात संगीतातील आपल्या गुणीजनांनी मेघ रागात, “मरे मरे प, मरे म” ही मल्हाराची स्वर-संगती घालून राग मेघ-मल्हार बांधला असावा. ह्यात अजून एक सूक्ष्म फरक म्हणजे असा की जर मेघ रागात रिषभ स्वरावर न्यास लावला तर तो राग मधमाद सारंग व्हायची भिती असते. त्यामुळे ह्या जवळ-जवळच्या रागांवर प्रभुत्व मिळवणं हे कठोर रियाझाचे काम आहे.

खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही अश्विनी भिडे-देशपांडे ह्यांनी उत्तम गायलेला राग मेघ-मल्हार ऐकू शकता. बंदिश द्रुत एकतालातील आहे.

मेघश्याम घनश्याम ... श्याम रंग तन छायो ...अश्विनी भिडे देशपांडे



गौड-मल्हार तिसरा प्राचीन मल्हार म्हणजे गौड-मल्हार. हा राग म्हणजे राग गौड आणि शुद्ध-मल्हाराचा संगम आहे. या रागाचे स्वरूप आहे: “सा, रेग, रेगम, मग, रेगरेमगरेसा, मरे मरेप, धपम, मपधनिप, मपधनि सां | सांधनिप, धपम, रेगरेमगरेसा |” ह्यात “रेग, रेगम, रेगरेमग” हे गौड रागाचे अंग आहे आणि “मरेप, मपधसांधप म” हे राग शुद्ध-मल्हाराचे अंग आहे. दोन्ही मूळ राग बिलावल थाटाचे असल्यामुळे गौड-मल्हारमध्येही बिलावलच्या छटा दिसणं स्वाभाविक आहे. जसं “पमगमरेसा”, किंव्हा “पनिधनिसां”. काही गायक ह्यात “पधगपम, ग” ह्या स्वरूपाचा बिलावलसारखा स्वरसमुह वापरतात.

भारतीय शास्त्रीय संगीताचं भुमिगत धन पहिल्यांदा सामान्य रसिकांसाठी लुटलं ते संगीत रंगभूमीनं. अण्णासाहेब किर्लोस्करांच्या प्रतिभेतून साकारलेलं नित्यनुतन 'सौभद्र' १८८२ साली प्रथम रंगभूमीवर आलं. कृष्णाच्या तोंडी असलेल्या 'नभ मेघांनी आक्रमिले' या पदातून राग 'गौड मल्हार' मराठी रसिकांच्या मनात बरसला. हल्लीच्या गायकांचा मल्हार मधला आवडता राग कुठला विचारलं तर चटकन “गौड मल्हार” हे उत्तर अपेक्षित आहे. ह्यात बंदिशी आणि गाणीही बरीच आहेत.

“बरसात की रात” ह्या चित्रपटातील “गरजत बरसत सावन आयो रे” हे गाणंदेखील राग गौड-मल्हारवरच आधारित आहे. ह्याचे संगीतकार आहेत रोशन आणि गीतकार आहेत साहिर लुधियानवी. हे गाणं सुमन कल्याणपूर आणि कमल बारोत ह्या दोघींनी गायले आहे. “गरजत बरसत भीजत आई लो” ह्या पारंपरिक बंदिशीला पुन्हा एकदा साहिरनं नवा साज चढवला आणि हे गाणं म्हणजे पावसाबरोबरच दूर गेलेला प्रियकर यावा अशी साद घालणारी विरही प्रणयिनीचं हृद्गत झालं आहे.

गरजत बरसत सावन आयो रे – “सुमन कल्याणपूर आणि कमल बारोत

पण त्याची मूळ बंदिश संगीतकार रोशन ह्यांनी “मल्हार” ह्या १९५१च्या चित्रपटात लता मंगेशकर ह्यांचाकडून गाऊन घेतली आहे.

गरजत बरसत भीजत आई लो – लता मंगेशकर


असंच शोध घेत असता कुमार गंधर्वांनी तब्बल तीन तास उलगडून दाखवलेला गौड मल्हारची एक लिंक मला सापडली.

कुमार गंधर्व, गौड मल्हार



झुकी आयी रे बदरिया सावन कि 

मिया मल्हार तानसेनने मिया मल्हार हा राग बांधला अशी अख्यायिका आहे. हा राग सर्व मध्यकालीन मल्हार रागांचा पाया आहे. हया रागात कोमल गंधार आणि दोन्ही निषाद आहेत. प्राचीन मल्हार रागांप्रमाणेच ह्या रागाच्या वादी आणि संवादी स्वरांबद्दल बरीच मतं आहेत. काही दिग्गज मध्यम-षड्ज हया स्वरांना वादी-संवादी मानतात. काही पंचम-षड्ज, तर काही षड्ज-पंचम. पण जर मध्यम ह्या रागाचा वादी स्वर मानला तर तो बहार रागाच्या अगदी जवळ जातो.

मिया-मल्हार हा राग मल्हार आणि कानडा रागाचे मिश्रण आहे. ह्यात “निप मप गमरेसा” हे कानडाचे अंग आहे आणि “मरे रेप” हे मल्हाराचे अंग आहे. वरील कानडा रागाचे अंग राग बहार मध्ये देखील येते पण फरक एवढाच की राग मिया-मल्हार मध्ये गंधार आंदोलित आहे, जो बहार मध्ये नाही. दुसरा फरक असा की मिया-मल्हारमध्ये मध्यमाला गौण स्थान आहे पण बहार रागाचा तो वादी स्वर आहे.

हया सूक्ष्म फरकांवरून लक्षात येईल की भारतीय अभिजात संगीत हे किती बारकाईने अभ्यासावे लागते आणि मगच ते आत्मसात करता येते. छोट्या छोट्या फरकांमुळे राग बदलू शकतो त्यामुळे स्वरांवर हुकुमत मिळवणे खूप महत्वाचे आहे.

अनेक चित्रपटातील गाणी देखील मिया-मल्हार मधे आहेत. त्यात सर्वात लोकप्रिय झालेलं म्हणजे “गुड्डी” चित्रपटातील जया भादुरीच्या तोंडी असलेलं, वाणी जयराम ह्यांनी गायलेलं, वसंत देसाई ह्यांचं संगीत लाभलेलं हे गीत:

बोल रे पपीहरा


खाली दिलेल्या लिंक वरुन पंडित राम मराठे ह्यांनी गायलेली मिया-मल्हार रागातील सुप्रसिद्ध बंदीश, “करीम नाम तेरो” आणि बोले रे बोल रे पपैहरा” ऐकू शकता:

पंडित राम मराठे - राग मिया मल्हार


आता हीच बंदिश पंडित कुमार गंधर्वांच्या खास अंदाजात ऐकू या:

बंदिश - बोल रे पपैहरा - पं. कुमार गंधर्व


अजून एक अतिशय सुंदर गाणं आहे, ह्याच रागावर आधारलेलं पण तितकंसं प्रसिद्ध न झालेलं! ते म्हणजे “सम्राट पृथ्वीराज चौहान” हया १९५९ सालच्या चित्रपटातील, लता मंगेशकर ह्यांनी गायलेलं:

ना ना ना बरसो बादल


अशा ह्या वर्षा ऋतुवर आणि मल्हार रागावर शोधायला, लिहायला, बसलो की, कितीतरी निरनिराळ्या ढंगातून हा उलगडत जातो... भारतीय सृष्टीच्या तनमनालाच नव्हे तर संस्कृतीला लपेटलेला पाऊस आणि 'मल्हार'ची सुरावट आमच्या हृदयात रुजलेली आहे. 'रिमझिम', 'झिरमिर', 'झिरझिर', 'टप्-टप', 'टापुर टुपुर', 'उमड घुमड', 'घनन-घनन' अशा शब्दांच्या नादातून तो आतवर झिरपलेला आहे.

आता ह्या व्यतिरिक्त अजून कुठले राग आणि गान प्रकार वर्षाऋतुमध्ये गायले जातात असं विचारलंत तर, सावनी, झुला, कजरी, बागेश्री, मारु बिहाग, आणि वर सांगितल्याप्रमाणे भूपाली, जयजयवंती मधल्या बंदिशी लोकप्रिय आहेत. उपशास्त्रीय संगीतात ‘कजरी’ हा वर्षाऋतुत गायला जाणारा ब्रज भाषेतला रसपूर्ण गीतप्रकार आहे. यामध्ये मुख्यतः वर्षाऋतुचे आणि राधा-कृष्णाच्या शृृृृंगारलीलांचे वर्णन केलेले असते. विशेषतः मिर्जापूर आणि बनारस भागात कजरी गाण्याचा प्रघात आहे. काफी, झिंजोटी, खमाज अशा रागात कजरी गायली जाते.

वर्षा ऋतुचे सारे विभ्रम, नखरे लोकगीतं, चित्रपटगीतं, नाट्यसंगीत आणि भावगीत संगीताने अलगद झेलले आहेत. हुरहूर लावणारा, अश्रांत जीवांना शांत करणारा, आपल्या धारांनी तृषार्ततेला न्हाऊ घालणारा, मेघांचा गडगडाट, वीजांचा लखलखाट, सोसाट्याचा वारा, त्यामागे तडतड आवाज करत येणाऱ्या थंडगार थेंबांनी ओथंबलेल्या बरसत्या धारा, मनधुंद करणारा मातीचा दखळणारा कस्तुरी सुगंध, वातावरणात पसरलेला सुखद गारवा, वाऱ्यावर डोलणारी हिरवीगार वनश्री आणि आपला मोरपंखी रंगाचा मखमली नयनमनोहर पिसारा फुलवून केकारव करत आनंदाने नाचणारा मोर, असं निसर्गातील आनंदविभोर करणारं वातावरण घेऊन वर्षाऋतू दर वर्षी अवतरतो !

हा जसा कलाकारांच्या स्वरसौंदर्यनिर्मितीला प्रेरणा देतो तसा काव्यप्रतिभेलाही देतो.

ह्या मल्हाराच्या सुरांनी भिजवणारा पाऊस कविता म्हणून भेटतो, तसा व्यक्ती किंवा एखाद्या घटनेमागे उभं असलेलं वातावरण म्हणूनसुद्धा भेटतो. ‘पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने.. हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद स्वराने’ ह्या ग्रेसच्या कवितेमधला पाऊस..

शेकडो बंदिशींमध्ये, काव्यरचनेतून सृष्टीच्या नवचैतन्यदायी रूपाची आणि त्यानुसार शृंगाररसाच्या अनंत छटांची वर्णने व्यक्त झाली आहेत. किती शोधाल तितकं अपुरं आहे.. आणि म्हणून दर वर्षीचा वर्षा ऋतू हा निराळा का भासतो ह्याचं हे उत्तर आहे. 

- ओंकार गोखले











कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा