बर्फाचा गोळा उर्फ चुसकी


सिंगापुरात १२ महिने उन्हाळा असतो. आंबे जरी बारा महिने मिळत नसले तरी थंड पेयांची चंगळ आपण १२ ही महिने मनसोक्त करू शकतो. तुम्हाला आवडेल आणि करायला सोपा असा एक पदार्थ इथे सांगतो आहोत. 

महाराष्ट्र मंडळाच्या नुकत्या झालेल्या महाराष्ट्र दिन खाद्य मेळाव्यात आम्ही तो तिथल्या तिथे करून विकला आणि सर्वांना खूप आवडला. तुम्ही देखील करून पहा आणि सांगा आवडतो का.


साहित्य :
  1. बर्फ किसण्यासाठी किसणी किंवा ICE Shaver मशीन किंवा मिक्सर
  2. बर्फाचे ४-५ मोठे खडे
  3. आवडीनुसार गारेगारवर टाकण्यासाठी रंग व चवीची सरबते (थोडीशी घट्ट हवीत. सरबत कॉन्सन्ट्रेट किंवा स्क्वाश असेल तर जास्त चांगले.
  4. उभट छोटा कप किंवा कुल्फीचा साचा
  5. वाटी चमचा
  6. एक लाकडी आईसक्रीम कांडी
  7. मीठ व चाट मसाला - लागल्यास
    कृती :
  • सर्व प्रथम वाटी मध्ये तुम्हाला आवडेल त्या चवीचे घट्ट सरबत घ्या व त्यात एक मोठा व खोल चमचा घाला. कोकम सरबत, मॅप्रोचा आंबा सरबत कॉन्सन्ट्रेट, मॅप्रोचा संत्रे सरबत कॉन्सन्ट्रेट तसेच रूह अफज़ा चा शाही गुलाब अथवा रासनाच्या कोणत्याही सरबताचा कॉन्सन्ट्रेट याला चालेल.
  • बर्फ किसणीवर किंवा Ice Shaver मध्ये किंवा मिक्सर मध्ये किसून अथवा बारीक करून घ्या.
  • अजिबात वेळ न दवडता तो लगेच साच्यामध्ये निम्म्या उंचीपर्यंत घाला.
  • त्यात लाकडी कांडी घाला पण ती एकदम तळापर्यंत जाऊ देऊ नका.
  • बर्फावर बोटाने दाबून तो साच्यात व कांडीच्या आजूबाजूने घट्ट करा. त्यात अजिबात जागा राहू देऊ नका. नाहीतर कांडी बाहेर काढल्यास बर्फ पडून जाईल.
  • मग उरलेला बर्फ घालून पुन्हा घट्ट होईतो दाबा.
  • साचा दोन तळव्यामध्ये धरून थोडा पुढे मागे गोल फिरवा जेणेकरून बर्फाचा गोळा साच्या पासून थोडा सुट्टा होईल .
  • अलगद कांडीधरून आता बर्फाचा गोळा बाहेर काढा.
  • कांडी एका हाताने गोलगोल फिरवीत दुसऱ्या हाताने चमच्याने त्यावर सरबताचं पाणी ओता. हे सर्व अतिशय पटकन झाले पाहिजे. नाहीतर बर्फ वितळेल. तसेच सरबत थोडेच घाला.जास्त घातल्याने बर्फ ओघळून जाईल. तसेच सरबत सर्व भागात नीट लागले आहे ना हे पहा. कृती मधला हा भाग सर्वात अवघड आहे. २-३ वेळा सराव केला की जमेल .
  • आवडी नुसार तसाच किंवा वर मीठ चाट मसाला घालून हा गोळा खायला द्या.
  • जर गोळा बनायला अवघड जात असेल तर बाजारातून तयार आईस क्रीम कोन आणून त्यात किसलेला बर्फ व वर सरबत घालून द्या. मुलांना हे ही खूप आवडते.
अनुवाद : नलिनी थिटे 

- ओजस वैद्य

२ टिप्पण्या: