नमस्कार,
सर्वप्रथम ग्रेगरियन नववर्षारंभानिमित्त आमच्या वाचकांना हार्दिक शुभेच्छा! हे वर्ष आपणास सुखसमृद्धीचे व संकल्पसिद्धीचे जावो ही प्रार्थना.
हा हा म्हणता २०१८ संपले आणि २०१९ लागले. काळ झपाझप फिरत असताना आयुष्याच्या धबडग्यातून दोन क्षण उसंतीचे काढून मागं वळून थोडं स्वत:वर, थोडं जगावर हसता आलं पाहिजे; म्हणून विनोद विशेषांकाची संकल्पना मांडली होती. खरं म्हणजे आजच्या सत्योत्तरी जगात रोजच्यारोज अनेकानेक अभूतपूर्व गमती-जमती घडत आहेत आणि सामाजिक माध्यमे गमतीदार मीम्सनी ओसंडून वाहात आहेत. ह्या अशा वातावरणात अनेकांना सद्यपरिस्थितीवरची प्रहसने सुचत असतील आणि ती प्रहसने ऋतुगंधसाठी पाठवली जातील अशी फार आशा होती; परंतु अशी काही प्रहसने आली नाहीत. थोडी निराशा झाली असली तरी मराठी माणसांच्या धुमसणाऱ्या, धुमारणाऱ्या, धो-धो वाहणाऱ्या वगैरे सर्जनशक्तीला वाव देण्यासाठी तब्बल बारा वर्षे ऋतुगंध चालू आहे आणि असेच पुढे कैक वर्षे चालू राहील ह्यात समाधान आहे. ह्या अनावर सर्जनशक्तीला वारंवार आवाहन करून, जागवून साहित्यथेंब शोधून गोळा करण्याचे काम श्री. यशवंत काकड न थकता करतात म्हणून त्यांचे विशेष आभार आम्ही मानतो. त्याचबरोबर मुखपृष्ठासाठी ऐनवेळी छायाचित्र दिल्याबद्दल सौ. राजश्री लेले यांचेही अनेक आभार मानतो.
ह्या अंकात काही लेखक-कविंनी दिलेल्या विनोदी साहित्याबरोबरच काही गंभीर लेखन अंतर्भूत आहे व शिवाय “सिनेसफर” आणि “कवि शब्दांचे ईश्वर साकारताना” ही दोन लोकप्रिय सदरेही आहेत.
नेहमीप्रमाणेच आपल्याला हाही अंक आवडेल अशी आशा. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवण्यास विसरू नका!
धन्यवाद.
सस्नेह,
ऋतुगंध समिती.
कृपया आपला सिंगापूरचा पत्ता व फोन नंबर मिळेल का . बेळगावहून माझे मित्र तिकडे पोचताहेत . कांही हवे असल्यास कळवा . किशोर मधुकर काकडे 9449858618
उत्तर द्याहटवा