गोल्डन टच (गोल्डी विजय आनंद)

ऋतुगंध शरद - वर्ष १२ अंक ४उणेपुरे वीस चित्रपट आणि तेही तीन दशकाच्या कारकिर्दीत, कागदावर फारसे प्रभावी वाटत नाही, पण प्रत्यक्षात हिऱ्यांची खाण असलेले एक सो एक उत्तमोत्तम सिनेमे गोल्डी ने सिनेरसिकांना दिले. त्यांनी जे चित्रपट दिले, त्याही पेक्षा जी गाणी दिली, त्यांचं जे सोनं केलं तोच हा गोल्डन टच.

१९५० आणि ६० च दशक हे हिंदी चित्रपटसृष्टीच्या संगीताचा सुवर्णकाळ म्हणून गणले जाते. आजही अंताक्षरी गाताना या दशकातील अजरामर गाणी आठवतात, यात त्या काळाचं यश आहे. या दशकांनी काही अविस्मरणीय संगीतकार, गायक चित्रपटांना दिले. तसेच काही प्रतिभावान कलाकार, दिग्दर्शकही दिले. त्या काळात हिंदी सिनेसृष्टी ढोबळपणे तीन सुपरस्टार कलाकारांमध्ये विभागली गेली होती. ते तीन म्हणजे राज, दिलीप आणि देव. त्यांची प्रत्येकाची स्वतंत्र अशी शैली आणि स्वतंत्र चाहते होते. राजचा आदर्शवादी, थोडा डाव्या विचारसरणीचा, निरागस, परंतु रोमँटिक नायक; दिलीपचा सामाजिक, गंभीर, संवेदनशील नायक; आणि देवचा सदाबहार चिरतरुण प्रेमवीर. त्यांचा जसा स्वतंत्र प्रेक्षकवर्ग होता तसाच त्यांचा स्वतःचा असा एक कॅम्प होता. राज कपूरचा आर के, ज्यात त्याचे आवडते कलाकार, संगीतकार, गायक; तसेच देव आनंदचा नवकेतनचा, दिलीप कुमार मात्र विविध प्रतिभावंत दिग्दर्शकांकडे काम करत राहिला; तरीही त्याचे संगीतकार किंवा सहकलाकार ठराविक असत. या त्रिमूर्तीने त्यांच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन इतर निर्मात्या, कलाकारांबरोबर कामे केली; पण त्यातही त्यांनी शक्यतोवर आपल्या ठराविक आवडत्या व्यक्तीना सोबत घेतले. उदा. राज कपूर - शंकर जयकिशन- शैलेंद्र- मुकेश लता; दिलीप कुमार - नौशाद - मोहम्मद रफी; देव आनंद - एस डी बर्मन - किशोर कुमार लता आशा या जोड्या सहसा बदलत नसत. 

देव आनंद आणि त्याच्या आनंद बंधूनी मिळून नवकेतन या आपल्या बॅनर अंतर्गत चित्रपट निर्मिती सुरू केली. अफसर हा नवकेतनच्या बॅनरचा पहिला चित्रपट. साधारणतः देव आनंद हा नायक आणि चेतन आनंद दिग्दर्शक असा साधारण पॅटर्न ठरला होता आणि हा सिलसिला टॅक्सी ड्रायव्हर आणि फंतूश पर्यंत कायम राहिला. १९५७ साली आलेल्या नौ दो ग्यारहने देव आनंदच्या धाकट्या भावाने म्हणजेच विजय आनंदने दिग्दर्शनात पदार्पण केले. विजय आनंदला त्याच्या सोनेरी केसांवरून गोल्डी असे नाव पडले आणि मग त्याच नावाने तो चित्रपट सृष्टीत प्रसिद्ध झाला.

