- माझा आवडता कवी - कविश्रेष्ठ कुसुमाग्रज -

कविता अगदी लहानपणीच आपल्याला भेटलेली असते. शाळेच्या पाठ्यक्रमात ४-८ ओळींच्या सुरेख व लगेच समजतील अश्या कवितांपासून या परिचयाची सुरुवात होते. संक्षिप्त रूपाने थोडक्यात काही मोठ्या अर्थांचे उलगडे हळू हळू या कविता आपल्याला करून द्यायला लागतात. पुस्तकातले गद्य रुपातले धडे व त्यातल्या काही ओळी सहसा लक्षात राहत नाहीत परंतु कवितांच्या काहीच ओळी पटकन लक्षात राहून जातात, तर काही मनास भिडलेल्या कविता जन्मभर स्मृतीत कोरल्या जातात. धडे कधी गुणगुणता येत नाहीत पण काव्य मात्र सहजपणे ओठांवर घोळते. अशी ही किमयावान कृती - कविता.

जसजसे आयुष्य जास्त समजायला लागले तसे वाचन वाढत गेले व तसेच त्यातले गर्भार्थही हळूहळू कळू लागले. मराठी साहित्याबद्दल बोलायचे झाले तर या अथांग सागररुपी खजिन्यातले काही अमूल्य मोती पाहण्याचे, न्याहाळण्याचे व अनुभवण्याचे सौभाग्य लाभले. त्यातीलच एक मला सर्वात प्रिय असे कविश्रेष्ठ म्हणजे कुसुमाग्रज.

कुसुमाग्रजांचे पूर्ण नाव श्री. विष्णू वामन शिरवाडकर असे होते हे आपण सर्वजण जाणतोच. २७ फेब्रुवारी १९१२ ला जन्मलेले कुसुमाग्रज केवळ ३० वर्षांच्या वयातच म्हणजे १९४२ साली त्यांच्या "विशाखा" या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून प्रसिद्धीचा सूर्योदय पाहू शकले. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात त्यांच्या लेखनाला एक क्रांतीची विलक्षण धारच होती असे म्हणणे अनुचित ठरणार नाही. 
म्यानातुन उसळे तरवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात

हे शिवरायांच्या काळातले शौर्य गीत, तसेच
सरणार कधी रण प्रभो तरी 
हे कुठवर साहू घाव शिरी 

हे बाजीप्रभू देशपांडे यांची देहाची चाळणी होईस्तोवर लढ्यातली झुंज याचे हृदयस्पर्शी कथन देऊन जाणारे काव्य हे कुसुमाग्रजांचे वैशिष्ठ्य. पण खरे भारतातल्या तत्कालीन क्रांतीने पेटलेले व मराठी साहित्यात नक्कीच अजरामर काव्य ठरेल असे लेखन म्हणजे “गर्जा जयजयकार, क्रांतीचा गर्जा जयजयकार” हे अमर काव्य. डोळ्यात पाणी आणल्याखेरीज राहणार नाही असा हसत-हसत मरणाला, फाशीला सामोरं जाणाऱ्या क्रांतीवीरांचा जिवंत, मूर्तिमंत दृष्टांत हे काव्य आपल्याला देऊन जाते. सात कडवे असलेल्या या कुसुमाग्रजांच्या कवितेत एकन-एक शब्दच अत्यंत प्रभावशाली आहे असे म्हणणे हे त्याचे सौम्यच वर्णन म्हणावे लागेल.
खळखळू द्या ह्या अदय शृंखला हाता-पायात 
पोलादाची काय तमा मरणाच्या दारात ? 
सर्पांनो उद्दाम आवळा कसूनिया पाश 
पिचेल मनगट परी उरातिल अभंग आवेश 
तडिताघाते कोसळेल का तारांचा संभार ?
कधीही तारांचा संभार 
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार 

अशा शब्द-मशालीने पेटलेले हे महान क्रांतीगीत क्रमाक्रमाने त्या हुतात्म्यांचे त्यांच्या जीवाहून शत-शतपटीने अधिक प्रिय अश्या मातृभूमीस वदलेले अंतिम बोल ऐकवत असे सांगून जाते -
कशास आई भिजविसी डोळे, उजळ तुझे भाल 
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल 
सरणावरती आज आमुचि पेटताच प्रेते 
उठतिल त्या ज्वालांतुन भावी क्रांतीचे नेते 
लोहदंड तव पायामधले खळाखळा तुटणार 
आई खळाखळा तुटणार 
गर्जा जयजयकार, क्रांतीचा गर्जा जयजयकार 

या कवितेची सर्वच कडवी येथे नमूद करण्याचा मोह होत असूनही ते शक्य नसल्याने, वाचक वर्गातील सर्व मराठी भाषिकांनी उद्याच्या पिढीस हे पूर्ण काव्य शोधून, आवर्जून ऐकवावे अशी नम्र विनंती मी या लेखाद्वारे करू इच्छितो.

असे हे काव्य कुसुमाग्रजांच्या लेखणीतून एक प्रवाह होऊन वाहले, एका अवखळ झऱ्याची लाट होऊन तसेच समुद्रतटाच्या दिशेने वेगाने येणारी उर्जापूर्ण लाट होऊन ते वाचकांच्या मनातही वाहत जाते हे वेगळे सांगणे नकोच. केवळ क्रांती किंवा देशभक्तीने प्रेरित काव्यच कुसुमाग्रजांनी केले नाही तर अत्यंत भावूक व मानवी मनाच्या विविध पैलूंबद्दलही त्यांच्या कविता सुप्रसिद्ध आहेत. 'हे सुरांनो चंद्र व्हा' हे अतिशय उच्च कोटीचे कल्पनारम्य काव्य त्यांच्याच लेखणीतून उतरले. "कणा" ही त्यांची गाजलेली कविता एक मार्मिक, माणुसकीचा हळुवार स्पर्श देऊन जाते. "पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा … प्रेम कर भिल्लासारखं" हे तडफदार लेखन हे त्यांच्या काव्याचे बहुरंगी अंग असे म्हणता येईल. “उठा उठा चिऊताई” सारखी लहानच पण गोड कविता केवळ कुसुमाग्रजच करू जाणे. ह्या महान कवीचे एकूण १८ काव्य-संग्रह सुप्रसिध्द आहेत तसेच लेखक या नात्याने १५ लघुकथा संग्रह, १७ नाटके, ३ कादंबऱ्या, “मेघदूत” या कालिदासांच्या मूळ संस्कृत आणि शेक्सपिअरच्या “मॅकबेथ” व “ऑथेल्लो” ह्या गाजलेल्या लिखाणाचे मराठी अनुवाद असा प्रचंड साहित्यसाठा त्यांच्या नावाने प्रसिध्द आहे.

आवडते थोर कवी असे म्हणताना त्यामागचे आणखीन एक कारण सांगावेसे वाटते ते म्हणजे कुसुमाग्रज हे एक संपूर्ण व अष्टपैलू लेखक होते. त्यांनी कित्येक नाटके लिहिली, लघुकथाही लिहिल्या. नटसम्राट हे त्यांनी लिहिलेले नाटक प्रसिद्धीचे उच्चांक मोडून गेले. १९७४ साली मराठी साहित्य अकादमी पुरस्कार व नंतर १९८७ साली सर्वोच्च "ज्ञानपीठ पुरस्कार" व आणखी बरेच पुरस्कार व गौरव ह्या महाराष्ट्रभूषण महान व्यक्तीची गौरवगाथा सांगतात. २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्म दिवस "जागतिक मराठी भाषा दिवस " म्हणून पाळला जातो.

१० मार्च १९९९ रोजी, पुणे शहरात जन्मलेला हा महाराष्ट्राचा सुपुत्र, कवीसूर्य नाशिक या पावन स्थानी कायम स्वरूपाने अस्तास गेला, पण आपले अजरामर काव्य व साहित्यखजिना येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी एक अमूल्य ठेवा या स्वरुपात मागे सोडून गेला. नाशिक येथे स्थित कुसुमाग्रज प्रतिष्ठान हे आजही साहित्य क्षेत्रात कार्यरत असून कुसुमाग्रजांच्या निवासस्थानीच स्थापित झालेले आहे. अश्या या परमप्रतिभावंत मराठी कवीश्रेष्ठास शतकोटी प्रणाम!
- नंदकुमार देशपांडे

४ टिप्पण्या:

  1. नंद्कुमारजी, सुंदर गौरव चित्रण…

    कुसुमाग्रजांची एक सुंदर कविता इथे अवतरू इच्छितो ….

    जोगीण....

    साद घालशील
    तेव्हाच येईन
    जितकं मागशील
    तितकच देईन.
    दिल्यानंतर
    देहावेगळ्या
    सावली सारखी
    निघुन जाईन.
    तुझा मुगूट
    मागणार नाही
    सभेत नातं
    सांगणार नाही.
    माझ्यामधल्या
    तुझेपणात
    जोगीण बनून
    जगत राहीन......


    उत्तर द्याहटवा
  2. लेख आवडला. वेडात दौडले वीर मराठे सात ही ऑल टाईम फेवरिट कविता आहे.

    उत्तर द्याहटवा