शेवटची लोकल


ऋतुगंध शिशिर वर्ष १२ अंक ६
गाडी व्ही.टी. स्टेशनात, म्हणजे आजच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस मधे, दाखल झाली. त्याने निरोपाचा फोन ठेवला व गाडीतून उतरण्यास तयार झाला. वेगळं होण्याचा निर्णय कुणाचा होता ते स्पष्ट नव्हतं पण त्याने तिचा निरोप तर घेतला होता. एकप्रकारे काडीमोडच. ती माहेरी जायला निघाली होती.

तिच्याशी, त्यांच्या दोघांच्या घराशी, निगडित गोष्टी गाडीबरोबर निघून जातील असं काहीसं वाटून तो उतरेना. पाय जड झाले. आठवणींची गर्दी संध्याकाळच्या प्रवाशांच्या गर्दीपेक्षा जास्त होती. गुदमरून टाकणारी. अंगावर येणारी.
काडीमोड...
एकच शब्द पण आता अथांग वाटणारा...
त्या शब्दाच्या गडद अंधारात तो बुडत चालला होता.

त्याला काहीच कळत नव्हतं. हे इतकं कठीण का वाटत होतं? रोजच्या भांडणातून, त्रासातून सुटका तर मिळत होती. मग ही कालवाकालव?

आजचं भांडण सर्वात सौम्य पण सर्वात भीषण ठरलं होतं. मोजके शब्द पण भेदक. नजरेला न भेटणारी नजर पण तरीही बोचरी. क्षणात घेतलेला निर्णय, जणू एका जालिम विषासारखा.
“तू ऑफिसला पोहोचेपर्यॅत विचार कर. माझी बॅग तयार आहे”. आतापर्यंत ती कुलूप लावून खाली उतरली असेल. रिक्षेत बसलीही असेल.

आजच्या वृत्तपत्राचा अंक प्रकाशित करून त्याला घरी जायचं होतं ते फक्त कोरी पानं वाचायला. वृत्ताचं संपादन करणं त्याचं काम होतं पण स्वत:च्या संसाराचा मजकूर त्याने स्वत:च पुसून टाकला होता.

फोनवर रडत तिने ना त्रागा केला होता ना काही बडबड. बराच वेळ फोनवर दोन्हीकडून शांतताच होती. पण बडबडीचा मख्ता कायम ह्याचा. अलिखित नियमाप्रमाणे ह्यानेच बोलायला हवे होते. भांडणातही बडबडून हा थकला की ती म्हणायची, “तुझं झालं असेल तर फोन ठेऊ?” नेहमीप्रमाणे आजही तेच म्हणाली. नेहमीप्रमाणे त्याने त्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. एरवी ती काही वेळ खोळंबे. पण आज तिच्यात कुठून निर्धार आला कुणास ठाऊक. उत्तराची फार वाट न बघता ती फक्त एवढच म्हणाली, “पुन्हा कुणाशी असं करू नको”, आणि फोन ठेवला. भयाण शांतता. कुणी खाडकनं कानाखाली वाजवावी त्यापेक्षा कर्कशं!

हेच तर हवं होतं ना त्याला? सुटका. सोक्षमोक्ष. मग एकाएकी ही पोकळी का जाणवत होती? पाच-सात वर्षांचा सहवास तो, त्याची सवय ती व्हायचीच की. एका जिवंत व्यक्तिचा रोजचा वावर, रोजचं बोलणं, सवयी... सगळं कसं कधी न बदलणारं असं वाटू लागतं. किंवा, कधी बदलू नये असं.
“अरे, जाना नही है क्या? पिया हुआ है क्या?” गाडी पुन्हा सुटत होती आणि बाजूच्या माणसाने खडसून विचारलं. आॅफिसला उशीर झाला होता. पुन्हा वरिष्ठांचं बोलणं ऐकावं लागणार होतं. क्षणभर त्याला वाटलं, सरळ नोकरी सोडून घरी बसावं. नको, घरी जाणं नको.

विचारांचा गाडीने पुन्हा ट्रॅक बदलला...
लग्न ही संस्थाच फोल आहे का? पण मग कोट्यावधी माणसं त्यावाटे का जातात? कारण माणसं मेंढरंच असतात. माकडंच. एकाने केलं म्हणून इतरही करणारी. इतरांकडून आपला स्वीकार व्हावा याची गरज फार तीव्र असते... कदाचित जीवघेणी.

आणि प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे सेमच असतं... फक्त एक मेटिंग गेम असतं.
मग आपण काडीमोड का करतोय? काही साक्षात्कार झालाय का आपल्याला?
विचारांच्या उसळत्या लाटात तो नुसता हेलकावे घेत होता.

आणि संध्याकाळच्या त्या तूफान गर्दीत शेवटी तो कुणाशी तरी आदळला. हातातली डब्याची पिशवी पडली आणि सगळी पोळी-भाजी फलाटावर! तो काही करायच्या आधी पायदळी गेली. नकळतच, त्याच्या डोळ्यात पाणी तरारलं. तिने आजसुद्धा त्याच्याकरता डबा बनवला होता... “बाहेरचं शक्यतो खाऊ नको, बाळा”, ती म्हणत असे...
ऋदयातून एकदम एक पोरका हुंदका निघाला आणि जणू सगळा गोंधळ धुवून निघाला. त्याने फोन हातात घेतला व मेसेज टाईप केला: “शेवटच्या गाडीने येईन तुझ्या माहेरी. मग घरी जाऊन नेहमीसारखा चहा घेऊ...”
फार उशीर तर नसेल ना झाला? तिच्या मनाला व त्यांच्या नात्याला न जोडण्याजोगा तडा तर गेला नसेल ना? ती माहेरी निघून गेली असेल का?...

जड पावलांनी तो ऑफिसला पोहोचला आणि तेवढ्यात फोनवर मेसेज आला. घाबरतच त्याने पाहिलं, तर तिचं उत्तर आलं होतं: “मी घरीच आहे. नाही चुकणार आपली शेवटची लोकल”.

- केशव पाटणकर

२ टिप्पण्या: