माणूस ट्रेकिंग का करतो?

ऋतुगंध वसंत वर्ष १३ अंक १

“अहो वैद्य, एक विचारू का?”

“विचारा ना काका”

“तुम्ही हे असं डोंगर दऱ्यात, जिथं धड रस्ते नाहीत, राहायची सोय नाही, अशा ठिकाणी जाताच कशाला?”

काका मनातल्या मनात “कडमडायला” असे म्हणाले असावेत. 

“म्हणजे हे असे तुम्ही मोठ्या हुद्द्यावर काम करता. छान घरात राहता. सुखवस्तू वाटता. मग काय ही सुखाचा जीव दु:खात घालायची हौस?” काका पुणेकर असावेत . 

मी नुकताच एव्हरेस्ट बेस कॅम्पचा ट्रेक करून परत आलो होतो आणि त्या ट्रेकविषयीची माहिती देणारे व्याख्यान संपवून पाणी पीत होतो. तेव्हां जे प्राण कंठाशी आले ते काकांच्या प्रश्नांनी आले कीं ठसका लागल्यामुळे आले हे सांगणे अवघड आहे. 

“एकदा या विषयावर तुमच्याशी सविस्तर बोलायचंय”, असं म्हणून पळ काढला. 

काकांना काय माहीत की मी पण पुणेकरच आहे. 

पण माझ्या नंतर हळूहळू लक्षात यायला लागलं की हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे फक्त काकांसारखं बेधडक विचारायचं कोणी धाडस करत नाही. आपापल्या गांवांचा परिणाम दुसरं काय? 

माणूस ट्रेकिंग का करतो? याचं उत्तर जगाच्या उत्क्रान्ती मध्ये माशांना जमिनीवर कां यावंसं वाटलं याच्या इतकंच गहन आहे. जसे मासे पाण्यात अतिशय सुखी होते, मुबलक अन्न होतं, सगळे आप्तस्वकीय होते तरी काही मासे त्रास सोसत, हवेत श्वास घेण्याचा प्रयत्न करत बाहेर आलेच. तसेच शहरी सुखात डुंबणारे आम्ही, आजूबाजूचे ऐषाराम सोडून आणि सोफ्यावर बसलेल्या कुटुंबियांना सोडून मधूनमधून डोंगराची वाट पकडतो. पण आमच्या केस मध्ये मात्र श्वास घेणे सोपे असते. 

माझ्या बरोबर ट्रेकला येणाऱ्या बहुतेक जणांच्या ट्रेकिंगची सुरुवात शालेय जीवनात, एखाद्या सहलीबरोबर झाली. आमच्या शालेय जीवनात “आपण हे का करतोय?” असा प्रश्न कधी पडायचाच नाही. "गप्प बसा !" संस्कृतीत ते allowed नव्हतं. मग ट्रेकिंग ची सहल त्याला अपवाद का असावी? मग काय, मी पण निघालो भाजा लेणी ते लोहगड अशा ट्रेकला, भर पावसाळ्यात. 

हिरवे गर्द डोंगर, त्यांच्या माथ्यावर काळ्या-राखाडी रंगांच्या घनांच्या टोप्या, त्याच्या अंगा खांद्यावर शुभ्र पांढऱ्या रंगानी ओढलेल्या धबधब्यांच्या रेषांची अमूर्त नक्षी, वाऱ्याच्या झुळुकीच्या इशाऱ्यावर ये जा करणारे धुके आणि आजुबाजूला वाहणाऱ्या पण अदृश्य असणाऱ्या झऱ्यांची आसमंतात भरून राहिलेली खळखळ. सगळेच अवर्णनीय. आत्तापर्यंत सहा बाय आठच्या खोलीत बंदिस्त असलेले माझे बालमन मोहून गेले. मित्रांबरोबरचा दंगा विसरून मी हे निसर्गचित्र पाहतच राहिलो. बरं झालं तेव्हां आमच्याकडे कॅमेरे नव्हते, मी नजरेत ते चित्र साठवून ठेवले, इतके की, आज इतक्या वर्षांनी मी जेव्हां माझ्या पहिल्या ट्रेकचा विचार करून डोळे मिटतो तेव्हां ते चित्र माझ्या डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे राहते. 

दुसरे दिवशी लोहगडाकडे कूच करायचे होते. निसर्गराजाचा नूर बदललेला. इतका जोरात पाऊस पडत होता की निसर्गचित्र सोडा, पायाखालची वाट दिसत नव्हती. आदल्या दिवशी जी वाट साधी सरळ सोपी वाटत होती ती आता इतकी निसरडी झाली होती की दर मिनिटाला कोणीतरी आपटत होता. पायातले बूट वरून कसे दिसतात या पेक्षा खालून कसे असतात हे ट्रेक मध्ये जास्त महत्वाचे आहे असे जीवनविषयक सूत्र त्या दिवशी आम्ही शिकलो होतो. पायवाटेच्या आजूबाजूला काल नसलेले अनेक झरे अचानक उपटले होते, न बोलावलेल्या पाहुण्यासारखे. त्या काळात पाहुणे-मंडळींमध्ये तशीच फॅशन होती. झऱ्यांनी का वेगळे वागावे? सुरुवातीला बुटात पाणी जाऊ नये अशी काळजी घेत, रेनकोट टोपी सावरत चालत होतो. पण आमच्या खडूने पॉलिश केलेल्या पांढऱ्या कॅनव्हासच्या बुटांचा त्या धो धो पावसासमोर काय पाड लागणार? रेनकोट ला सुद्धा फार काम करायची सवय नव्हती. पावसाळ्याचे दोन तीन महिने दप्तरात बसायचे आणि एखाद-दोन दिवस शाळेत जाताना पाऊस आला तर बाहेर यायचे ही त्याची जॉब डेफिनिशन. त्या राक्षसी पावसासमोर त्याने सपशेल शरणागती पत्करली आणि ज्या प्रमाणे खंडोजी बल्लाळाने गनिमासाठी चोर दरवाजे उघडले होते त्याप्रमाणे रेनकोटनी मलाही माहित नसलेली छोटी छोटी भोके पावसाला उघडून दिली. थोड्याच वेळात नखशिखान्त चिंब भिजलो. इतका, की चालतोय का पोहतोय ते कळेनासे झाले. 

पावसाळा सुरु होऊन ३-४ आठवडेच झाले असतील पण लोहगडाच्या पायरी पायरीवर इतके शेवाळे साठले होते की जणू काही तिथे पावसाळा सुरु झाल्यापासून पाऊस थांबलाच नव्हता. जसं जसं किल्ल्याच्या दरवाज्याच्या जवळ जायला लागलो तसतशी घसरून पडणाऱ्यांची संख्या अजूनच वाढायला लागली. गड सर करणे याला महाराज पराक्रम कां मानायचे याची चुणूक आम्हाला मिळाली. गडाच्या आडोश्यामुळे वारा पूर्ण थांबला होता. आम्ही गडावर सुखरूप पोचण्याच्या काळजीने जणू आसमंताने श्वास रोखून धरला होता. वेगवेगळ्या सप्तकात डरावडराव करणाऱ्या असंख्य बेडकांनी पार्श्वसूर धरला होता, त्यात रानपक्षी आपआपल्या रागातल्या आरोह-अवरोहाची तान घेत इकडून तिकडे जात होते. त्या निसर्गसंगीताच्या तालावर आम्ही जपून पावले टाकत होतो. छप छप छप छप . बाकी कोणताही आवाज नव्हता. शब्दांच्या पलीकडले ते स्वर्गीय क्षण भेदरलेल्या अवस्थेतल्या बालमनाने अंतर्कूपात जपून ठेवले. इतक्या नाजुकपणे, की ते क्षण आपल्याकडे आहेत हे कळायला चाळिशी उजाडली. 

घसरत, आपटत पण प्रत्येक वेळी उठत, बालचमू गडावर पोचला . आनंदाच्या आरोळ्या ठोकल्या. आणि काय जादू? आसमंताने जणू निःश्वास टाकला आणि डोंगर माथ्यावर भन्नाट वारा वाहायला लागला. सह्याद्रीच्या एका शिखरावर उभे होतो त्यामुळे सातासमुद्रा पलीकडून प्रवास करत आलेला वारा आमच्या कानात भणाणत होता. आधी हुडहुडी भरली पण मग थोड्याच वेळात कपडे बूट सगळे वाळून गेले. टक्क कोरडे. निसर्ग कोडी घालतो खरा पण जे निसर्गात टिकून राहतात त्यांना ती सोडवायला मदत पण करतो. गड वरून अगदी सपाट होता, मोकळा मोकळा. एखादे मंदिर आणि त्याच्या शेजारी तळे सोडून फार काही नव्हते. गडावर फक्त आम्हीच होतो. तेव्हां ट्रेकिंगची एवढी फॅशन नव्हती. 

त्या सपाट मोकळ्या डोंगरमाथ्यावर “इथे किल्लेदाराचा वाडा होता…. त्यासमोरून २० फूट रुंदीचा रस्ता सरळ बाजारपेठेकडे जायचा…. गडावरचे लढवय्ये मावळे या बाजूला छोट्या छोट्या घरात राहायचे..... तटबंदीवर २४ तास पहारा असायचा..... या मंदिराचा पुजारी त्या कड्यापासच्या गुहेत राहायचा” …. असे वर्णन करत आमच्या शिक्षकांनी इतिहास आमच्या डोळ्यासमोर उभा केला. सगळा ग्रुप ट्रान्स मध्ये. त्यांना भानावर आणले माकडांच्या टोळीने. माणसांकडून मिळणाऱ्या मोफत अन्नाला सोकावलेली माकडांची टोळी आमच्यावर चालून आली. काही जण घाबरले, काहींनी हात पुढे करून बिस्कीट दिले. टोळीतल्या हुप्प्यानी ते हिसकावून पळ काढला. पिल्लानी या झाडावरून त्या झाडावर उड्या मारून दाखवल्या, शेपटीला लटकून दाखवले. आमची करमणूक केली. 

परतीच्या, मळवली ते शिवाजी नगर लोकल मध्ये बसलेले आम्ही पूर्णपणे बदललेले होतो. निसर्गाच्या सानिध्यात काढलेला तो एक दिवस आणि एक रात्र आम्हाला जन्मभराचे ट्रेकिंग चे वेड लावायला पुरेसे होते. 

त्या काकांचा प्रश्न दिसायला अगदी साधा सरळ होता पण त्याचं उत्तर खरंच अवघड होतं. नक्की कोणत्या रानफुलांचा वास घेतल्यावर ट्रेकिंग आवडायला लागलं आणि नक्की कोणत्या झऱ्याचं पाणी पिताना ट्रेकिंगच्या प्रेमात पडलो अशा प्रश्नांची उत्तरं कशी देणार?

त्या पेक्षा एक नामी युक्ती करतो. मी कसा वेगवेगळ्या देशात ट्रेकिंगला गेलो, तिथे मी काय काय पाहिले आणि काय काय अनुभव आले ते सांगतो. मग कदाचित त्या काकांना त्यांच्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर आपोआप मिळेल. 

सध्या इतकंच सांगतो - ट्रेकिंग पाहावं करून !!
- विवेक वैद्य





२ टिप्पण्या:

  1. एकुणात माणूस ट्रेकिंग का करतो,ह्याचे उत्तर सापडायचे तेव्हा सापडेल. विवेकने ट्रेकिंग का करावे ह्याचे उत्तर माझ्यासारख्या वाचकांना सापडले आहे आणि ते म्हणजे आम्हाला इतके सुंदर वर्णन सोफ्यावर बसल्या बसल्या वाचता यावे म्हणून!!सहजसुंदर शैली. धबधब्यांची अमूर्त नक्षी, बूट वरून कसे दिसतात ह्यापेक्षा खालून कसे असतात आवडलेच!!
    प्रत्येक मनात न दिसणारे पण खळखळ जाणवणारे अनेक झरे असतात. त्यांच्या शोधात मग आपण लिहितो, गातो,चित्र काढतो ,नृत्य करतो किंवा ट्रेक करतो असे तर नसेल? न जाणो केव्हा तो झरा अचानक सामोरा येईल!!

    उत्तर द्याहटवा
  2. ट्रेकिंग न केलेल्या माणसाला ट्रेकिंग पाहावे करून असे वाटायला लावणारा लेख ...छान आहे.

    उत्तर द्याहटवा