निरोप

ऋतुगंध शिशिर वर्ष १२ अंक ६

जंगलात हत्ती नेहमी कळपाने राहतात सर्वात शक्तिमान गटप्रमुख असतो.सारे निर्णय तो घेतो.म्हातारा होऊन शेवट जवळ आला आहे हे लक्षात आल्यावर तो सर्वांचा निरोप घेतो आणि विरुद्ध दिशेने चालायला सुरुवात करतो.सद्गदित झालेले सर्व तो दिसेनासा होईपर्यंत त्याच्याकडे पाहत राहतात पण एकदाही मागे वळून न पाहता तो निघून जातो. हे जेव्हा मी वाचले होते , तेव्हा निशब्द झाले होते.डोळ्यात पाणी आले होते , की काय त्यांची मनस्थिती असेल , जाणाऱ्याची अन बाकीच्यांची. किती दिवस चैन नव्हते , मृत्यू असा कळतो ?

लग्न होऊन या घरी आले नि हळूहळू आजेसासूबाईंबद्दल कळले तशी अवाक झाले.सरस्वती नावाची हि करारी स्त्री अल्पशा तापाचे निमित्त होऊन अकाली झालेल्या पतिनिधनानंतर पनवेलवरून मुंबईला भावाच्या आग्रहावरून आली , मुलाच्या शिक्षणासाठी.ही गोष्ट आहे १९२० सालची.पदरी तीन मुले, मोठी १३ वर्षे, मुलगा ९ वर्षे व धाकटी ४ वर्षे ! अत्यंत प्रेमाने आणि कर्तव्यबुद्धीने भावाने तिला आपल्याकडे आणले आणि आधीच १२ माणसे रहात असलेल्या गिरगावातील चाळीत आणखी ४जणांची भर पडली.सरस्वतीबाई घरात शिरल्या त्या थेट स्वयंपाकघरात. १४-१५ वर्षे अन्नपूर्णा झाल्या. मुलींची लग्नें केली, मुलाला शिकवून स्वतःच्या घराचे स्वप्न दाखविले. स्वयंपाकघरातूनही बाहेरच्या जगातील घडामोडीबद्दल सजग असणारी अतिशय व्यावहारिक स्त्री ! १९४७ साली परप्रांतीय येऊन मिळेल त्या किंमतीत मुंबईत जमिनी घेऊ लागले तेव्हा , आत्ता नाही तर जमीनच उरणार नाही घ्यायला काही वर्षात , हे मुलाच्या मनावर बिंबविले.त्यावेळी पार्ल्यात भावाकडे रहात असल्याने , त्यावेळी जंगल असलेल्या ठिकाणी छोटीशी जागा घेतली, व जमेल तसे हळूहळू प्रथम चार खोल्या , मग एक असे करत दोन मजली घर उभे केले आणि अर्थप्राप्तीसाठी तळमजला नि पहिला मजला भाड्याने दिला.पण त्यावेळी घराला प्रवेशद्वार करतांना , मोठ्ठे ठेव , माझा नातू गाडी घेईल, हे आवर्जून सांगितले.

घरात पाच नातवंडे आली, शिवाय माणसे भरपूर होती घरात. चुलत वहिनीस आश्रय, काही पुतणे .भाचे शिक्षणासाठी ,आणि मुंबईला हक्काचे घर उतरण्यासाठी म्हणून कायम माणसांचा राबता..रोजचा स्वयंपाक २०-२५ जणांचा . कठीण दिवसात मिळालेली मदत, घर कधीच विसरल्या नाहीत , आता आपण करायचे हे तत्व. वरकामाला बायका होत्या पण स्वयंपाक घरातील स्त्रियाच करावयाच्या यांच्याबरोबर नि सर्वांचे झाले की यांचा सोवळ्यातील स्वयंपाक ! अशातच सुनेचे निधन झाले आणि पाच नातवंडांच्या आजी दुःख्ख बाजूला सारून ठामपणे उभ्या राहिल्या.मोठा नातू , सुरेश उपवर झाल्यावर दूरच्या नात्यातील मुलीलाच मागणी घातली नि झोकात लग्न केले.त्याच आमच्या शशीवहिनी ! २१ वर्षांच्या कोवळ्या तरुणीवर एकदम २०-२५ जणांचा कुटुंबकबिला सांभाळण्याची जबाबदारी आली.शिवाय शिक्षिकेची नोकरी.पण आजीबाई सदैव तत्पर..तिलाही तयार केले आणि मायाही भरपूर केली.शाळेतून आल्यावर तिच्या शेजारी बसून गरम खाण्याचा आग्रह करीत.काही वर्षातच नंदकुमार व विजय या दोघांचे एकाच मांडवात लग्न झाले .नातीचेही लग्न करून दिले. आता, तीन नातसूना, आणि १५-२० माणसे येऊन जाऊन रोजच.पण सारे काही गोडीने चालले होते. पणतू झाले नि पणत्याही !! पणतू ची मुंज झाली आणि एक दिवस आज्जीनी मिटिंग च घेतली साऱ्यांची आणि आत्ता गोडीने चालले आहे तोवरच वेगळी बिऱ्हाडे करा तीही माझ्या डोळ्यादेखत हे निर्णयात्मक सांगून साऱ्यांचे संसार थाटून दिले.

