आनंदाचे डोही आनंद तरंग

ऋतुगंध वर्षा  वर्ष १३ अंक ३

बालपणीचा काळ सुखाचा असतो. चिंता, काळजी आणि कुठल्याही प्रकारची जवाबदारी नसलेले मुक्त बालपण स्वछंदी फुलपाखरासारखं असतं. सिनेमातल्या "फ्लॅश बेक" सारखं आयुष्यात परत जाता आलं असतं तर या स्वछंदी आनंदयात्रेचे हसरे कितीतरी क्षण परत अनुभवता आले असते. तशी आता पण कधी कधी मनाची स्वारी भूतकाळात फेरफटका मारून येतच असते.

ती बघा....दोन घट्टमुट्ट वेण्या घातलेली “ती” उतरत्या छपरावरून वेगात खाली पडणाऱ्या पावसाकडे पाहते आहे. पावसाच्या पाण्यात कागदी बोटी सोडताना तिला जाम मजा येते आहे. मैत्रिणीला दप्तर आणि छत्री देऊन पावसात भिजत येण्याचा आनंद तिच्या चेहेऱ्यावर ओसंडून वाहतो आहे...

घराभोवती असलेल्या आवारात तासंतास सायकल चालवत गाणी आणि वेगवेगळ्या कथा रचण्याचा आवडता मनखेळ रंगला आहे. कथा कागदावर का आल्या नाही? माहित नाही, पण गाण्यानी साथ सोडली नाही.

आगगाडीत खिडकीची सीट मिळाली म्हणून ती खूश आहे.(आजही होते) पळत जाणाऱ्या झाडांबरोबर गाणी म्हणत, प्रवासात येणाऱ्या स्टेशनाची नाव वाचत ती रंगली आहे. तिच्या वाढदिवसाला घरी केलेलं pot Ice-cream समोसे ती चवीने खाते आहे. शाळेत आणि घरी सर्व खेळात भाग घेणारी ती मैदानात अनवाणी रमली आहे.....

आनंदयात्रेचा हा फ्लॅश बेक डोळ्यासमोर सरकतांना संमिश्र भावना उचंबळून येत आहेत. त्या काळात फिरून आल्याचा आनंद आणि आता काहीही करण्याचा स्वातंत्र्य असलं तरी ती “मजा” नाही याची हुरहूर....मन वढाय वढाय दुसरं काय ....

प्रत्येकाची "आनंदाची" संकल्पना वेगळी असणार. वयाबरोबर व्याख्यासुद्धा बदलत असावी; पण आनंदी माणसाचा सदरा आपल्याला स्वतःला शिवायचा असतो. शाळा कॉलेज मधे असतांना मी दांडी मारत नसे. पावसाळ्याचे दिवस होते, खूप पाऊस पडत होता, आई मला म्हणाली, “एक दिवस कॉलेज मधे गेली नाहीस तर काही बिघडणार नाही”. पण कसलं काय, एक तर भिजण्याचा सोस भारी आणि मैत्रीण पण येऊन तयार, गेलो तश्या पावसात. कॉलेज मधे उपस्थिती तुरळक होती. सर आणि आम्ही विद्यार्थ्यांनी गाणी म्हंटली, गप्पा मारल्या,टपरी वर चहा प्यायला ...आजही त्या हास्याच्या लकेरी कानात गुंजन घालत आहेत. आनंदयात्रेच्या स्मृती मनात घर करून बसल्या आहेत. काही तरी कारण घडत आणि आनंदाचा हसरा सुगंध दरवळत राहतो.

कुठल्याही गोष्टीची निर्मिती वेगळाच आनंद देते. मनासारखा झालेला पदार्थ,चित्र, लेख, गाणं, कविता .... अशा कितीतरी गोष्टींची मोठी यादी आहे पण यातून मिळणारा आनंद मात्र अगदी अद्वितीय असतो. कदाचित एखाद्या निर्मितीचा परिणाम परिपूर्ण नसला तरी ती प्रक्रिया करताना मिळालेला आनंद चेहेऱ्यावर हसू फुलवून जातो.. मातेला देवाने बहाल केलेला अपत्य निर्मितीचा आनंद हा आगळा वेगळा आहे. मूल कितीही मोठं झालं तरी त्याला वाढवतांना लाभलेल्या आनंदी क्षणांच्या आठवणींना आईवडील वेळोवेळी उजाळा देत राहातात. कुणाला कशात आनंद वाटेल हे सांगता येत नाही,पाळीव प्राण्यांबरोबर खेळणं, सहलीला जाण, ट्रेकिंग करणं, गप्पा मारणं, सामाजिक सेवा करणं, वाचन, गायन, नाच, गाणं, स्वतःच्या क्षेत्रात मन लावून काम करणं ....सोप्या शब्दात मन आनंदी ठेवणं आपल्या हातात आहे.

मानवी जीवन हे आशा-निराशा, अपेक्षा-उपेक्षा, सुख-दुःख, यश- अपयश, जय-पराजयाच्या तराजूत झुलत असतं. अशावेळी मनाला आवडेल त्या कार्यात गुंतवून ठेवणं,स्वतःला आवडेल ते करणं मन प्रसन्न करायला मदत करतं. जीवनात वेगवेगळ्या प्रकारे आनंदचा डोह जर तयार केला तर मन आनंदाच्या तरंगावर नक्कीच तरंगेल.

- हेमांगी वेलणकर

1 टिप्पणी:

  1. खूप छान!! आनंदी माणसाचा आपला सदरा आपणच शिवायचा असतो,हे तर खूपच आवडले.

    उत्तर द्याहटवा