विजय आनंदने त्या आधी आपल्या मोठ्या भावाला अनेकदा साहाय्य केलं होतं; परंतु त्याचा दृष्टिकोन अत्यंत वेगळा होता. नवकेतनचे चित्रपट त्याआधी रहस्यमय कथानकावर आधारित असत; म्हणजे एखादा गँगस्टर, त्याचा अड्डा, एखादा खून, व्हॅम्प, नायक बेरोजगार गरीब, नायिका Damsel in distress, माफक मारामारी आणि शेवट गोड असा साधारण ढाचा असे. नौ दो ग्याराहसुद्धा मर्डर मिस्टरी होता; पण यात एक खूप मोठा बदल ठळकपणे दिसत होता. हा बदल पडद्यावरच्या सादरीकरणाचा होता. एक प्रकारचा पॉलिशनेस, क्रिस्पनेस जाणवत होता. सर्वात मोठं surprise म्हणजे चित्रपटाची गाणी होती. त्याआधीही टॅक्सी ड्रायव्हर व बाझीची गाणी गाजली होती; पण नौ डॉ ग्याराह मध्ये एक ताजेपणा होता. रोमँटिक गाणी अतिशय खेळकरपणाने चित्रित करण्यात आली होती. सादरीकरणात नावीन्य होतं. 'हम है राही प्यार के' मधला बेफिकीर, पूर्णपणे चालत्या गाडीत चित्रीकरण, 'कली के रूप मे' मधला खट्याळपणा, 'आखोमे क्या जी' मधली कॅमेरा बरोबरीने विहरणारी नायिका, 'आजा पंछी अकेला है' मधला टब मध्ये बंदिस्त नायक आणि खुल्या हवेतली नायिका, या पूर्वी हा खट्याळपणा, हे ताजेपण, हे तारुण्य नव्हतं असं नव्हे; पण या चित्रपटातल्या गाण्यातून हे अगदी प्रकर्षाने जाणवलं एवढं नक्की.

आपल्याकडे काही व्हिजनरी दिग्दर्शक होऊन गेले. त्यांचा काळाच्या पुढचा विचार करण्याच्या गुणांचं प्रकटीकरण त्यांच्या सिनेमांतून दिसून येतं. त्यांच्या वेगळेपणामुळे आजही सिनेरसिक चित्रपटाचा अभ्यास करताना या दिग्दर्शकांचे चित्रपट आवर्जून बघतात. गुरुदत्त, बिमल रॉय, यांनी ज्याप्रमाणे चित्रपटाला एक नवीन दृष्टी दिली त्याचप्रमाणे विजय आनंदने एक नवा स्टायलिश सिनेमा आपल्यासमोर आणला. त्याचं वेगळेपण काय होतं? या पूर्वीच्या चित्रपटात कथेला महत्व असायचं; पण ती कथा अतिशय संथपणे पुढे सरकत असे. त्यात असलेल्या गाण्यांमुळे कथानक पुढे न सरकता मध्येच तुटक वाटत असे. गाणी ऐकताना अतिशय सुरेख वाटत; पण बघताना कंटाळवाणी वाटत असत. विजय आनंदवर पाश्चात्य चित्रपटांचा प्रभाव असल्यामुळे असेल कदाचित; पण त्याचे चित्रपट कुठेही संथ होत नसत. जी गाणी पूर्वी श्रवणीय वाटत असत, ती आता गोल्डी ने प्रेक्षणीय केली. त्यापूर्वी बहुतांश चित्रीकरण हे स्टुडिओत होत असे, त्यामुळे गाण्यांची लोकेशन ठराविक आणि कृत्रिम असत. गोल्डी ने काही युनिक लोकेशन निवडून अप्रतिम गाणी चित्रित केली. प्रत्येक गाणं हे वैशिष्ट्यपुर्ण आणि वेगळं आहे. हाच तो गोल्डी टच.

सुरवातीला म्हटल्याप्रमाणे उणें-पुरे वीस चित्रपट; पण त्यातले बरेचसे मास्टरपीस. १९६० मधल्या 'काला बझार' मधील तिकिटं ब्लॅक मध्ये विकणारा नायक, त्यात मदर इंडियाचा प्रीमियर, त्याचं ब्लॅक करणारा नायक देव आनंद ही कल्पनाच किती वेगळी होती! 'अपनी तो हर आह एक तुफान है', 'उपरवाला जानकर अंजान है', यात ट्रेन मधल्या बर्थ ची कल्पना कशी सुचली असेल? बर्थ वरच्या नायिकेला इंडिरेक्टली फ्लर्ट करत म्हटलेलं गाणं, भक्तीभावनेचा आभास आणत, किती अफलातून आहे! 'खोया खोया चांद' मधला चांदण्यात प्रेमात बेभान होऊन भरधाव धावणारा नायक, 'सच हुए सपने तेरे' मधली मिश्किल खट्याळ नायिका; आणि ते पावसातील पार्श्वभूमीवर वाजणारे 'रिमझिम के तराने लेके', एका छत्रीतले नायक नायिका, मन प्रसन्न करणारी गाणी, आऊटडोअर लोकेशनचा मुबलक वापर हेही त्यांचं वैशिष्ट्य, गाणी कुठेही कंटाळवाणी वाटतं नाहीत हेच त्यांचे यश.

१९६३ साली आलेला 'तेरे घर के सामने' हा तर एक से एक गाण्यांचा नजराणा होता. साधी सरळ प्रेमकहाणी, नायक आर्किटेक्ट, नायक नायिकेच्या वडिलांचं जुनं वैर, त्यातून फुलणारं नायक नायिकेचे प्रेम. नूतनच्या प्रचंड बोलक्या चेहऱ्याला इतका न्याय बिमल रॉय नंतर गोल्डीनेच दिला असेल. आता कुतुबमिनार हे गाणं चित्रित करण्याचं ठिकाण कसं काय होऊ शकतं? पण हाच तो गोल्डी टच. 'दिल का भवर करे पुकार' गाण्यात नायक तो मिनार उतरत उतरत गातो आणि नायिका केवळ मुद्राभिनयाने त्याला साथ देते. केवळ लाजवाब! 'तू कहाँ यह बता' गाण्यात सिमल्याच्या गुलाबी थंडीतून आपल्या प्रियेला शोधत फिरणारा दिवाना, त्या धुक्याच्या शालीतून अचानक चंद्र डोकवावा तशी अचानकच समोर उभी राहिलेली नायिका, तिचा तो आनंदश्चर्याने उजळून निघालेला चेहरा, आणि तो पाहून श्रमाचे सार्थक झालेले नायकाच्या चेहऱ्यावरचे भाव! हा सीन, त्यामागचा विचार, इथे दिग्दर्शक दिसतो म्हणावं असाच. चित्रपटाचा हायलाईट असलेलं अत्यंत गाजलेलं "तेरे घर के सामने एक घर बनाउंगा" नायकाच्या मनातली ग्लासात दिसणारी नायिका, सहकलाकाराने ग्लासात बर्फ टाकताना शहारलेली नायिका, कल्पनाविष्काराचं उत्तम उदाहरण. 

१९६५ साली पडद्यावर आलेला 'गाईड' हा तर भारतीय सिनेमातील क्लासिक म्हणवला जातो. आर के नारायण यांच्या कथेवर आधारित चित्रपटाने देव आनंदलाही उत्तम अभिनेता म्हणून ओळख मिळवून दिली. गोल्डीला असलेलं अध्यात्माचं कुतूहल, आवड आणि समज या चित्रपटात दिसून येते. यातील व्यक्तिरेखा रूढार्थाने नायक नायिकेच्या नाहीत तर त्यांना अनेक कंगोरे आहेत. नायिका ही कन्व्हेंशनल नाही, ती लग्नाशिवाय नायकासोबत राहते, शेवट ही टिपिकल नायक नायिका एकत्र आनंदी आनंद असा नाही. विजय आंनदने आव्हान लीलया पेललं, बरेचदा असं वाटतं की हा खऱ्या अर्थाने विजय आनंदचा त्याला आनंद देऊन जाणारा चित्रपट असावा. देव आनंदला प्रतिमेबाहेर काढणं हेच मोठं शिवधनुष्य होतं, आणि ते गोल्डी ने सहज पेललं. 

नायिका नर्तिका असल्यामुळे गाणी असणं स्वाभाविक होतं. बर्मनदा आणि शैलेंद्र यांनी अप्रतिम गाणी दिली. नायक गाईड असल्यामुळे चित्रपटात विविध लोकेशन्स असणे स्वाभाविक होते. भोगवादातून अध्यात्मापर्यंतच्या प्रवासात विविध स्थळांचा विचार ही आवश्यक होता. 'कांटोसे खिच के ये आंचल' मधली बंधनमुक्त नायिका चितोडगडाच्या विशाल परिसरातून वावरतेय, तिच्या त्या मुक्त वावरण्यात तिच्या या आधीच्या बंदिस्त आयुष्याची झलक मिळते. 'आज फिर जीने की तमन्ना है' मधून तिची या पूर्वीची घुसमट आणि आता मिळालेलं स्वातंत्र्य त्याचा आनंद हे सगळंच मंत्रमुग्ध करणारं. 'पिया तो से नैना' हे गाणं कथेच्या अनुषंगाने फुलवत नेलं आहे. त्याचे सेट्स, costumes, सगळंच अगदी परफेक्ट. 'तेरे मेरे सपने' चा सूर्यास्ताचा इफेक्ट, एक आश्वासक आधार, एक तरल असा अनुभव. गोल्डीच्या एका मुलाखतीत 'गाता रहे मेरा दिल' हे गाणं नंतर चित्रपटात टाकण्यात आले असं वाचल्याचं आठवतंय; आणि रेस्ट इज हिस्टरी. राजुची अध्यात्माकडे वाटचाल होत असताना तो शेवटी जिथे पोहोचतो, तिथलं ते मंदीर गोल्डीच्या हटके विचारांचं उत्तम उदाहरण आहे. या मंदिराचं चित्रीकरण स्टुडिओ मध्ये किंवा ठराविक फिल्मी मंदिरात करणं सहज शक्य असताना केवळ परिपूर्णतेची आस म्हणून या चित्रपटाच्या अत्यंत महत्वाच्या भागाचं चित्रीकरण हे अहमदाबाद हुन नव्वद किलोमीटर दूर असलेल्या लिंबडी गावात करण्यात आलं. त्यामुळेच ते आजही अस्सल वाटते.

