जिव्हाळा

ऋतुगंध वसंत वर्ष १३ अंक १

प्रेम,जिव्हाळा,भूतदया यावर लिहायचा विचार केला आणि मनात उलट सुलट विचारांचा गोंधळ उडाला नुसता . खरंच मानवी मन ही एक अजब पोतडी आहे, त्यात एकावेळी अनेक विचार खच्चून भरता येतात हे परत एकदा पटलं. 

पोत्यातून प्रेमाचं एकेक रूप बाहेर काढत गेले तर त्याची किती रूपं सापडली म्हणून सांगू ? आईवडील मुलं, प्रियकर प्रेयसी, आजी ,आजोबा ,नवरा बायको भाऊ बहिण व काका, मामा , आत्या असे इतर नातेवाईक. तसंच माणसांचं प्राण्यांवर ,पक्ष्यांवर ,निसर्गावर ,झाडांवर ,फुलांवर कितीतरी प्रेमाची रूपं. राधेचं किंवा मीरेचं श्रीकृष्णावर केलेलं प्रेम, ते तर अगदी आगळं वेगळंच होतं . आणखी काही प्रेमाची रूप म्हणजे आपल्या देशावर असलेलं आपलं प्रेम आणि आपल्या देवावर असलेलं प्रेम .

आईवडील आणि मुलांचं प्रेम इतकं निस्सीम असतं की त्यात कसलीही अपेक्षा नसते. मुलांसाठी कोणताही त्याग आणि कष्ट सहन करण्यात आईवडील आनंदच मानतात . त्यांच्या जीवनाचं एकच उद्दिष्ट असतं, मुलं मोठी होऊन खूप शिकावी, स्वतःच्या पायावर उभी रहावी .त्यांनी स्वच्छन्दपणे आकाशात भरारी घ्यावी .उडताना मागे वळून पाहायची वेळ त्यांच्यावर येऊ नये .मुलं परदेशात गेली तरी आई वडीलांची तक्रार नसते . आपल्याला एकटं , त्यांच्यापासून वेगळं ,दूर राहावं लागलं तरी, मुलांचं भलं होतंय ना म्हणून तेही आनंदात रहातात . खरंतर म्हातारपणाची काठी म्हणून गरज असते मुलांची त्यांना, पण आपल्या गरजेसाठी मुलांना अडकवून ठेवत नाहीत ते केवढं निःस्वार्थी प्रेमाचं रूप . 

तसेच एखाद्या परोपकारी ध्येयावर केलेले प्रेम. सिंधूताई सपकाळांचंच उदाहरण घ्या ना. अनाथ मुलांवर प्रेम करून, त्यांची खरी आई नसून सुद्धा आईसारखं प्रेम देऊन त्यांना मार्गाला लावणं, तेसुद्धा पैशाची चणचण असताना, यालाच निःस्वार्थी प्रेम नाही का म्हणत ? 

नवरा बायको मधील प्रेमाचीही जगात अनेक उदाहरणे दिसतात , त्यातील काही उत्तम उदाहरणे म्हणजे आनंदी आणि गोपाळ जोशी , प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे. ह्या दोन्ही स्त्रियांनी नवऱ्याची आवड पूर्ण व्हावी म्हणून स्वतःच्या सुखाचा अजिबात हव्यास न धरता पतीची स्वप्ने पुरी करण्यासाठी सर्व आयुष्यभर कष्ट केले. कोणत्याही ऐषोआरामाची अपेक्षा न ठेवता. हे फक्त प्रेमामुळेच घडू शकतं नाही का ? यातून त्यांचं समाजाला सुखी करायचं स्वप्नही पुरं झालं. 

आजी आजोबांच्या,आपल्या नातवंडांवर असलेल्या प्रेमाला तर तोडच नाही. म्हणून तर नातवंडाला दुधावरची साय असं म्हटलं जातं.स्वतःची मुलं लहान असताना वेळ कमी असतो पण नातवंडं झाली की आजी आजोबांकडे वेळच वेळ असतो त्यामुळे त्याला पाठीवर बसविणे,घोडा घोडा खेळणे ह्या गोष्टी पाठ दुखत असतानाही आजोबा आनंदाने करतात म्हणूनच दुधापेक्षा त्यावरची साय जास्त प्रिय असते असं म्हणतात .त्या वयातही आपल्याच बालपणात परत गेल्यासारखं वाटतं त्यांना . 

वीर सावरकर , शिवाजी महाराज यांचं देशावरचं प्रेम ,आपल्या सैन्यातील सैनिक आपले कुटुंब सोडून लढायला जातात, जिथे प्राणाला मुकायचीही शक्यता असते आणि त्यांची कुटुंब त्यांना जायला विरोध करत नाहीत. ह्या देशप्रेमाला खरंच वंदन करावंसं वाटतं . 

आपल्या सगळ्या संतांचं देवावरचं प्रेम,संत तुकाराम,चोखा मेळा,जनाबाई कितीतरी उदाहरणं सापडतात आपल्याला, ज्यांनी संसारात अलिप्त राहून आपला देश आणि देवभक्तीत आयुष्य व्यतीत केलं , 

अशी कितीतरी प्रेमाची उदाहरणं ह्या जगात आहेत ज्याचं वर्णन करायला माझे शब्द अपुरे आहेत. 

हे प्रेम फक्त माणसांमध्ये असतं असं नाही बरं का . 

प्राण्यांमध्ये पण ते दिसतं . परवा एक गोष्ट वाचली आणि हे पटलं. गोष्ट अशी होती ,जपान ह्या देशात घरांच्या भिंती लाकडाच्या आणि पोकळ असतात, हे आपल्याला माहीतच आहे लाकडात अनेक ठिकाणी लहान मोठे खिळे असतात. एकदा एका अर्धवट पडलेल्या भिंतीत एका माणसाला एक पाल अडकलेली दिसली .जिवंत होती पण तिच्या एका पायात बारीकसा खिळा घुसल्यामुळे तिला हलता येत नव्हतं . घर बांधून दोन वर्ष झाली होती. त्या माणसाला प्रश्न पडला कि दोन वर्ष ही पाल जागची हलली नाही तर जिवंत कशी राहिली ? त्याला खूपच उत्सुकता वाटली म्हणून त्याने तिच्यावर बराच वेळ लक्ष ठेवले आणि आश्चर्य वाटेल असे दृश्य त्याला दिसले .दुसरी एक पाल तिथे येऊन तिला खाणे पुरवत होती असे दृश्य . डोळ्यावर विश्वासच बसेना त्याचा . त्याच्या कल्पनेप्रमाणे तो त्या पालीचा जोडीदार असावा, ज्याने तशा परिस्थितीत दोन वर्षे खाणं भरवून जिवंत ठेवले होतं तिला . त्या माणसाने तो खिळा हळूच काढला आणि पाल निघून गेली. दोन वर्ष सेवा केल्याचं फळ तिच्या जोडीदाराला दिल्याचं समाधान वाटलं त्याला. 

लहानपणापासून माझ्या संपर्कात बरेचदा कुत्रा,मांजर गाई ,म्हशी हे प्राणी आले. हे प्राणी अत्यंत निःस्वार्थीपणे प्रेम करतात असं मला नेहमी वाटतं. वाटतंच नव्हे,तर तसा मी अनुभवही घेतलाय. आपण त्यांना एकदा लळा लावला की आयुष्यभर ते नक्कीच लक्षात ठेवतील. 

आम्ही एकदा एका ओळखीच्या मावशींकडे गेलो होतो. त्यांच्याकडे घरी टॉमी नावाचा कुत्रा होता ( सॉरी, त्याला कुत्रा नाही हं म्हणायचं, असं त्यांनी आम्हाला शक्य तेवढं आवाजात मार्दव आणून सांगितलं होतं )

का ? ते थोड्या वेळाने समजलं आम्हांला . त्यांना मुलबाळ नव्हतं पण ते कुटुंबं टॉमीवर मुलासारखंच प्रेम करत होतं. टॉमीला घेऊन थोड्या वेळाने चक्कर मारायला आम्ही बाहेर पडलो .टॉमीने आपले विधी बाहेर उरकले आणि घरी यायची वेळ झाली तर टॉमीचा काही घरी यायचा मूड नव्हता . मग मावशी बाई म्हणू लागल्या , "चल टॉमी, घरी जायची वेळ झाली ,अंधार झाला बघ राजा .ममा घरी चालली बरं का ! 'पपा पण घरी आले असतील, तुझी वाट पहात असतील . तू एकटा बाहेर राहिलास तर भिती वाटेल हं तुला . 

खरं सांगू का ,मला त्यांची ही जगण्याची पद्धत आवडली . मुलबाळ नाही म्हणून रडत नाही बसल्या त्या .त्यांनी टॉमीला प्रेम दिलं आणि त्याची कंपनी एन्जॉय करत आहेत आणि सुखात आहेत. एक मात्र खरं की त्या टॉमीला जेवढं प्रेम देतील त्याच्या कितीतरी अधिक पटीने तो त्यांच्यावर माया करेल . हेच प्राण्याचं ,पक्ष्यांच वैशिष्ट्य असतं . म्हणून मलासुद्धा त्यांच्यावर माया करावीशी वाटते 

कुत्रा मांजर घरी पाळावे त्याचे लाड करावे असे मलासुद्धा नेहमी वाटते .पण आपण बाहेरगावी गेलो तर त्याचे सर्व कोण करणार हा मोठा प्रश्न असतो . पोपट ,कबुतर लव्ह बर्ड्स ,मासे पाळणे काही माझ्या मनाला पटत नाही. आपल्या आनंदासाठी त्यांचे स्वैर उडण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेऊन का बरं त्यांना पिंजऱ्यात कोंडायचे ?.मला नाही पटत ते. 

पण एकदा नाईलाजास्तव मला पक्षी घरी पाळावा लागला. 

त्याचं असं झालं ,साधारण दोन वर्ष झाली असतील या गोष्टीला . आम्ही दोघं, संध्याकाळी वॉक ला बाहेर पडलो . आणि पाहतो तर एक पांढरं कबूतर रस्त्याच्या मधोमध बसलेलं दिसलं. प्रथम लक्षात आलं नाही त्याला काय झालंय ते, पण नंतर कळलं कि त्याला उडता तर येतच नाहीये पण चालताही येत नव्हतं. पण जिवंत होतं ते. आम्हाला काळजी वाटू लागली, कारण रस्ता खूप रहदारीचा नसला तरी मधूनच एखादी गाडी जात होती . आता जर गाडी आली आणि ते उडू शकले नाही तर ते नक्की मरणार होते. पटकन समजेचना काय करावं ते. आणि तेवढ्यात खरंच समोरून गाडी आली . आता तरी ते जिवाच्या आकांताने बाजूला होइल असे वाटले .पण नाही, त्याला शक्यंच नव्हत तें .आम्ही गाडीला हात दाखवून थांबायला सांगितले .गाडीवाल्याला वाटलं ते उडून गेलं असेल. मग हे थांबायला का सांगत आहेत? ड्राइव्हर सिंगापोरियन असल्यामुळे, एक आठी आलीच चेहऱ्यावर त्याच्या. पण त्याची पर्वा न करता मी कबुतराजवळ गेले, पण पुढे काय ?असा मला प्रश्न पडला, आत्तापर्यंत कधि कबुतराला हात लावायची वेळ आली नव्हती .पण हात नसता लावला तर ते नक्की मेलं असतं कुठल्यातरी गाडीखाली रात्र झाल्यावर .म्हणून जरा धीर केला आणि त्याला उचलून बाजूच्या झाडापाशी आणून ठेवलं पटकन .आत्ता तर याचा प्राण वाचवला आपण. पण पुढे काय ?अंधार होऊ लागला होता. एखाद मांजर नाहीतर कुत्रा येऊन त्याला रात्री मारणार हे नक्की होतं आता याचं पुढे काय करावं हा मोठाच प्रश्न होता पण आम्ही ठरवलं होत की एकदा प्राण वाचवलाय आता काही झालं तरी त्याला मरू द्यायचं नाही. त्याचा जीव वाचवायचाच. 

घरात एक छोटासा टब होता प्लास्टिकचा, तो आणला आणि त्याला त्यात ठेऊन घरी घेऊन आलो . कमीत कमी घरात ते सुरक्षित तरी होतं 

पण आता प्रश्न असा होता कि याला खायला काय द्यावे ? बाहेर कबुतरं काहीतरी खाताना नेहमी दिसतात पण कोणतं धान्य खातात हे कुठे माहित होतं ? त्याच्यासमोर तांदूळ ,गहूं वगैरे टाकून पाहिलं ,पण ते तोंड लावेना. मग आपले गुगल बाबा आठवले ,म्हटलं त्यांनाच विचारावं आणि गुगल बाबा उपयोगाला आले . त्यावर लिहिले होते की कबुतरांना बार्ली हे धान्य आवडते. नशिबाने घरात थोडी बार्ली होती. ती त्याच्या समोर टाकली तर त्याने पटापट खायला सुरुवात केली. त्याला खूप भूक लागली होती असं जाणवलं . मलाही बरे वाटले. त्यानंतर पाणी त्याच्या समोर ठेवले. तेही त्याने संपवले चला,आता त्याच्या खाण्यापिण्याचा प्रश्न तरी मिटला होता.त्याला घरी आणल्यावर आमच्या लक्षात आलं की त्याच्या पंखाला इजा झाली आहे . त्याच्या जिवावर आलं होतं पण पंखावर निभावलं होतं. 

एक दोन दिवसात त्याचा पंख बरा होईल व ते उडून जाईल असं वाटलं होतं आम्हाला . मी खाणे व पाणी पाजायचे काम चालू ठेवले. टब मध्ये आम्ही रोज वर्तमान पत्राचा कागद घालत होतो. खराब झाला कि बदलायला ते सोपे जात होते. दरवेळी टबमधून बाहेर काढताना ते विशिष्ट आवाज करी, त्याला हात लावलेला आवडत नसावा. पण माझाही काही इलाज नव्हता. माझ्या मनात विचार आला की मी याला मरताना वाचवलय आणि हात लावल्यावर नाराजीचे आवाज का काढतोय हा? पण त्याच्या बुद्धीचा विचार करून माझा ' मी ' मी बाजूला ठेवला व त्याला उडता कसे येईल या दृष्टीने विचार करू लागले. एक महिना झाला तरी त्याला उडता येईना.पण चार पाच दिवस झाल्यावर, टब मधून उडी मारून घरभर हिंडायला सुरुवात केली त्याने. आणि घरभर घाण करू लागले. त्याच्या ह्या मंदगतीने चाललेल्या प्रगती मुळे पुढे काय करावे काही सुचेना. आमची भारतात जाण्याची तारीखही जवळ येत होती. मग विचार केला कि आपल्या जवळच बर्ड पार्क आहे, तिथे जाऊन ,त्यांचा सल्ला घेतला तर ते काही मदत करण्याची शक्यता आहे. ताबडतोब जाऊन चौकशी केली तर तिथला अधिकारी म्हणाला, तुम्ही हा पक्षी ' बर्ड पार्क' ला डोनेट करा. आम्ही त्याच्यावर नक्की उपचार करू. आमच्याकडे पक्षांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर आहे.आम्हाला हे ऐकून बरे वाटले . नंतर आम्ही त्याला बर्ड पार्कला नेऊन सोडले . महिनाभर ते घरात राहिल्यामुळे आम्हाला त्याची चांगलीच सवय झाली होती ,त्यामुळे सोडताना मात्र खरंच वाईट वाटले . 

अशा प्रकारे माझ्या मनातील एखाद्या पक्षावर मुलासारखी माया करायची इच्छा पूर्ण झाली. आणि त्याचा जीव वाचवल्याचे समाधान मला मिळाले .त्यामुळे छान वाटले. तेंव्हापासून आम्ही जेंव्हा फिरायला जातो तेंव्हा वर उडणाऱ्या कबुतरांकडे बघतो व विचार करतो कि यात आपल्या घरी राहून गेलेले कबुतर तर नसेल ते वरून उडताना विचारेल,' काय म्हणताय मावशी? माझ्या लक्षात आहे, कसे मस्त गेले तुमच्या घरातले पाहुणचाराचे दिवस ते .आता पहा मी बरा झालो आणि छान उडू लागलोय. बाय , बाय चालू ठेवा तुमचा वॉक .' त्याला उडताना पाहून,आम्ही समाधानाने आमचा वॉक पुढे चालू ठेवतो... 

-स्नेहल केळकर
 


1 टिप्पणी: