आनंदप्रभा


आज ती सकाळी सकाळीचं आईकडे आली होती. आईने जाणलं प्रकरण जरा वेगळचं आहे. कारण एकाच गावात राहून आईला फोनकरण्या एवढाही वेळ नसलेली ती आज चक्क बॅग घेऊन आली होती.

बहुतेक तिने सुट्टी टाकली होती आणि सगळं नॉर्मल दाखविण्याचा तिचा प्रयत्न आईच्या नजरेतून सुटला नव्हता. त्यामुळे ती जोपर्यंत काही सांगत नाही तोपर्यंत आपण काही विचारायचे नाही अस दोघांनी ठरवलं.

जरा कुठे काम संपवून आई तिच्या शेजारी लवंडली तोच बाबांचा पुकारा सुरू झाला, अहो! काय करताय, चहाचं पाणी देण्याची कृपा कराल का? आता मात्र तिचा बांध फुटला आणि बाबांसमोर जाऊन तावातावाने त्यांना विचारू लागली. हे काय चहाचं नवीन खुळं काढलतं? आधी तर कधी चहा पीत नव्हतात. किती त्रास देणार आहात तिला? बटीक आहे का ती तुमची? तिचही वयं झालं आता. असे म्हणून ती तडक बेडरुममध्ये गेली तर आई तिथे नव्हती. नक्कीच ती स्वयंपाकघरात असणार म्हणून तिने तिचा मोर्चा तिकडे वळवला. बघते तर ती चहाचं आधण ठेवत होती. तिच्याकडे हात जोडून ती म्हणाली धन्य तुझी, तुला आवडत असेल तर कर मग.

आई हसत म्हणाली तुझाही टाकलायं. जा बस जा, जरा शांत. आलेचं घेऊन. मग ती धुसफुसतच बेडरूममध्ये जाऊन बसली. थोड्याच वेळात वाफाळता गवतीचहा घेऊन आई आली. पावसाळी वातावरणात चहाचा घोट घेतल्यावर ती जरा तरतरीत झाली. आपण आपला राग उगाचच आई-बाबांवर काढला असं तिला वाटलं पण तरी ही बाबांची चूक होती या मतावर ती ठाम होती.

तिने आईला विचारलं, अग इतकी वर्षे संसार झाला कंटाळा नाही का आला? अजूनही आज्ञेतच राहणार आहेस का? काय सुख दिलं गं त्यांनी तुला? कधी कुठे फिरायला नेलं नाही, अगदी साध्या पिक्चरला सुद्धा नाही. तू तुझ्या आवडीच्या साड्यादेखील घेवु शकत नाहीस. कायम स्वयंपाकघरातचं अडकलीस. घुसमट नाही का होत तुझी? बघत होतो आम्ही हे सगळं आणि मोठं झाल्यावर जाणवलं सुध्दा.

आईने चहाचा मस्त भुरका मारला आणि हसून म्हणाली, अच्छा म्हणजे रागाचं मूळ हे आहे तर. मग थांब. असे म्हणत दुखऱ्या गुडघ्यावर दाब देत ती उठली आणि तिने कपाटातून जुना बिस्कीटचा मोठा पत्र्याचा डबा तिच्या हातात दिला.

हे काय? तिने विचारलं. तर म्हणाली बघ तूच उघडून. उघडला तर डबा भरून घडी केलेल्या चिटोऱ्या. उघडून ती एक एक वाचू लागली काही चिटोर्‍यांवर सॉरी, काहींवर सुंदर, अप्रतिम, घायाळ असा एकच शब्द. तो हि गिचमिडया अक्षरातला. तिने ते अक्षर ओळखलं, बाबांचं होत ते. तरीही प्रश्न अजून अनुत्तरितच होता.

तिचा आश्चर्यमिश्रित प्रश्नार्थक चेहरा बघून आई म्हणाली ऐक आता. तुला माहित आहे का की आमचं लव्ह मॅरेज आहे ते? हे ऐकताच ती उडाली. आई जोरात हसत म्हणाली आता तुला काय सांगू? सासूबाईंना सुद्धा माहित नव्हतं. त्यांच्या काही जुन्या कॉलेजच्या मित्रांना फक्त कुणकुण आहे.

ते त्यावेळी कॉलेजमध्ये असताना आमच्या वाड्यात शेजारी दूध घालायला यायचे. तेव्हाच त्यांनी मला बघितलं. मोठे धाडसी हो तुझे बाबा. दुसऱ्या दिवशी कॉलेजात मला गाठली आणि म्हणाले आवडलीस तू मला. लग्न करशील माझ्याशी? मी तर पुरती भांबावून गेलेले. मग स्वतःच म्हणाले, तूझ ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत वाट पाहीन मी. आणि असे म्हणून निघून सुद्धा गेले.

त्याकाळी असं काही प्रचलित नव्हतं, घरी जाऊन आई-वडिलांना सगळं सांगितलं. त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांना वाड्याच्या दरवाजातच गाठलं आणि दरडावून विचारलं काय रे? काय फाजिलपणा चालवला आहेस? वाडयात यायचे बंद करीन. तर ते हसतच म्हणाले, सर तुम्हाला भेटणारच होतो, तुम्हीच भेटलात ते बरं झालं. त्यानंतर त्या दोघांमध्ये काय बोलाचाली झाली ते माहीत नाही. पण माझ्या ग्रॅज्युएशन नंतर बाबा रीतसर यांच्या घरी जाऊन आले आणि आमचं लग्न पार पडलं.

आता विचारशील बाबांनी काय दिलं? तर तुला सांगते. हो त्यांनी कधी मला बाहेर फिरायला नेलं नाही अगदी पिक्चरला सुद्धा. तुला आठवतं का? नवीन पिक्चर आला की बाबा आवर्जून त्याची तिकीटं काढायचे आणि तुम्हा दोघींना काकांसोबत पाठवायचे. सासूबाई ही त्या दिवशी भजनाला जायच्या. मग त्या दीड खणाच्या घरातच आम्ही देश परदेश फिरुन यायचो. तोच वेळ आमच्यासाठी आमचा दोघांचा असायचा. एकदा तुम्ही संजीवकुमारचा पिक्चर बघून आल्यावर तू गळ्यात मेरा नाम कैश है! अशी पाटी लावून फिरत होतीस. अमिताभ बच्चन तुझा फेवरेट. घरी आल्यावर काका आणि तुम्ही दोघी पिक्चरचे डायलॉग आमच्या पुढे सादर करायचात. आमची तर हसून हसून मुरकुंडी वळायची.

आणि साड्यांचं म्हणशील तर त्यांना माझे आवडते रंग माहीत होते. पाहिल्या सासूबाईंना आणि वन्संना साड्या दाखवायच्या. त्यांची निवड झाल्यानंतर उरलेली साडी माझ्या पदरात आणि ती पण माझ्या आवडीची हे सांगताना आईने डोळे मिचकावले. कारण दुसऱ्या साड्या त्यांना कशा छान दिसतील हे ते अगदी मस्त पटवायचे त्यांना.

अगं बरंच काही आहे पण सगळं काही शब्दात मांडता येतं का गं? समोरच्याला समजून घेतलं की आपल्यालाही तो समजून घेतो. मग शब्दांवीण सुद्धा संवाद साधता येतो.

माणूसच आहे मी. मलाही कधीकधी राग यायचा. मग काय? जेवणाचा डबा रिकामाचं जायचा. आमचा कोडवर्ड होता तो. त्यांना कळायचं मी रागावली आहे ते. संध्याकाळी त्या डब्यात ह्या sorry च्या चिटोऱ्या बरोबर एखादा गजरा, राखून ठेवलेल चॉकलेट, पेढा असं काहीतरी यायचं. मग माझा राग कुठल्याकुठे पळून जायचा दुसऱ्या दिवशीच्या डब्यात त्यांच्या आवडीचं जायचं. कधीकधी हा रुसवा बरेच दिवसही टिकायचा मग ह्या एक शब्दाच्या चिटोऱ्या. अकाउंटंट माणूस, त्याला शब्द तरी कुठून सापडणार? आईने चिटोऱ्यांचे गुपित तिला सांगितलं आणि मग खू खू हसत राहिली. 

पुढे म्हणाली आता तू ज्या चहावर रागावलीस ना, ती हि सवय त्यांना रिटायरमेंट नंतर लागली. काहीतरी टाईमपास हवा न गं. नाहीतर भाऊजींचे शिक्षण, वन्संचं लग्न, तुम्ही दोघी, सासूबाईंचा आजारपण हे सांभाळताना त्यांनी कधी स्वतःसाठी चहावर सुद्धा पैसे खर्च केले नाहीत. आठवतं? दर एक तारखेला ते आपल्याला बाजारात डोसा खायला घालायचे त्यावेळी आणि सुटीच्या दिवशी काय चहा घेतील तेवढाच.

तिच्या डोळ्यापुढे कौतुकाने डोसा भरवणारे बाबा उभे राहिले. कसं काय आपण हे सगळे छान क्षण विसरलो? तिने भरल्या डोळ्याने हळूच आईचा हात दाबला. आईनेही तिला थोपटले .

त्यांना डायबिटीस आहे आणि हे माहीत असूनही तोंडावर नियंत्रण नाही ठेवू शकत. म्हणून ते मला चहा करायला सांगतात. मग मी दिला की आपोआप तो कोरा चहाही आनंदाने पितात. माझीही थोडी हालचाल होते. अगं म्हातारपणी स्वतःला तंदुरुस्त ठेवणं हीच मोठी मदत आहे आमची एकमेकांना.

हे समजण्यासाठी संसार लोणच्यासारखा मुरावा लागतो. लोणच्यात जश्या सगळ्या चवी कालांतराने एकरूप होतात, तसेच सगळे राग, लोभ अन द्वेष सुद्धा लयाला जातात. 

आता तू सांग तुझ काय बिनसलयं? जावईबापूंना काय झालयं? आईने विचारलं. तुला कसं कळालं? तिने विचारलं? तिला चापट मारत आई म्हणाली, आई आहे तुझी आणि बत्तीस वर्षांचा अनुभव आहे पाठीशी म्हटलं.

अग काय हे? एकमेकांना चांगलं पसंत करुन पारखून स्वतः ठरवून लग्न केलस ना आणि बघितलं तर दिवसभर ऑफिसमध्ये. मग वेळ कधी मिळतो गं भांडायला?

आता मात्र ती कडाडली, आई मुद्दा तोच आहे. वेळ नाही त्याच्याकडे माझ्यासाठी. गेले आठ दिवस बोलत नाही आहोत एकमेकांशी. साधा फोनही नाही केला त्याने मला.

अगं मग तू केलास का? ताणून धरु नये ग फार. लग्न करताना तू तर अभिमानानं म्हणाली होतीस त्याचं कामच त्याचं पॅशन आहे, मग आता दुस्वास का? असा वेळ काढून होत नाही, आपणच आपले सुखाचे क्षण वेचायचे असतात. 

मेलं आमच्याकडे काही फोनबीन नव्हते. एकमेकांकडे बघूनच सगळं कळायचं. एवढा विश्वास होता एकमेकांबद्दल. तुमचं काय? कायम तुम्ही त्या फोनला चिकटलेले. प्रत्येकवेळी बोलायलाच कशाला पाहिजे गं? दिवसातून एखादा मेसेज, घरी आल्यावर पाच मिनिटे का होईना एकमेकांची विचारपूस सुद्धा पुरेशी ठरते. त्यासाठी काही फॉरेन टूर काढल्या पाहिजेत किंवा सारखं त्या फेसबुकवर स्टेटस अपडेट केलं पाहिजे असं थोडीच. मेलं घरातल्यांपेक्षा बाहेरच्यांनाच सगळं माहिती. बघितलीत मी दोघांची फेसबुक स्टेटस, काय मेली ती थेरं. 

आता तिला चक्कर यायची बाकी होती. आई तू फेसबूक बघतेस? अग हो, दोघेही बघतो. हल्लीच शिकलो आमच्या सिनिअर क्लबमध्ये. तेवढाच विरंगुळा. आम्हीही टेक्नोसावी का काय म्हणतात ते आहोत बरं का. असं म्हणत आईने टाळी मागीतली.

मग तू मी आल्यावरच मला का विचारलं नाहीस? तिने उखडून विचारलं. आई म्हणाली, म्हटलं बघूया किती तग धरतेस ते. पण बिचाऱ्या बाबांवर उगाचच चिडलीस. वडाच तेल वांग्यावर असं झालं ते.

बाबांना जाऊन आत्ताच सॉरी म्हणते, ती वरमून म्हणाली. आता राहू दे ते सगळं आणि पहिले जावईबापूंना फोन कर आईने सल्ला दिला. मी का बोलू त्याने करावा की फोन? इती ती.

आई हात जोडून म्हणाली सगळं मुसळ केरात. एवढा वेळ काय समजावतेय मी?

आण तो फोन इकडे असं म्हणून आईने तिचा फोन हिसकावून घेतला आणि एक मॅसेज टाईप करुन जावईबापूंना धाडून दिला.

पंधरा मिनिटे झाली काहीच प्रत्युत्तर नाही. मग ती आईला वेडावून दाखवत म्हणाली बघ काय म्हटलं होतं मी? कऴलं आता तुला? जरा पड आता आणि मलाही पडू देत आई म्हणाली. बघ आता काही उत्तर नाही ना म्हणून पळवाट काढतेस. असं म्हणून कूस बदलून ती झोपी जाणार तेवढ्यात दाराची बेल वाजली.

आता कोण कडमडलं? आई बघ ना जरा? माझे म्हातारीचा गुडघे दुखतायत, तूच बघ जा असे म्हणून आईने टाळलं . ती तशीच पाय आपटत दरवाज्याकडे निघाली. दरवाजा उघडून बघते तर समोर तो उभा. पटकन त्याच्या मिठीत शिरली. आईने आतूनच विचारलं, आम्ही बाहेर यायचं का? तर म्हणाली, काही नको तू आराम कर आम्हीच दोघं बाहेर जातोय.

बाहेर पडल्यावर तिने विचारलं काय रे, आईचा मेसेज मिळाल्यावर पंधरा मिनिटात कसा काय हजर झालास? कुठला मेसेज? त्याने विचारलं. अगं तुझ्या बाबांनी फोन करून चांगलीच हजेरी घेतली आणि घरी यायला सांगितलं. तिच्या आत्ता लक्षात आलं , अरे आपल्या फोनला तर पासवर्ड आहे. आणि आईने आपल्याला कसं मूर्ख बनवलं याचं तिला हसू आलं.

आणि ती अंतर्मुख झाली. एवढा वेळ तर आई आपल्याशी बोलत होती. बाबांचं आणि तिचं एका शब्दानही बोलणं झालं नाही मग त्यांना कशा कळल्या आपल्या भावना. नक्कीच त्यांच्या दोघांमध्ये एक अदृश्य बंध होता जो परस्परांवरील गाढ प्रेम, विश्वास, ओढ, सकारात्मक दृष्टिकोण आणि संयम यांच्या घट्ट विणीने बनला होता. आपणही असंच बनायचं असा विचार करत तिने त्याच्या हातात हात गुंफले आणि सहज मागे वळून बघितले. तर हा जोड गॅलरीत उभा. मावळतीच्या सुर्याची किरणं आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद याची एक वेगळीच प्रभा त्यांच्या भोवती तयार झाली होती. तिने हलकेच एक फ्लाइंग कीस त्यांच्याकडे फेकल. ते त्या दोघांनी पकडलं आणि आपल्या भोळ्या पिल्लाकडे डोळे भरून बघत राहिले. दूर कुठेतरी गाणं वाजत होतं.

“दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसे

जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे!” 

 अंजली कुबल

1 टिप्पणी: