प्रेम - एक वेगळी फ्रेम

ऋतुगंध वसंत वर्ष १३ अंक १

प्रेम फक्त स्वित्झरलॅंडमधे शाहरूख खान ने आपल्या खास अदाकारीने हात पसरवूनच व्यक्त करावं असं काही नाही. वास्तवातलं प्रेम काहीसं आर्ट फिल्मसारखं असतं. अशीच एक सत्यघटनांवर आधारित प्रेमाची गोष्ट पाहुया दोन वेगळ्या फ्रेम्समधून.

फ्रेम १: वट सावित्री
काकांच्या ठसक्याने काकू दचकून जाग्या होतात. “काय झालं हो? बरं वाटतय ना?” 
“काही नाही. बाथरूमला जाऊन येतो. झोप तू.” 
दुखऱ्या गुडघ्याने जमेल तसं चालत काका बाथरूमला पोहोचतात, दिवा लावतात, दाराची कडी उघडून आत जातात, दार लावून घेतात पण आतून कडी लावत नाहीत — काकूंची तशी ताकीदच आहे — फ्लशचा आवाज होतो, मग दाराचा, नंतर दिवा बंद होतो. काका पुन्हा अंथरुणात येऊन बसतात तेव्हाच काकू पाठ टेकतात. पण काका घोरू लागत नाहीत तोवर काकूंना काही डोळा लागत नाही. 

काकांना हृदयविकाराचा झटका येऊन आता तब्बल वीस वर्षं उलटली आहेत. पण काकूंच्या मनावरचं भीतीचं सावट काही जात नाही. इतकी वर्षं वट-सावित्रीच्या निष्ठेने काकूंनी काकांचं पथ्य पाळलय, त्यांची तब्ब्येत सांभाळली आहे. 

अटॅकनंतरचा काळ एका कठीण परीक्षेसारखा होता. कमवणारे फक्त काका. पण त्यांची कंपनी आधी बंद पडलेली आणि मग ते स्वत: आजारी पडले. घरात तरूण मुलगी. मुलगा असता तर त्याला वेळी-अवेळी औषधं आणायला, हॉस्पिटलात थांबायला सांगता आलं असतं. 
जे.जे. हॉस्पिटलच्या जनरल वार्डात रुग्णाबरोबर थांबायची सोय नव्हती. मग काकूंनी अनेक रात्री पत्र्याच्या स्टुलावर बसून काढल्या. काका जरा कण्हले की स्टुलावरून ताडकन उठून काकांजवळ जात, व अनेकदा नर्सला बोलवत. दिवसातून अनेक वेळा नर्सला त्या विचारत, “डॉक्टर काय म्हणाले?”.
तो काळ सोसायला काकूंनी कुठून हिम्मत आणली कुणास ठाऊक. ही जिद्दं प्रेमातूनच आली असेल. 

काका घरी परतल्यावर त्यांचा अख्खा दिवस कसा आखायचा ह्याची काकूंना चिंता होती. कंपनी बंद झाल्यामुळे काकांना करायला काही नव्हतं. अशात मानसिक ताण वाढून पुन्हा हृदयविकार होण्याची शक्यता होती. 

बरं, काकांचा स्वभाव असा खाष्ट की त्यांना सूचना देणं तर दूरच पण साधं काही सुचवणंही कठीण होतं. काका अबोल तर होतेच पण बोलायचे तेव्हा खडसावल्यासारखेच. घरी नातेवाईक व शेजारी पाजारी यायला चाचरत असत. 
पण आजारपणानंतर काका मवाळ होत गेले आणि काकू अधिकाधिक खंबीर. जे.जे.तल्या जागरणांनी, त्यावेळच्या नैराष्येने जणू काकूंना कणखर बनवलं होतं. 
आता काकांच्या “अरे” ला काकूंचा “का रे” येऊ लागला.
काकूंच्या बदललेला स्वभावामागची त्यांची काकांवरची श्रद्धा होती. कदाचित ह्याचीच जाणीव होऊन काकांनीही अनेक वर्षांची सिगारेटीची सवय मोडली. 

हळूहळू काकूंनी नवीन नियम बनवले. बाजारहाट, व घरातील काही कामं, जसं झाडांना पाणी घालणं, भाजा निवडणं ही काकांना नेमून दिली.
काकांच्या व स्वत:च्या खाण्यापिण्याला आवर घातला. घरात जर तळलेलं, चमचमीत वा गोड-धोड आणलं किंवा बनवलं तर काकांनाही इच्छा होणार. त्यापेक्षा ते पदार्थ बनवणच बंद कराव. भेटायला येणाऱ्यांनाही असले पदार्थ न आणण्याची ताकीद दिली. बरं, काकूंना साखरेचा त्रास नाही. तरीही अनेकअनेक महिने त्या साधी केळ्याची शिक्रणही बनवत नसत. पण मुलीचे हाल होऊ नयेत म्हणून काकू आठवडा-पंधरवड्यात तिच्यापुरतं थोडसं काहीतरी बनवत. कालांतराने मुलीचं लग्न झाल्यावर हे ही बनवणं बंद झालं. 

जेव्हा मुलीचं लग्न झालं तेव्हा घर अगदी रिकामं झालं. मग शिस्तीपोटी लावलेल्या सवयीची — आणि नाइलाजाने एकमेकाची — सोबत वाटू लागली. काका-काकूंची नव्याने ओळख झाली.

भाजी निवडता निवडता काका बातम्यांबद्दल काकूंशी बोलू लागले. बाजारात कोण भेटलं, काय भाज्या होत्या इत्यादि विषय काढू लागले. 

लग्नाला चाळीस-एक वर्षं उलटल्यावर नात्यात एक वेगळा ओलावा येत होता. 

काकूंना मोतीबिंदू जडला तेव्हा काकंनी पायपीट करून रेडक्राॅसमधे शस्त्रक्रिया करून घेतली. खाजगी रूग्णालय परवडणार नव्हतं ना. काही दिवस काकांनी चक्क पोळ्याही केल्या! 
काकूंचा डोळा दुखे तेव्हा काका कधी उशापाशी बसले नाहीत, पण “औषध घेतलंस का?”, किंवा “जेवायला झुणका भाकरी आणली तर चालेल ना?”, असं विचारत. त्यांच्या त्या करड्या आवाजात परिस्थितीने एक आपुलकी आणली होती पण ही गोष्ट दोघेही कबूल करणार नाहीत... कदाचित स्वत:शीही ! 


———————-

फ्रेम २: चक्रम माणूस
“अहो! इकडे या”, काकूंचा टाहो ऐकून काकांनी टीव्हीवरील मॅडमना म्यूट केलं आणि दुखऱ्या गुडघ्यांना झेपेल त्या वेगाने स्वयंपाकघराकडे सरसावलें. “हे एवढे बटाटे काय करायचेत? आणि ते चोकोज् कुणासाठी?” काका दिसताच काकूंचा दुसरा हल्ला.
“अगं, मुलं यायचीत ना दोन दिवसात म्हणून आणलय थोडंसं,” काकांचं स्पष्टिकरण.
“मुलं पुढल्या आठवड्यात यायचीत. तोवर काय तुला देऊ बटाटे वडे? का मी खाऊ चोकोज् दुधातनं?! चक्रम माणूस नुस्ता!”
तर ही अशी राजा-राणीची जोडी. टाम अॅण्ड जेरी म्हणा, हवं तर, नाही तर अगदी ‘सास-बहु’ सुद्धा चालेल! एकुलतं एक कन्यारत्न परदेशात असतं, आपला नवरा व दोन गोंडस मुलांबरोबर. ती जेव्हा भेटायला येते तेव्हा तोफांचं डागणं जरा कमी होतं. 
वीस-एक वर्षांपूर्वी काकांना जाब विचारायची कुणाची हिम्मत नव्हती; काकूंची तर नाहीच नाही. काकांचा तो जड आवाज, रशियन हेरासारखे भावनाशून्य दगड डोळे व अबोल स्वभाव. एकंदर समोरच्याला गार करणारं व्यक्तिमत्त्व. अशा मुळे, पूर्वी काका ‘सास’ तर काकू ‘बहु’ असं समीकरण होतं. पण ऋदयविकाराच्या झटक्यानंतर ते उलट झालं.
आता तर त्यांच्या डोळ्यात ममताही दिसते. अहो ममता दीदी नाही हो; त्या आहेत काकूंच्या रूपाने. ममता म्हणजे माया, त्यांच्या दोन नातवंडांकरता. 
असो, ममता दीदी... म्हणजे, सॉरी, काकू काकांना नेहमीच एकेरी संबोधत नाहीत हां. कधी प्रेमाचा बांध तुटला की ते शब्दात व्यक्त होतं. 
त्यात दोघांचे अगदी छत्तीस गूण जुळावेत असे स्वभाव. काकू बोलक्या तर काका मूकपट. काकूंना भेटीगाठी करायला आवडतं तर काकांना त्यांचा टीव्ही बरा. काकू जर नोकरी वा व्यवसाय करत असत्या तर त्यांचा गोतावळा फार मोठा झाला असता. 
तर अशा आमच्या काकूंना अठराव्या वर्षी लग्न झाल्यापासून काकांशी नीट मैत्री करायलाच मिळाली नाही की कधी सलगी साधता आली नाही. लग्नाच्या तीस वर्षांनंतर काकूंना ही संधी मिळाली आणि ती ही आजारपणामुळे. आता काकू त्याचा पुरेपूर वापर करणार होत्या. 

काकांवर शस्त्रक्रिया व उपचार जे.जे. हॉस्पिटलात झाले. तिथल्या जनरल वार्डात रुग्णाबरोबर कुणाला थांबायची व्यवस्था नव्हती. मग काकूंनी अनेक रात्री पत्र्याच्या स्टुलावर बसून काकांची निगराणी केली. अहो, मुंबईतला प्रसिद्ध खडा पारशाचा पुतळा वाकेल पण आमच्या काकू जैसे थे! काकांना बरं करायच्या त्यांच्या जिद्दीसमोर यमराजच नव्हे तर काकांच्या आडमुठ्या स्वभावानेही हार मानली. पण काकू एवढ्यावर कुठे ऐकणार होत्या? त्यांना काकांच्या दुसऱ्या इनिंगची फील्डिंग लावायची होती ना!

इंदिरा गांधी, मार्गारेट थॅचर ह्यांच्यासारख्या पोलादी इराद्याने काकूंनी सिगारेट, वडा-पाव, फरसाण यांना घराबाहेर केलं. काकूंचं हे रूप बघून काकांनीही टिळक, वल्लभभाई पटेल यांना रामराम ठोकून मनमोहन सिंग पवित्रा धारण केला: कमी तेलाचं जेवण गोड मानून खाऊ लागले. रात्रीच्या ताटातून वजा झालेल्या भाताबद्दल तक्रार केली नाही. प्रत्येक जेवणातील लसणीच्या पाकळ्यांना सुकी मच्छी (काकांचं फेवरिट!) समजून आवडीने खाऊ लागले!
नेमून दिल्याप्रमाणे काका रोज प्रभात फेरीस जाऊ लागले. येताना दूध, भाजी ईत्यादी आणू लागले. मग नाश्ता वगैरे झाल्यावर झाडांना पाणी घालणे, आणलेली भाजी निवडणे अशी कामे. हे सारं झाल्यानंतरच टीव्ही!
काकूंची ही निष्ठा वटसावित्रीला लाजवणारी पण जर काकांना त्यांच्यात सावित्री कमी आणि सटवी जास्तं दिसली असेल तर वाचकांनी काकांना माफ करावं. 

ह्या नवीन काकूंची कारकीर्द आणखी आहे: 
एकदा विळीवर अंगठा कापला. कापला म्हणजे पार हाड दिसेपर्यंत! पण पुढील थरार सीन तर असा होता की खुद्द रजनीकांत पुन्हा पुन्हा रिवान्ड करून पाहील! काकूंनी थंडपणे विळी सिंकमधे ठेवली. मग फ्रीजमधून बर्फाचा तुकडा घेतला व फडक्याने अंगठ्यावर करकचून बांधला. मग फरशीवर जे थोडे रक्ताचे डाग होते ते पुसले, स्वयंपाकाचा पसारा आवरला आणि मगच घड्याळाकडे कटाक्ष टाकून निर्णय घेतला की डॉक्टर अजूनही भेटतील. मुलीचं घर रिक्षेनी पाच मिनिटावर — तसं दोघींकडे मोबाईलही होतेच — पण तिला का त्रास द्या? ती घााबरली तर आणखी तिला सांभाळा. सांगितलय कुणी. सकाळच्या ११:३० च्या कोवळ्या उन्हात झाशीच्या राणीने दवाखान्याकडे कूच केली... चालतच. (रिक्षेला कोण ११ रुपये मोजेल?)
दवाखान्यात राणी, म्हणजे काकू, पोहोचतायत तो त्यांना थोडी चक्कर आली. डॉक्टरांनी हातचा रुग्णं सोडून तडक काकूंना तपासायला घेतलं. सारा प्रकार कळल्यावर डॉक्टरांनी राष्ट्रपती भवनात शौर्य पदकासाठी फोन लावला. पण फोन लागेना! पाहतात तो काय; काकूंनी दुखऱ्या हातानेच फोनची वायर ओढून काढलेली! मोबाईल शोधला तर तोही काकूंनी ताब्यात घेतलेला! डॉक्टर चाट पडले! “डॉक्टर, आधी मलम पट्टी करा” काकूंच्या तोंडून गब्बरचा आवाज ऐकताच डॉक्टरांनी मुकाट्याने मलम पट्टी केली. 
एव्हाना काका घरी परतले व कुलूप पाहून काकूंना फोन लावला. सारी हकीकत कळली, तसे आमचे ‘नव्या’ रुपातले काका परत खाली उतरले. कोपऱ्यावरील फूलवाल्याकडून गजरा आणला व बाजूच्या डेअरीतून आइस्क्रीम. काकू काही वेळाने परतल्या तर त्यांना विचारलं, “आइस्क्रीम खातेस?” लग्नाच्या चाळीस वर्षांनंतर ही एवढी ममता आमच्या इंदिरेला सोसली नाही आणि ती पुन्हा चक्कर येऊन पडली. अहो, “शी फेल इन लव्ह, ना!”

- केशव पाटणकर



१७ टिप्पण्या:

  1. खुप छान! कथा आवडली, अगदी आपलंसं वाटेल अशी. अनेक शुभेच्छा!!

    उत्तर द्याहटवा
  2. छान लिहिलं आहे ... कीप उप द गुड वर्क ☺️

    उत्तर द्याहटवा
  3. अप्रतिम!!! कथा काल्पनिक आहे की घडलेली, काही असो कथेची मांडणी छान आहे.असेच लिहित जावे.पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा
  4. क्या बात हैं.. लिहिलयस छानच...पण आपली आवड जोपासणे सोपे नाही.त्याबद्दल विशेष अभिनंदन.. 👍👌

    उत्तर द्याहटवा
  5. Atiii sundar hube hubh varnan kaka kakinch ek mekavar asnara prem kalji vekta hoth aahe vachtana dolyat panni anni ghashyat awnda,dathuun kanth aala
    Thank you
    Dada

    उत्तर द्याहटवा
  6. Atiii sundar hube hubh varnan kaka kakinch ek mekavar asnara prem kalji vekta hoth aahe vachtana dolyat panni anni ghashyat awnda,dathuun kanth aala
    Thank you
    Dada

    उत्तर द्याहटवा