'ज्वेलथीफ' हा थ्रिलर जॉनरचा व्यवसायिक सिनेमा गोल्डीच्या स्टायलिश दिग्दर्शनाचं उत्तम उदाहरण. मुळात अशोक कुमारला खलनायक म्हणून पेश करणं हेच विशेष. अशा सिनेमांना जो एक वेग लागतो, तो गोल्डी ने अचूक पकडलाय. कुठेही न रेंगाळता, उत्कंठा कायम ठेवत, विविध पात्रांना योग्य महत्व देत सिनेमा पुढे जातो; आणि त्याचा कळसाध्याय प्रेक्षकांना अपेक्षित धक्का देऊन जातो. यातली गाणीही गाजली. 'होटो पे ऐसी बात' या गाण्यात तर ध्रुवपद एका शॉट मध्येच चित्रित करण्यात आले आहे. त्यावरून दिग्दर्शकाचे कॅमेरावरचे प्रभुत्व दिसून येते. 'ये दिल न होता बेचारा' मधला iconic फॅशन आयकॉन देव आनंद, 'रात अकेली' मधली चुलबुली तरुण तनुजा, 'आसमा के नीचे' मधला आणि 'दिल पुकारे' मधला नर्म शृंगार, सिक्कीम या निसर्गरम्य ठिकाणाला खऱ्या अर्थाने भारताच्या पर्यटन स्थळात स्थान देण्यात आनंद बंधूंचा मोठा वाटा आहे

'तिसरी मंझिल' मध्येही हीच शैली वेगवान कथानक, कथेच्या अनुषंगाने असणारी गाणी, बऱ्यापैकी शेवटपर्यंत न कळणारा सस्पेन्स. या चित्रपटात नायक एक क्लब मध्ये गायक असल्यामुळे बरीचशी गाणी सेट्स वर चित्रित करण्यात आली आहेत. तरीही प्रत्येक गाणं हे वेगळं उठून दिसते. जसे 'ओ हसीना झुल्फोवाली' मधले 'ओ अंजाना' या ओळीतील डोळ्यातून, लांब जिन्यावरून, घसरगुंडीवरून येणारी हेलन, क्लबचं revolving दार, काचेच्या ग्लास चा आवाज, सगळंच visually impressive, 'ओ मेरे सोना' मधील नयनरम्य लोकेशन, तुटलेल्या बॅगेची थीम, 'देखीये साहेबो' मधला झुलता पाळणा, या सगळ्या गाण्यातून गोल्डी इफेक्ट दिसतोच दिसतो. 'जॉनी मेरा नाम' मधले 'पल भर के लिये कोई हमे प्यार कर ले' या गाण्यातल्या खिडक्या असोत किंवा 'ए मैने कसम ली' मधील सायकल वरचा रोमान्स असो, किंवा 'पल पल दिल के पास' मधील ओढ असो, गोल्डी ने प्रत्येक गाण्यावर आपला ठसा उमटवला. 

गोल्डी इतकी या माध्यमाची समज फारच कमी दिग्दर्शकांमध्ये आढळते. आजच्या गाण्यात कल्पकतेचा अभाव दिसून येतो. बरेचदा गाणी काढून टाकली जातात. कदाचित दिग्दर्शकाला त्यांचं काय करावं हा प्रश्न पडत असेल. गोल्डी ने चित्रपट तयार करत असताना कलेशी तडजोड केली नाही. त्याच्याच शब्दात सांगायचे तर "The man who wants to express, doesn't want to limit himself to only the visual. If he can make people feel the touch of his film, he will definitely! Why not! Limitations limit him, not his need to express and touch the other man".

- जुईली वाळिंबे६ टिप्पण्या:

  1. फारच सुंदर.कौतूकासाठी शब्द अपुरे पडतील..गोल्डी च्या दिग्दर्शनातील बारकावे छान टिपलेत..लिहीत जा..

    उत्तर द्याहटवा
  2. सखोल अभ्यासपूर्ण विवेचन,माहितीपर असूनही मनोरंजक,अतिशय सुंदर प्रस्तुतीकरण असल्याने एक उत्तम लेख वाचल्याची अनुभूती मिळाली.चकलीची खुमारी आणि चिरोट्याचा हळवार स्पर्श असलेली ही कलाकृती मनाला भावली.अभिनंदन आणि धन्यवाद!!!

    उत्तर द्याहटवा