भीतिची दुनिया

ऋतुगंध ग्रीष्म वर्ष १३ अंक २

कधी पासून असते? अहो ही तर अगदी लहान पणापासून...कशी? कोणी? कुठे? कधी? हो हो सांगते. हिचं अस्तित्व... हम्म्म....तसं बघा अगदी आई, बाबा, आजी, आजोबा, बहीण- भाऊ, शिक्षक, मित्र, कुणाकडूनही अन् कुठल्याही रुपात. प्रत्येकात असतेच असते. कधी सुप्त स्वरूपात तर कधी अचानकपणे जाणवते. हिचं वास्तव्य प्रत्येकात. म्हणाल चर्चा कुणावर चालली आहे? अहो, ही आहे सर्व परिचित, सर्वांची नावडती, “बिनबुलाये मेहमान” सारखी, सर्व वयोगटात वास्तव्य करणारी, अगोचर, जशी येते तशीच कधीही परतीच्या वाटेवर सहज जाणारी ..."भीती".

कितीही युगं बदलली तरी तिचं अस्तित्व अबाधित राहिलंय. "भित्यापोटी ब्रम्हराक्षस" म्हण तंतोतंत खरी करून दाखवते. लहानपणी शाळेत जेव्हा रिक्षातून जायचो तेव्हा जागेसाठी रोज वाद व्हायचे. आईनी कितीही समंजसपणे वागायचे सांगितले तरी प्रत्येक दोन दिवसांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव व्हायची अन् मग मन बंड पुकारून भांडणाला सुरुवात व्हायची. मग काय घरी आईला कळलं तर? घरी मोठी बहीण म्हणून कधीतरी आई धाकट्या बहिणींची ताई म्हणून काळजी घ्यायला सांगायची. खूप आवडायचं; पण कधीतरी आपल्या मैत्रिणींमध्ये त्या नको वाटायच्या. आईकडे तक्रार करतील ह्या भीतीने त्यांना कसं बसं आपल्यात खेळवतांना किती म्हणून कंटाळा यायचा! आठवलं की आजही हसू येतं.

शाळेत एखादी वही हरवली किंवा पेन पेन्सिल हरवलं की आईला किती अन् कसं सांगायचं ही भीती; पण कालांतराने जाणीव झाली की आईला-बाबांना जर खरं खरं सांगितलं तर ते आपल्याला न रागावता समजून घेतात. मग काय त्यांची वाटणारी भीती गेली! त्यांच्यासोबत मैत्रीचे नाते सुरू झाले; पण मला नाही वाटत की सर्व जण आपल्या आई बाबांना सगळचं सरळ सरळ सांगतात. तसा हा मोठा चर्चेचा विषय होऊ शकतो.

शाळेसमोर एक बोरंवाली आजी उकडलेली बोरं घेऊन बसायची. ती बघितली की तोंडाला पाणी सुटायचं! तसं ते आजही आठवण काढली की सुटतयं. ती इच्छा अपुरी राहिली ती राहिलीच. कारण तब्येत खराब होईल ही भीती! किती अन् काय काय सांगू? सर्व गोष्टी एका मर्यादेत राहून करायच्या; कारण कोण काय म्हणेल अशी भीती. सतत ती सावलीसारखी मागे असतेच. कुणी काहीही म्हणा, ती आपला पाठलाग वेगवेगळ्या मार्गांनी करतेच.

आज-काल तर तिचं स्वरूपच बदलले आहे. कदाचित ही आजच्या काळाची गरज झाली आहे. स्वच्छंदपणे वागायला जिगरा लागतो, लोक काय म्हणतील ह्यातच माणूस अडकून पडतो, वरुन एखाद्या व्यक्तीचा असा प्रभाव असतो की दडपणा खाली येऊन इच्छा असूनही मनासारखं वागता येतं नाही. ही भीती नाही तर अजून काय? भितीपोटी चांगुलपणाचा मुखवटा घालून मिरवणारे सर्वत्र मिळतील. स्वतःचे वर्चस्व कमी होईल ह्या भितीपाई दुसऱ्याला कमी लेखणे, दुसऱ्याला बदनाम करणे, स्वतःचा दबदबा कायम रहावा म्हणून माणुसकीचा गळा दाबून गलिच्छ राजकारण खेळणे, रूढी, चालीरीती, परंपरांना पाहिजे तेव्हा पाहिजे तसे वापरायचे, का तर आपली इमेज खराब व्हायची भीती.माणुसकीचे बोल ऐकवणारा कितपत खरा आहे जाणून घ्यायचे असेल, तर तुमच्या अडचणीच्या प्रसंगात त्याला पाहा. दूध का दूध पानी का पानी हो जायेगा. माणसांत घर करुन असलेली भीती कधी ना कधी आपला हक्क दाखवतेचं.

पण काही काही ठिकाणी हिचं अस्तित्व गरजेचं असतं. जसं कलाकारांना स्टेजवर कला सादरीकरणाआधी वाटणारी भिती, लेखकाला त्याची शैली लोकांना आवडेल का नाही ह्याची वाटणारी भीती, जी आत्ता मला जाणवतेय बरं का ! अतिआत्मविश्वास नेहमीच घातक असतो, त्यामुळे ह्या ठिकाणी हिचं अस्तित्व मान्य आहे. परिक्षेआधी अभ्यास झाला असूनही वाटणारी भीती, स्वयंपाकात तरबेज असूनही पाहुणे काय प्रतिक्रिया देतील? ही गृहिणीला वाटणारी भीती, नवीन नवरीच्या भीतिचं स्वरूप तर काही निराळंच असतं. आजकाल पालकांना मुलांना मिळणाऱ्या वाढत्या ज्ञानाची भीती जाणवतेय, छोटी छोटी मुलं जेव्हा सराईतपणे इंटरनेटचा वापर करतात तेव्हा अप्रत्यक्षपणे एक विशिष्ट प्रकारची भिती पालकांच्या मनात घर करून राहिली आहे. 

पण खरचं का हिचं साम्राज्य एवढं महत्वाचं आहे? जर वर्तमान काळात जगायचं निश्चित केलं तर हिच्या वास्तव्याला जागाचं नसणार हे माहित असूनही माणूस अप्रत्यक्षपणे हिच्यात गुरफटलेला असतो. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंध जोडून हिच्या काल्पनिक दुनियेत आपले तारे तोडत सावधपणे वागण्यातून धन्यता मानतो.

-नंदिनी नागपूरकर

1 टिप्पणी: