ऋतुगंध वर्षा वर्ष १३ अंक ३
फेसबुक किंवा इन्स्टा वर लोक इतके गुंतून का पडतात?
मी फेसबुक मधे काम करायचो तेव्हा न्यूजफीड ही प्राईम प्राॅपर्टी का, हा प्रश्न मला नेहेमी पडायचा. पण मग जेव्हा ऑक्सिटाॅसिनचे पराक्रम वाचले तेव्हा उत्तरं मिळाली. फेसबुक किंवा इन्स्टावर होतं काय? आपण एखाद्या मित्र/मैत्रिणीनं टाकलेले फोटो / विडिओ बघतो, पोस्ट वाचतो. सामान्यतः या पोस्ट्स वाढदिवस, कसली तरी आनंदवर्षंपूर्ती, सहल, बाहेर जेवायला जाणं किंवा तत्सम प्रकारच्या असतात. त्या वाचताना मेंदूत ऑक्सिटाॅसिन स्रवतं आणि (इतर गुंतागुंत सध्या बाजूला ठेवत) आपल्याला एक आनंददायक अनुभव मिळतो. हा अनुभव आनंददायक आहे हे लक्षात आलं की मग एकानंतर दुसरी, दुसरी नंतर तिसरी अशी पोस्टवाचनाची साखळी सुरू राहते आणि हातातलं काम बाजूला कधी पडलं, हे लक्षात सुद्धा येत नाही. फेसबुक किंवा इन्स्टा किंवा तत्सम कुठल्याही ॲपवर ह्या प्रकारचा आनंदानुभव सान थोर सगळेच घेत असतात. वर आपल्याला एखादा मित्र/मैत्रीण प्रत्यक्षात भेटणं आणि त्यांना सोशल नेटवर्क वर भेटणं यातल्या ऑक्सिटाॅसिन मात्रेमधे विशेष फरक दिसत नाही. मग या ॲप्सवर आपण गुंतून पडलो नाही तरच नवल!
पण त्यात एवढं गुंतून पडण्यासारखं काय आहे? झालं, मिळाला पाच मिनिटाचा आनंद. पुढे जावं. पण ते खरंच सहजसाध्य आहे का? असतं तर लोकांना काही दिवस/महिन्यांची फेसबुक/इन्स्टा विश्रांती घेण्याची गरज पडली नसती. एका उंदरांवरच्या प्रयोगात त्यांना विजेचा हलका झटका बसून ऑक्सिटाॅसिन मिळेल अशी व्यवस्था केली होती आणि ऑक्सिटाॅसिन आणि जेवण यातलं ते काय निवडतात याची पाहणी करण्यात आली. उंदरांनी पुन्हा पुन्हा जेवणाऐवजी विजेचा झटका निवडला! (ह्या दुष्ट प्रयोगात शेवटी काय होतं हे मी सांगत नाही.)
आनंदाचंही व्यसन लागू शकतं का? मला आठवतं ऑर्कुट जेव्हा भारतात जोमात होतं तेव्हा गूगलमध्ये आम्हांला सगळ्यांची मिटिंग घेऊन काम करताना सतत ऑर्कुट वापरायचं नाही असं सांगावं लागलं होतं! काही वर्षांपूर्वी सामाजिक संपर्कमाध्यमांच्या डोकेदुखीला आळा घालण्यासाठी कंपन्यांनी अमुक अमुक संकेतस्थळ कंपनीत उघडायचं नाही असे नियम करून पाहिले. काही कंपन्यांनी त्याला वेळेचं बंधन घालून पाहिलं (फक्त दु. २-४)! आणि कशाचाच उपयोग होत नाही म्हणून मग निकराचा प्रयत्न म्हणून फायरवाॅलनी (अग्निभिंत म्हणायचा मोह आवरत नव्हता 😁) ही संकेतस्थळं संपर्कक्षेत्राच्या बाहेर ठेवायचाही प्रयत्न केला. पण कर्मचाऱ्यांनी स्वत:ची साधनं वापरून संपर्क सुरूच ठेवला! एवढी खडाजंगी होण्याचं काय कारण? सामाजिक संपर्कातून मिळणारं आनंदरसायन कामाच्या छळानं नैराश्य न येण्याकरता लोकांना आवश्यक असेल का?
कामाचा छळ? त्यातनं नैराश्य येतं?? उगाच कशाला जास्त आडपडदा घ्यायचा? येतंच की. एका कंपनीत काम करत असताना तिथल्या एका देशाच्या संप्रेषण अधिकाऱ्याला कामाच्या दडपणातून त्रास होऊन प्रवासात असतांना दवाखान्यात नेण्याची वेळ माझ्यावर आलेली आहे. हल्ली सगळ्याच कंपन्या भागमूल्याची चिंता सतत करत असतात. त्याकरता मग अशक्यप्राय उद्दिष्टं निवडली जातात, कर्मचाऱ्यांच्या गळी मारली जातात (विक्रीव्यवसायातल्या कुणाशी बोलून बघा), आणि त्यांचा यथेच्छ पिच्छा पुरवला जातो. अशा परिस्थितीत काम करणं कुणाला आनंददायक वाटेल? पण सतत निराश मनोवस्थेत काम करणंही अशक्यच. मग लोक आपले आनंदाचे मार्ग शोधतात. सामाजिक संपर्क माध्यमं हा त्यातला एक सहजी उपलब्ध असणारा मार्ग आहे.
पण या व्यतिरिक्त इतर काही मार्ग नाहीत का? असू शकतात. कामावर सहकर्मचारी असतातच. त्यातले काही मित्र-मैत्रीण असतील तर त्यांच्याशी संपर्क हा एक मार्ग आहे. संगीताची आवड असेल तर आवडतं संगीत ऐकणं सहजप्राप्य आहे. आपला छंद जोपासणं हा एक मार्ग आहे. कित्येक कंपन्यांमध्ये समछंदी लोक एकत्र येऊन वेगवेगळे उपक्रम राबवताना दिसतात. समाजसेवा हा काहींकरता आनंदाचा मार्ग असू शकतो.
नवीन संशोधनातून कंपन्यांच्याही हे लक्षात आलेलं आहे की फक्त पगार देऊन भागत नाही. कर्मचाऱ्यांची मनोवृत्ती आनंदी असेल तर त्याचा कंपनीच्या कामगिरीवर सकारात्मक परिणाम होतोच. म्हणून कंपन्या कर्मचाऱ्यांना आवडेल असं जेवण पुरवतात (इतरही कारणं आहेत त्या मागे), ऑफसाईट्स करतात, भेटवस्तू देतात, बोनस देतात, पारितोषिकं देतात.
पण मग माझा आनंद असा दर वेळी कंपनीच्या ताब्यात असणार का? ते ही काही गरजेचं नाही. थाॅमस कार्लाईल एकदा म्हणाला होता, “ज्याला मनासारखं काम सापडलंय तो अनुग्रहित आहे. इतर कुठला आशीर्वाद मागायची त्याला गरज नाही.” मनाजोगतं काम मिळवणं, आपल्या शक्ती वापरून त्यात नवनवी क्षितिजं पादाक्रांत करणं, सतत नवीन शिकत राहणं यातनं मिळणारा निखळ आनंद आपल्या हातात असतो आणि तो जोपासणंही!
- नितीन मोरे
Oxytocin... learnt something new. Thanks. छान लेख.
उत्तर द्याहटवाmastach!!!!
उत्तर द्याहटवाकाल ‘अमुक-तमुक’ ह्या कार्यक्रमाचा पहिला भाग यू-ट्यूब वर बधितला आणि त्यातली माहिती राजश्री ला सांगत होते तेव्हा तिनी हा तुमचा लेख वाचायला दिला 👌👌👌
उत्तर द्याहटवा