आजारपणे आली , गेली. अगदीच नाईलाज झाला की आणायचे औषध , तेही डॉक्टर व्होरा यांच्याकडूनच.८५ उलटून गेली तरी जमेल तसा सोवळ्याचा स्वयंपाक करायचा नि खायचं.त्याला पर्याय नाही.मीही सोवळे नेसून करते असे शशीवहिनींनी सांगितले कितीवेळा पण नाही म्हणजे नाहीच !!

उलट मूड आला की त्यांनाच द्यायच्या , " घे गं, चव बघ कसे केलंय,बरंय की नाही ?"

आयुष्यात नानाविविध अनुभव घेतलेल्या, अनेक मृत्यू ,अगदी मुलीचे वैधव्याही पाहिलेल्या , स्पष्ट आणि ठाम विचाराच्या सरस्वतीबाई एक दिवस थोड्या आजारी झाल्या . वय वर्षे ८६ ! त्याही अवस्थेत सोवळ्याचा स्वयंपाक केलाच.डॉक्टरांना बोलावयाचे तर डॉ. व्होराच हवेत, ते तर नव्हते पार्ल्यात,तर डॉक्टर झालेला भाचा आला तरी त्याच्याकडून तपासून घ्यायचे नाकारले.उलट मुलाला सांगितले ,मी यातून उठणार नाही, मुलींना घेऊन या आणि साऱ्या नातवंड , पतवंड यांना लगेच यायला सांगा.काही तासातच सारे आले.पेणला राहणाऱ्या यमुताईंना वेळ लागला तेवढाच.डॉक्टर व्होराही निरोप मिळून बाहेरगावाहून आले. त्यांनी तपासले, B .P . चेक केले , ठीक होते. (पण आजी दोन दिवस सारख्या म्हणत होत्या , ही अमावस्या टळली तर अजून दोन वर्षे जगेन,कारण याच अमावत्सेला त्यांचे दोन भाऊ दोन वर्ष्यांच्या अंतराने स्वर्गवासी झाले होते.मात्र सकाळपासून आली वेळ हाच धोशा होता.)डॉक्टर जाण्यास निघाले तर आजींनी सांगितले ,"व्होराला जाऊ देऊ नका.मी आज जाणार.लगेच परत यायला लागेल.उगाच जा जा ,ये ये नको.सारे अवाक.डॉक्टर( वय वर्षे ८५ ) इतक्या वर्षांचे साऱ्या घराण्याचे डॉक्टर , घरच्यासारखेच , थांबले.

आता आजी व्यवस्थित आराम सदृश खुर्चीत बसल्या होत्या.भोवती सारी नातवंडे , नातसुना,सारे पणतू , पणत्या, मुली व त्यांची मुले , नातवंडे ,भाचे , भाच्या, सारे सहृद .! आजींनी बोलायला सुरुवात केली .जगरहाटी, कसे गुण्यागोविंदाने रहा,एकमेकांशी संबंध ,नाती कायम जपा,कितीही कामात व्यस्त असाल तरी सण,कार्याला एकत्र जमा , एकोपा राखा.नातवांना खास उपदेश , नोकरी ,धंदा उत्तम करून नाव कमवा,चार पैसे गाठीशी राखा इ.नातसुनांना ही खास उपदेश.स्वयंपाकाच्या सूचना , आवडीनिवडी जपा ,तिखट जास्त खाऊ नका, मूळव्याध होते इथपासून अगदी लोणी गार पाण्याच्या कपाटात ( फ्रीज. शेवटपर्यंत त्यांनी त्याला गार पाण्याचे कपाटच म्हटले.) ठेवता , तर रोज पाणी बदलत जा.....इतपर्यंत सूचना.मग पणतू , पणत्या ......उत्तम शिका. त्याशिवाय काही राम नाही. उत्तम नावलौकिक मिळवा आणि अडल्यानडल्यांच्या उपयोगीही पडा.मग प्रत्येकाशी बोलल्या , अगदी नाव घेऊन .सारे बोलून झाल्यावर काही वेळ शांत बसल्या.मग डॉक्टरांशी बोलल्या आणि शेवटी मुलाशी ! भोग भोगले , पण आता सारे बरे आहे, काळजी नाही, मी आता आनंदात आहे......अशा तऱ्हेचे. आणि शेवटी म्हणाल्या , "अरे , ती गंगा ठेवली आहे ना देवघरात , आण ती, फोड आणि घाल माझ्या तोंडात आत्ताच. मेल्यावर घालून काय उपयोग ? गंगाजल घेऊन प्राण जाऊ देत. " भाऊ तांब्याचा तो छोटा कलश घेऊन आले , देवघरातून .

" हं, फोड रे ".....

सील तोडून भाऊंनी गंगाजल आजींच्या मुखात घातले.आजींच्या चेहऱ्यावर हास्य आले, "मी समाधानी आहे " असे म्हणून हात जोडले नि डोळे मिटले. 

भावनाविवश सारे , स्तब्ध बसले,वाट बघत की त्याही भावनाविवश झाल्या असतील, काही क्षणानंतर उघडतील डोळे नि बोलू लागतील मनातले पुन्हा. सेकंद काटा पुढे सरकत राहिला. भाऊंनी डॉक्टरांकडे पाहिले.त्यांनी तपासले , पुन्हा एकदा आणि सद्गदित अंतकरणाने मन हलवून हॉलच्या बाहेर पडले. 
काही तासांपूर्वीच अमावस्या सुरु झाली होती आणि आजी शांत झोपलेल्या दिसत होत्या , चेहऱ्यावर स्मितहास्य आणि समाधानाचे भाव लेवून !!


मनोगत : वर लिहिलेल्या आठवणी / अद्भुत प्रसंग मी लग्न होऊन या घरी आल्यावर शशीवहिनींकडून ऐकला होता. यावेळी महाराष्ट्र मंडळाकडून निरोप हा विषय आल्यावर खूप प्रसंग आठवले अगदी माझ्या नोकरीचा शेवटचा दिवस, आई वडिलांना दिलेला अग्नी , देश सोडतांना...इ इ. आणि अचानक वरील प्रसंग आठवला. पण खूप पूर्वी ऐकला असल्याने, in details लक्षात नव्हता.घरी पाहुणे मंडळी तरी शशीवहिनींना फोन केला १५ feb ला आणि हा विषय सांगून त्यावर लिहावेसे वाटत असल्याचे सांगितले.शशीवहिनींनी सारी माहिती दिली इतकी की वरच्या प्रसंगातील शब्द्ध त्यांचे , लेखणी फक्त माझी.मी त्यांना म्हटलेही , १५/२० दिवसात प्रकाशित झाला की पहिला तुम्हाला पाठविते.त्या नंतर ही त्या खूप जुन्या आठवणीत रमल्या , खूप गोष्टी share. केल्या.खूप गप्पा झाल्या आमच्या या निमित्ताने. आणि काय सांगू , दुर्दैवाने त्या १९ तारखेस तब्बेत बिघडून हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाल्या.ICU मध्ये.आणि ,आणि २६ तारखेस त्यांचे निधन झाले. आजही सारे शोकाकुल आहेत आणि मला काल पुन्हा MMS च्या लेखाची आठवण झाली. मी शशीवहिनींना यावर लिहीन म्हणून सांगितले होते.लगेच निरंजन यांच्याशी संपर्क साधला व फक्त उशीर झाला पण लिहू का असे विचारले.बाकी काहीही न सांगता. त्यांनी मोठ्या मनाने दोन दिवस दिले, म्हणून लिहून , type करून पाठवू शकले.एका वेगळ्या मनस्थिती त लिहिलेला हा लेख शशीवहिनींना अर्पण आणि निरंजन आणि टीम ला मनःपूर्वक नमस्कार . त्यांच्या या विषयामुळे शशीवहिनींशी काही दिवस आधी (हे शेवटचे याची अजिबात कल्पना नाही )मनसोक्त गप्पा झाल्या ज्या माझ्यासाठी आयुष्यभर लक्षात राहतील.निरोपाच्या नसूनही शेवटच्या ठरल्या.

- नीला बर्वे


२ टिप्पण्या:

  1. नीलाताई
    खूप सुंदर लिहिला लेख. शशीमावशी डोळ्यासमोर उभ्या राहिल्यात. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली.
    यशवंत

    उत्तर द्याहटवा