लग्नाच्या वाढदिवसाच्या बरोबर एका आठवड्याने दोघे वकीलाला भेटायला गेले. घाबरू नका. नवरा-बायकोला आपापल्या भावंडांशी प्रॉपर्टीच्या वाटणीबद्दल सल्ला हवा होता. नाती सगऴी सख्खीच होती पण कसं आहे ना की हे प्रश्नं आपल्या माणसांशी बोलून सुटत नाहीत. वकीलासारख्या बाहेरच्या माणसाच्या सल्ल्याची वा मध्यस्थीची गरज असते. तर तुम्ही म्हणाल की लहानपणा पासून आपण शिकतो की बाहेरच्यांवर विश्वास ठेऊ नये ? बरोबर आहे तुमचं. पण, ‘आपल्या’ लोकांना घराबाहेर काढायचं असेल किंवा आपल्यांपासून लांब जायचं असेल तर बाहेरच्यांचीच मदत घ्यावी लागते.
कागदपत्र वरवर तपासून वकीलसाहेब विचारतात, “सगळे करार झाले की तुमचा आपापसातला वाटा किती? म्हणजे, पुढे तुमच्यात वाद नको म्हणून. नाहीतर तेव्हा परत याल व माझी फी परत भराल”. ह्या काहीशा खोचक प्रश्नाने दोघे जरा घाबरले. आपापसात मालमत्तेवरून विवाद होऊ शकतो हे त्यांना सुचलच नव्हतं. हल्लीच्या ‘प्री-नपशियल ऍग्रीमेंटच्या’ काळात सप्तपदीवर विश्वास ठेवणारी ही जोडी अपवादात्मकच म्हणावी लागेल.
प्रत्येक माणूस जन्माला येताना विश्वास नावाच्या चमत्कारिक भावनेचा / जाणीवेचा भरपूर साठा घेऊन येतो. म्हणून तर बाळ आपल्यावर सतत माया करणाऱ्या व्यक्तिला आई म्हणून ओळखायला लागतं. ह्याच आधारावर त्याला परिवार कळू लागतो, भाऊ-बहीण, आजी-आजोबा, काका-मामा ही नाती कळू लागतात. पहा ना, आईला कुठे आधार कार्डं दाखवावं लागतं बाळाला? तुम्ही म्हणाल की बाळाकडे पर्याय नसतात. त्याला काही कळत नसतं. कबूल… पण आपल्याकडे असंख्य पर्याय असून व आपण (बहुतांशी) दूधखुळे नसून कुणावरही विश्वास ठेवायला का बरं घाबरतो?
“मार उडी. मी धरेन तुला,” असं जेव्हा वडील लहान मुलाला सांगतात, तेव्हा ते मूल खरच उडी मारतं! उडी दोन फुटी पलंगावरून असते पण त्या लहानग्याचा विश्वास अगाध असतो. आणि मग मूल जसजसं मोठं होऊ लागतं, त्याच्यावर अनेक संस्कार होतात: मित्र मंडळींचे, शिक्षणाचे, नातेवाईकांचे आणि स्वानुभावाचे. ह्या सर्व संस्कारात एक सूप्त शिकवण असते, अविश्वासाची! पलंगावरून खुशाल वडिलांकडे उडी घेणारं मूल “चौकस” होऊ लागतं. आपलीच ‘शी’ धुऊन आपल्याला अंघोळ घालायला येणाऱ्या वडिलांना ते विचारतं, “बाबा, हात धुतलेस का?” बाबलाही ह्याचं कौतुक वाटतं. मुलाच्या मनात हा अविश्वासाचा धडा घर करतो. मग ते मूल जितक्या व्यक्तींची व परिस्थितींची उलट तपासणी घेऊ लागतं तितकं ते स्वत:ला शहाणं, परिपक्वं वगैरे समजू लागतं.
इतरांवर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीला कमी लेखलं जातं… ‘बावळट’ समजलं जातं असं म्हटलं तरी चालेल. इतकच कशाला, इंग्रजीतलं ह्या अर्थाचं विशेषण, ‘ट्रस्टिंग’, हे ही दूषणच समजलं जातं.
अशा तऱ्हेने, वय वाढतं तसं विश्वासाचा बहुमोल बॅलेन्स कमी होऊ लागतो. ह्या बॅलेन्सचा रीचार्जसुद्धा होत नाही, बरं. काही मोजक्या, तरल अत:करणाच्या व्यक्तींनाच रीचार्ज मिळतो.
हा विषय गमतीचा नाही. ट्रस्टिंग वाटणाऱ्या व्यक्तींना सामाजिक व व्यावसायिक जीवनात ह्याचे परिणाम भोगावे लागतात. अशा लोकांना नोकरी मिळणं कठीण होत. मिळाली तर त्यात पदोन्नती होणं कठीण. तसच, लग्न जमण्यातही अडचण येऊ शकते. म्हणजे ‘अरेंज्ड’ लग्न असो वा हल्ली प्रचलित होऊ लागलेलं ‘लिव्ह इन’ रिलेशन, ट्रस्टिंग व्यक्ती संसार चालवायच्या उपयोगाची नाही, अशीच धारणा असते. “हल्लीच्या जगात हा माणूस माझ्या मुलीची काय काळजी घेणार”, ही बहुतांश पालकांची भूमिका असते.
बरं, विश्वास कुणावर व किती ठेवावा ह्याचे आपापले नियम असतात. हे कौशल्य काय फक्त राजकारणी लोकांनाच असतं होय? शेवटी ती ही तुम्हा आम्हा मधीलच लोकं आहेत. आता हेच पाहा:
काॅलेजात असताना किंवा नोकरी नवीन असताना मोठ्या भावाकडून किंवा बहिणीकडून गरजेप्रमाणे पैसे घेणं किंवा प्रसंगी सल्ला मागणं हा तर आपला हक्कच असतो. पण त्याच नोकरीत पगारवाढ झाली की आपण मोटार घ्यायचं ठरवतो. मात्र, ह्या वेळी ताई-दादाचा सल्ला गरजेचा वाटत नाही. कारण त्यांना ‘सरप्राइज्’ द्यायची असते ना! मग आपण आणखी थोडे मोठे होतो, जबाबदार होतो आणि आणखी मोठे निर्णय घेऊ लागतो. उदा. लग्नही आपलं आपणच ठरवतो. ताई-दादाला आणखी मोठी सरप्राइज् देणं हीच आपली प्रांजळ इच्छा असते.
नवरा जर अनेक वर्षांनी भेटलेल्या पूर्वीच्या सहकर्मचारिणी बरोबर काॅफी ला गेला तर “त्यात काय”, पण बायको जर जुन्या मित्राबरोबर जाॅगिंगला गेली तर बाऊ! नवऱ्यांच्या बाजूनी बोलायचं झालं तर, पार्टीत मित्राने खांद्यावर हात ठेऊन सेल्फी घेतला तर नवऱ्याने ‘चिल’ कराव कारण हे ‘नाॅर्मल’ असतं. मात्र कुठल्या बाईने आपल्या नवऱ्याबरोबर डान्स केला की बायको जी नजर देते की नवऱ्याचं रक्तच ‘चिल’ होऊन जातं.
तर, इतरांवर विश्वास ठेवण्यापेक्षा इतरांना आपल्यावर विश्वास ठेवायला लावणं श्रेयस्कर मानलं जातं. पण आजच्या जगात सर्वांची हीच धडपड असल्यामुळे कुणीच कुणावर विश्वास ठेवत नाही असं वाटत. इतकच कशाला आपला आपल्यावरही विश्वास कमी होऊ लागला आहे. कधी कुणा सहकर्मचाऱ्याशी किंवा बिल्डिंगमधील मित्राशी जरा मनमोकळ्या गप्पा मारल्या तर प्रश्न पडतो, “आपण फारच मोकळेपणे तर नाही ना बोललो? इतका विश्वास टाकून मनातलं सांगणं बरं नाही ना?”
प्री-नप कराराच्या आधारे लग्न करणारी आजची जोडपी एकमेकांना बॅंकेचे पासवर्ड सांगत नाहीत पण सगळे पासवर्ड गूगलच्या स्वाधीन करतात. आपले पगार आपल्या आई-वडिलांना माहीत नसतात पण “निवेष करनेसे पहले आॅफर दस्तावेज ध्यान से पढे”, अशी ताकीद देणाऱ्या म्यूचुअल फंडांवर आपण बिनधास्त विश्वास ठेवतो.
असो… कथा ज्यांच्यापासून सुरू झाली ते आपलं जोडपंही पुरतं गोंधळून गेलं होतं. पण वकिलाला आपला गोंधळ दिसता कामा नये... आपण ‘व्हलनरेबल’ वाटू ना. म्हणून दोघे मालमत्तेची समान वाटणी करायचं ठरवतात व वकीलाच्या आॅफिसातून निघतात. पण वकील नामक तिऱ्हाइत व्यक्तिच्या ‘वाटणी’बद्दलच्या एका प्रश्नाने त्या दोघांच्या नात्यावर संशयाचं सावट पसरलं. एकमेकांशी बोलायला एकदम संकोच वाटू लागला. मग काय. सगळ्या रोगांचं औषध असलेला मोबाइल बाहेर आला. दोघांनीही मतभेद असलेल्या आपापल्या भावंडांना मेसेज केले, “अरे, मी ना वकिलाकडे आलो होतो (होते). हिच्याबरोबर (ह्याच्याबरोबर) जागेची समान वाटणी करायचं ठरवलं आहे. बरोबर वाटतं का तुला?”
इती, आपले विश्वस्त.
केशव पाटणकर
Khup chaan lekh!! pratyekaala vichar karaayla laavnaara lekh aahe...
उत्तर द्याहटवाKhupcha chan lekha ahe
उत्तर द्याहटवानेहमीप्रमाणे अप्रतिम लिहिलंय... खूप छान..पुढील लिखाणासाठी शुभेच्छा.
उत्तर द्याहटवा