साथ

ऋतुगंध वसंत वर्ष १३ अंक १
वारा आणतो अनेक वादळे
कधी आणतो तुफान
भिरभिर वारा आणि पावसाचे थैमान 
सामना करता करता
पाऊले थकतात पहा
पेलण्यास वादळे अशी
आधार मला तुझाच हवा.........१

संध्याकाळ कलंडते तेव्हा
मन कस काहूरत
निःशब्द सोबत सावल्यांची
जाणार म्हणून हुरहुरत
अशा कातरवेळी मला 
विश्वासाचा हात तुझाच हवा.......२

कुठेतरी चुकतय , कुठेतरी दुखतंय 
मनांत काही खुपतय
अशावेळी हसून खुलवायला
मन संभाळणारा जोडीदार हवा.......३

गाण्यातील माझ्या सुरांना
तुझाच रे ताल मिळावा
रेखिलेल्या चित्रात माझ्या 
तूच स्वप्नरंग भरावा
कवितेचे या गीत करण्या
तव सतारिचा झंकार हवा
मनातील सारे सांगण्यासाठी
तुझ्यासारखाच साथी हवा............४

परतीच्या या वाटेवर
कधीतरी असेही होईल
गीत माझे अंतराळात
विरूनही जाईल
परी त्याच्या स्मृतीने 
भरतील नेत्र जेव्हां
बावरल्या मनास माझ्या
सावरण्या सखया तू आणि तूच हवा........५

- कल्याणी पाध्ये


1 टिप्पणी: